पुनरागमन

पुनरागमन??? मधुशालेमध्ये बच्चनजी म्हणतात – आनेकेही साथ जगतमें कहलाया जानेवाला..

बरेच दिवस गैरहजर राहिल्याबद्दल मुआफी बक्षावी. मध्यंतरीच्या कळत अनेक घटना घडल्या ज्यांना फक्त असंभावित अन अनपेक्षित म्हणू शकतो. खरे तर त्यातल्या प्रत्येक घटनेवर एक एक मस्त आर्टिकल होऊ शकते. एका माणसाला भेटलो. त्याचे जन्मगाव आहे बेथलेहेम. तेच ते गाव जिथे ख्रिस्त जन्माला. आणि ते आहे जेरुसलेम पासून हाकेच्या अंतरावर. त्याच्याशी मनसोक्त गप्पा मारल्या ३०-४० मिनिटे…. तो ७३ च्या युद्धात अरब सैन्याकडून इस्राईलविरुद्ध लढला पण होता बच्चमजी..!! यॉम किप्पुर च्या युद्धात… मग जॉर्डन मध्ये काही वर्षे राहून अमेरिकेत आला. इथे शेफ बनला… मायकल जॉर्डन च्या टीमचा शेफ होता म्हणे काही वर्षे… आणि आता इथे येऊन हॉटेल टाकले. त्याने कुरआनातल्या काही गोष्टी पण सांगितल्या. आब-ए-जमजम आणि आर्क ऑफ नोआह सांगताना तर त्याचा उत्साह उतू जात होता… मजा आली

मग एका विद्यार्थ्याला भेटलो. तो आहे तेहरान चा. म्हणजे इराण. मातृभाषा फार्सी. हा तर एक मस्तच किस्सा आहे. इतिहास हा विषय निघाल्याबरोबर त्याने पहिलाच प्रश्न गुगली टाकला… म्हणे तुझे नादिरशाह बद्दल मत काय आहे…? आयला… मला मग पटापट आठवले. त्याने अफगाण प्रांत जिंकून घेतला होता. मग सिंधू ओलांडली होती. भारतावर हल्ला केला होता. दिल्ली जिंकून घेतली. मुघलांचा पाडाव केला.. बेसुमार कत्तल केली.. अगदी ६ डिसेंबरच्या ‘प्रत्यक्ष कृती दिन’ स्टाईल मध्ये २-३ दिवसात त्याने २०-३०००० माणसे कापून काढली.. घाबरून मग बादशाहने त्याच्या हातात राज-खजिन्याच्या चाव्या दिल्या. यानेच मयुरासन आणि कोहिनूर भारताहेर नेले… इतकी लुट मिळाली इतकी लुट मिळाली त्याने इराण ला जाऊन पहिले काम काय केले असेल? तर संपूर्ण देशाला ३ वर्षे करमाफी केली. सरसकट सगळ्यांना…!!! आणि त्याच पैश्यात वर अजून ओट्टोमान साम्राज्याशी आणि इतरही काही लढाया केल्या… तर असा हा नादिरशाह.. मुघालांवर कितीही राग असला तरी नादिरशाह बद्दल चांगले मत भारतात तरी कोणाचे असायचेच काही कारण नाही. पण त्याला सरळ कसे सांगू की आम्ही काय विचार करतो ते… आणि जर अब्दाली जरा अफगाणिस्तानात तसा हा इराण मध्ये पुजला जात असेल तर मग प्रोब्लेमच. मग जरा पोलिटिकल उत्तर दिले. पण मग तोच म्हणाला की आम्ही त्याला शिव्याच देतो. त्याने देशाची वाट लावली. खूप मुडदे पडले, अर्थव्यवस्था बुडवली आणि काय काय… हुश्श्श… मग पुढचा मुद्दा त्यानेच मांडला… की तुला संस्कृत येते का? काय बोलणार..! थोडी थोडी कळते म्हणालो…मग म्हणे बऱ्याच फार्सी शब्दांचे रुट्स संस्कृतमध्ये आहेत… वा वा… खुलेपणाने मान्य पण केलेन बेट्याने.. थोडक्यात बराच लिबरल, बरीच माहिती आणि कुतूहल असणारा दिसला… मग मी पण त्याला त्याच्या नावाचा अर्थ काय होतो आणि तेहरान बद्दल १-२ प्रश्न विचारले आणि पुन्हा भेटायचे नक्की करून खुदा हाफिज केले.

टेस्ट ऑफ टीपकनू नावाच्या इथल्या जत्रेत भाग घेतला. जरा फूड कुपन्स वगैरे विकली.. इथल्या लोकांबरोबर सहभागी व्हायची संध्या येणे आणि आपण त्या घेणे नेहमीच होते असे नाही.. त्यात बरेच शिकायला मिळाले… overly simplified and straightly put….

