आवरण

(या लेखातील मते लेखकाची नसून ‘आवरण’ कादंबरी वाचताना आढळलेले काही मुद्दे लेखकाच्या शब्दात मांडलेले आहेत. त्याचा आणि लेखकाच्या वैयक्तिक विचारधारेचा संबंध जोडायची काही एक गरज नाही. जर मते विवाद्य वाटलीच अथवा भावना दुखावणारी असतील तर त्यास कादंबरीकार कारणीभूत आहे, लेखक नाही याची नोंद घ्यावी.)

Avaran

शेवटी ‘आवरण’ वाचून काढलीच एकदाची. भैरप्पा तर सिद्धहस्त लेखक आहेचेत आणि त्यात विषय पण असा जळजळीत की त्यावर बहुअंगी पब्लिक चर्चा होणे क्रमप्राप्त. आणि झाली देखील. आंतर्जालावर अनेक लोकांनी अनेक दृष्टीकोनातून अनेक मते अनेक ठिकाणी मांडली आहेत. सुरस चर्चा झडल्या आहेत. वादविवाद झाले आहेत. पण तरीही काही गोष्टी सुटून गेल्यातशा वाटले. या चर्चांमध्ये काही गोष्टी गृहीत आहेत तर काही पुरेशा स्पष्ट नाहीत. पण त्याही तितक्याच महत्वाच्या. म्हणून हे प्रयोजन. प्रथम जर त्या पुस्तकाच्या मजकुरावरची चर्चा कोणास वाचायची असेल तर या आणि या लिंक्स वर जाऊन वाचावे.

इतिहास आणि क्रोनिकल मध्ये फरक आहे. इतिहास म्हणजे केवळ घटनाक्रम नव्हे. आपल्याकडे भारतीयाने लिहिलेले इतिहासावरचे प्रथम संपूर्ण पुस्तक म्हणून म्हणून राजतरंगिणीचा उल्लेख होतो. मात्र ते ही गिबन-स्टाईल लिहिलेले नसून काव्य-रूप आहे. आणि ‘प्रशस्ती’ म्हणजे इतिहास नव्हे. मुसलमानी इतिहासकार ‘तारीख’ लिहायचे. सिंध प्रांत पडला त्याबद्दल लिहिलेले छाछनामा पासून ते गझनीच्या दरबारी असलेला फिरदौसी, उत्बी, मग हसन निझामी, मिन्हाज-उल-सिराज, झियाउद्दीन बरनी, आणि आपल्या दख्खनचा फ़ेरिश्ता पर्यंत मोठी परंपरा आहे. मुघल तर स्वतःच इतिहास लिहायचे. तुझूक-ए-बाबरी पासून आलमगीरनाम्यापर्यंत अनेक पुस्तके उपलब्ध आहेत.

इतिहास, इतिहास लेखन, आणि इतिहास अध्ययन ही फार विचित्र गोष्ट आहे. हि सर्व पुस्तके असून देखील हर काळात इतिहासकार आपापल्या काळाच्या नियम-मूल्यांनुसार इतिहासाचा स्थळ-काल सापेक्ष नवनवा अर्थ लावत राहतात (त्यांचे दुकान सुरु राहिले पाहिजे न?). त्यात इतिहासकाराची स्वतःची काही मुल्ये असतात ती कळत-नकळत, काही वेळा हेतुतः लिखाणात उतरतात. पण त्यातून बऱ्याचदा लिखाणात ‘काय झाले’ पेक्षा ‘कसे झाले’, ‘का झाले’ आणि ‘काय व्हायला पाहिजे होते’ यावर जास्त भर दिला जातो. नेपोलिअन महान म्हणतो – What is history but a fable agreed upon?

मार्क्सिस्ट लोक तर इतिहास ‘रिव्हाईज’ करण्यात सगळ्यात बहाद्दर. इतिहास कायमच जेते लिहित आले आहेत. रशिया मध्ये झालेले मार्क्सिस्ट रिव्हिजनिस्म तर सर्वश्रुतच. सत्ताधाऱ्यांना आपली सत्ता मजबूत व कायम राहावी यासाठी काही उपाय योजावे लागतात. यात प्रामाणिकपणा आणि नैतिकतेचा काहीच संबंध नसतो. मार्क्सिस्ट लोक तर असे ‘नायकत्व’ (Hegemony) कसे टिकवावे-वाढवावे यासाठी अलेक्झांडर ग्राम्सी चे उदाहरण नेहमी देतात. ‘पब्लिक डीस्कोर्स’वर आपला, आपल्या विचारांचा पगडा रहावा यासाठी सर्वच प्रयत्न करतात. भारतात ही ते झाले, चालू आहे. यासाठी अनेक उपाय योजले जातात.

