होय ती ! उणीपुरी दोन वर्षेच लोटली आमच्या भेटीला ! पण आज मात्र माझे उभे आयुष्य व्यापूनही दशांगुळे उरलीय. मला तर जणू पहिल्याच भेटीत वेड लावले तिने! सुरुवातीला हा ही एक आकर्षणाचा प्रकार असेल असे म्हणून मी ही दुर्लक्ष्य करीत होतो पण हळूहळू हे त्याहूनही काही वेगळे आहे हे कळायला लागले.
तसे पाहायला गेले तर ती आणि मी बऱ्यापैकी सारखे आणि बऱ्यापैकी वेगळे सुद्धा! मी खूप जास्त विचार करणारा तशीच ती पण. पण ज्या वेळी मी नरम पडतो अगर भावनाविवश होतो त्या वेळी ती खंबीर असते, मला आधार देण्यासाठीच जणू! ती लिहिते सुंदर. बोलतेही खूप छान! अभ्यासात तर तिला कोणी मागे टाकेल असे वाटत नाही! म्हणून तर मी तिला अनेकदा “ब्यूटी विथ ब्रेन” म्हणतो. पण ती जितके छान बोलते त्यापेक्षा तिचे निरागस डोळेच पटकन बोलून जातात. तिच्या बऱ्याच गोष्टी स्पेशल आहेत, अगदी तिच्यासारख्या! डोळ्यांवर येणारी केसांची एखादी लडिवाळ बात नाजूक बोटांनी अलगदपणे कानामागे सरकवण्याची तिची ती अदा फक्त तीच जाणे. ओठांमागचे तिचे ते खट्याळ हसू जेंव्हा तिच्या तितक्याच छछोर डोळ्यातून पाझरते तेंव्हा सारे जग सुंदर वाटायला लागते. पण ह्या लपलेल्या हास्याहूनही कितीतरी पटीने मोहक असते ते तिचे खळाळते हसू! एखाद्या पवित्र मंदिराच्या शांत गाभारयात टांगलेल्या घंटाना जेंव्हा अलगदपणे वारा छेडून जातो, आणि नुकत्याच जाग्या झालेल्या चिमणपाखरांसारखा त्या घंटांचा जो मंजुळ किलबिलाट सुरु होतो तो ही तिच्या त्या हास्याइतका मोहक नसावा. तिच्या त्या हसण्यातून हजारो चंद्राचे चांदणे एकाच वेळी लखलखत असते. तिच्या हास्याइतकीच सुंदर आहे ती तिची नजर. चालता चालता टाकलेला एक हलकासा कटाक्ष, कधी मी बोलत असताना तिचे ते एकटक पाहणे, उगीच चिडवल्यावर लटक्या रागाचा साज ल्यालेला तो दृष्टीक्षेप … कुबेराने वाटेत जाताना अनंत रत्नांची उधळण करावी, प्रत्येक रत्न इतराहून वेगळे तरी तितकेच मनोवेधक असावे आणि एखाद्याने त्या रत्नांना वेचत सुटावे तसा मी तिच्या डोळ्यांचे हे अविष्कार टिपत जातो. तिचा एखादा तिरपा कटाक्ष मनाला विद्ध करून जातो तर कधी आमची झालेली नजरानजर लेक्चरला पहिल्या बाकावर असलो तरी तिचे स्मरण देत जाते.