मंथन पहिला…. श्याम बेनेगलवर पुन्हा एकदा दिल खुश झाला…. काय तो संपूर्ण संच होता लोकांचा.. श्याम बेनेगल, गोविंद निलाहणी, स्मिता पाटील, ओम पुरी, अमरीश पुरी, कुलभूषण खरबंदा, नसिरुद्दीन शाह, शबाना आझमी, वनराज भाटीया वगैरे लोकांनी जे जे काम करून ठेवले आहे ना.. अप्रतिम. लहानपणी मी जर स्वतः सिनेमा काढला तर कसं काढेन, कोणत्या कथा हातालेन, कसे चित्रीकरण, संवाद असा मुक्त-विचार करत असे. पण श्याम बेनेगलचे सीनेमे पहिल्यापासून तर आता काही करायचे उरले आहे असे वाटतच नाही. नंतर मिर्च मसाला पहिला… पुन्हा एकदा दिल खुश झाला… जबरदस्त आहे… मग Bandit Queen आणि हजार चौरासी की मा पहिला… अनुपमेय. आणि सगलावर कडी कशाने झाली माहित आहे? Sophie’s Choice ने…. याचे नाव पण पूर्वी ऐकले नव्हते… पण बेत शिंडलर’स लिस्ट च्या तोडीस तोड निघाला… मेरील स्ट्रीपचा अभिनय बघणे हाच एक मोठा अनुभव होता… जेव्हा तो खरंच निवडीचा क्षण येतो तेव्हा हृदयाची कालवाकालव होणे म्हणजे काय त्याचा अर्थ पुन्हा एकदा कळला… आणि काल रात्री पहिला तो वास्तु-पुरुष. अतिशय उच्च…शब्दातीत… यावर लिहिण्याची पण क्षमता नाही म्हणून इथेच हा विषय थांबवतो.

घरी I too had a dream मागवले. वर्गीस कुरियनचे आत्म-चरित्र. बघू आता जेव्हा हातात पडेल तेव्हा वाचू… आणि शैक्षणिक जीवनात तर असंख्य घटना घडत आहेत. हळू हळूच घडत आहे पण काहीना काही चालूच आहे… ते परत केव्हातरी..

संधी

जर मला कधी आयुष्यात साक्सोफोन बघायलाच मिळाला नसेल, तर वाजवून बघणार कधी? आणि मग आवडणार कधी? आणि मग त्यात पारंगत होणार कधी? साक्सोफोनच का..सगळेच… जगात सगळे असेच असते नाही? कोणती संधी मिळते, कोणत्या ठिकाणी तुम्ही असता, कोणत्या पातळीवर असता त्यावर सगळे ठरत जाते.. मग तुमच्यात ती प्रज्ञा असो वा नसो…. ती आहे की नाही हे कळण्यासाठी ती आजमावायची संधी मिळणेच दुरापास्त…

Anti-climax..

रावणाला मारायला राम आला होता. म्हणजे रावणाची योग्यता इतकी होती, शक्ती इतकी होती, आराधना, भक्ती इतकी होती की त्याच्या बरोबरीचा शत्रू म्हणजे राम. यात रावणाचे महानत्व येते. (काही लोक उलटे पाहतात की रावणासारख्या शत्रूला मारले म्हणून राम जास्त मोठा.. म्हणजे रावणाच्या पात्रतेवरून रामाची योग्यता मोजतात) ते काही असो. तुम्ही खूप कष्ट करता, प्रयत्न करता, रिझल्ट्स मिळवता, प्रेझेंट करता आणि ऐन वेळी काहीतरी फालतू म्हणजे अतिशय फालतू गोष्टीमुळे पचका होतो. आणि सगळ्याच गोष्टी अचानकपणे फोल वाटू लागतात. जर प्रोफेसरने काही मोठा कन्सेप्चुअल प्रश्न विचारला असता आणि उत्तर आले नसते तर किमान त्या प्रश्नाच्या क्लिष्टपणामुळे वाईट वाटले नसते. अतिशय भंकस चूक केली, चुकीची लाईन काढली ग्राफमध्ये आणि प्रोफेसरने नेमके ते पोईंट आउट केले. इतके वाईट वाटले म्हणून सांगू. या गोष्टीमुळे फक्त प्रोजेक्टच्या बाबतीतचा हलगर्जीपणा, आळस आणि बेफिकीर वृत्ती दिसून येते. कितीही नाही म्हणालो तर तसेच पोर्ट्रे होते ते. काय करणार.. आणि त्याहीपुढे तुमच्या ग्रुप मेम्बर्सचा विश्वासघात केल्यासारखे असते कारण तुमच्या चुकीमुळे त्यांच्या पण ग्रेड्सवर परिणाम होणार असतो. एवढे सगळे करून, अयोध्येहून निघून विजनवास स्वीकारून, संपूर्ण भारतवर्ष चालत चालत पार करून, वानरांची सेना जमवून, समुद्राला पार करून शेवटी तो क्षण येतो. युद्धाचा… रणांगणामध्ये उभे ठाकल्यावर समोर रावण असताना लढून मरण्यापेक्षा भोवळ येऊन खाली पडल्यास त्याला काय म्हणणार?

