सचिन जाधव IAS to आर. विनील कृष्णा IAS (both Orissa cadre)

कृष्णा यांची सुटका झाली शेवटी. आणि हे एक सुरेख पत्र सापडले. मूळ लेख या ब्लॉगवर प्रसिद्ध झाला आहे.

ओरिसातील मलकनगिरीचे जिल्हाधिकारी आर. विनील कृष्णा यांचे, त्यांच्यासमवेत असणारे अभियंता पवित्र माझी यांच्यासह, माओवाद्यांनी अपहरण केले. विनील यांचे मलकनगिरीतील काम असे आहे, की त्यांच्या सुटकेसाठी माओवाद्यांचा प्रभाव असूनही आदिवासीच रस्त्यावर आले आहेत. फक्त आदिवासीच नव्हे, तर सर्वदूर समाजही. नेमकं काय घडतं आहे तिथं? सुरक्षा न घेता विनील जंगलात गेले, हा आता मुद्दा होऊ पाहतोय. खरंच त्यांचं चुकलं? ओरिसातच आयएएस अधिकारी असणारे सचिन जाधव यांनी विनिलला उद्देशून लिहिलेलं हे खुलं पत्र. त्यांच्या परवानगीनेच येथे प्रसिद्ध करतो आहे.
————————————————————————————————————

प्रिय विनील,

परवा मध्यरात्री एका जिल्हाधिकारी मित्राचा फोन आल्यापासून झोप उडालीय. म्हणाले, ‘माओवाद्यांनी विनीलला डिटेन केलंय’. फोन कलेक्टरांचाच असल्यामुळे बातमीची खातरजमा करण्याचा प्रश्नच नव्हता. मग निष्फळ फोनाफोनी सुरु झाली. काय झालंय हे समजून घेण्यासाठी फक्त. तपशील समजले. डिटेन नव्हे तर अपहरणच. पण उपयोग काय?

रात्री दोन वाजता एका मित्र एसपींचा (पोलीस अधीक्षक) फोन आला. माझ्याकडून त्यांना तपशील पाहिजे होते. मी काय कप्पाळ तपशील देणार? ते पूर्वी मलकनगिरीत एसपी होते. “कशाला असं सिक्युरिटी न घेता नक्षल भागात फिरता रे?” कळवळ्याने ते म्हणाले. त्यांची अस्वस्थता माझ्या लक्षात आली. तुझ्यावर सगळेच पोलीस वैतागले असले तर आश्चर्य नाही रे. तुझ्यावर आख्खी एस्टॅब्लिशमेंटच वैतागली असणार. अस्वस्थ करण्याची शक्ती घेऊनच जन्माला आलायस.

तू मयूरभंजमध्ये आयएएस प्रोबेशनर असतानाच एखाद्या कार्यकर्त्यासारखं स्वत:ला झोकून दिलं होतंस. मोटरसायकल घेऊन सिमलीपालच्या जंगलात वेळी-अवेळी एकटाच जायचास. आदिवासी पाड्यांवर फिरायचास. त्यांना जवळून बघायचास. त्यांच्यासाठी योजनांमध्ये, नियमांमध्ये अपवाद करण्यासाठी कलेक्टरांशी बोलायचास. आम्हाला सिमलीपाल दोनच गोष्टींसाठी माहीत होतं – पर्यटन स्थळ, आणि नंतर माओवाद्यांचा अड्डा. तू याच्या पलीकडे गेला होतास. वयाच्या पंचविशीतच. ही समज घेऊनच तू जन्माला आला होतास.

तुला एका ठिकाणी पोस्टिंग मिळालं, आणि त्याचवेळी कंधमाळमध्ये धार्मिक दंगली सुरु झाल्या. या दंगलींना आदिवासी विरुद्ध दलित असा कुठेही न सापडणारा रंग होता. सरकारला एक कलेक्टर, एक एस्पी आणि एक सबकलेक्टर हवा होता. टू फिक्स द थिंग. आणि चारच महिन्यांत तुला डिस्टर्ब करुन कंधमाळला पाठवला. तुम्ही तिघांनी तिथे अजोड कामगिरी केलीत. आंतरराष्ट्रीय निरीक्षकांचा पूर्वग्रहही तुमचे काम झाकोळू शकला नाही.

मलकनगिरी जिल्हाधिकारी पदासाठी तुझी निवड झाली तेंव्हा बऱ्याच जणांना आश्चर्य वाटले. एवढे चांगले काम करणाऱ्याला ही शिक्षा? हाच अनेकांचा प्रश्न होता. मलकनगिरीमध्ये कुणी पाय ठेऊ धजत नाही. नक्षलवाद्यांची अघोषित राजधानी. पण सुजाण मुख्यमंत्री इथे कर्तव्यकठोर अधिकारीच पाठवतात हे फार थोड्या जणांच्या लक्षात येते. तुझ्याअगोदर इथे नितीन जावळेंनी चांगल्या कामांचा पायंडा पाडून ठेवलेला होताच. तुझे ग्राऊंड बऱ्यापैकी तयार होते. तू त्यावर सुंदर बाग फुलवलीस. मलकनगिरीत आजमितीस तू जेमतेम एक वर्ष पूर्ण केलेस. लाल दिव्याच्या गाडीचे तुला कधीच आकर्षण नव्हते. मलकनगिरीत त्याची गरजही नव्हती तुला. नाडलेल्या आदिवासींना मदत करण्यासाठी तुला कशाचीच गरज नव्हती. मनासारखे काम करता येण्यासाठी तुला फक्त स्वातंत्र्य आणि एक यंत्रणा हवी होती. ती तुला मिळाली.

