कामातुर (?)

ख्रिस्त बुद्ध गांधी कोणालाही नाही सुचली अशी थिअरी मला सुचली आहे… जगात प्रेम पाहिजे? जगात शांतता पाहिजे? जगात अहिंसा पाहिजे? सोप्पे आहे. सगळ्यांना खूप खूप काम द्या. काम करत राहिला म्हणजे फालतू विचार आणि उचापत्या सुचत नाहीत. सध्या खूप बिझी झालो परत आणि विचार करायला वेळच नाही.

ब्लॉगचे विषय???

किती कविता कविता कविता….चायला कधी वाटलेच नव्हते की मी कविता वाचेन आणि त्यावर लिहेन वगैरे. माझे खास आवडते विषय म्हणजे आत्मवृत्त, इतिहास आणि प्रवास वर्णन. कविता वगैरे वाचणाऱ्यांना शिव्याच घालायचो. म्हणजे कविता आवडायच्या नाहीत असे नाही पण मुद्दामहून काव्यसंग्रह हा घेऊन वाचायचा प्रकार आहे असे नाही वाटायचे. पण एक मात्र होते. मर्ढेकर आणि तुकाराम…ते खूप आवडायचे. संपूर्ण मर्ढेकर रट्टा मारून झाला होता आणि तुकाराम तर जागोजागी दर्शन देत होते. पण मर्ढेकर आवडण्यामागे कारण काहीच नव्हते. मर्ढेकर मोठे का? हेच कळत नव्हते. मग केव्हातरी रविकिरण मंडळ, नव-काव्य, दलित काव्य, सामाजिक आशयाच्या कविता…हळू हळू कळत गेले आणि मर्ढेकरांच्या मोठेपणाची खरी प्रचीती आली. तोवर ‘सकाळी उठोनी चहा कॉफी घ्यावी’ किंवा ‘इरेस पडलो जर बच्चमजी’, ‘फलाटदादा फलाटदादा’ कविता नुसत्या गम्मत म्हणून आवडायच्या….आणि ‘पिपात मेले ओल्या उंदीर’ कळायचंच नाही आणि  ‘काहो माजवता दुही, माखता स्वातंत्र्याची वही, स्वजन रक्ताने प्रत्यही, लळथळा’ ही आहे त्याच वृत्तात का केली हे विचार करायचे प्रश्न तेच नाही कळायचे. ‘न्हालेल्या जणू गर्भवतीच्या’ म्हणजे मुंबईचे किती अप्रतिम वर्णन आहे आणि हाच कवी हेही लिहितो आहे त्यात महानता आहे हे लक्षातच नाही आले. ‘कितीतरी दिवसात नाही चांदण्यात गेलो किती तरी दिवसात नाही नदीत डुंबलो’ अशी सुरुवात करून जेव्हा ती कविता ‘बरा म्हणून हा इथे दिवा पारवा पाऱ्याचा, बरी तोतऱ्या नळाची, शीरी धार मुखी ऋचा’ अशा वाक्याने संपते तेव्हा किती अंतर्मुख करते याचा अंदाज नंतर नंतर येऊ लागला होता…..पण तरीही त्याहीपेक्षा जास्त लोभसवाणे रूप होते ते म्हणजे ‘आला आषाढ श्रावण’ मधली ‘ओल्या पानातल्या रेषा वाचतात ओले पक्षी, आणि पोपटी रंगाची रान दाखविते नक्षी’…हे खूप आवडायचे…पण जेव्हा हाच कवी लिहितो की ‘या स्नायूंच्या तारांचा रे तुझ्याच हात खाली स्वीच’ तेव्हा मराठी कवितेत किती क्रांती घडवून आणत होता याचा अंदाज नाही आला..ती क्रांती अर्थाची होती, उपमांची होती, छंदांची तर होतीच होती पण त्याहीपेक्षा कविता का, कोणासाठी आणि कशी या प्रश्नाच्या उत्तरांची होती…संपूर्ण नवा दृष्टीकोन होता तो….’पोरसवदा होतीस काल परवा पावेतो, थांब उद्याचे माई तीर्थ पायाचे घेईतो’ असे लिहिताना त्यांनीच असेही म्हटले आहे – ‘आभाळाच्या पल्याड स्पंदन टिपरी त्याची या मडक्यावरी’…