एका म्हणीचा उल्लेख भैरप्पा करतात – suppresio veri, suggestio falsi. काही खऱ्या गोष्टी दडवणे आणि काही खोट्या गोष्टी पसरवणे. आता परवाच पेपरात आलेली हि बातमी पहा. फाळणीला ६०च्या वर वर्षे होऊन गेली, फाळणी अनुभवलेली पिढी जवळ जवळ मरून सुद्धा गेली तरीही अजून जिनांची भाषणे सरकार दडवून आहे. मौलाना आझादांनी लिहिलेले ‘इंडिया विन्स फ्रीडम’ पुस्तकावर अनेक दशके बंदी होती. ब्रिगेडियर दळवींच्या ‘हिमालयन ब्लंडर’ ची सुद्धा तशीच कथा. कारण काय तर सत्ताधार्यांच्या इतिहासाच्या ‘व्हर्शन’ ला प्रतिस्पर्धी ‘व्हर्शन’ सादर केल्याचा परिणाम. हे फक्त भारतात नाही तर जगभर चालते. प्रमाण कमी-अधिक.

हे झाले दाखले ‘suppresio veri’ चे. तशाच ‘suggestio falsi’ च्या ही अनेक वानग्या देता येतील. आणि त्यावरचे ‘आवरण’ काढायचे काम भैराप्पांनी इथे केले आहे. हे काम दुहेरी आहे. एक म्हणजे ‘फॉर्म’ किंवा ‘मेथड’ आणि दुसरे म्हणजे ‘सबस्टन्स’ किंवा ‘कंटेंट’. सत्ताधारी कोणते मार्ग अवलंबतात, त्यांच्या संस्था, फंडिंग, कमिटीज, शाळेच्या पुस्तकांचा मजकूर, माध्यमांवर असलेला पगडा, जनतेने काय वाचावे आणि काय वाचू नये हे ते कसे ठरवतात याची येथेच्छ खबरबात घेतली आहे. त्याचबरोबर दुसरा प्रश्न म्हणजे कंटेंटचा. अंतर्जालावर असलेली चर्चा मुख्यतः त्याभोवती घोटाळताना दिसते. पण या दोन्हीव्यतिरिक्त आणखी काही मुद्दे आहेत.

मूळ प्रश्न आहे की इतिहास कसा लिहावा. तो संपूर्ण ‘ओब्जेक्टीव’ असू शकतो का? याचे उत्तर अनेकांनी आतापर्यंत ‘नाही’ असेच दिले आहे. मात्र लिखाणातून ‘ओब्जेक्टीविटी’ आणि ‘सब्जेक्टीविटी’ वेगळी वेगळी करून मांडता येते आणि त्यातून काय घ्यायचे याचा निर्णय वाचकावर सोपवता येतो. पुस्तकाच्या सुरुवातीलाच तुमची मुल्ये काय आहेत ते ठळकपणे मांडणे, ‘तथ्य’ आणि ‘अनुमान’ स्वतंत्रपणे, सरमिसळ न करता लिहिणे याने ‘suggestio falsi’ वर काही बंध राहू शकतो. यात academic morality आहे. मात्र भारतात अनेक इतिहासकार या गोष्टी सोयीस्करपणे विसरतात.

दुसरी गोष्ट. आजच्या काळाची मुल्ये जुन्या काळावर आणि ऐतिहासिक घटना-व्यक्तींवर थोपताना काही मर्यादांचे पालन करणे आवश्यक आहे. शिवाजी महाराजांना सात बायका होत्या म्हणून ते काही anti-feminist होत नाहीत. प्रत्येक माणूस हा त्या त्या काळाचा कैदी असतो. तेव्हा आजच्या मूल्यांच्या कसोटीवर घासून त्याचा नायक किंवा खलनायक ठरवणे हे धोक्याचे आहे आणि अन्यायाचे ठरू शकते. रामाने सीतेचा त्याग केला त्यात ‘लोकापवादो बलवान मतो मे’ आणि ‘Caesar’s wife must be above suspicion’ याचा संदर्भ तोडून फक्त तो काल कसा पुरुषसत्ताक होता आणि म्हणून अन्यायी होता अशी मांडणी करणे सोप्पे, आकर्षक आणि सोयीस्कर जरी असले तरी पूर्णपणे ऐतिहासिक नाही. असे अनेक दाखले लेखक जागोजागी देतो.

