मोहन-वीणा

आत्ता पंडित विश्वमोहन भट यांचा इथे कार्यक्रम झाला. तबल्यावर साथीला पंडित शुभेन चटर्जी होते. यमन आणि हंसध्वनी वाजवला. त्यांच्या ‘Meeting at the river’ आणि ‘Sleepless nights’ या अल्बम्स मधील २-३ गाणी वाजवली. ज्याच्याकरता Grammy Award मिळाले ते गाणेही वाजवले…. कार्यक्रम अतिशय रंगला…. पण शेवट त्याहूनही उच्च होता. त्यांनी जन गण मन आणि वंदे मातरम वाजवले. आणि संपूर्ण १३ महिन्यांनी पहिल्यांदा आजूबाजूला शंभरावर भारतीय लोक एकत्र उभे राहून जन गण मन ऐकले. अंगावर सरसरून काटा आला. अविस्मरणीय…

वो जो हममे तुममे करार था..

मोमीन खान मोमीन साहेबांची उत्कृष्ट गजल…
वो जो हममे तुममे करार था.. तुम्हे याद हो के न याद हो….
वो नये गिले वो शिकायते, वो मजेमजेकी हिकायते…वो हर एक बातपे रूठना… तुम्हे याद हो के न याद हो…

बघा एकेकाने कशी गायली आहे..

नय्यर नूर –

गुलाम अली –

फरीदा खानुम –

बेगम अख्तरीबाई फैजाबादी-

अबिदा परवीन –

पंकज उदास –

त्रिवेणी

जपान म्हटलं की काय आठवते? झेन कथा, हायकू, इकेबाना, बोन्साय, ओरिगामी, गेयशा, कोडो, बर्नाकू, काबुकी, खान्जी……. हे सगळे ऐकून असतो. कशाचा अर्थ काय ते थोडक्यात माहित असते पण त्याबद्दल फारसे ऐकले नसते… ‘जपानची संस्कृती = उपरिनिर्दिष्ट शब्द’ असे एकच समीकरण आपल्या मनात असते… फार तर फार कोणा रसिक चहा प्रेम्याला ‘साडो’ अनुभवायची इच्छा असते. तरी पण हायकू आणि झेन कथा आपल्याकडे पुष्कळ आल्या आहेत. शांताबाई आणि इतरांनी पण त्यावर बरेच लेखन केले आहे. गुलझार साहेबांनी तर हिंदी मध्ये शायरीला नवे आयामच प्रदान केले. शेर असतो २ ओळींचा. उल्ला-मिस्रअ आणि सानी-मिस्रअ.. पाहिली ओळ आणि दुसरी ओळ… उर्दू काही फारशी अवघड नाहीये बघा. पाहिली ओळ मधला ‘पहिली’ साठी जो शब्द आहे तो आहे उल्ला त्याच्या जवळचा उर्दुच पण आपल्या ओळखीचा शब्द म्हणजे अव्वल. पहिला. प्रथम… तर अशा २ ओळी असतात. आणि अनेक शेरांची मिळून गजल बनते. जरी संपूर्ण गजलेला अर्थ असला आणि त्यात एक फ्लूईडीटी असली तरी प्रत्येक शेर हा पण स्वतंत्रपणे अर्थसंपूर्ण असायला लागतो.. आणि मग त्यानंतर काही काफिया-रदीफ ची बंधने असतात… अजून काही डीटेल्स आहेत. पण २ ओळी या कायम २ च असतात. गुलजार साहेबांनी त्यात तिसरी ओळ टाकली. आता आहे तो शेर तसाच आहे. २ ओळींना मिळून पूर्ण अर्थ आहे. आणि त्यात तिसरी ओळ आली की पहिल्या २ ओळींमधून जो अर्थ अभिप्रेत झालेला असतो तो एकदम बदलून जातो. एकदम वेगळेच दालन उघडावे, वीज चमकावी किंवा १८० अंशाचे वळण घ्यावे.. असे काहीतरी धक्का तंत्र तरी असते किंवा.. जाऊ दे काहीतरी वेगळाच प्रकार आहे. हायकूच्या जवळ जाणारा आहे पण हायकू नाही. तुम्हीच वाचा –