तिच्यासोबत घालवलेले क्षण हा तर माझ्यासाठी एक अनमोल ठेवा आहे. खरे सांगायचे तर, भेटलो तरी आम्ही फारसे बोलतच नाही. ह्या बाबतीत माझी अवस्था फार विचित्र होते. तिचे मेसेज- जे स्वतःहून क्वचितच येतात- आले कि मला तिच्याशी फोनवर का होईना बोलावेसे वाटते. कारण तिच्या आवाजात तिचे विचार ऐकणे हि एक पर्वणी असते. फोनवर बोलत असताना देखील ती काय बोलतेय ह्याकडे माझे जास्त लक्ष्य नसतेच. मी तिच्याशी बोलतोय ह्या आनंदातच मी न्हात असतो. फोनवर बोलताना तिचे ते हसणे ऐकले कि, हे सारे बोलणे होत असताना ही समोर असती तर किती बरे झाले असते असे वाटून जाते. कधीकधी आम्ही कर्म-धर्म-संयोगाने भेटतो सुद्धा! पण अनेकदा आमचे भेटणे हे ती, मी आणि इतर अशी भेट होऊन बसते. अशा वेळी ह्या ‘इतरां’चा -मग ते कितीही जवळचे का असेना -राग येतो. पण हा राग तिच्याकडे पाहताना तितक्याच चटकन मावळून पण जातो. जर का आम्ही दोघे भेटलो तर मात्र माझी अवस्था शोचनीय होऊन बसते. कारण तिच्या समोर गेल्यावर सारे शब्द, सारे मुद्राभिनय, सारे विनोद, सारी गप्पाष्टके रंगवण्याची कौशल्ये हात गळून, आणि शस्त्रे टाकून बाजूला होतात. काय बोलावे ते काळातच नाही. तिच्याकडे एकटक पहायची सोय नसते. मग मी कुठेतरी दूर डोळे लावून बसतो. डोळ्यांसमोर मात्र तीच असते. काहीतरी उगाच बोलायचे म्हणून मी बोलतो. “आजचा दिवस खूप भारी गेला आणि आता तू भेटलीस” हे किंवा “आजचा दिवस फार फार बोर गेला, बरे झाले भेटलीस” असे अनेक विचार मनात थैमान घालीत असतात. पण ते विचार, त्या भावना व्यक्त करायला वाव नसतो. तिच्यासमोर हे काहीच बोलता येत नाही मला. ती चिडेल, आणि मग आता जे भेटतीये, जे बोलतीये ते सुद्धा पुढे जमणार नाही अशी उगाच धास्ती वाटत राहते. थोड्या वेळाने आम्ही वेगळे होतो. पण मी मात्र ते क्षण पकडून तिथेच उभा असतो. शरीराने कुठेही गेलो तरी मनाने मात्र तिथेच असतो. त्या भेटीच्या ठिकाणी! कधीकधी मी वेगवेगळ्या चिंतांच्या ओझ्याखाली वाकून गेलेला असतो. आभाळ काळ्याकुट्ट मेघांनी आच्छादले जावे, काहीच दिसू नये तसे काहीसे संताप, भीती, शंका मनावर पसरतात. शरीर, मन यांना अभूतपूर्व मरगळ आलेली असते. अशा वेळी तिच्या भेटीच्या ओढीने मन अजूनच अस्वस्थ होते. अश्या वेळी तर तिची भेट अजूनच दुर्मिळ होऊन बसते. उभ्या जगाने आपल्याशी असहकार पुकारलेला असतो. मेसेज जात नसतात, होस्टेलवरचे इंटरनेट हे डिसकनेक्ट होण्यासाठीच कनेक्ट केले जाते ह्याची सतत प्रचीती येत राहते. या आगीत मनाच्या नंदनवनाचे जळून कोळसे होतात अन मग कधीतरी ती येते. आणि चांदण्यांच्या शिडकावा करीत सारी जुनी जळमटे धुवून काढते. तिच्या साक्षीने नंदनवन पुन्हा बहरू लागते. तिच्या गालांवर पडणाऱ्या त्या धुंद खळ्यामध्ये मी माझ्या साऱ्या चिंता, दु:खें विसरतो.