तुझ्या मनात या आदिवासींसाठी इतके प्रेम आहे की तुला भीती म्हणून काय ती नाहीच. या भागात दुसरा एखादा अधिकारी काय करेल? एकतर बाहेर पडायचे नाही. पडले तर हेवी सिक्युरिटी असल्याशिवाय नाही. आर ओ पी (रोड ओपनिंग पार्टी) आधी पुढे जाणार. लॅण्डमाइन्स तपासणार. साग्रसंगीत उपचार होणार. अर्धा दिवस त्यातच जाणार. मग आपलं भोज्जाला शिवून अधिकृत भेट उरकून अंधार पडायच्या आत आपल्या सुरक्षित ठिकाणी परत यायचं. पण तुझी रीतच न्यारी. तू आणि तुझा ड्रायव्हर. पीएसओ नाही, आरओपी नाही. हत्यार तर नाहीच नाही. जिथंपर्यंत गाडी जाईल तिथंपर्यंत जायचं. जिथं रस्ता संपेल तिथं तुला घ्यायला एखादा तहसीलदार, एखादा बीडीओ, एखादा इंजिनियर आलेला असायचा. मोटरसायकल घेऊन किंवा चालत. जेवण त्यांच्यासोबतच. सगळं एकदम शिवाजी महाराज स्टाइल. लोकांच्यात बसायचं. बोलायचं. आणि जे करता येण्यासारखं असेल ते लगेच करायचं. जे करता येण्यासारखं नाही, ते त्यांना समजावून सांगायचं.

हे एवढं आदिवासींसाठी खूप होतं. तू त्यांच्यासाठी वनवासात आलेला रामच जणू.

आदिवासी गांजलेले. एका बाजूने नक्षल. दुसऱ्या बाजूने पोलीस, सीआरपी. दोन्हीकडून मार. खायची मारामार. नक्षलवाद म्हणजे काय हे त्यांना कुठून समजणार? नक्षलींनी आदिवासींची पोथी बरोबर वाचलेली होती. त्यांची मनं जिंकायची त्यांना गरजच नव्हती. जे त्यांना जरा बरे वाटत, त्यांना ‘रिक्रुट’ करीत. बाकीच्यांचा काही फरक पडत नसे. अशा परिस्थितीत जिल्हाधिकारी स्वत: त्यांच्या पाड्यावर येत असेल तर त्यांना तुझ्यात देव दिसल्यास नवल नाही.

हे आम्हाला आज समजलं. तुला नक्षलवाद्यांनी पकडून नेल्यावर ज्या गावातून तुला त्यांनी नेलं, त्याच गावातल्या आदिवासींनी उत्स्फूर्त मोर्चे काढले, तुला सोडावा म्हणून. सगळं मलकनगिरी बंद आहे आज. कुणीही न सांगता. तू याआधी काम केलेला कंधमाळ जिल्हाही बंद आहे. तोही तसाच. उत्स्फूर्तपणे. ज्या आदिवासींसाठी काम करत असल्याचा दावा नक्षल करतात, त्याच आदिवासींनी नक्षलांना ठणकावून सांगितले, आमच्या कल्याणाची काळजी असेल, तर अगोदर कलेक्टरांना सोडा. आम्हाला तेंव्हा कळलं, तू काय आणि कसं काम करतोयस ते. आज सगळ्या राज्यात निदर्शने चालू आहेत. कलेक्टरसाठी नाही, तर विनीलसाठी.

एक फार मोठा विरोधाभास आज लोकांना पहायला मिळाला.

कुडमुल्गुमा नावाच्या दुर्गम ब्लॉकमध्ये तू गेला होतास. जनसंपर्क मेळाव्यासाठी. तिथं जाणं सोपंही नाही, आणि शहाणपणाचंही नाही. रस्त्या-रस्त्यावर सुरुंग लागलेले असतात. तू गेलास ते गाव तर भलतंच कुप्रसिद्ध. हे कुडमुल्गुमा त्याच भयावह बालिमेडा जलाशयाच्या जवळ, जिथे दोन वर्षांपूर्वी जवानांनी भरलेली आख्खी बोट नक्षल्यांनी बॉंबहल्ल्याने बुडवली होती. हा ‘त्यांचा’ इलाका. पंधरा ग्रामपंचायती त्यांच्या. या भागात सरकारी माणसानं यायचं नाही. पोलीस, सीआरपी तर लांब.

तू इथे जायचास. एकदा नाही, दोनदा नाही, नेहेमी. खरं तर तू इथेच, १५१ गावांवर, कट ऑफ गावांवर, तुझं लक्ष केन्द्रित केलंस. तू जाऊ लागलास, आणि लोकांनाही वाटलं इथं काम होतंय. इथल्या लोकांनी एकदा मागणी केली, आम्हाला ब्लॉक ऑफिस लांब होतंय, तर तू थेट त्या गावांमध्ये गेलास, आणि ब्लॉक ऑफिस आठवड्यातून एक दिवस तिथे, असं खरंच चालू केलंस देखील. लोकांमध्ये जसजसा प्रिय होत गेलास, नक्षली वेट अॅण्ड वॉच करत राहिले असावेत बहुदा, तुझा आत्मविश्वास वाढत गेला. तुला सिन्सिअरली वाटत होतं, इथं सरकार पोचलं नाही म्हणून नक्षलवाद आला. आता तो घालवायचा असेल, तर सरकार तिथं गेलं पाहिजे.

विनील, ज्या दिवशी तू गेलास तो दिवस इदचा होता. सरकारी सुट्टीचा. तू सुट्टी न घेता काम करत होतास. भीतीने सुनसान ओस पडलेले रस्ते पार करून तू सिलेरू नदीच्या काठी गेलास. तिथून बोटीने नदी ओलांडून त्या गावी पोहोचलास. का, तर सरकार गावांत पोचलं पाहिजे यासाठी. शिबिर झालं. लोकांचे समाधान केलंस. वनाधिकाराचे दाखले वाटलेस. पेन्शन दिलीस. आवास योजनेचे लाभ दिलेस. मग एका स्वयंसेवी संघटनेच्या कार्यकर्त्याने तुला आग्रह केला, “सर, इथे जनतापै गावात विद्युतीकरणाचं काम बघायला चला.” आणि तू विनाविलंब गेलासही. मोटरसायकलवर. सोबत फक्त दोन ज्युनिअर इंजिनियर घेऊन. जंगलात. खोल गुहेत जणू. जिथून परत आलेली पावलं दिसत नाहीत. तुझे एकूणच स्वयंसेवी संघटनांवर भाबडे प्रेम आहे. त्या लोकांनी तुला परत पाठवलेच नाही. एका इंजिनियरला परत पाठवले – असं सांगून की, ‘आम्ही सरांची काळजी घेतो, तू जाऊन सरकारला ही चिठ्ठी दे, सांग अठ्ठेचाळीस तास, आमच्या मागण्या आणि कलेक्टरचे प्राण.’ तुझे डोळे बांधून तुला चालवत सहा जण जंगलात घेऊन गेले.