कोई चादर की तरह खींचे चला जाता है ये दरिया..कौन सोया है तले इसके जिसे ढूंढ रहा है?
डूबने वालेको भी चैनसे सोने नहीं देते…
किंवा
ये मना इस दौरान कुछ साल बीत गए है, फिर भी आँखों में चेहरा तुम्हारा समाई हुई हु..
किताबोंपे धुल जमनेसे कहानी कहा बदलती है?

मानवी नात्यांवर तर हे किती सुरेख आणि विराण आहे बघा –

ना हर सहर का वो झगडा, ना शब् की बेचैनी,
ना चुल्हा जलता है घर में ना आखें जलती है..
कितने अमनसे घर में उदास रहता हु…

इथे गुलजार साहेब स्वतः त्रिवेणी म्हणजे काय ते समजावून सांगत आहे बघा..

बालगंधर्वांचा चंद्रास्त

एक अतिशय उत्कृष्ट पुस्तक वाचले होते – सर्वोत्तम पिंगे. उत्कृष्ट विषयांची निवड, आणि शैलीचे वरदान. खूप आवडले होते. त्यातले बरेच बरेच लेख हे अभ्यासाचे आहेत. इरावती कर्वे असोत की चर्चिल की सोमर्सेट मॉम की कुमार गंधर्व. त्यात एक लेख होता – बालगंधर्वांचा चंद्रास्त. अतिशय हृदयस्पर्शी आहे. वाचा म्हणजे काय ते कळेल. जमल्यास तो एकदा स्कॅन करून अपलोडच केला पाहिजे… संगीताच्या प्रत्येक चाहत्याने रादर प्रत्येकानेच वाचला पाहिजे असा तो लेख आहे. त्यातूनच समजलेल्या २ गोष्टी. १ म्हणजे बालगंधर्वांच्या नातीने की मुलीने (आठवत नाही) त्यांच्या चरित्राची लेखमाला लिहिली होती. माणूस मध्ये. आता बालगंधर्व या नावाभोवतीचे वलय म्हणजे काय सांगायला पाहिजे का? त्यात तशी मालिका कधी प्रकाशित झाली होती हेच आता लोकांना माहित नाहीये. तेव्हा माजगावकर हयात होते. पण ते अंक आता मिळणार कुठे? खूप इकडे तिकडे केले तेव्हा ते अंक कुठे मिळतील त्याचा पत्ता लागला, ओळख पण निघाली… आणि अमेरिकेत निघून आलो… ते राहूनच गेले…
आणि दुसरी त्याहूनही भारी गोष्ट आहे. १९३५-३६ च्या सुमारास बालगंधर्व शांतारामांकडे होते.. त्यांनी तिथे बरेच सिनेमे करायचे ठरवले होते पण दुर्दैवाने एकच सिनेमा निघाला. नंतर काहीतरी बिनसले नि ते सोडून परत स्टेजवर गेले. पण तो एकच सिनेमा जो होता तो होता ‘संत एकनाथ’…. श्रीकृष्णार्जुनयुद्ध मध्ये आपण मास्तर दीनानाथांना पहिलेच आहे. तेव्हा हा व्हिडियो कुठे मिळतो का शोधात होतो…बरेच वर्ष सापडत नव्हता. तो आत्ता सापडला. ज्याने अपलोड केला त्याला शतशः धन्यवाद. मागच्याच आठवड्यात अपलोड केला आहे बहुधा.
कुमारांचा ‘मला उमजेले बालगंधर्व’ सगळ्यांनी ऐकला असेलच. प्रत्यक्ष बालगंधर्वांच्याही रेकॉर्ड्स उपलब्ध आहेत. नाट्य संगीताच्या ही आणि भजनाच्या ही. हो हो..भजनाच्या…. बालगंधर्वांना भजनाचे वेड होते. बऱ्याचदा ते भजनी मंडळी गोळा करून लोकांसमोर भजन गायचे… त्यांना लोकांनी बजावले होते की असे ओरडत जाऊ नका घसा खराब कराल म्हणून…पण त्यांनी ऐकले नाही कधीच… त्यातली काही भजने जी आहेत त्यांना चाली लावल्यात त्यांच्याच गुरुबंधूंनी.. मास्तर कृष्णारावांनी…अतिशय श्रवणीय.
असो. खाली त्या सिनेमातील गाण्याच्या लिन्क्स देतो. आवडतात का ते बघा.