झाले? कवितांवर किती जास्त लिहितो आहे सांगताना परत त्यावरच एक चुकून आर्टिकल झाले. चायला….. हा ब्लॉग काही कवितांचा ब्लॉग म्हणून सुरु केलेला नाही पण ६० पैकी २० पोस्ट्स कवितांवर झाल्या आहेत. नकळतपणे…. गालिब, तुकाराम, बच्चन तर नेहमीचेच पेटंट आहेत. काही सुचत नसले की आपोपाप गालिब आणि इक्बाल सुरु करतो…कारण त्यांवर बोलणे सोप्पे असते. जसे की आत्ता मर्ढेकर…इतके वाचले आहेत की झोपेत ही त्यांच्या कवितांवर बोलू शकतो…पण त्यात आता मजा येत नाही. नवे वचन करायची आणि व्हायची संधी इथे फार कमी आहे. तेव्हा आपोआप रारंगढांग किंवा मधुशाला सुरु करतो…नाहीतर इतिहास…इतिहास तर कायमचा डोक्यात ठाण मांडून बसला आहे. त्यातही मध्ययुगीन भारत. या क्षेत्रातल्या भरपूर मोठ्या लोकांच्या सहवासात आल्याने आणि समानशील मित्र लाभल्याने त्याच विषयावर दिवसाच्या दिवस घालवले आहेत. जसे की पानिपतचे युद्ध…साधारणपणे आपली सुरुवात विश्वास पाटलांच्या कादंबरीने होते आणि तोतयाचे बंद किंवा भाऊबंदकी नाटकाच्या आधाराने संपते. पण मग आम्ही जातो ते पानिपत १७६१ कडे. तिथून…शेजवलकर कोण? मग त्यांचे शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या अभ्यासाची साधने व आराखडे…तिथून मग दांडेकर, वि श्री, सरदेसाई, राजवाडे, पोतदार, पगडी…..पगडी मग निझामाकालीन हैद्राबाद आणि पोट्टी श्रीरामल्लू, मग हैदराबादची जामा मस्जिद, हैद्राबादी दखनी भाषा, हिंदीचे प्रकार, खडी बोली, अवधी, ब्रज भाषा वगैरे…मग तिथून वीर रसाची हिंदी साहित्यातली उत्थापना, छायावाद वगैरे…हिंदीवर उर्दू चा प्रभाव..मग रामचरीतमानस वगैरे,, भक्ती मुव्हमेंट…वंगदेशाचे इस्लामीकरण, कबीराच्या खऱ्या रचना कोणत्या…पाठभेद…ऐतिहासिक पात्रे…मग महाभारत आणि रामायण…तिथून दुर्गा भागवत आणि इरावती कर्वे…इरावती कर्वे आल्या की एका दिशेने डी डी कर्वे, अण्णा कर्वे, महात्मा फुले तर दुसऱ्या दिशेने आनंदीबाई जोशी, रमाबाई रानडे…(युगांत वाचले आहे? अप्रतिम पुस्तक आहे…वाचाच वाचा….जगात तोड नाही त्याला…) मग असे करत करत सध्याच्या बाबासाहेब, मेहेंदळे, बेडेकर, बेलसरे पर्यंत येऊन थांबतो…पण गप्पांची भूक काही संपत नाही. त्यातून कधी काय साध्य झाला का हा संशोधनाचा विषय ठरवा…..पण वेळ मात्र मजेत जातो…काहीच नसेल तर उर्दू, हिंदी शायरी आणि गाणी, चित्रपटांचा इतिहास, जुने गायक संगीतकार…..नाट्यसंगीत….अशा विषयी लिहायला काहीच लागत नाही….उचलली जीभ आणि लावली टाळ्याला सारखे उघडला ब्लॉग आणि लावला बडवायला असे होते….

पण आजकाल त्यात मजा येत नाही…सध्या अमेरिकेत आहे त्याविषयी कितीतरी गोष्टी लिहिण्यासारख्या आहेत…इथले लोक, समाज, शिक्षण पद्धती, इथले राहायचे अनुभव….मागे एकदा शिकागो ला गेलो होतो तिथे स्वामी विवेकानंदांनी जेथे जागतिक सर्वधर्म परिषदेमध्ये जेथे भाषण दिले १८९३ मध्ये ती जागा पाहून आलो…. का नाही लिहित? आणि ललित? ललित हाताळणे सोप्पे नाहीये…पण जमला तर त्यासारखा तोच. अर्थकारण आणि राजकारण हे तर विषय दिवस रात्र असतात गप्पांमध्ये पण लिहिताना का नाही सुचत? सध्या रिसर्च आणि academic मध्ये इतक्या इतक्या नव्या गोष्टी पाहत आहे की त्या लिहायला पण हरकत नाही… एवढे मित्र बंगाल, हरियाना, ओरिसा, अरुणाचल, आंध्र, गुजरात, इंग्लंड, जर्मनी, सिंगापूर, अमेरिकेत पसरले आहेत त्यांचे कितीतरी ऐकतो नवे नवे अचंबित व्हावे असे….का नाही लिहित?