आजही तुला चालवलंच जातंय. रोज वेगळ्या ठिकाणी. जागा बदलत. का, तर तुझ्या सुटकेसाठी सारं काही पणाला लावू पाहणाऱ्या आदिवासींनाही ते शक्य होऊ नये. असं म्हणतात की, त्यांनी आता मोर्चेबांधणीही केली आहे.

विनील, तू म्हणायचास, या लोकांसाठी काम करायला मला पाठवलंय, मी ते करतोय, हे लोक मला कसा काय अपाय करतील? तुझा विश्वासघात झाला दोस्ता.

आता आज बऱ्याच जणांच्या मनात काय विचार सुरू असतील ठाऊक आहे? ऐक.

विनिल, वेड्या, तुला कल्पना आहे का तू सरकारला किती मोठ्या काळजीत टाकलंयस त्याची? आम्हाला एकाच वेळी तू उत्तम अधिकारी, प्रशासक वाटतोस, आणि त्याच वेळी अविचारी साहसी आदर्शवादी तरुणही वाटतोस. तुला काय गरज होती तिथं जायची? पकडलेले जे नक्षल आता तुझ्या बदल्यात सोडले जातील त्याबद्दल तुलाच आता सगळे जबाबदार धरणार असं वाटत नाही तुला? एकतर तिथं जायचंच नव्हतंस. किंवा गेलास तर सुरक्षेचा जामानिमा घेऊनच जायचंस. वेडा. बेजबाबदार. अदूरदर्शी. असा कसा रे कलेक्टर तू?

हे आणि असंच बऱ्याच जणांच्या मनात येत असणार याची मला कल्पना आहे. हे असले प्रसंग तर होतच असतात असंही म्हणणारे महाभाग मला भेटले आहेत. विनायक सेनांच्या मानवी अधिकारांची चिंता वाहणाऱ्यांना तुझ्या मानवी हक्कांचा विचार करावासा वाटणारच नाही, कारण तू तर जालीम सरकारी व्यवस्थेतला बाबू! सरकारचा जावई! चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला वगैरे वगैरे. तुझ्यासाठी सरकार आकाशपाताळ एक करणार याची या विचारवंतांना पक्की खात्रीच. त्यामुळे ते आपली वाफ कशाला दवडतील?

पण मला काय वाटतं सांगू? तू जिंकलायस विनील. तू हादरवून सोडलंयस या तथाकथित माओवाद्यांना. ज्यांच्या कल्याणाच्या गोष्टी ते करतात, त्या आदिवासींनीच आज त्यांना सणसणीत चपराक मारलीय, ‘आम्हाला तुम्ही नको, विनील हवाय,’ असं ठणकावून सांगून. तुला प्यादं म्हणून वापरायच्या नादात नक्षल्यांनी आपलं थडगं खणून ठेवलं. यू आर देअर नेमेसिस.

विनील, आम्हाला क्रांतिकारक हवेत. आणि तेही तुझ्यासारखे. यंत्रणेचा योग्य वापर करून लोकांचं आयुष्य बदलवण्यासाठी स्वत:चं आयुष्य पणाला लावणारे. यंत्रणेच्या नावाने खडे फोडणारे विचारवंतही नकोत, आणि यंत्रणाच बदलायला हवी म्हणून अजून एक अन्याय्य यंत्रणा बळजबरीने माथी मारणारेही नकोत. तू हे अशा प्रकारे काम नसतंस केलं तरी तुला कुणी जाब विचारणार नव्हतं. उलट तुला सहानुभूतीच मिळाली असती, बिचारा मलकनगिरीत पोस्टिंग झालंय, याच्या कुटुंबाचं, मुलांचं कसं होणार, याच्या सॉफ्ट पोस्टिंगसाठी कुठे प्रयत्न करायला सांगूयात, इत्यादी.

तू हिरो आहेस विनील. आय ए एस आहेस म्हणून नाही. जिल्हाधिकारी आहेस म्हणून नाही. जिवाची बाजी लावून जग बदलायला निघालेला शिलेदार आहेस. केवळ स्वप्न न बघता झोकून देणारा कार्यकर्ता आहेस. म्हणूनच तू हवा आहेस आम्हाला.

तुझा वेडेपणा हवाय विनील आम्हाला. तुझ्यासारखे ‘वेडे’च नक्षलवादाच्या वेडाला मूठमाती देऊ शकतात.

आय सॅल्यूट यू, सर!

सचिन जाधव, आयएएस, ओरिसा.

लातूरकरांचे अभिनंदन…

आत्ताच १२ वीचा निकाल लागला. या निकालातली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ‘लातूर Pattern’  साठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्याची पहिल्या क्रमांकावरून झालेली उचलबांगडी आणि ती सुद्धा साधीसुधी नाही तर एकदम शेवटच्या स्थानावर. मागच्या वर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण होते ८५.५१ %  आणि ह्या वेळेस ते आहे ४४.८१ %….!! आता वर्षभरात विद्यार्थ्याची पातळी काही इतकी खालावत नाही. या साठी जबाबदार सर्वात मोठा घटक म्हणजे लातूरच्या आणि  महत्वाच्या नांदेडच्या जिल्लाधिकारी आणि करमचार्यानी घेतलेले ‘Tough Anti Exam Malpractices Measures ‘ बाकीच्या ७ बोर्डाचे निकाल ८० % च्या आसपास आहेत आणि फक्त लातूर चा ४४ %. यात लातूर बोर्ड गंडलेले आहे असे समजावे की बाकीच्यांना ‘Reality check ची गरज  आहे असं समजावे..?

