‘चिंटू’ म्हातारा झाला हो…!!!

चिंटू ने कधी काळी एक जमाना गाजवला होतं.. Good Old Black and White जमाना. चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर तर तेव्हा हिरोच होते. निरागस प्रश्न, आपल्याच आयुष्यातल्या सगळ्या घटना, जमलेली सगळी पात्र त्यामुळे मजा यायची वाचायला. मध्यमवर्गीय कुटुंब, सुट्टी, अभ्यास, सोसायटी, आसपासचे मित्र, शाळा, चित्रकला, क्रिकेट, घरातला पसारा, वाढदिवस, कैऱ्या…. सगळे तेच पण किती निरागस होते. आणि डोळे तर खास बोलके असायचे. प्रत्येकाच्या आजूबाजूला राजू, बगळ्या, मिनी, जोशी काकू… वगैरे असतात त्यामुळे अजून मजा यायची. मराठी मधली बहुधा सगळ्यात फेमस आणि जास्त काल चाललेली हीच कॉमिक स्ट्रीप असावी…एकदम भारी होतं चिंटू… आणि आज कितीतरी दिवसांनी वाचतो आहे परत… काय कचरा झाला आहे त्याचा…चिंटूची खासियत होती ते बोलके चेहरे आणि प्रासंगिक संवाद. चित्र काढण्यात जम बसल्याने त्यात काही कमतरता नाहीये नि रंग आल्यापासून अजून छानच वाटते आहे. पण डायलॉग मध्ये पार चिथडे उडाले आहेत. काय ती भाषा.. सातवी आठवीमधला मुलगा असे बोलतो? हे वाचा आणि बघा मी काय म्हणतो आहे ते… नको ती भाषा नको तिथे वापरल्याने चिंटू मधला चिंटूपणाच संपून गेला असे वाटतंय…फुल उजाड शुष्क चिंटू…..

चुकीच्या व्यक्तीकडे बोलतोय? अभ्यासाने गती पकडलीये? धोका पत्करू शकत नाही?? सातवी आठवीमधला मुलगा बोलतोय? वाटतंय का? आणि ही तर हाईट च आहे – चिंटू म्हणजे काय कोणी तत्वज्ञ आहे का? बघा तो शेवटच्या स्ट्रीप मध्ये काय बोलतो आहे ते – प्रत्येक आनंदाची किंमत द्यावी लागते….!!! आईच्ची जय त्याच्या…झाला…. चिंटू आता म्हातारा झालाय…

4663910945544493811

5485996976237177342

5625973960205425082

ब्लॉगचे विषय???