साधे उत्तर आहे – शाहरुख खानचा चित्रपट होता एक – राम जाने….का नाही लिहित……….राम जाने…

पांडुरंग पांडुरंग

का काही काहीसु काहीसुच काहीसुचत काहीसुचतना काहीसुचतनाही काहीसुचतनाहिये…….

सुज्ञ वाचकांनी बरोबर ओळखले असेलच की ही तर कोसला स्टाईल… बरोबर ओळखले.कोसला सगळ्यांनी वाचली आहे. पांडुरंग सांगवीकर सगळ्यांनी एकदा कधीतरी जगलेला आहे. त्याची कहाणी म्हणजे ‘लाथ मारेन तिथे पाणी काढेन’ अशा उर्मीपासून ते ‘लायी हयात आये..’ पर्यंत जगण्याची अपरिहार्यता दाखवणाऱ्या प्रवासाची झलकच जणू. कबीराच्या ‘दुई पाटन के बीचमें साबूत बचा ना कोई’ चा साक्षात मूर्तिमंत अवतार. मनुष्याच्या क्षुद्रतेची एक साधी वानगी. मला पांडुरंग आठवला की ‘रंग दे बसंती’ मधला अमीर खानच लगेच डोळ्यासमोर येतो. ‘कॉलेज की इस पार हम दुनिया को नचाते है, तो कॉलेज के उस पार दुनिया हमे नचाती है, टीम लख लख दे टीम लख लख…’

वादी-संवादी

‘सध्या खूप काम करतोस का रे तू?’ ‘काय माहित…आव तर आणतो.’ ‘कायम आउटपुट बद्दल असमाधानी असणे म्हणजे स्थायीभावच की तुझा. कितीही काम करा, किंवा कितीही आराम करा, पुरेसा नसतोच…तुकारामांचा एवढा आदर करतोस, पण ‘चित्ती असो द्यावे समाधान’ म्हणजे काय हे पण नाही कळले तुला अजून. कसा रे तू असा? कधी काही मग चिडून यावर प्रत्युत्तर ही तयार असते – की ‘असंतुष्टता हीच माणसाच्या प्रगतीचे इंधन आहे’ …!!!!’ ‘असेल बुवा..काय माहित.’ ‘अरे पण इथे असंतुष्टता ही कामाच्या बाबतीत नाहीये. हा एक मानसिक किडा आहे. आरामाच्या बाबतीत ही तेच आहे. कितीही सिनेमे बघा – कमीच वाटतात. कितीही वसंतराव ऐका – काहीच समाधान नाही. कितीही फिरा सायकल असो की चालत – समाधान नाही. कितीही पुस्तके वाचा – समाधान नाही. कितीही गप्पा मारा, chating करा – नाहीच नाही…याने काय प्रगती होते रे तुझी?’

वृत्तीच असते बघ एकेकच असमाधानी असण्याची…ही काय परफेक्शन अचिव्ह करण्यामागची तळमळ नव्हे…आणि प्रगतीच आस तर नव्हेच नव्हे…बाय द वे, ‘प्रगती’ वगैरे सगळे मानसिक-भौतिक-आधिभौतिक-वैचारिक-राजकीय-आर्थिक…. असे खेळ आहेत. २ वाक्य आठवतात…एक कोणत्या तरी हिंदी सिनेमा मध्ये होते. तो म्हणतो – ‘आदमी की खोज कभी खतम नाही होती, लेकीन वक्त खतम हो जाता है’…सो यू गॉट लिमिटेड टाईम फेला. बी अवेअर. आणि दुसरे वाक्य. ते माझ्या अतिशय आवडत्या पुस्तकातले, रारंगढांग. प्रचंड आशयघन आणि तरीही साधे. विश्वनाथ कुठे तर हिमालयात बसला आहे. बोर्डर रोड मध्ये काम करतो आहे. इंजिनियर आहे. सतलज वर पूल बांधणे चालू आहे. त्याच्या एका आत्म-मग्न अवस्थेमध्ये त्याच्या मनात उमटलेला विचाराचा तरंग – ‘आता मी हा ढांगातून रस्ता बांधतो. त्यामुळे लोक नदीपर्यंत पोहोचतील. मग नदीवर पूल बांधतो. तिथून पुढे तिबेट आणि मग चीन…..हा रस्ता कुठे जातो? कुठेच नाही….हा इथेच आहे. माणूसच यावरून चालला आहे…’ कुठपर्यंत? तर मागे म्हटल्याप्रमाणे – ज्याचा त्याचा लिमिटेड वेळ आहे. तो संपेपर्यंत. आणि तो पण काही स्वतःच्या मर्जीने तर काही लोकांच्या मर्जीने. कुठे आहे प्रगती?

प्रगती ? कोणाची? कशाची? कुठे? हे सगळे अवतीभवतीचे प्रश्न आहेत. डोन्ट बीट अराउंड द बुश. मुख्य प्रश्न आहे ‘का’…? का? का?