इतर महाराष्ट्रात काही फार दिव्य परिस्थिती आहे असं वाटत नाही, त्यामुळे दुसरा पर्याय जास्त योग्य वाटतो. आता लातूरकरांना कमी निकालाबद्दल फैलावर घेतलं जाते की इतरांना ठोस पावले न उचलण्याबद्दल हे पाहायला हवे. महाराष्ट्र बोर्डाने निकाल Online लावून फार मोठी सोय केली आहे, आणि त्यात सर्वात मस्त गोष्ट म्हणजे भरपूर Statistics उपलब्ध करून दिले आहेत. लातूरच्या या निकालावरून जरी आपल्या शिक्षण पद्धतीचे खरे स्वरूप बाहेर येऊन वाभाडे निघाले असतील तरी परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने एक महत्वाचा पाउल म्हणता येईल. बाकीच्यांना सुद्धा असे करण्यास प्रवृत्त केले पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनात पास होण्यासठी अभ्यास करावा लागतो अशी भावना तरी निर्माण होईल.भविष्यासाठी आपले बोर्ड कुठल्या वाटेने जातात हे महत्वाचे ठरेल. ईश्वर त्यांना योग्य (कठीण असला तरी ) मार्गाने चालांयची सुबुद्धी देवो .

( ह्या पार्श्वभूमीवर ८ वी पर्यंत परीक्षा रद्द करण्याचा निर्णयाबद्दल विचार करतोय.. फारसे आशावादी चित्र दिसत नाहीये)
१२ वी results आणि Statistics इथे पाहू शकतात http://mahresult.nic.in/ येथे विभाग निहाय statistics पण उपलब्ध आहेत.

– स्मित गाडे

महु-पुराण..!

काही माणसे, काही प्रसंग, काही ठिकाणे… उगीच कारण नसताना मनात घर करून असतात. त्यांच्या बाबतीत काही स्पेशल असते असे नाही, पण असतात. काही वेळा काही घटना घडल्या म्हणून तर काही वेळा का नाही घडल्या म्हणून…

एकदा मागे मध्ये-प्रदेश दौरा करून आलो होतो. आपण ज्याला ट्रीप म्हणतो ती ९९% वेळा अगदी तिऱ्हाईत, परदेशी, अनोळखी, अलिप्त व्यक्तीसारखी त्या प्रदेशाला दिलेली भेट असते. ना तिथले लोक कळतात ना तिथली संस्कृती. काचेच्या अलीकडून पाहिल्यासारखे अंगावर काही शिंतोडे ना उडवून देता जर त्या भागाला भेट दिली तर पोकळ समाधानच मिळते. ती सहल मग फोटो काढण्यासाठी आणि इतरांना ‘मी तिथे जाऊन आलो’ सांगून फुशारक्या मारण्यासाठी होऊन जाते. किंवा स्वतःलाच ‘मी जाऊन आलो बर का, आता छान वाटून घे’ असे समजावण्यासाठीची ती सहल. रोजच्या आयुष्यातून बदल आणि विरंगुळा म्हणून ठीक आहे पण त्याने तुम्ही त्या भागल खरी भेट देत नाही. स्वतःपासून पळण्यासाठी आपण कामात मग्न असतो आणि कामापासून पळण्यासाठी इतर लोकांमध्ये आणि अशा ट्रिप्स मध्ये. असो. उगीच फिलॉसॉफी देणे आपला धंदाच आहे.

तर ट्रीपला गेलो होतो. इंदौर, उज्जैन, मांडवगड, ओंकारेश्वर वगैरे बघून आलो. नवा प्रदेश होतं, नवे लोक होते आणि एकंदरीतच भारताच्या सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक भूगोलाचे ज्ञान कमी असल्याने खूप नव्या गोष्टी कळल्या. सांदिपनी आश्रम असो नाहीतर मांडू… खूप भारी होते सगळे. नंतर वर्षभराने पुन्हा एकदा ‘बहा’ स्पर्धेच्या निमित्ताने पिथमपूर ला जाणे झाले. दोन्ही वेळेस महू नावाचे गाव लागले. ११-१२वी मध्ये एक मित्र होता त्याचे बाबा आर्मी मध्ये होते आणि तेव्हा महूला स्टेशंड होते. त्यामुळे महू म्हणजे भारतीय लष्कराचे एक ठाणे एवढीच ओळख… पण परवा गुगल करता करता महूची जी जी माहिती वाचली तसा अवाकच झालो… दोनदा महू ला टच करून आलो तरी हे माहित नव्हते म्हणून वाईट पण वाटले. महू हे एक अजब रसायन च आहे… म्हणजे पुण्यासारख्या शहराला जाज्वल्य अभिमान बाळगण्यासारखा ३००-४०० वर्षांचा इतिहास असणे यात नवे काही नाही.. पण ज्या गावाचे अस्तित्व इतके पिटुकले आहे त्याचा इतिहास पण असा भरलेला आहे की काय… वाचाच वाचा..