किती कविता कविता कविता….चायला कधी वाटलेच नव्हते की मी कविता वाचेन आणि त्यावर लिहेन वगैरे. माझे खास आवडते विषय म्हणजे आत्मवृत्त, इतिहास आणि प्रवास वर्णन. कविता वगैरे वाचणाऱ्यांना शिव्याच घालायचो. म्हणजे कविता आवडायच्या नाहीत असे नाही पण मुद्दामहून काव्यसंग्रह हा घेऊन वाचायचा प्रकार आहे असे नाही वाटायचे. पण एक मात्र होते. मर्ढेकर आणि तुकाराम…ते खूप आवडायचे. संपूर्ण मर्ढेकर रट्टा मारून झाला होता आणि तुकाराम तर जागोजागी दर्शन देत होते. पण मर्ढेकर आवडण्यामागे कारण काहीच नव्हते. मर्ढेकर मोठे का? हेच कळत नव्हते. मग केव्हातरी रविकिरण मंडळ, नव-काव्य, दलित काव्य, सामाजिक आशयाच्या कविता…हळू हळू कळत गेले आणि मर्ढेकरांच्या मोठेपणाची खरी प्रचीती आली. तोवर ‘सकाळी उठोनी चहा कॉफी घ्यावी’ किंवा ‘इरेस पडलो जर बच्चमजी’, ‘फलाटदादा फलाटदादा’ कविता नुसत्या गम्मत म्हणून आवडायच्या….आणि ‘पिपात मेले ओल्या उंदीर’ कळायचंच नाही आणि  ‘काहो माजवता दुही, माखता स्वातंत्र्याची वही, स्वजन रक्ताने प्रत्यही, लळथळा’ ही आहे त्याच वृत्तात का केली हे विचार करायचे प्रश्न तेच नाही कळायचे. ‘न्हालेल्या जणू गर्भवतीच्या’ म्हणजे मुंबईचे किती अप्रतिम वर्णन आहे आणि हाच कवी हेही लिहितो आहे त्यात महानता आहे हे लक्षातच नाही आले. ‘कितीतरी दिवसात नाही चांदण्यात गेलो किती तरी दिवसात नाही नदीत डुंबलो’ अशी सुरुवात करून जेव्हा ती कविता ‘बरा म्हणून हा इथे दिवा पारवा पाऱ्याचा, बरी तोतऱ्या नळाची, शीरी धार मुखी ऋचा’ अशा वाक्याने संपते तेव्हा किती अंतर्मुख करते याचा अंदाज नंतर नंतर येऊ लागला होता…..पण तरीही त्याहीपेक्षा जास्त लोभसवाणे रूप होते ते म्हणजे ‘आला आषाढ श्रावण’ मधली ‘ओल्या पानातल्या रेषा वाचतात ओले पक्षी, आणि पोपटी रंगाची रान दाखविते नक्षी’…हे खूप आवडायचे…पण जेव्हा हाच कवी लिहितो की ‘या स्नायूंच्या तारांचा रे तुझ्याच हात खाली स्वीच’ तेव्हा मराठी कवितेत किती क्रांती घडवून आणत होता याचा अंदाज नाही आला..ती क्रांती अर्थाची होती, उपमांची होती, छंदांची तर होतीच होती पण त्याहीपेक्षा कविता का, कोणासाठी आणि कशी या प्रश्नाच्या उत्तरांची होती…संपूर्ण नवा दृष्टीकोन होता तो….’पोरसवदा होतीस काल परवा पावेतो, थांब उद्याचे माई तीर्थ पायाचे घेईतो’ असे लिहिताना त्यांनीच असेही म्हटले आहे – ‘आभाळाच्या पल्याड स्पंदन टिपरी त्याची या मडक्यावरी’…

झाले? कवितांवर किती जास्त लिहितो आहे सांगताना परत त्यावरच एक चुकून आर्टिकल झाले. चायला….. हा ब्लॉग काही कवितांचा ब्लॉग म्हणून सुरु केलेला नाही पण ६० पैकी २० पोस्ट्स कवितांवर झाल्या आहेत. नकळतपणे…. गालिब, तुकाराम, बच्चन तर नेहमीचेच पेटंट आहेत. काही सुचत नसले की आपोपाप गालिब आणि इक्बाल सुरु करतो…कारण त्यांवर बोलणे सोप्पे असते. जसे की आत्ता मर्ढेकर…इतके वाचले आहेत की झोपेत ही त्यांच्या कवितांवर बोलू शकतो…पण त्यात आता मजा येत नाही. नवे वचन करायची आणि व्हायची संधी इथे फार कमी आहे. तेव्हा आपोआप रारंगढांग किंवा मधुशाला सुरु करतो…नाहीतर इतिहास…इतिहास तर कायमचा डोक्यात ठाण मांडून बसला आहे. त्यातही मध्ययुगीन भारत. या क्षेत्रातल्या भरपूर मोठ्या लोकांच्या सहवासात आल्याने आणि समानशील मित्र लाभल्याने त्याच विषयावर दिवसाच्या दिवस घालवले आहेत. जसे की पानिपतचे युद्ध…साधारणपणे आपली सुरुवात विश्वास पाटलांच्या कादंबरीने होते आणि तोतयाचे बंद किंवा भाऊबंदकी नाटकाच्या आधाराने संपते. पण मग आम्ही जातो ते पानिपत १७६१ कडे. तिथून…शेजवलकर कोण? मग त्यांचे शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या अभ्यासाची साधने व आराखडे…तिथून मग दांडेकर, वि श्री, सरदेसाई, राजवाडे, पोतदार, पगडी…..पगडी मग निझामाकालीन हैद्राबाद आणि पोट्टी श्रीरामल्लू, मग हैदराबादची जामा मस्जिद, हैद्राबादी दखनी भाषा, हिंदीचे प्रकार, खडी बोली, अवधी, ब्रज भाषा वगैरे…मग तिथून वीर रसाची हिंदी साहित्यातली उत्थापना, छायावाद वगैरे…हिंदीवर उर्दू चा प्रभाव..मग रामचरीतमानस वगैरे,, भक्ती मुव्हमेंट…वंगदेशाचे इस्लामीकरण, कबीराच्या खऱ्या रचना कोणत्या…पाठभेद…ऐतिहासिक पात्रे…मग महाभारत आणि रामायण…तिथून दुर्गा भागवत आणि इरावती कर्वे…इरावती कर्वे आल्या की एका दिशेने डी डी कर्वे, अण्णा कर्वे, महात्मा फुले तर दुसऱ्या दिशेने आनंदीबाई जोशी, रमाबाई रानडे…(युगांत वाचले आहे? अप्रतिम पुस्तक आहे…वाचाच वाचा….जगात तोड नाही त्याला…) मग असे करत करत सध्याच्या बाबासाहेब, मेहेंदळे, बेडेकर, बेलसरे पर्यंत येऊन थांबतो…पण गप्पांची भूक काही संपत नाही. त्यातून कधी काय साध्य झाला का हा संशोधनाचा विषय ठरवा…..पण वेळ मात्र मजेत जातो…काहीच नसेल तर उर्दू, हिंदी शायरी आणि गाणी, चित्रपटांचा इतिहास, जुने गायक संगीतकार…..नाट्यसंगीत….अशा विषयी लिहायला काहीच लागत नाही….उचलली जीभ आणि लावली टाळ्याला सारखे उघडला ब्लॉग आणि लावला बडवायला असे होते….