काही का असेना. मला त्यातच आनंद आहे. त्यातच जगायची उमेद आहे. तीच अशी गोष्ट आहे ती मला गुंतवून ठेवू शकते आयुष्यभर. जिच्यामागे धावता धावता काही अचिव्ह केल्यासारखे वाटते आणि खूप काही करायचे आहे त्याचे असमाधान अजून काही करायला बळ देते…

‘किती रे तू असा असमंजस? काहीच कसं नाही रे कळत तुला? स्वतःला घाबरतोस तू. स्वतःकडे बघायची इच्छा नाही. म्हणून इतरांकडे बघतोस. ही असली कारणं म्हणूनच सुचतात द्यायला…असमाधानी का या प्रश्नाचे हे काय उत्तर झाले? प्रश्न काय उत्तर काय? का आता या प्रश्नाला पण घाबरतोस? छ्या…काही अर्थ नाही. निरर्थक निरर्थक. सुखी माणसाचा सदरा वगैरे नसतो माहित आहे…सुख काही सदरा वगैरे घालून मिळत नाही. या बाह्य गोष्टी झाल्या’….’मग काय आता सांगशील? आत बघ स्वतःच्या…? काय रे तू तेच तेच सांगतोस? वेगळे काही असेल तर बोल…उगीच बोअर नको करूस.’

‘नाही रे करत. पण तुझ्या असमाधानामागचे कारण काय ते तर कळू डे की आधी. तुलाही आणि मलाही….मग त्यावर औषध शोधता येईल…’ ‘औषध? कसले औषध? असमाधानी असणे हा आजार कारे वाटतो तुला? उगीच भलत्या सलत्या गोष्टी करू नकोस…शेवटचे सांगतो. निक्षून सांगतो – असमाधानात च मी समाधानी आहे…जर समाधानी असतो तर काय झाले असते? काहीच नाही. ‘ठेविले अनंते’ राहिलो असतो. मग? त्यापेक्षा हे बरे’….’हा…आता बरोबर लायनीवर आलास. हे आणि ते असे दोन भाग केलेस. समाधानी असण्याने अन नसण्याने या दोघांची तुलना…पण ती पण करणे अवघड आहे…कारण जे घडले ते माहिती आहे, जे घडू शकले असते ते कोणाला माहिती? मग कशी तुलना करतोस?…’

‘ए काय रे फालतू पणा लावलाय दोघांनी…मूर्खपणा बंद करा..पुढ्यात आहे ते काम करा आणि गप बस…रिकाम वेळ मिळाला की असले चाळे सुरु होतात डोक्यात…काम नसेल तर जाऊन झोपा…विचार बिचार करायच्या फंदात पडू नका…’


हियाटस

फेलो रीडर्स,

विचार करत होतो की ब्लॉग लिखाणात घालवलेल्या वेळेचे फलित काय? आपण गोष्टी करण्या एवढा वेळ आणि एनर्जी गुंतवतो तेव्हा त्यापासून काय अपेक्षा असतात…स्पेशली कला क्षेत्रात…मटेरीअल आउटपुट तर काहीच नसते हे मान्य व्हायला आधी जड गेले. मध्यंतरी पूर्णपणे ‘युटीलिटेरिअन’ वृतीचा झालो होतो…’काव्यशास्त्रविनोदेन कालो गच्छति धीमताम’ याचसाठी एवढे सगळे करायचं? शतकानुशतके मानव फ़क़्त याच कारणासाठी सगळे करत आला आहे? पोट आणि त्याव्यतिरिक्त असलेल्या जबाबदाऱ्या निभावल्या की जीवनाचे कर्तव्य काय ते उरते? ‘स्वान्त-सुखाय’ या प्रकारात ते सगळे बसेल का? मी ब्लॉग का लिहितो? या प्रशाचे उत्तर मला अजून माहित नाहीये. या प्रश्नातला ‘मी’चा अजून बाहेर पडत नाहीये…त्यामुळे उत्तराची एवढ्या लवकर अपेक्षा ही नाहीये म्हणा…

असो. तुमच्या डोक्याला त्रास देत नाही जास्त…किंवा असे म्हणा की थोडे दिवस तर आता काही त्रास देत नाही…आपण सर्वांनी दिलेला प्रतिसाद खूपच अनपेक्षित आणि सुखद आहे. ब्लॉग लिखाण करायचा कधी विचार च नव्हता केलेला आणि रोजचे २००-३०० हिट्स पाहून प्रेरणा यायची…आभार. सध्या काही कामानिमित्त पुढचे ७-८ दिवस लिखाणास वेळ मिळणार नाहीये. तर त्याबद्दल मुआफी…जल्द ही वापस आऊंगा कुछ और जाम अता-ए-खिदमत करने…