बेल्लारीकर तसा एक चक्रमच मुलगा आहे. इंजिनियरिंग मध्ये दुसऱ्या वर्षाला असताना आमची ओळख झाली. बोट क्लब वर काहीतरी वाद घालत बसला होता. नंतर कळले की हा पण आपल्यासारखाच (सं)वाद-प्रिय मुलगा आहे म्हणून… फक्त वादाचे विषय एकदम आर्केन असतात… गणितात डेरीव्हेटिव्ह शिकवले होते… डेल्टा-अप्रोक्झीमेशंस पण शिकवली होती.. पार्शियल पण शिकलो होतो पण कधी अपूर्णांकात डेरीव्हेटिव्ह नव्हते बघितले आणि ते असतात म्हणून हा ओरडून ओरडून सांगत होता. कोणी ऐकतच नव्हते… (हे पण नेहमीचच.. अपवाद एकच – ‘ती’ संस्कृतमध्ये लिहिलेली गोष्ट मात्र अख्ख्या होस्टेल ने ऐकली-वाचली होती) तेव्हा पासून मैत्री झाली.
शब्द-प्रभू आहेच. इतिहास, क्लासिकल मराठी लिटरेचर, गणित (त्यातही नंबर थिअरी, आणि आता संख्याशास्त्र), ग्रीक मायथोलोजी यावर कमांड आहे… पानिपतच्या तिसऱ्या युद्धाचा आणि एकंदरीतच मध्ययुगीन भारताचा सखोल अभ्यास, मराठी, इंग्रजी, हिंदी या व्यतिरिक्त कन्नड, तेलुगु, बांग्ला, उर्दू, ग्रीक आणि संस्कृत ही या भाषांवर प्रभुत्व….(याचे वय २१ कसे शक्य आहे?) ( या गोष्टीकरता प्रचंड असूया वाटते याची… मी किती वर्ष अजून उर्दू-फार्सी वरच अडकून पडलो आहे) मिरजेचा इतिहास नि महादेव विनायक रानडे (चापेकरांचे सह-क्रांतिकारी), गोडेल, भारत इतिहास संशोधन मंडळ, ट्रोय चे युद्ध, John Nash हे म्हणजे अगदी जिव्हाळ्याचे विषय.. पाठांतर म्हणजे आ वासावे इतके… मग ते मेघदूताचे असो, पुलंच्या गाळीव इतिहासाचे की सखाराम बापूंच्या पत्राचे, ओमर खय्याम असो की रिचर्ड बर्टनच्या सुरस कथा……… पानेच्या पाने घडाघडा म्हणून समोरच्याला चाट पडणे यात स्वर्गीय आनंद लाभतो याला…
याचे व्यक्तिचित्रण केव्हा तरी नक्कीच करणारे… आतापर्यंत पाहिलेल्या सगळ्यांत सगळ्यांत विचित्र पात्र आहे हे… पण त्याचे आत्ता प्रयोजन नाही. मुख्य म्हणजे त्याने ‘दिसामाजी काहीतरी’ वर अनेक पोस्ट्स लिहिल्या. आता स्वतःचा ब्लॉग पण सुरु केला आहे. जरूर वाचा…