‘चिंटू’ म्हातारा झाला हो…!!!

चिंटू ने कधी काळी एक जमाना गाजवला होतं.. Good Old Black and White जमाना. चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर तर तेव्हा हिरोच होते. निरागस प्रश्न, आपल्याच आयुष्यातल्या सगळ्या घटना, जमलेली सगळी पात्र त्यामुळे मजा यायची वाचायला. मध्यमवर्गीय कुटुंब, सुट्टी, अभ्यास, सोसायटी, आसपासचे मित्र, शाळा, चित्रकला, क्रिकेट, घरातला पसारा, वाढदिवस, कैऱ्या…. सगळे तेच पण किती निरागस होते. आणि डोळे तर खास बोलके असायचे. प्रत्येकाच्या आजूबाजूला राजू, बगळ्या, मिनी, जोशी काकू… वगैरे असतात त्यामुळे अजून मजा यायची. मराठी मधली बहुधा सगळ्यात फेमस आणि जास्त काल चाललेली हीच कॉमिक स्ट्रीप असावी…एकदम भारी होतं चिंटू… आणि आज कितीतरी दिवसांनी वाचतो आहे परत… काय कचरा झाला आहे त्याचा…चिंटूची खासियत होती ते बोलके चेहरे आणि प्रासंगिक संवाद. चित्र काढण्यात जम बसल्याने त्यात काही कमतरता नाहीये नि रंग आल्यापासून अजून छानच वाटते आहे. पण डायलॉग मध्ये पार चिथडे उडाले आहेत. काय ती भाषा.. सातवी आठवीमधला मुलगा असे बोलतो? हे वाचा आणि बघा मी काय म्हणतो आहे ते… नको ती भाषा नको तिथे वापरल्याने चिंटू मधला चिंटूपणाच संपून गेला असे वाटतंय…फुल उजाड शुष्क चिंटू…..

चुकीच्या व्यक्तीकडे बोलतोय? अभ्यासाने गती पकडलीये? धोका पत्करू शकत नाही?? सातवी आठवीमधला मुलगा बोलतोय? वाटतंय का? आणि ही तर हाईट च आहे – चिंटू म्हणजे काय कोणी तत्वज्ञ आहे का? बघा तो शेवटच्या स्ट्रीप मध्ये काय बोलतो आहे ते – प्रत्येक आनंदाची किंमत द्यावी लागते….!!! आईच्ची जय त्याच्या…झाला…. चिंटू आता म्हातारा झालाय…

4663910945544493811

5485996976237177342

5625973960205425082

देवमाणूस

जेव्हा खूप तणावाखाली असतो, डोके कामातून गेले असतो तेव्हा माणूस वेगळाच होतो. इतरांना हसताना बघतानाही खूप राग येतो कधी कधी…. त्याने आपले काही बिघडवले नसते. पण क्षुद्र मनोवृत्ती काही शांत बसून देत नाही. अशा वेळी देवाने संगीत निर्माण केल्याबद्दल त्याचे शतशः आभार मानतो. शांत शांत वाटायला मदत करतात. पण तेही तात्पुरतेच असते. परत एकदा आपल्यासमोर वाढून ठेवलेले ताट दिसले की मग डोळे कसे जहरी होतात, झोप कशी उडून जाते, विचार कसे खालच्या दर्जाला जातात…. डटे राहो.. वो लास्ट सेकंद, किंवा कोशिश करने वालोंकी कभी हार नही होती.. वगैरेंची पण मात्रा प्रत्येक वेळी चालेलच असे नाही. मनात विखार दाटून आला असतो. अशा वेळी काय करावे? सुमंत सर म्हणायचे की आयडियल कंडीशन मध्ये प्रत्येक वायू हा नॉर्मल असतो. तसा प्रत्येक माणूस पण सामान्य परिस्थितीमध्ये चांगलाच वागतो. पण तो वायू खरा आयडियल आहे की नाही हे जसे एक्स्ट्रीम प्रेशर, टेम्परेचर ला कळते तसे माणसाचे मनुष्यत्व एक्स्ट्रीम कंडीशनलाच टेस्ट होते….फ्रस्ट्रेशन मध्येही जो माणूस खरंच शांत राहू शकतो तो खरा देवमाणूस.