परत येताना जम्मू स्टेशनवर तीन-चार मराठी जवानांचा घोळका होत. झेलम पकडायची होती त्यांना. सुट्टी नुकतीच मंजूर झाल्याने आरक्षण नाही. कुठे घुसायचे, कुठला दरवाजा अडवायचा यावर गप्पा चालू होत्या. आम्ही बाजूलाच उभे होतो, म्हटले जर खुशाली विचारावी… तर चकार बोलेनात. आणि बोललेच तर १-२ शब्दात उत्तर संपायचे. त्यांचा एक ‘सर’ पण तिथेच उभा होता. तो २-३ शब्द बोलला झाले. नंतर कळले की काश्मीर मध्ये राहून राहून असे होते. अनोळखी लोकांशी न बोलणे आणि सिव्हिलियन्स बरोबर गप्पा न मारणे अंगात मुरते म्हणे यांच्या. शेजारी जरी मारामारी चालू असेल तरी ढुंकून बघणार नाहीत म्हणे हे. आपली ड्युटी करत राहणार. चाललंय ते चालू दे. असे का? कश्मीरातला सामान्य माणूस भारतीय सेनेचा पराकोटीचा द्वेष करतो. त्यामुळे यांनी पण जास्त भांडण नको म्हणून तुम्ही तुमचे काम करा आम्ही आमचे करतो असा पवित्रा घेतला असावा… हा एक बोर्ड बघा – श्रीनगरमध्ये एका बागेच्या बाहेर लावला आहे – जवानांना तिकीटाशिवाय प्रवेश नाही. ऑपरेशन सद्भावना कसे चालवले कोणास ठाऊक.
आम्हाला पुलवामा बघायची इच्छा होती, पण एक माणूस म्हणाला तुम्हाला पाहिजे तिथे भटका पण हायवे सोडून जाऊ नका. आडरस्त्याची गावे म्हणजे कधी काय होईल सांगता यायचे नाही. आणि झालेही तसेच. ज्या दिवशी आम्ही तिथे जाणे अपेक्षित होते त्याच दिवशी जैश-ए-मुहम्मदचा कोणी अतिरेकी तिथे आला, २-३ ग्रेनेड्स फेकले, गोळाबारी झाली आणि मेला. कश्मीरला जायच्या आधीचा दिवस, पेपरात बातमी होती कि कोणी २-३ दहशतवादी मारले म्हणून. जम्मू-श्रीनगर प्रवासात लोकांच्या त्याच गप्पा चालू होत्या. म्हणे तो चांगला शिकलेला होता, इंजिनियर होता, त्या भागात आतापर्यंत कधी दहशतवादी निघाला नाही… वगैरे वगैरे. कोणीही मारला गेला या लोकांना पहिली शंका येते म्हणजे ते एन्काउन्टर असणार म्हणून, आणि एक निर्दोष कश्मिरी मारला गेला याचा कळवळा. खरे खोटे कोणास ठाऊक. एका मित्राला दल तलावात शिकारा चालवणारा म्हणाला होता – पुढच्या आठवड्यात मनमोहन आणि सोनिया येत आहेत – तेव्हा एक तरी घटना घडणारच – दोनचार कश्मिरी मरणारच – त्याशिवाय हे लोक हिम्मत दाखवून आले असे दिसेलच कसे? आणि झालेही तसेच. बहुतेक कश्मीरी लोक गेली ३० वर्षे कायकाय बघून कमालीची साशंक झालीयेत. तुम्ही काहीही सांगा, त्यांना त्यात काहीना काही गोम दिसते.
मागेच त्यांची एक मशीद जळून गेली. शेकडो वर्ष जुन्या मशिदी आहेत, लाकडाच्या आहेत. इवलेसे कारण पण पुरते आग लागायला आणि एकदा आग लागली कि अख्खी मशीद भस्मसात. तर त्यावरही सरकार नीट संरक्षण देत नाही, आर्मीच्या छावणीतून आग विझवायला बंब मुद्दाम उशिरा पाठवतात वगैरे ओरड झाली होती. अगदी काहीही वाईट झाली की लगेच भारत सरकार.
पोलिस हा आपला मित्र असतो, त्या न्यायाने सैनिक पण मित्रच झाला. आणि कश्मीर सारख्या ठिकाणी तर त्यांचाच मोठा आधार. पण जातानाच अनेकांनी बजावून सांगितले होते – काही झाले तरी सैनिकांच्या जवळ जाऊ नकोस गप्पा मारू नकोस. एकतर लोकल साशंकतेने बघतात आणि दुसरे म्हणजे सैनिकाच अतिरेक्यांचे टार्गेट असतात – प्रवासी नाही. तेव्हा नेमका आपण तिथे बोलायला जायला आणि गोळीबारी सुरु व्हायला… त्यापेक्षा दूर राहणे बरे.
मात्र एका बीएसेफच्या जवानाशी चर्चा करायला मिळाली. गौडा होता, हसनचा. घरी कॉफीची शेती असूनही बेटा जवान बनला. त्याच्या हातात इन्सास होती. रिकामा होता, आरामात होता आणि मूडही चांगला होता तेव्हा इन्सासबद्दल प्रश्न विचारले – कशी आहे, काय अडचण आहे वगैरे. आपल्या डीआरडीओ ने बनवलेली ही बंदूक – तीनचार वेगवेगळे मॉडेल्स एकत्र करून बनवली आहे – बऱ्यापैकी बरी आहे. आपण नेपाळला निर्यात पण करतो म्हणे. कारगिलच्या वेळेस मात्र जर दगा दिला असे ऐकिवात आहे. इतक्या थंड हवामानात त्याचा सेमी-ऑटोमॅटीक मोड नीट काम करेना. मधेच जॅम वगैरे व्हायची. याबद्दल अधिकृतरित्या कोणी काही सांगत नाही पण अशी वदंता आहे. पण चला, काहीच नसण्यापेक्षा आता किमान टीका करायला तरी आपल्याकडे आपण बनवलेले आपले हत्यार आहे – हेही नसे थोडके.
आफ्स्पा विषयी कोणाशी चर्चा करायची संधी मिळाली नाही. त्यात काय बदल केले की यांचे समाधान होऊ शकेल, नेमकी अडचण काय आहे याविषयी चर्चा करावा असा माणूसच नाही सापडला ३-४ दिवसात. लँडमाइन्स बद्दल पण नाही. सीमेवर म्हणे अजून अनेक सापडतात, खास करून पूंछ भागात. ओटावा करारात भारत आणि पाकिस्तान दोघेशी शामिल नाहीयेत.
रस्त्यावरून सारख्या मिलिटरीच्या कोणत्या न कोणत्या गाड्या जातयेत असतात. मधेच काही अँटी-लँडमाइन्स गाड्या दिसल्या तर काही अँन्टेना लावून फिरणाऱ्या. या गाड्या बहुतेक संदेश पकडायला असाव्यात. मागे म्हणालो होतो कि एका मित्राचे वडील मराठा लाईट मध्ये होते, ते जेव्हा आरआर मध्ये सर्व्ह करायला इथे होते तेव्हाची गोष्ट. शत्रूला पण माहित असते कि आपली फ्रिक्वेन्सी भारतीय सैन्याला माहित आहे अन ते ऐकत आहेत. तेव्हा संदेश तर कोड-भाषेतच चालतो आणि मधेच जरा मजा म्हणून ते भारतीय सैन्याला दोन-चार शिव्या पण हासडून देतात हिंदीतून. तेवढीच मजा… असा संदेश ऐकणाऱ्याला त्यांच्या बोलीभाषेत स्पॅरो म्हणतात.
क्रमशः