ला मिझराब्ल

ला मिजाराब्ल… एक नितांतसुंदर कादंबरी आहे. असे म्हणतात की एकोणीसाव्या शतकातील जगातल्या सगळ्या भाषांमधली उच्चतम कादंबरी… असेलही नसेलही. पण उच्च असेल हे नक्की. नेपोलियनचा पाडाव झाल्यानंतरच्या काळातील फ्रान्सची पार्श्वभूमी. मनुष्या-मनुष्यातल्या संबंधावर आधारित. पण पश्चिमी देशातले लोक मानवी मनाच्या भावना आणि गुंतागुंत दाखवण्यात अग्रणी आहेतच. त्यांची ही अग्रणी. त्याला सामाजिक आशय असतोच. आर्थिक, तात्त्विक सगळे परिमाण असतातच. पण भावना ज्या तीव्रतेने प्रतीत करतात त्याला तोड नाही. War and Peace च्या लेवलचेच रसायन दिसते आहे.

याच पुस्तकावर एक नाट्यसंगीत टाईप कार्यक्रम आला होता. त्याला केव्हातरी १० वर्षे पण झाली त्याच्या निमित्त झालेल्या प्रयोगाचे हे व्हिडियो पाहण्यात आले. शब्द वाचा, चाल ऐका, गायकाच्या चेहेर्यावरचे भाव बघा, अस्वस्थ व्हा…. उत्कृष्ट नमुना आहे हे गाणे तर….

सगळीच गाणी पहिली तरी आवडतील खूपच. पण सगळ्यात जास्त गाजलेले गाणे म्हणजे ‘आय ड्रीम ऑफ ड्रीम’. सुसन बॉयल नावाची एक ४८ वर्षांची बाई. ब्रिटीश आयडॉल सारखी एक खूप प्रेस्टीजीयस टीव्ही मालिका. त्यावर तिला गायची संधी मिळाली. गाणे सुरु करण्यापूर्वी तिची सगळ्यांनी खिल्ली उडवली की ही बाई काय गाणार म्हणून. आणि तिने प्रत्येक प्रश्नाला अतिशय आत्मविश्वासाने उत्तर दिले. त्या उत्तरांना लोक हसत होते. तिला परीक्षकांनी विचारले कोणते गाणे गाणार? उत्तर : ‘आय ड्रीम ऑफ ड्रीम’.. आता परीक्षकपण हसायला लागले. मात्र तिने जेव्हा गाणे सुरु केले तेव्हा सगळे सभागृह एक क्षणभर स्तब्ध झाले. कोणाला कळलेच नाही की काय होते आहे ते. आणि मग जसं एकेक जण भानावर आला तासा उभा राहून टाळ्याच वाजवत राहिला….

(तिचे गाणे इथे ऐकायला मिळेल – http://www.youtube.com/watch?v=wnmbJzH93NU)

आणि हे ओरिजिनल गाणे –

आता ला मिसराब्ल चा इंग्रजी अनुवाद वाचायला सुरुवात करतो आहे. बघू कसे कधी पूर्ण होते ते…