पण आजकाल त्यात मजा येत नाही…सध्या अमेरिकेत आहे त्याविषयी कितीतरी गोष्टी लिहिण्यासारख्या आहेत…इथले लोक, समाज, शिक्षण पद्धती, इथले राहायचे अनुभव….मागे एकदा शिकागो ला गेलो होतो तिथे स्वामी विवेकानंदांनी जेथे जागतिक सर्वधर्म परिषदेमध्ये जेथे भाषण दिले १८९३ मध्ये ती जागा पाहून आलो…. का नाही लिहित? आणि ललित? ललित हाताळणे सोप्पे नाहीये…पण जमला तर त्यासारखा तोच. अर्थकारण आणि राजकारण हे तर विषय दिवस रात्र असतात गप्पांमध्ये पण लिहिताना का नाही सुचत? सध्या रिसर्च आणि academic मध्ये इतक्या इतक्या नव्या गोष्टी पाहत आहे की त्या लिहायला पण हरकत नाही… एवढे मित्र बंगाल, हरियाना, ओरिसा, अरुणाचल, आंध्र, गुजरात, इंग्लंड, जर्मनी, सिंगापूर, अमेरिकेत पसरले आहेत त्यांचे कितीतरी ऐकतो नवे नवे अचंबित व्हावे असे….का नाही लिहित?

साधे उत्तर आहे – शाहरुख खानचा चित्रपट होता एक – राम जाने….का नाही लिहित……….राम जाने…

कहते है अगले जमाने में भी कोई ‘मीर’ था

मीर तकी मीर….ज्याच्याबद्दल गालिब म्हणतो – ‘रेख्तेके तुम अकेले शेहेनशाह नही हो ‘गालिब’, कहते है अगले जमाने में भी कोई ‘मीर’ था’…कवितेचा काही तू एकटाच सम्राट नाहीयेस गालिब…असे म्हणतात की पूर्वी पण कोणी ‘मीर’ होऊन गेला आहे…’मीर’ या शब्दावर इथे सुरेख कोटी आहे…गालिब पण ज्याची तोंडभरून स्तुती करतो असा हा मीर…त्याची एक गझल काल वाचत होतो..अतिशय उत्कृष्ट नमुना आहे…हा कवी १७२३ ला जन्माला आला आणि १८१० ला मेला…पानिपत चे युद्ध झाले तेव्हाचा हा…म्हणजे किती जुना आहे याचा अंदाज यावा..अब्दाली ने दिल्लीवर जेव्हा स्वारी केली तेव्हा याने दिल्लीचा दरबार सोडला आणि लखनौला गेला…मला नेहमी वाटते की यातना आणि वेदना माणसाला कलाकार आणि रसिक बनवते…आस्वाद घ्यायला आणि द्यायला शिकवते…रंगीत बनवते…त्याचा मीर हे उत्कृष्ट उदाहरण आहे…