तिसरा मुद्दा. वरील दोन्ही गोष्टी जरी इतिहासकाराने पाळल्या तरी तत्कालीन घटनांचा अर्थ लावण्याचे काम शेवटी त्याच्यावरच येउन पडते. जो ते सशक्तपणे पेलतो त्याला आपण भाष्यकार म्हणतो. इथेही गोम आहे. ‘घटना’ आणि ‘घटनाक्रम’ जरी सिद्ध झाला तरी त्यामागचा ‘हेतू’ काय होता ते सांगणे काम भाष्यकाराचे. तो हेतू काहीवेळा उघड असतो तर काही वेळा अंतस्थ असतो. काही वेळा त्या ऐतिहासिक पात्राला उलगडलेला असतो किंवा त्या पात्राच्या देखील लक्षात आलेला नसतो. काही वेळा तत्कालीन इतिहासकाराने नोंदवलेला असतो काही वेळा नसतो. अनेक दशके-शतके वेचून मग ऐतिहासक घटनांचा अर्थ लावताना इतिहासकाराला त्या घटनांच्या परिणतींची जी माहिती असते ती त्या पात्राला असायची सुतराम शक्यता नसते. तेव्हा या गोष्टींचा फायदा जरी इतिहासकारास होत असला तरी इतिहासावर मात्र अन्याय व्हायची शक्यता असते. खास करून जेव्हा मार्क्सिस्ट लोक आपली एकच एक ‘सर्वकालीन सत्य’ सांगणारी थिअरी वापरतात तेव्हा तर नक्कीच असतो. सम्राट हर्षाने जरी गौड-चालुक्यांशी अनेक युद्धे केली असतील तरी त्यामागे मी म्हणतो म्हणून ‘शैव-वैष्णव’ झगडा हेच मूळ सुप्त कारण होते. आता याला काही ऐतिहासिक पुरावा असो व नसो. द्यायचा आपला अर्थ लावून. याला खरतर सुतावरून स्वर्ग सुद्धा नाही तर अकलेचे तारे तोडणे म्हणतात.

पण काही लोकांच्या ‘वर्ल्ड-व्ह्यू’ला हे सोयीस्कर वाटते. याचीच आणिक एक करोलरी म्हणजे इतिहास वाचताना तो त्या त्या पात्रांच्या चष्म्यातून पहावा. जेव्हा कोणी मुस्लिम इतिहासकार म्हणतो की आम्ही मंदिरे तोडली आणि त्यामागचा हेतू काफरांना शिक्षा करणे हा होता तर ते सरळ सरळ मान्य करायला हरकत नाही. ते मान्य करणे राहो बाजूलाच, उलट जो तुमचा प्राथमिक सोर्स आहे त्यालाच अक्कल शिकवायला जायचे आणि सांगायचे कि नाही यांचा खरा हेतू फक्त आर्थिक-राजकीय होता आणि त्यात धार्मिक गोष्टी मिसळायची आवश्यकता नाही ही इतिहासाशी प्रतारणा झाली. इतिहास वाचताना तो ज्यांनी घडवला त्यांचा चष्मा पूर्णपणे काढून टाकणे चुकीचे आहे. ज्यांनी घडवला त्यांच्या अन्तःप्रेरणा कोणत्या होत्या ते पाहणे इतिहासाचे एक महत्वाचे काम आहे. या कादंबरीत दोन कादंबऱ्या आहेत. रझिया हे पात्र फ्रेमिंग डिव्हाइस म्हणून वापरले आहे. ती कादंबरीत एक कादंबरी लिहित असते. आता इतिहास अध्ययनाचे काही बेसिक निकष भैरप्पा इथे पाळतात. दोन गोष्टी समांतर चालू आहेत. एक औरंगझेबाच्या काळात तर एक विसाव्या शतकाच्या शेवटी. घटना समान आहेत. पण दोन्ही काळातल्या पात्रांची विचार करायची पद्धत आणि जाणीवेतला फरक व समानता भारी चितारलिये. ऐतिहासिक पात्रे उगाच फेमिनिस्ट दाखवली नाहीत कि ‘rational’ (post-french revolution meaning) नाहीत. मात्र त्या विचारांचा आजच्या काळातील  रझियाच्या मनातरील अंतर्द्वन्दांवर मात्र परिणाम झालेला दाखवला आहे. हा प्रामाणिकपणा इतरत्र क्वचितच आढळतो.

