उ. अमजद अली खानांचे ख्रिसमसि तुकडे

याला काय म्हणायचे? ख्रिसमस जिंगल्स आणि अमजद अली खान साहेब? नाट्य संगीत स्टेजवर गायला लागले तेव्हा लोकांनी काय गोंधळ केला होता…आणि ही तर कमालच आहे बुवा…मला तर त्या आयोजकांची कशी फजिती झाली असेल याचा विचार करवत नाही… अमजद अली खानांना बोलावले आणि काय…तर इंग्रजी पोएम. बदल पाहिजे, नाविन्याचे वारे पाहिजेत सगळे ठीक आहे हो…पण हे मानवणे खरंच अवघड आहे….

(पूर्ण व्हिडियो इथे पाहायला मिळेल – http://video.webindia123.com/music/ustadamjadalikhan/index.htm)

अमेरिकन शिक्षक…?

अमेरिकेत शिकायला यायच्या आधी इथल्या एज्युकेशन सिस्टीम बद्दल बरेच ऐकले, वाचले, सर्फले, गुगले होते. की इथले वर्ग कसे असता, व्हिडियो लेक्चर्स, वेबसाईट वरून गृहपाठ, वर्गात खाणारी-पिणारी (कॉफी) मुले, वर्गात laptop वर नोट्स काढणारी किंवा गेम्स खेळणारी मुले वगैरे वगैरे….आश्चर्य च वाटायचे की वर्गात मास्तर जीव तोडून शिकवत असता कोणी कॉफी कसे पिऊ शकते…ते पण ठीके एकवेळ पण एक कानाने त्याचे बोलणे ऐकताना laptop वर दुसरेच काम करणे म्हणजे त्याचा अपमानच नाही का? असले ‘काय सांगू वाटे, काहीचिया बाही’ रेग्युलर आणि नैसर्गिक वाटायला लागले….तोच हा व्हिडियो पहिला. ओक्लाहोमा युनी.चा. चला, एक तरी असा प्रोफ आहे ज्याला वाटते की मुलांनी त्याच्या लेक्चर ला असली उपकरणे वापरू नयेत, वापरू नयेत काय, वर्गात आणू ही नाहीयेत….अन नुसते त्याला वाटत नाही तर तो प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड स्ट्रीक्ट दिसतो आहे त्याबाबतीत…मुलांनी घाबरावे, आपले ऐकावे म्हणून अपाल्याकडे कान पिरगळणे, कोंबडा करायला लावणे, छडी मारणे, वर्गाबाहेर किंवा बाकावर उभे करणे अशा शिक्षा आहेत. पण हा प्रोफ काय करतोय? खरंच ‘काहीच्या बाही’च आहे. त्याचा मुद्दा मुलांना नीट कळावा आणि एकदम नीट कळावा म्हणून याने काय केले? याच्या वर्गात मुलांनी laptops अनु नयेत अशी याची इच्छा आहे. म्हणून याने पहिल्या लेक्चर ला एक laptop घेतला, लिक्विड नायट्रोजन घेतले, laptop त्यामध्ये बुडवला, आणि मग म्हणाला, “This is just liquid nitrogen, so it alone won’t hurt the computer. But this will.” आता हे ‘this’ म्हणजे काय ते या व्हिडियो मध्येच पाहा. हे पाहून पोरांच्या कपाळात गेल्या नसतील तरच आश्चर्य आहे. कोण हिम्मत करेल वर्गात परत laptop आणायची किंवा मोबाईलशी खेळायची?

वाचून तर दाखवा…आहे हिम्मत?

२-३ वर्षांपूर्वीच्या सवाई मध्ये घडलेला किस्सा. कोणीतरी गात होते. अनु दुर्दैवाने गाणाऱ्याचा मूड नव्हता की प्रेक्षकांचा मूड नव्हता की वेळच खराब होती काय जाणे, पण कार्यक्रम काही रंगत नव्हता. तेव्हा एका मित्राने मस्त डायलॉग मारला. ‘काय रे चायला, काय तो माणूस स्टेज वरती एक पोतं भरून बोरं घेऊन बसलाय. आणि एक एक निवडून निवडून मारतोय…:).’ कॉलेज मध्ये असताना असाच बोअर करण्यासाठी एक युक्ती काढली होती. कुठे ही जायचे असेल आणि मित्र म्हणाला की काम आहे जरा नंतर जाऊ किंवा बीसी वर बसलो असू आणि लेक्चर असेल किंवा काहीही ऑकेजन ज्यामध्ये टाईम पास करायच्या कल्पनेला कोणी खोडा घालायचा प्रयत्न केला की मी त्याला कोपऱ्यात घ्यायचो आणि एक गोष्ट सांगायचो. ती सांगताना सुरुवात जरा उत्कंठावर्धक करायचो पण नंतर नंतर त्या गोष्टीरुपी पोत्यातून इतकी बोरं बाहेर काढायचो, इतकी बोरं बाहेर काढायचो की ऐकणारच शेवटी म्हणायचा ‘बरोबर येतो, पण गोष्ट आवर’…:) त्यातलीच एक गोष्ट लिहितो, तुम्हाला challenge आहे, बघू कोण शेवटपर्यंत वाचून दाखवतो ते…:):):)