लहानपण आग्र्याला गेले..पण वडिलांच्या मृत्युच्या पश्चात मीर दिल्लीला आला…तिथेच शिकून मोठा झाला आणि शेवटी शाही कवीपण झाला दरबारात…..सगळी प्रगती स्वकर्तृत्वावर केली. हे साल १७५० च्या आसपास असावे…नंतर नादिरशाह ने धुमाकूळ घातला होता. नादिरशाह आणि अब्दाली यांनी दिल्लीवर सारखे हल्ले करून पुरती वासलात लावून टाकली. आणि तेव्हाच प्रचंड मोठा दुष्काळ पण पडला होता उत्तर भारतात…पानिपतचे तिसरे युद्ध पण तेव्हाचेच. हे सगळी वाताहत त्याने डोळ्याने पाहिली आणि दिल्ली सोडून लखनौ ला गेला…आणि एका ठिकाणी म्हणतो – ‘हमको शायर न कहो मीर कि साहिब हमने; दर्दो ग़म कितने किए जमा तो दीवान किया’….’दीवान’ म्हणजे कवितांचा एक प्रकारचा संग्रह…आम्ही एवढे दुःख पहिले, सहन केले…की त्याचाच दीवान झाला…त्यात माझे काहीच कौतुक नाही..मी खरा शायर नव्हेच. सर्व दुःखाचा अर्क म्हणजे ही शायरी…फक्त त्यात कविमनाचा आकांत आहे…

पण खरी गम्मत इथे आहे…मीर हा गालिबच्या २-३ पिढ्या आधीचा माणूस…गालिब चा फेमस शेर आहे तो म्हणजे – ‘हजारो ख्वाहिशे ऐसी’..आणि मीरचा पण त्याच लायनीवर एक शेर आहे. योगायोगच आहे हा आणि आश्चर्य जास्त याचे वाटते की तो शेर फारसा लोकांना माहित नाहीये – आरज़ूएं हज़ार रखते हैं; तो भी हम दिल को मार रखते हैं…

मात्र कवी बनणे सोप्पे नसते. मनात येते ते कागदावर उतरतेच असे नाही. बऱ्याचदा मध्येच खूप सारे गळून जाते. कवीच कशाला, चित्रकाराचे तेच, गायकाचे तेच आणि लेखाकाचेही तेच…मनातील तरंग अचूक टिपणे जमायला ईश्वरी वरदहस्तच पाहिजे. शिवाय कितीही आणि कसेही लिहा, एक प्रकारचे असमाधान कायम असतेच. शब्द नेमक्या भावना पकडत नाहीयेत म्हणू रुखरुख असतेच… त्याच भावना मीर नेमक्या पकडतो कसं ते बघा –

जी में क्या-क्या है अपने ऐ हमदम; हर सुखन ता बा-लब नहीं आता।    (सुखन – काव्य;  ता – so; बा-लब – शब्दानुसार)


यहा तक आते आते सूख जाती है कई नदिया….

एक सुंदर शेर आहे – यहा तक आते आते सूख जाती है कई नदिया, मुझे मालूम है, पानी कहा ठहरा हुआ है…कवी आहे दुष्यंत कुमार…एकदा वाचायला सुरु केला की नो थांबणे…दुष्यंत कुमार म्हणजे जादू. बस, जादूच अजून काही नाही. त्यांच्या कविता नुसत्या वाचत राहाव्यात…साये में धूप मधली ‘आग जलनी चाहिये’ तर फेमस आहेच…पण आज त्यांची एक वेगळी कविता सादर करतो

त्यांचे जेव्हा साहित्याच्या मंचावर आगमन झाले तेव्हा हिंदी साहित्य सृष्टी काहीतरी विचित्र अवस्थेमध्ये होते. कैफी भोपाली यांच्या तरक्कीपसंद गजला फेमस होत्या तर कोण अज्ञेय नावाच्या कवीच्या महाकठीण कविता गाजत होत्या…असे म्हणतात की तेव्हा सामान्य माणसाला समजेल, किंवा सर्वसामन्याच्या सामान्य भावनांना वाट देईल असा कवीच नव्हता. आणि तेव्हा हिन्दि-उर्दु मध्ये दुष्यंत कुमारांनी पाऊल ठेवले आणि नुसतेच नाही तर असे दमदार पाउल ठेवले की रसिक सगळे आवक झाले.