महू ची सुरुवात होते तीच ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात… त्यापूर्वी तिथे काय होते ते माहित नाही… कंपनी सरकारचा एक तगडा अधिकारी – सर जॉन माल्कम. याचे लहानपण गेले मद्रास ला. फार्सीचा सखोल अभ्यास आणि त्यामुळेच कॉर्नवालीसने त्याची नियुक्ती त्याच्याशी रिलेटेड पदावर केली होती. (हा माणूस इतिहासकर ही आहे बर का) सगळ्यात आधी हा प्रकाशझोतात आला ते म्हणजे इंग्रज विरुद्ध टिपू सुलतान + निझाम यांच्यात झालेल्या शेवटच्या लढाईत. तिथे जोरदार पराक्रम गाजवला भाऊंनी. मग इंग्लंड ला गेला. तिथे काहीतरी नेव्ही मध्ये पराक्रम गाजवला. एक मात्र आहे, की त्या १००-२०० वर्षांमध्ये जो जो भारी इंग्रज अधिकारी होऊन गेला त्याचं काही ना काही काही कर्तृत्व नेव्ही मध्ये असतेच.. तसेच याचे पण होते. परत मद्रास ला आला.. बऱ्याच मोठ्या मोठ्या पोस्ट्स वर चढत गेला.. मुलकी आणि लष्करी दोन्ही…. रादर तेव्हा असा फरक कंपनी सरकारात तरी जास्त होते नसे… एकाच अधिकाऱ्याकडे बऱ्याचदा दोन्ही पॉवर्स असायच्या.. नशीब म्हणजे काय असते एकेकाचे.. कोणाला कुठे कुठे फिरवून आणेल सांगता येत नाही. इराणच्या इंग्रजी राजदूताची हत्या झाली आणि याला तिथे पाठवले.. तिथे राजदरबारात हे फारच रमले… वारेमाप खर्च केला. बेधुंद झाले आणि मग सगळ्यांशी भांडण करून बसले. कंपनी सरकारने परत मुंबईला बोलावले. आता काळ येतो १८००-१८१५ चा… तेव्हाचा हिंदुस्थान लक्षात घ्या… कंपनी एकेक राज्य गिळत होती. ३ इंग्रज-मराठा युद्धे, इंग्रज-शीख युद्धे, दक्षिणेतली अनेक युद्धे… संपूर्ण भारत म्हणजे रणभूमी झाला होता.. मला वाटते भारतवर्षभर स्प्रेड असलेले युद्ध १-२ दशकाच्या कालावधीत.. नि ते पण एकाच शत्रूशी.. हे पहिलेच असावे इतिहासात… अफगानिस्तान-इराण पासून म्यानमार पर्यंत आणि काश्मीर पासून श्रीलंकेपर्यंत… सगळीकडेच युद्ध-सदृश परिस्थिती… अशा वेळी माल्कम महाराजांना भराभरा पदोन्नती मिळत गेल्या.. आधी इराणचा राजदूत मग मद्रास ला मोठे कोणते तरी पद नि मग डायरेक्ट गव्हर्नर ऑफ बॉम्बे… !! आता आले साल १८१७-१८१८… म्हणजे शेवटचे इंग्रज मराठा युद्ध. आणि माल्कम साहेब बॉम्बेचे गव्हर्नर आणि मोठ्या लष्करी हुद्द्यावर…

ब्रिटीश लोकांचा खरा राग येतो जेव्हा तुम्ही त्यांनी सगळा भारत कसा मिळवला ते नीट वाचले तर.. आणि मग त्यांची न्याय-प्रियता, तंत्रात प्रगती, त्यांची पार्लमेंट.. सगळे जाते गाढवाच्या ***. तळपायाची आग मस्तकात जाणे म्हणजे काय त्या म्हणीचा अर्थ अनुभवायचा असेल तर हा १०० वर्षांचा इतिहास वाचा, गाझेटीयर्स वाचा….. १९ डिसेंबर १८१७. मध्य भारत. होळकर विरुद्ध इंग्रज. आपल्यातला अजून एक सूर्याजी पिसाळ म्हणजे गफूर खान पिंडारी. याने या दिवशी ब्रिटीशांशी गुप्त तह केला, परत छावणीत आला आणि तुळशीबाईला खलास केले. दुसऱ्या दिवशी ब्रिटीश आले लढायला आणि आपले उरलेले सेनानी म्हणजे ११ वर्षांचा मल्हारराव आणि २० वर्षांचा हरीराव होळकर.. असेही नाही की तेव्हा आपण लै भारी होतो.. खूप डीग्रेड झालोच होतो अनेकदृष्ट्या.. त्यामुळे पराभवाचे खापर शत्रूवर फोडणे म्हणजे पलायनवाद होईल. औरंगझेबने गोवळकोन्ड्याला केलेली न-गीना बाग असो किंवा ब्रिटिशांनी केलेली ही महिद्पुरची कत्तल… कोणीना कोणी ‘क़्विसलिन्ग’ असल्याशिवाय हे होत नाही हे खरे… असो. तर दुसऱ्या दिवशी युद्ध सपाटून मार खाला आणि हरलो. आणि कंपनी सरकारच्या अखात्यारीखाली हा ‘मध्य भारत’ नावाचा प्रांत आला. या युद्धानंतर होळकर महेश्वर सोडून इंदौर ला आले… नर्मदेकडून क्षिप्रेकडे…तिथून महू आहे २०-३० किलोमीटर..परत कोणी इंदूर, उज्जैन ला उचल काहु नये या कारणासाठी किंवा भारताच्या मधोमध एक असावे म्हणून… अनेक कारणांनी इंग्रजांनी इथे एक मोठा लष्करी तळ उभारला – ज्याचे नाव आहे – महू.. मिलिटरी हेडक्वार्टर्स ऑफ वेस्टर्न इंडिया चे अक्रोनिम आहे हे. And this is how Mhow came into being… हुश.. ..

तरी पण भारताच्या इतिहासात महू चे महत्व काय फक्त या घटनेमुळे नाहीये.. या युद्धात जरी होळकर जिंकले असते तरी एकंदरीतच मराठे काही फायनल युद्ध जिंकायच्या स्थितीत नव्हते.. केव्हा ना केव्हा हरणारच होते.. त्यामुळे महुचे सगळ्यात मोठे योगदान कोणते? – बाबासाहेब आंबेडकर… त्यांचे वालीद लष्करात होते, महार रेजिमेंट मध्ये. आणि महार रेजिमेंट तेव्हा काही काल होती महू मध्ये. तिथे त्यांच्या वडिलांवर कबीराचे संस्कार झाले. आणि वडिलांचे संस्कार झाले बाबासाहेबांवर. कबीर-बुद्ध-फुले असे तीन बाबासाहेबांचे गुरु होते त्यातले पहिले कबीर.. अन बाबासाहेबांचा जन्म पण महूचाच… कोण सांगणार आम्हाला हे? उज्जैनचा कुंभमेळा माहित पण महुचे महात्म्य नाही…