पाचवी गोष्ट म्हणजे गेले काही दशके इतिहासातून व्यक्तीला आणि व्यक्तीच्या कर्तृत्वाला कनिष्ठता देऊन ‘पस-मंझर’ किंवा त्याकाळचे सामाजिक-आर्थिक प्रवाहच कसे बलशाली होते हे सांगणे. आपल्याकडे चाणक्य म्हणून गेला आहे की ‘राजा कालस्य कारणम’. आणि आजकाल तर काळाचा महिमा जास्त आणि व्यक्ती कशी इम्मटेरीअल आहे ते दाखवतात. शिवाजी झाला असता वा नसता, मुघल साम्राज्य कोलमडायला आलेच होते किंवा असेच कहितरी. यात थोडेफार तथ्य आहे पण पूर्णतया नाहि. पण या दोन्हीचे जे संतुलन हवे ते हरवलेसे वाटते ते या कादंबरीत व्यवस्थित सांभाळले आहे.

सहावा मुद्दा जरा नाजूक आहे. इंग्रजीमध्ये त्याला ‘मेथाडोलोजीकॅल बायस’ म्हणतात. आपण जे प्रश्न विचारू तशी उत्तरे आपल्याला मिळतात. मात्र प्रश्न कोणते आहेत आणि कसे आहेत त्यावर उत्तरांमध्ये काय येणार आणि काय नाही हे ठरून जाते. संशोधनात हे लोक ‘analysis-synthesis’ साठी कोणते टूल्स वापरतात त्यावर काही गोष्टी आधीच ठरून जातात. आता जर ‘वर्ग-कलह’ हे टूल वापरले तर हरकत नाही. मात्र हेच एकमेव टूल आहे आणि हेच सगळ्यात जास्त शास्त्रीय आणि योग्य आहे असा अट्टाहास केल्यास हसावे कि रडावे कळत नाही. साहित्य-संगीत-कला-समाज-इतिहास-अर्थकारण-राजकारण सर्वत्र हे टूल वापरायची मुभा आहे. मात्र यातून निघालेले जे निष्कर्ष असतील त्यावर या टूलच्या मर्यादा असतील हे ध्यानात घेतले पाहिजे. या बाबतीत मार्क्सिस्ट लोकांचा हात कोणी धरू शकत नाही. इतर सर्व साधने कानाडोळा करून उपेक्षेने मृतवत करून टाकली आहेत. पण हे जे ‘वर्ग-कलह’ साधन आहे त्याला पण काही ‘इकोलोजी’ आहे हे ते ध्यानात घेत नाहीत. ते भारतात किती प्रमाणात योग्य आहे आणि त्याच्या मर्यादा काय यावर देखील कोणी फारसे चर्चा करत नाही. त्यांची मुल्ये तेवढी शास्त्रीय आणि सर्वकाळ योग्य आणि बाकीची टाकाऊ याला ‘मार्क्सिस्ट फंडामेंटलीजम’ म्हणतात. गांधीजी एका ठिकाणी म्हणाले होते कि या वर्ग-कलहाच्या पाश्चात्य चष्म्यातून पहिले तर भारतातील असमानता फारच भेसूर दिसते. आणि यातून परिस्थती सुधारायला फारसे काही हाती पण लागत नाही. तेव्हा सत्य-सहिष्णुता वगैरे देखिल मुल्यांचा उपयोग इतिहास अध्ययनात करणे आवश्यक आहे. पण भारतात class is caste and caste is class हे एकमेव सत्य ठरवले गेले आहे.