स्वातंत्र्य तर मिळाले होते, पण स्वप्न साकार झाली नव्हती…हळू हळू, लोकांच्या नजरेत आले की आपला खरं शत्रू कोणी गोरा माणूस नसून आपलीच प्रवृत्ती आहे…जी सत्ताधारी बनून आपल्यावर शतकानुशतके राज्य करत आहे….समाजवादाचा सगळीकडे बोलबाला होता…तेव्हा ते म्हणतात – 
भूख है तो सब्र कर रोटी नहीं तो क्या हुआ, आजकल दिल्ली में है ज़ेर-ए-बहस ये मुदद्आ| 
गिड़गिड़ाने का यहां कोई असर होता नही पेट भरकर गालियां दो, आह भरकर बददुआ| 
इस शहर मे वो कोई बारात हो या वारदात अब किसी भी बात पर खुलती नहीं हैं खिड़कियां|

अतिशय मार्मिक…पण म्हणून निराशावादी नव्हे…आशावाद वाचवा तर हरिवंशराय बच्चन आणि दुष्यंत कुमारांचा…एका ठिकाणी त्यांनी सुंदर लिहून ठेवले आहे –
एक चादर साँझ ने सारे नगर पर डाल दी, यह अंधेरे की सड़क उस भोर तक जाती तो है। 
दुख नहीं कोई कि अब उपलब्धियों के नाम पर, और कुछ हो या न हो, आकाश-सी छाती तो है।

खूप पूर्वी एक सिनेमा येऊन गेला होता – काबुलीवाला म्हणून…ती टागोरांची एक लघुकथा आहे. त्यातले गाणे खूप गाजले होते – अये मेरे प्यारे वतन…संगीत रवी शंकरांचे आहे…देशापासून दूर गेल्यावर मनाची अवस्था त्यात चितारली आहे…एक प्रकारचे विरह गीतच आहे ते…बोर्डर मध्ये पण तसेच एक गाणे आहे…माचीस मध्ये पण….तशीच यांची पण एक कविता आहे….
चांदनी छत पे चल रही होगी अब अकेली टहल रही होगी;
फिर मेरा ज़िक्र आ गया होगा वो बर्फ़-सी पिघल रही होगी, 
तेरे गहनों सी खनखनाती थी बाजरे की फ़सल रही होगी;
जिन हवाओं ने तुझ को दुलराया उन में मेरी ग़ज़ल रही होगी.

एका ठिकाणी ते म्हणून जातात – 
तुम्हारे पाँव के नीचे कोई ज़मीन नहीं,
कमाल ये है कि फिर भी तुम्हें यक़ीन नहीं…

वास्तवावर ओरखडे ओढणे हे तर साहित्यिकांचे आजीवन कर्तव्यच जणू. बहुत मशहूर है आएँ ज़रूर आप यहाँ,ये मुल्क देखने लायक़ तो है हसीन नहीं….आता बोला…पण म्हणून दुष्यंत कुमार काय फक्त वास्तवाचे कवी नव्हते…किंवा मनस्वी पण नव्हते…स्वप्नील आशावादी कविता करून थांबले नाहीत…समाजावर आघात करूनही वैतागले नाहीत…..त्यांची कविता ही त्यांची कविता होती…माणूस हा त्याच्या कर्तव्याने स्पष्ट होत जातो…मी जे खातो, जे पितो, जे बघतो, जे करतो, जे वाचतो, जे ऐकतो यापेक्षा मी असा वेगळा कोणी नाही..मी हाच आहे….मर्ढेकर जसे म्हणतात – आभाळाच्या पल्याड स्पंदन, टिपरी त्याची या मडक्यावरी…असेलही खरे…पण मला हे मडके दिसते….आभाळाच्या पल्याड जे काही असेल ते असो…माझी कविता कुठून येते? कुठून स्फुरते? त्यात आभाळाच्या पल्याडचा सहभाग किती आणि निसर्ग-समाजाचा किती? आणि माझी त्यात भर काय? या कवितेच्या पुढे-मागे माझे अस्तित्व काय? माझे सगळे विचार यात आहेत का? की त्यापेक्षाही मी कोणी वेगळा आहे? त्यांचीच एक कविता वाचा…

मैं जिसे ओढ़ता—बिछाता हूँ; वो ग़ज़ल आपको सुनाता हूँ; 
एक जंगल है तेरी आँखों में; मैं जहाँ राह भूल जाता हूँ
तू किसी रेल—सी गुज़रती है; मैं किसी पुल-सा थरथराता हूँ; 
हर तरफ़ ऐतराज़ होता है; मैं अगर रौशनी में आता हूँ
एक बाज़ू उखड़ गया जबसे; और ज़्यादा वज़न उठाता हूँ; 
मैं तुझे भूलने की कोशिश में; आज कितने क़रीब पाता हूँ
कौन ये फ़ासला निभाएगा; मैं फ़रिश्ता हूँ सच बताता हूँ