आणि आपण भारतीय लढण्यात एकदम निष्णात.. शत्रूशी नाही… आयुधजीवी राज्ये केव्हाची गेली.. आपल्या-आपल्यात भांडण्यात माहीर… आणि सगळ्यात दुर्दैवी म्हणजे अतिशय फालतू मुद्द्यांवरून… कोणाचे इगो कुठे कधी कसे ठेचले जातात तेच काळात नाही… जो तो उठतो तो ‘अस्मिता’ ‘अस्मिता’ करून भांडायला लागतो… इथे पण एक नामांतर वाद झाला. महू ला बाबासाहेब आंबेडकर नगर म्हणायचे की नाही? औरंगाबाद ला खडकी किंवा संभाजी नगर म्हणायचे की नाही? जे नाव बदला म्हणणारे होते ते बाबासाहेबांचे तथाकथित अनुयायी असावेत.. मला ते कोण होते ते माहित नाही.. आणि नाव बदलू नका म्हणणारे जे होते ते महू य अनावाची इमोशनली आणि हिस्टोरीकली बांधलेले होते… पोरबंदर ला गांधीनगर किंवा अलाहाबाद ला नेहरू-नगर नाही म्हणत तर महुलाच का आंबेडकर नगर म्हणायचे… बघा किती इगो -  पहिला इगो अस्मितेचा… आंबेडकरांचे खरे अनुयायी असल्या वादात पडण्यापेक्षा खरे काहीतरी कामाचे काम करतील तर खरे.. बर, या वादात पडले ते पडले.. दुसरी बाजू पण तशीच… इतिहासाची गोचीडे अंगावर पाळत बसलेली… ज्यातून कधी बाहेर पडतील तर बदलेले जग बघतील…. आणि तिसरी चूक म्हणजे ‘तुलना’.. जे काही करायचे आहे ते केस-स्पेसिफिक नाही बोलणार.. उगीच अजून इतर ३-४ गोष्टी मध्ये घुसडून वादाला अजून मोठा वाद करणे तेवढे जमते… चुकून उद्या कोणी खरंच म्हटले की अलाहाबाद ला करा नेहरूनगर तर काय घ्या.. परत नवीनच लचांड सुरु व्हायचे… आणि या सगळ्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर राहिले बाजूला… ना ते मोठे-लहान होणार किंवा त्यांना कमी-जास्त मान मिळणार असेही नाही किंवा यामुळे इतर काही दृश्य फायदा तरी मला दिसत नाही… पण एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या स्मृतीप्रित्यर्थ नाव बदलायला पण हरकत नाही.. कारण त्यांचे कर्तृत्व आहे तसे.. पण भांडणे कशाला? इथे इतिहासाचा दुरुपयोग दोन्ही बाजू करतात… त्यापेक्षा लोकांनी बुद्ध आणि हिज धम्म वाचले तर जास्त उपकार होतील या देशावर…

असो. आपण जरा आपल्याला मानवेल अशा विषयाकडे येऊ. सेलिना जेटली. बॉलीवूड मधली एक हिरोईन. लोकांना आता सर जॉन माल्कम माहित असायचे काहीच कारण नाही. त्याचे (अ)कर्तृत्व २०० वर्षांपूर्वीचे… पण सेलिना जेटलीला उभ्या भारतातल्या प्रत्येक घरातले लहान मूळ ओळखते… तर तिचा जन्म काही इथला नाहीये.. हिचा जन्म अफगानिस्तान मधला.. काय स्टोरी आहे बघा हीची.. वडील लष्करात, अफगाणिस्तानात होते. तेव्हा कोण एका अफगाण हिंदू बाईला यांनी पटवले… (अफगाण हिंदू हा काय प्रकार आहे मला खरंच माहित नाही, कोणाला माहित असल्यास कळवावे) ती होती तेव्हाची अफगाणी ब्युटी क्वीन… (अफगानिस्तान मध्ये ब्युटी क्वीनच्या स्पर्धा? मी वाचलेली माहिती नक्कीच चुकीची असणारे)  आणि या दाम्पत्याला झालेली मुलगी म्हणजे सेलिना जेटली… आता हे दाम्पत्य महू मध्ये राहते… एवढाच त्यांचा आणि महूचा संबंध…..:):)

असो. इति महुपुराण…

ता. क. – अफगाण हिंदू अशी कम्युनिटी खरंच अस्तित्वात आहे. इथे त्याबद्दल वाचायला मिळेल. त्यांचा एक ब्लॉग पण आहे… इंट्रेस्टिंग..

आर्य आणि अनार्य : एक धावता (अगदी f -1) आढावा .

इतिहास म्हणजे या ना त्या कारणाने वेळोवेळी फुटणाऱ्या बॉम्बगोळ्यांनी व्यापलेले कुरुक्षेत्रच  जणू. अलीकडे तर कधी कोणत्या मुद्द्यावरून वाद , वितंडवाद आणि दहशतवाद फोफावतील, हे सांगणे कठीणच आहे. मग काल कोणताही असो , प्रदेश कोणताही असो. युरोपात पाहिले तर लोक  चेंगीज खान , अरब यांच्या नावाने बोटे मोडतात , ज्यू हिटलरला शिव्या घालतात. आफ्रिका आणि वसाहतवादाच्या जोखडातून नुकतेच मुक्त झालेले कोणतेही देश युरोपच्या नावाने खडे फोडतात .  भारतात तर असे बॉम्बगोळे  किती आहेत कुणास ठाऊक. पण या सर्व स्फोटकांचा बाप म्हणजे सो-कॉल्ड आर्यन इन्व्हेजन थेअरी . या सिद्धांतावरून जितका कंठशोष झाला, तितका अजून कोणत्याही मुद्द्यावरून झाला नाही . तस्मात या आणि अजून काही लेखांमधून याचा एक अति-अति धावता आढावा घेण्याचा प्रयत्न आहे .

हा सिद्धांत पुढे करून १९व्य शतकात ब्रिटीश लोकांनी आपल्या साम्राज्यवादाला नैतिक बैठक देण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुल्यांनी हा सिद्धांत वापरून आर्य हे बाहेरचे उपरे असून त्यांनी आधीच्या अधिक प्रगत अशा मूलनिवासी  द्रविड लोकांना पराभूत केले , असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला . बहुजनसमाजाला पारंपारिक हिंदू धर्मापेक्षा एक वेगळी ओळख देण्याचा हा प्रयत्न होता. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी   या सिद्धांताचा उहापोह “who were the shudras?”  या पुस्तकात केला आणि फुल्यान्प्रमानेच  मत दिले. तामिळनाडूमध्ये हा सिद्धांत वापरून सो-कॉल्ड द्रविडपणाला चेतविण्याचा प्रयत्न केला गेला. आजदेखील काही तथाकथित आणि पोकळ बहुजनसमाजवादी लिखाणात या सिद्धांताची मढी उकरून हवी तशी सजविली जातात.अर्थात आर्यन इन्व्हेजन थेअरी हा आर्य संकल्पनेचा एक भाग आहे. ती संकल्पना वापरून हिटलरने जो दंगा केला, तो महशूर आहे . “white man’s burden” हादेखील असाच एक रद्दी सिद्धांत आहे. पण त्याबद्दल नंतर कधीतरी .