सातवा मुद्दा आहे ‘Information Asymmetry’ चा. आधी मायबाप सरकार ज्ञानाचा स्रोत होते. इतर साधने क्वचितच उपलब्ध होत. आता तसे नाही. इंटरनेट आहे, परदेशी पुस्तके मागवणे देखील  सोप्पे आहे. त्यामुळे हे ‘hegemony’ चे हे युद्ध आणखीनच पेटलेय. एस्टाब्लिशमेन्ट एक सांगते आहे. त्याला प्रतिद्वंदी अनेक व्हर्जन्स उपलब्ध होत आहेत. भारतात मध्यमवर्ग अनेक पटींनी वाढला आहे, वाढत आहे. या लोकांकडे जिज्ञासा आहे, वेळ आहे, पैसे आहेत. मात्र एस्टाब्लिशमेन्ट जे लिहिते-सांगते ते इतके academic आहे कि इथपर्यंत पोचत नाही. त्यात अनेक ठिकाणी विसंगती आढळते, ती लोकांना पटत नाही त्याला कोणी उत्तरे देत नाही. उगीच अवजड आणि बोजड पुस्तके लिहित बसतात अन आपल्या आपल्यात एकमेकांची पाठ थोपटत बसतात. हि कादंबरी मात्र ती gap भरायचे काम उत्कृष्टरित्या करते. वाचनीय अडीचशे पाने, सोपी भाषा, समर्पक पात्रयोजना, सरळ सन्देश. कुठेही आडवळण नाही.

या कादंबरीवर ‘selectivism’ चा आरोप होऊ शकतो, मात्र तो तितकासा खरा नाही हे वाचल्यावर कोणाच्याही ध्यानात येइल. ‘दुसरी बाजू’ मांडली नाही असे कोणी म्हणेल. पण आज पर्यंत पारंपारिकरित्या जी ‘दुसरी बाजू’ मांडण्यात आली आहे त्यातली ‘खोट’ दाखवणे हा कादंबरीचा विषय आहे. आणि यावर पर्याप्त उत्तर म्हणजे आता ”दुसरी’ दुसरी बाजू’ शोधणे क्रमप्राप्त आहे. त्याला या कादंबरीचा विरोध नाही. पुस्तकाच्या सुरुवातीला दिलेले विक्षेप-अविद्या-माया-आवरण हे वर्णन तर झकासच.

कादंबरीत अनेक गोष्टी आहेत. पण तीन मला व्यक्तीशः महत्वाच्या वाटल्या ज्या लोकांनी बहुतेक दुर्लक्षिलेल्यात असे वाटते.

एक म्हणजे मराठ्यांचे ऐतिहासिक स्थान मान्य करणे. अ-मराठी इतिहासकार साधारणतः मराठ्यांना फारसे महत्व देत नाहीत. मुघल जाणे आणि इंग्रज येणे यांच्या मध्ये अनेक प्रांतीय सत्ता उदयास आल्या त्यातलेच एक ‘filler’ एवढेच स्थान दिले जाते. खरे पाहता जो दिल्लीश्वर तोच खरा भारतीय स्वामी हि प्रवृत्ती अनेकांची आहे. इतरत्र असलेल्या सत्तांना प्रांतीय म्हणायचे आणि दिल्लीत बसलेला कितीही लहान राज्याचा का स्वामी असेना तो भारताचा केंद्रबिंदू ठरतो. मात्र मराठ्यांच्या ऐतिहासिक स्थानाला कायम सापत्न-भाव मिळतोय अशी शंका अनेक पुस्तके वाचताना येते. ‘आवरण’ मध्ये मात्र मराठ्यांना थोडाफार न्याय दिल्याचे मराठी वाचकाला थोडे समाधान.

दुसरी गोष्ट म्हणजे ‘Go back to primary sources’ हा संदेश. लोकांनी लावलेला अर्थ प्रमाण मानण्यात अनेक धोके आहेत. तेव्हा मूळ तर्जुमा काय आहे, मूळ लेखक काय म्हणतो हे वाचून स्वतः अर्थ लावला की फसवाफसवी कमी होईल, स्वतंत्र मत बनवता येईल.

आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पुस्तकाचा मुख्य सन्देश. नेमकी हिंदूंची मागणी तरी काय आहे? नाझी जर्मनी मध्ये अनन्वित अत्याचार झाले. ते अत्याचार झाले होते हे पुढच्या पिढ्यांनी मान्य केले. त्याची जबाबदारी स्वीकारली. याची आवश्यकता काय? तर पुन्हा असे अत्याचार होणार नाहीत याची खबरदारी. आजही ते चित्रपटातून, पुस्तकातून, टीव्ही सेरिअल्स मधून सारखे सारखे दाखवून त्या चुका चूकंच होत्या याची वारंवार पुनरुक्ती केली जाते. इतकी कि हिटलर च्या बाजूने कोणी बोलायची फारशी हिम्मत करत नाही. नंतरच्या पिढ्यांनी चुका मान्य केल्या म्हणजेच त्या पुन्हा होणार नाहीत याची खात्री पण दिली. भैराप्पांना भारतीय मुस्लिमांकडून हेच अपेक्षित असावे. जर अफझल खानाचे पोस्टर लावले तर त्याचा आणि आजच्या मुसलमानांचा काही संबंधच नाही. औरंगझेबचा धर्मांधपणा दाखवला तर आजच्या मुसलमानांच्या पोटात दुखायचे काही कारण नाही. आणि जर दुखत असेल तर आजही तशा प्रवृत्ती जिवंत आहेत याची शंका यावी. जोपर्यंत खुलेपणाने चुका मान्य करत नाहीत तोपर्यंत त्याची पुनरुक्ती होणार नाही याची खात्री कोण देणार? मनात शंकेला जागा कायम आहे. भैरप्पा म्हणतात, “इतिहासाकडून मिळवण्याइतकंच, त्याच्याकडून सोडवून घेणं हे परिपक्वतेचं द्योतक आहे.”

कादंबरीत अनेक ‘-इज्म’ आहेत. फेमिनिज्म आहे. मार्क्सिज्म आहे. नाशनालिज्म आहे. अनेक पात्रे आहेत. शिक्षक, पंडित, धर्मांतरित, मिडीयावाले, पोलिस, सरकार, गावकरी, शहरी, चित्रपट-डॉक्युमेंटरी बनवणारे कलाकार, नाटककार मंडळी, वडील, मुलगी, प्रेम-विवाह केले जोडपे, डावे-उजवे सर्वांचीच गुंफण आहे. अनेक प्रसंग ठळकपणे लक्षात राहतील असे रंगवले आहेत. ग्यानवापी पाहतानाचा प्रसंग, प्रोफेसर शास्त्रींचा दुटप्पीपणा, गंगेच्या किनाऱ्यावर भेटलेला साधू आणि झालेली चर्चा वगैरे वगैरे. टिपू वरचे आरोप (जे पूर्वी पगडींनीपण केले आहेत), अनंतमूर्ती आणि कर्नाड यांनी नंतर केलेली बोंब या गोष्टी बरेच काही सांगून जातात. शेवट देखील आशावादी आहे.

पुस्तक वाचनीय नक्कीच.

Blog

आणि आज हा एक ब्लॉग गवसला. अवचितच गवसला… खूप वर्षांनी ‘हेच ते, हेच हेच शोधत होतो’ असं झालं. तुम्हा लोकांचे ठाऊक नाही पण ज्यांची किमान सांस्कृतिक वंचना आणि आत्मिक घुसमट (हा येडा आहे का?) त्यांच्यासाठी हा ब्लॉग जालीम उपाय तरी आहे किंवा … जाऊदे चायला शब्दांची चणचण भासते आजकाल. त्यातच काय ते समजून घ्या. तर हा ब्लॉग मिळाल्यावर अधाशासारखा वाचून काढतो आहे. अजून निम्मादेखील झाला नाही तरी वाईट वाटायला लागले… संपला तर? पुढे? ‘रारंगढांग’ वाचताना प्रत्येक वेळी होते तसे. ‘युगांत’ जेव्हा संपायला आले होते तेव्हा शेवटची पंचवीस पाने वाचायला पंचवीस दिवस घेतले होते. संपल्यावर उगीच अधांतरी वाटायला नको. अगदी तसेच गोर्कीच्या ‘मदर’ चे वा पास्तरनाकच्या ‘झिवागो’ चे झाले होते…. अर्थात ही पुस्तके वाचून काळ लोटला, जमाना झाला, मुद्दते हुई वगैरे वगैरे. त्याचीच अंधुकशी जाणीव हा ब्लॉग वाचताना झाली. काही काही लोक इतके उत्कटतेने लिहितात, वाचताना जणू वाटते की लेखाचे मनच वाचतो आहे. लेखापलीकडे लेखक दशांगुळे उरतो हे विसरूनच जातो. लेखकाची ही जशी खासियत तसेच दुर्दैव देखील. हरकत नाही. जमल्यास नक्की वाचा.