२ मित्र असतात. जीवश्च कंठश्च. एकदम म्हणजे एकदम फूल टू जीवश्च कंठश्च. मोठे होई पर्यंत एकत्र असतात कायम. पण दोघांची कौटुंबिक पार्श्वभूमी एकदम निराळी असते. त्यामुळे मोठेपणी मार्ग वेगवेगळे म्हणजे कॉमन सेन्स. अपरिहार्यता नशिबांची त्यांच्या त्याला ते तरी काय करणार. श्रीमंत मित्राला मिळतो पारंपारिक व्यवसाय, मोठा कारखाना, हाताखाली नोकर-चाकर,शोफर, अलिशान ऑफिस….आणि आपल्या सुदाम्याला? सकाळी ६.१५ ची लोकल, दिवसभर ऑफिस मध्ये रखडपट्टी, क्षुल्लक पगार…वगैरे वगैरे…

तरीही आपला सुदामा खूपच लॉयल होता. आठवड्यातून एकदा तरी संध्याकाळी श्रीमंत मित्राला भेटून जायचा…पण श्रीमंत मित्र मात्र आता बदलला होता. असे नाही की तो आपल्या मित्राला विसरला. बिलकुल नाही, पण त्याला कामच एवढे असायचे की सुदाम्याची खातिरदारी करायला काय ढुंकून बघायला पण वेळ मिळणे अवघड. मुश्कीलच नाही तर महामुश्किल. त्याच्या अलिशान ऑफिस च्या एका टोकाला फुल ओल्ड लुक असलेले ब्राऊन मरून सागवानी टेबल, भिंतीवर कपाटे भरभरून फाईल्स, लम्बकाचे घड्याळ, फरशीवर कार्पेट, एसी, दरबान, टेबला वर सतत खणखणणारा फोन….फोन…..त्या फोन वरती तो इतका बिझी असायचा, की ऑफिस मध्ये कोण आले कोण गेले बघायला पण वेळ नाही मिळायचा. दिवस रात्र फोनवर. त्याचा सगळा धंदा त्या फोनवर होता. (ही गोष्ट मोबाईल यायच्या आधीच्या काळातली आहे ते सुज्ञ वाचकांनी ताडले असेलच. फक्त मोबाईलच का? तर सगळ्या कार्पोरेट कंपन्या पण यायच्या आधीची आहे, अशा काळातली जेव्हा लाकडी वस्तुकामाचे फर्निचर म्हणजे स्टायलिश गोष्ट होती, एसी दुर्मिळ होता…) तर त्या फोनने श्रीमंत मित्राचे आयुष्य व्यापून टाकले होते. आणि सुदामा बिचारा यायचा, आणि एका खुर्चीवर बाजूला बसून राहायचा..आत्ता बघेल, नंतर बघेल…पण तो कुठले बघायला…स्वतःमध्येच गर्क. शेवटी कंटाळून तासा दोन तासांनी निघून जायचा….रादर तो आला कधी गेला कधी हे पण याला कळायचे नाही.

किस्मत उनको कहा से कहा लायी थी…और भी आगे बहोत कुछ होना है…पढिये पढिये…..आणि अचानक एक दिवस उगवतो. वाचकहो, एकचित्ताने वाचा. आता तो क्षण समीप येत आहे. आपल्या गोष्टींचा शेवट. आणि एक ट्विस्ट….कहानी में ट्विस्ट.