मुळात हा सिद्धांत काय आहे? हा सिद्धांत असे सांगतो , की सुमारे १५०० इ.स .पू. या वेळी भारतात आर्य नामक लोक बाहेरून आले, त्यावेळी भारतात असलेल्या द्रविडीय लोकांना त्यांनी हळूहळू आपले गुलाम बनवले, आणि आपला वरचष्मा भारतावर प्रस्थापित केला . आर्य लोकांचा वंश द्रविड लोकांपेक्षा वेगळा होता , त्यांची भाषा देखील वेगळी होती .

तर हा सिद्धांत कोणी सर्वात आधी मांडला? याचे उत्तर देण्या आधी मुळात या सिद्धांतामागील पार्श्वभूमी थोडीशी समजावून घेऊ. १८व्य शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटीशांची भारतावरील पकड बर्यापैकी मजबूत होऊ लागली आणि बरेच युरोपियन्स भारतात येऊन भारतीय संस्कृतीचा अभ्यास करू लागले . त्याची परिणती म्हणजे “indology” ही शाखा होय. सर विलियम जोन्स हे त्यातील एक अग्रगण्य नाव आहे . संस्कृत चा अभ्यास करून त्यांनी आधीच्या लोकांनी केलेल्या तर्काला पुष्टी दिली, की संस्कृत, ग्रीक आणि लातिन या ३ भाषांची पूर्वज भाषा ही एकच होती. त्यामुळे भारत आणि युरोप यांचे सांस्कृतिक आजेपणजे एकच असावेत असा निष्कर्ष त्यांनी काढला. त्याचीच परिणती म्हणजे वरती सांगितलेला हा सिद्धांत होय . max  मुल्लर , जॉन मुइर आणि इतर अभ्यासकांनी हा सिद्धांत पहिल्यांदा मांडला.

आता या सिद्धांतातील तथ्य आणि मिथ्य दोन्ही तपासून पाहू . विलियम जोन्स हा संस्कृत भाषेचा पहिला प्रसिद्ध अभ्यासक संस्कृत बद्दल असे म्हणतो , की संस्कृत ही ग्रीक आणि लातिन यापेक्षा बाहेरून वेगळी असली तरी त्यांचे व्याकरण आणि साधारण ढाचा बर्यापैकी सारखा आहे आणि हा सारखेपणा इतका आहे , की या तीनही भाषांची मूळ भाषा १ च असावी . त्या भाषेला तो “proto-indo-european” असे म्हणतो. इतकेच नाही , तर पारशी लोकांच्या अवेस्ता नामक धर्मग्रंथातील पर्शियन भाषा आर्ष संस्कृतशी खूपच मिळतीजुळती आहे. हे झाले भाषिक पुरावे . कधीकाळी आर्य लोक हे भारताबाहेर होते याला काय पुरावा? इराणमधील प्राचीन  संस्कृती ही आर्य संस्कृतीशी मिळतीजुळती होती, पण त्यापुढे काय? पण तुर्की मध्ये बोगोझ-कोई नामक ठिकाणी मितान्नी   साम्राज्यामधील तुशारात्त राजाने इजिप्त च्या अमेनहोतेप तिसरा या राजाबरोबर केलेला  शांतता करार मिळाला क्युनिफोर्म लिपीत लिहिलेला मिळाला आहे . त्यात अग्नी, वरुण यांसारख्या स्पष्टपणे आर्यन / वैदिक देवतांना साक्षी मानले आहे . या कराराचा काळ आहे इ.स.पू . १४००   . ह्यावरून असे सिद्ध होते की भारताबाहेर देखील आर्य संस्कृती प्राचीन काळी पसरलेली होती.

पण मग द्रविड लोकांवरील त्या तथाकथित हल्ल्याचे काय? आर्य हे हल्लेखोर होते , असे म्हणणार्यांच्या मताला पुष्टी देणारा एकच अप्रत्यक्ष पुरावा आहे, तो म्हणजे पाकिस्तान मधील बलुचिस्तान भागात आजही सुमारे २२ लाख लोक बोलत असलेली ब्राहुई ही भाषा होय. जरी शब्दसंपदा अलीकडच्या काळात उर्दू फारसीने प्रभावित असली तरी व्याकरण इत्यादी प्रकारे तपासू गेलो तर ती एक द्रविड भाषा आहे , असे सर्व भाषातज्ञ म्हणतात. बाकी सर्व द्रविड भाषा दक्षिण भारतात आणि हीच एकटी उत्तरेत कशी काय? नक्की उत्तर कुणालाच माहित नाही. पण यावरून स्थलांतर हे एकच तर्कशुद्ध उत्तर निघते.

आता हा पुरावा असे सूचित करतो, की भाषेचे कदाचित स्थलांतर झाले असावे. पण मग तथाकथित आर्य वंशाचे काय? तर २००५ साली National DNA analysis centre, Kolkata , Oxford university zoology dept. ani Estonian biocentre या संस्थांमधील संशोधकांनी भारतामधील ३२ भटक्या जमाती आणि ४५ (नेहमीच्या) जाती यांमधून हजारो लोकांचे डी एन ए तपासले आणि निष्कर्ष काढला की सुमारे गेल्या ४०००० वर्षात तरी उत्तरपश्चिम भागातून मोठ्या प्रमाणावर लोकांचे कोणतेही उल्लेखनीय  स्थलांतर झालेले नाही . कुणाला हवे असल्यास त्याची पीडीएफ माझ्याकडे आहे. त्यामुळे वंशाचा मुद्दा तरी निकालात निघाला .