मी चालतो अखंड – विंदा

विंदा गेले….विंदा गेले….विंदा गेले…..बाबासाहेब म्हणतात तसे, काय लिहू शब्दच संपले….आपली आणि विंदांची ओळख पुस्तकांमधुनच…पण एकदम जिगरी ओळख ती..काय त्यांच्या एक एक कविता….उत्कृष्ट नमुनाच तो….स्वेदगंगा मध्ये त्यांनी म्हटले (बहुधा १९६६)

ऊठ ऊठ सह्याद्रे घुमवीत बोल मराठी खडे, समतेचे हे तुफान उठले उठले सागराकडे…
हीच मराठी जिच्या मुखाने वदली ज्ञानेश्वरी, शिवबाने तलावर घासली याच मराठीवरी,
हिच्या स्वागतासाठी झडती तोफांचे चौघडे….
टिळक रानडे फुले गोखले आगरकर वैखरी, स्वातंत्र्याच्या पाच मशाली जळती वेदिवरी,
या ज्योतीवर दीप पेटवा चला भविष्याकडे….
दर्याच्या भरतीच्या लाटा महाराष्ट्रअंगना, कंकणनादा भिऊनि ज्यांच्या शत्रू सोडिती रणा,
वीज माळूनी वेणीवरती त्याही घुसल्या पुढे….
ऊठ मजूरा पुन्हा एकदा झाडूनिया घोंगडी, ऊठ सैनिका पुन्हा झेपण्या आघाडीवर उडी,
एकजूट ही पाहून पडतील अन्यायाला तडे….

अन्यायाला तडे…काय हे शब्द…त्यांच्या फिलोसोफी वर तर पिढ्या जगल्या….आदिमाया मध्ये त्यांनी म्हटले आहे –

नुकते होते नजरेत तुझ्या दिसू लागले अवखळ पाणी; नुकती होती तुझ्या जिभेवर नाचू लागली अल्लड गाणी !
नुकते होते सुरु जाहले लाजेचे पदराशी चाळे; नुकते नकळत वितळत होते भाव निरंकुश साधे भोळे !
नुकते नुकते होतीस शिकलीस ओठ दाबण्या दातांखाली; नुकत्या नुकत्या मीही होतो जुळवीत पहिल्या-वहिल्या ओळी !
पहिल्या-वहिल्या त्या ओळीतील कुणासही नच काही रुचते; आठवता पण त्या माझे मन मधेच झुरते मधेच फुलते !

यांनी ज्ञानेश्वरी वर लिहिले तसेच लहान मुलांचे साहित्य पण हाताळले, समाजवादावर लिहिले तसेच ही कविता पण –

तीर्थाटण मी करीत पोचलो नकळत शेवट तव दारी ….. अन तुझिया देहात गवसली सखये मजला तीर्थे सारी ! !
अधरावरती तव वृंदावन प्रयाग सापडले नेत्री ……..भालावरती मानससर अन मानेवरती गंगोत्री !!
गया तुझ्या गालात मिळाली रामेश्वर खांद्यावरती …… मिळे द्वारका कमरेपाशी अन काशी अवती-भवती !!
मोक्षाचीही नुरली इच्छा नको कृपा याहुन दुसरी …….. तीर्थाटण मी करीत पोचलो नकळत शेवट तव दारी !

असे नव्या जुन्याची तमा नसलेले. स्वतःचे एक काव्यविश्व त्यांनी बनवले होते…एक तुतारी द्या मज आणुनी चा खरं अविष्कार होता तो…पण माझी सगळ्यात जास्त आवडती कविता म्हणजे –

चुकली दिशा तरीही हुकले ना श्रेय सारे; वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे
मी चालतो अखंड चालायचे म्हणून; धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे
डरतात वादळांना जे दास त्या धृवाचे; हे शीड तोडले कि अनुकूल सर्व वारे
मग्रूर प्राक्तनाचा मी फाडला नकाशा; विझले तिथेच सारे ते मागचे इशारे
चुकली दिशा तरीही आकाश एक आहे; हे जाणतो त्याला वाटेल तेथ न्या रे
आशा तशी निराशा, हे श्रेय सावधांचे; बेसावधास कैसे डसणार हे निखारे…