मला आज येणाऱ्या कित्येक गोष्टी तिच्यामुळे येतात, किंबहुना तिच्यासाठीच मी करतो. माझ्या प्रत्येक फसलेल्या, अगर यशस्वी विनोदाची एकमेव प्रेक्षक ती असते. सारे जग जरी माझ्या विनोदाला हसले आणि ती मात्र हसली नाही तरी तो विनोद फुकट गेला असे वाटत राहते. दिवस कितीही वाईट गेलेला असला, तरी माझ्या विनोदाने मिळवलेले तिचे एक हसू साऱ्या वाईट आठवणी पुसून काढते. जी गोष्ट विनोद सांगायची तीच विनोद लिहायची. मला विनोदी लिहिता येते हा साक्षात्कार तिला झाला, आणि तिच्यासाठीच मी ती लिहिले. आजसुद्धा तिला वाचायची इच्छा झालीये म्हणून मी हे सारे लिहितोय.
जिथेजिथे जातो; तिथेतिथे ती, तिचे विचार, तिच्यासोबत घालवलेल्या त्या मोजक्याच पण चिरंतन क्षणांच्या आठवणी सतत माझ्यासोबत असतात. सावली तरी अंधारात आपली पाठ सोडते पण ह्या आठवली… अंधाऱ्या, एकाकी रात्री जागवताना मला ह्यांचाच आधार असतो. कधी कुठले गाणे ऐकताना मती काही क्षण पुरती गुंग होऊन जाते. विरहगीतातले दु:ख, वीरगीतातले प्रोत्साहन, भावगीतातले भाव मनाचा ठाव घेतात. अशा वेळी कुण्या एका अनवट रागाची, गाणार्याने घेतलेल्या एखाद्या मुरक्याची आठवण मनाला “हाय ” म्हणायला लावून जाते. शरीर फक्त “वाह” म्हणण्याइतपतच शुद्धीत असते. असा एखादा मुरका, गाण्यातली एखादी ओळ काळीज कापून नेऊ पाहते. पण काळीज आहे तिथेच राहते… कारण पुढल्याच क्षणी तिचे मंजूळ हसू मनाच्या सांदीकोपर्यात निनादू लागते. काहीही सुंदर दिसले की तिची आठवण मनाला छळू लागते. एखादी सुंदर कविता अगर एखादे पुस्तक वाचताना ती पानापानातून, शब्दाशब्दातून डोकावत राहते. रायगडावर सूर्यास्त पाहताना, अजिंठ्याच्या लेण्यातले चिरतरुण रंग न्याहाळताना तिची प्रतिमा समोर येते; अन मग मन नकळत ती आणि समोरचे दृश्य यात अधिक सुंदर काय ह्याची तुलना करू लागते, आणि अचानक खांद्यावर पडलेली एखादी थाप त्या धुंद विचारांतून मला बाहेर ओढते. एखादा टपोरा गुलाब मला तिच्या लाजेने चूर झालेल्या गालांची आठवण करून देतो. कधी वसंतात कूजन करणारा कोकीळ उगचः तिच्या आवाजाच्या माधुर्याशी स्पर्धा करतोय असे वाटते आणि मला त्याच्या त्या धाडसाचे हसू येते. समोरचे सारे सौंदर्य मला आनंद देण्याऐवजी ती नसल्याचा शोक करायला लावते. पौर्णिमेचा चंद्र मला तिची आठवण करून देतो. क्षितीजापाशीचा त्याचा तो रक्तिम चेहेरा मला उगाच लटका राग धरून बसलेल्या तिची आठवण करून देतो. चंद्र मध्यावर आल्यावर जसे त्याच्यापासून काही लपत नाही तसे मला तिच्या समोर काही लपवता येत नाही. ती जाताना मनात अनंत विरहीणींचे सूर दाटून येतात. आणि ती गेल्यावर मी चंद्र नसलेल्या आभाळासारखा होतो. सभोवती अनंत चांदण्या असूनही एकटा….
– श्रीनिवास याडकीकर (तृतीय वर्ष, विद्युत अभियांत्रिकी, सी ओ ई पी)