नेहमीप्रमाणे संध्याकाळ झाली आहे. सुदामा त्याच्या ऑफिस मधून निघाला आणि श्रीमंताच्या ऑफिस मध्ये आला. घरी जाता जाता सहज डोकावायला म्हणून. त्यालाही सवय झाली होती की आपला हा मित्र काही आपल्याला भाव देणार नाहीये. ऑफिस मध्ये आला तर बघतो काय? सगळे ऑफिस अस्ताव्यस्त झालेले. दरबान नाही. एसी बंद. लाईट्स पण डीम वर….फाईल्स चा सगळीकडे पसारा….आणि मुख्य म्हणजे मित्राला काही काम नाही. रिकामा बसला आहे तो. डोक्याला हात लावून…किंकर्तव्यमुढावस्थेमध्ये…सुदाम्याला वाटले काय झाले की याला…गेला आणि विचारले…काय रे मित्रा, असा का बसलास? तर म्हणे अरे दोस्त, मी धंद्यात साफ बुडलो रे…खूप कर्ज झाले. सगळे प्रकार करून झाले…नोकरांना पण कामावरून कमी केले. शेअर्स विकले. जमिनी विकल्या, गाड्या विकल्या… सोने पण गेले..पण एवढे करूनही धंदा नाही वाचला…आता या क्षणी माझ्यावर कर्ज आहे आणि उद्या मला दिवाळखोरी जाहीर करण्याशिवाय पर्याय नाही..संपलो रे…..आयुष्यातून उठलो…इतके वर्ष एवढे कष्ट करून कमावलेले पैसे सगळे गेले…..साफ डुबलोय मी….घरी खायची पण भ्रांत होईल आता लवकरच अशीच स्थिती राहिली तर…..

सुदामा काय म्हणतो? मला एक सांग, तुला किती रुपयांची गरज आहे नेमकी? आपला हा मित्र पण त्याच्याकडे या स्थितीत बघतो आणि थोडेसे हसून म्हणतो, सोड रे, तेरे बस की बात नही है ये…तुला तर आकडा ऐकूनच भोवळ येईल…तू आलास ते बरे झाले, किती वर्षांनी भेटतो आहे ना आपण…!!!! याच्या हे पण ध्यानात नव्हते आले म्हणजे की सुदामा त्याला नेहमी भेटायला यायचा आणि बघूनच परत जायचा…..तरी सुदाम्याने परत विचारले, की अरे तू मला नुसते सांग तरी….सांगायला काय जाते तुझे? एक क्रुकेड लुक देऊन शेवटी मित्रवर्याने सांगितला तो आकडा शेवटी…तो ऐकून सुदामा जरा थोड वेळ शांत बसला आणि मग म्हणाला, ‘कारे? तू दरबानला काढलेस, एसी बंद केलास, हा फोन बराच वेळ झाला वाजत नाहीये ते? तो पण बंद केलास की काय?’…’नाहीरे, फोन चालू आहे, पण आता धंदाच बंद आहे त्याला काय’….’होका, मग थांब, मी एक फोन करतो’ असे म्हणून सुदाम्याने १ फोन केला ४-५ मिनिटे काहीतरी बोलला आणि काय जादू, श्रीमंताला म्हणाला, ‘ अरे बघ, तू आता काहीच काळजी करू नकोस. तुझ्या कर्जाची व्यवस्था मी केली आहे. तुला सगळे पैसे २ दिवसात मिळतील…तू किमान तुझा धंदा चालू करेपर्यंत तुला पैश्याची ददात भासणार नाही याची जबाबदारी माझी’ श्रीमंताचा त्याच्याच कानावर विश्वास बसत नव्हता. आता त्यालाच भोवळ येणे बाकी होते. ‘कसं काय? कसं काय? तू कुठून एवढे पैसे आणलेस? तू इतके पैसे कधी कमावालेस? तू नक्की काय केलेस? चोरी बिरी केलीस की काय? अरे सांग ना नुसता असा हसतोयेस काय? अरे बोल की जरा घडाघडा…मला तर विश्वासच बसत नाहीये. सांग की रे…’

आता माझा मित्र एकदम कान देऊन ऐकत असे. इथे याने पैसे खरच आणले कुठून? आणि मी सांगत असे की, ‘सुदामा एकच वाक्य बोलला, ‘इतकी सगळी वर्ष, while you were making money, I was making friends…!’

‘गोष्टीतून काय शिकलास रे तू?’ असे मग मी त्या पिक्चरला नकार देणाऱ्या मित्राला विचारत असे. ही गोष्ट सांगून आधीच १० मिनिटे त्याच्या डोक्याचे दही केलेले असते. बर गोष्ट जरा इंटरेस्टिंग वाटायला लागते ना लागते तोच असा युजलेस शेवट ऐकून तो मला कानाखालीच मारायच्या मूड मध्ये असतो….आणि तेव्हाच त्याला उपदेशाचा शेवटचा मोठा डोस पाजतो, ‘ बघ म्हणून सांगतो, लेक्चर करून मोठा माणूस बनून शेवटी तुला माझ्यासारख्या सच्च्या मित्राकडेच यावे लागणार आहे….त्यापेक्षा आत्ताच ये, चल पिक्चर ला जाऊ एकत्र….’

लोकहो, ही घटना खरी आहे. एक असा काळ होता की मी माझ्या एकूण एका मित्राला ही गोष्ट सांगून भंडावून सोडले होते. आणि कितीकदा मार खाता खाता वाचलो आहे…