हे खरे विंदा….ही त्यांची असामान्य शैली आणि प्रवृत्ती होती…एका ठिकाणी ते म्हणतात –

बन दगड आजपासून; काय अडेल तुझ्यावाचून; गालावरचे खारे पाणी पिऊन काय जगेल कोणी ?
काय तुझे हे निःश्‍वास मरणाऱ्यांना देतील श्‍वास ? आणिक दुःख छातीफोडे देईल त्यांना सूख थोडे ?
आहे दुःख तेच फार; माझ्या मना कर विचार; कर विचार; हस रगड; माझ्या मना बन दगड !

जशी पाडगावकरांची सलाम होती, तशाच भाष्य कविता विंदांनी खूप जबरदस्त लिहिल्या….ओरखडे ओढायची त्यांची शैली जरा विचकट होती पण टोकदार सुद्धा…ही कविता बघा –

जितकी डोकी तितकी मते जितकी शिते तितकी भूते;
कोणी मवाळ कोणी जहाल कोणी लठ्ठ कोणी मठ्ठ
कोणी ढीले कोणी घट्ट; कोणी कच्चे कोणी पक्के
सब घोडे बारा टक्के!

गोड गोड जुन्या थापा (तुम्ही पेरा तुम्ही कापा)
जुन्या आशा नवा चंग जुनी स्वप्ने नवा भंग;
तुम्ही तरी काय करणार? आम्ही तरी काय करणार?
त्याच त्याच खड्ड्या मधे पुन्हा पुन्हा तोच पाय;
जुना माल नवे शिक्के सब घोडे बारा टक्के!

जिकडे सत्ता तिकडे पोळी जिकडे सत्य तिकडे गोळी, (जिकडे टक्के तिकडे टोळी);
ज्याचा पैसा त्याची सत्ता, पुन्हा पुन्हा हाच कित्ता;
पुन्हा पुन्हा जुनाच स्वार, मंद घोडा जुना स्वार;
याच्या लत्ता त्याचे बुक्के, सब घोडे बारा टक्के!

सब घोडे! चंदी कमी; कोण देईल त्यांची हमी?
डोक्यावरती छप्पर तरी; कोण देईल माझा हरी?
कोणी तरी देईन म्हणा मीच फसविन माझ्या मना!
भुकेपेक्षा भ्रम बरा; कोण खोटा कोण खरा?
कोणी तिर्र्या कोणी छक्के; सब घोडे बारा टक्के!

ही कविता तर त्यांच्या काव्यात्म विश्वाचा पराकोटीचा कळसाच आहे…मनस्वी सृजनशिलातेचा उत्कृष्ट अविष्कार –

कधी येतसे क्षुद्रता कस्पटाची; कधी वाढता वाढता व्योम व्यापी
कधी धावतो विश्व चुंबावयाला कधी आपणाला स्वहस्तेच शापी

कधी याचितो सत कधी स्वप्न याची कधी धावतो काळ टाकुन मागे
कधी वर्षतो अमृताच्या सरी अन कधी मृत्यूची भाबडी भीक मागे

कधी दैन्यवाणा, निराधर होई कधी गुढ, गंभीर, आत्मप्रकाशी
कधी गर्जतो सागराच्या बळाने; कधी कापतो बोलता आपणाशी!

कधी आपणा सर्व पिंडात शोधी; कधी पाहतो आत्मरुपात सारे;
कधी मोजीतो आपणाला अनंते अणुरुप होती जिथे सुर्य, तारे

टळेना अहंकार साध्या कृतीचा; गळेना महापुच्छ स्वार्थी स्मृतीचे;
कधी घेतसे सोंग ते सत्य वाटे! कधी सत्य ते वाटते सोंग साचे!

कधी संयमी, संशयात्मा, विरागी कधी आततायी, कधी मत्तकामी
असा मी… तसा मी… कसा मी कळेना; स्वतःच्या घरी दुरचा पाहुणा मी!

त्यांची देणाऱ्याने देत जावे; घेणाऱ्याने घेत जावे; घेता घेता एक दिवस; देणाऱ्याचे हात घ्यावे….शक्य नाहीये ते….

(सगळ्या कविता स्मरणातून लिहिल्या आहेत तेव्हा चुका असतील तर क्षमा असावी)