भारतीय संस्कृतीचा सध्या ज्ञात असलेला सर्वात जुना अवशेष जी हडप्पा संस्कृती, ती आर्य  की द्राविडी? हडप्पा संस्कृती ही आर्य नाही , असे म्हणणार्यांचा भर कायम घोडे आणि त्याशी निगडीत असलेल्या रथ आणि इतर गोष्टींशी असतो. त्यामुळे घोड्यांचा  उल्लेख असणे म्हणजेच आर्यपणाचे लक्षण आहे का? आता “आर्य /वैदिक” संस्कृतीशी निगडीत असलेला सर्वात जुना ग्रंथ जो ऋग्वेद , तो याबद्दल काय सांगतो? त्यात घोड्याचे उल्लेख आहेत , परंतु निव्वळ घोडाच नाही , तर बैल , गायी यांनादेखील महत्वाचे स्थान आहे. आता एक fact म्हणजे घोडा हा प्राणी मुळात भारतातील नाहीच. इ स पू २००० पूर्वी अश्वपालनाचे उदाहरण दक्षिण आशिया मध्ये सापडलेले नाही. तर एक गोष्ट नक्की , की घोडा हा प्राणी बाहेरचा आहे. पण मग हडप्पाचे  काय? निव्वळ  घोडा नसणे हे  द्रविडपणाचे लक्षण कशावरून?  ज्या अर्थी ऋग्वेद आणि जुन्यातील जुनी उपनिषदे सरमा-पणी यांसारख्या कथा रंगवून सांगतात आणि त्या कथा गाईंच्या  चोरीबद्दल आहेत , त्या अर्थी ती आर्य संस्कृतीची अतिशय जुनी अवस्था आहे , आणि हडप्पादेखील तसे असण्याची शक्यता आहे. अर्थात हे सगळे अवलंबून आहे ते हडप्पाच्या चित्रलिपीच्या सर्वमान्य अशा वाचनावर . तोपर्यंत आर्य आणि द्रविड या दोन्हीही पक्षांना मूग गिळून बसणे भाग आहे.

तर सारांश असा , की घोडा भारतात बाहेरून आला आणि काही प्रमाणात भाषिक स्थलांतर झाले .पण मग संस्कृत भाषा ही मूळ भारतातील आहे की नाही? द्राविडी भाषांचे भारतीयत्व निर्विवाद आहे, तर खरी “भारतीय भाषा ” कोणती?   S R Rao  या संशोधकांनी संस्कृतवर आधारलेले त्यांचे वाचन मांडले १९९२ साली , पण ते मान्यताप्राप्त नाहीये . जोपर्यंत हडप्पा बोलत नाही, तोपर्यंत आर्य आणि द्रविड ह्या दोन्हीही पक्षांना आपापला प्राचीनतेचा दावा पुढे रेटता येणार नाही.

इत्यलम!

– निखिल बेल्लारीकर (कोलकाता)

नातलग

माझ्या शाळेसमोरच्या फुटपाथवर एक माणूस चिक्की, गोळ्या विकायला बसायचा. त्याचं नाव बहुधा.., नाही नक्कीच, ‘मारुती’ होतं! दुसरीत असताना आकाशवाणीवर पेटी वाजवली म्हणून त्याने मला दोन गोळ्या भेट दिल्या.. वीस वर्षांनंतर तो मला दत्ताच्या देवळाबाहेर उदबत्त्या विकताना दिसला.. पांढरी दाढी, अशक्त डोळे.. मी जवळ जाऊन हसलो.. त्याने विचारले, ‘तुम्ही संगीतकार कुलकर्णी ना?’.. मी म्हणालो, ‘नाही, मी सलील.. तुम्ही मारुती ना?’
तो ओळखीचं हसला.. निदान मला वाटलं तरी तसं!

दहावीनंतर मोठ्ठी सुट्टी.. रोज सकाळी  क्रिकेट आणि मग गुऱ्हाळात बसून उसाचा रस आणि खूऽऽप गप्पा.. गुऱ्हाळाच्या भिंतीवर कृष्ण, हनुमान, विवेकानंद, गांधीजी, अमिताभ, माधुरी आणि चार्ली चॅप्लिन..
..एक दिवस क्रिकेट खेळून पोहोचलो, तर ‘आमचं’ गुऱ्हाळ जमीनदोस्त.. अतिक्रमणविरोधी पथक जोरात काम करत होतं.
..नेहमी आमच्याबरोबर हास्यविनोद करणारा गुऱ्हाळवाला हतबल.. भिंतीवरून सगळे फोटो पाहत होते हे सगळं.. चार्ली चॅप्लिन नेहमीपेक्षा थोडा जास्तच करुण वाटला..

‘ती’ तिच्या निर्णयावर खंबीर होती.. आणि ‘मी’? नेहमीप्रमाणे गुळमुळीत.. पाठ फिरवून निघून गेली. शेकडो मैल दूर.. ‘मी’ आता अगदी सुखात आहे आणि कदाचित ‘ती’सुद्धा असेल.. पण मग एखाद्या अनोळखी नंबरवरून फोन आला तर धडधडतं ते कशामुळे? बहुतेक खूप दगदग चालली आहे म्हणून? आणि काही गाणी गाताना डोळ्यांत पाणी येतं ते का?..
..स्टेजवर खूप लाईट असतात. ते येतात डोळ्यांवर..!

इंग्लंड दौऱ्यादरम्यान स्ट्रॅटफर्ड या शेक्सपियरच्या गावी फिरताना एका रस्त्यावर दोन तरुण गिटार वाजवत बीटल्स गाताना दिसले. मी जाऊन दोघांच्या मध्ये उभा राहिलो आणि त्यांच्या संगीतावर आलापी गाऊ लागलो.. ते ओळखीचं हसले.. पाच मिनिटांनंतर दोघांना शेकहॅन्ड  करून निघालो..
ती पाच मिनिटे आम्हा तिघांच्या अंगात एकच रक्त वाहत होते..

– डॉ. सलील कुलकर्णी, म्युजीकली युअर्स, लोकसत्ता, ६ मार्च २०१०