अप्पा – पेटीचे शेहेनशाह

सह्या घेत फिरायची फार हौस…जो कोणी भेटेल मोठा माणूस की पकड त्याला, माग सही आणि मार गप्पा….खूप नाटक केली यापायी…एकदा तर पंडित जसराजांच्या मागे इतका लागलो होतो की ते चिडलेच….ते नेहमीच चिडतात हे नंतर कळले तो भाग अलाहिदा….सवाई म्हणजे सह्या मिळण्याचा खूप मोठा अड्डा…आणि तिथले काही स्वयंसेवक परिचयातले असल्याने ग्रीन रूम मध्ये घुसून सह्या घेणे किंवा कार्यक्रमाला पत्रकार/अतिथी कक्षात जाऊन बसणे हेही नेहमीचेच….

एकदा असंच पुढे बसलो होतो. आणि एक वयस्कर व्यक्ती आल्या..चालता नीट येत नव्हते. त्यांना सोफ्यावर बसवले…मित्राला विचारले की हे कोण? कोणीतरी जड व्यक्तिमत्व दिसत होते. तर तोही म्हणाला माहित नाही बुवा. आणि अचानक त्यांच्या शेजारी शाळेतले एक सर दिसले. जे काही फार थोडे शिक्षक शिक्षक म्हणण्याच्या लायकीचे लाभले आणि ज्यांच्याप्रती आदर वाटतो त्यातले ते एक होते. पण त्यांची शाळेतून तर त्यापूर्वीच काही वर्षे बदली झाली होती तेव्हा त्यांना इतक्या वर्षांनी पाहून आनंद झाला पण अचंबा याचा झाला की त्यांना त्या ‘जड’ व्यक्तीमत्वाशेजारी बसलेले पाहून. जाऊन सरांना हाय म्हणालो, पुण्यात कधी आलात? कसे काय चालले आहे? वगैरे विचारले. त्यांनीही विचारपूस केली…मग हळूच खिशातून डायरी बाहेर काढली आणि ‘जड’ व्यक्तीमत्वासमोर धरली…आणि मग कळले की त्यांना अर्धांगवायू झाला होता…फार वाईट वाटले पण तरीही त्यांनी ती डायरी घेतली आणि २-३ मिनिटं कष्ट करून सही दिली…सही म्हणजे काय तर नाव लिहून दिले. मग विचारले की काही गातोस/वाजवतोस का? मी म्हणालो पेटी…ते हसले…तरीही काहीच भारी नाही वाटले. कारण तेव्हा त्यांचे नावच माहित नव्हते मुळी…मग थोडा वेळ तिथेच तसा बसलो अन जसराजांचे गाणे सुरु झाले. जसराजांनी आल्या आल्या त्या ‘जड’ व्यक्तिमत्वाला नमस्कार केला. आयला…फारच ‘जड’ व्यक्तिमत्व होते म्हणजे….जसराज काहीवेळ गायले आणि मग त्यांना जड व्यक्तिमत्वाने फर्माईश केली. तेव्हा जसराज म्हणाले की तुमच्या बरोबरच किती तरी वेळा हे गाणे गायलो आहे तेव्हा तुम्ही फार्मैश मान्य करतो पण तुम्ही साथीला आले पाहिजे…हे सगळे होताना त्यांच्या बाजूला उभा होतो म्हणून उगीच भारी वाटले…मग त्यांना स्टेजवर नेले, समोर पेटी दिली. आणि यांनी एका हाताने मग पुढचा काहीवेळ पेटीने साथ केली. तेव्हा कळले की हे पेटीवाले कोणीतरी आहेत….आणि अस्मादिकांनी पण लहानपणी पेटी बडवायचा प्रयत्न केला असल्याने जर अजून बरे वाटले आणि जड व्यक्तिमत्वाविषयी एकदम ममत्व वाटले. रात्री घरी निघून आलो…

त्यानंतर काही महिन्यांनी कळले की ते व्यक्तिमत्व किती मोठे होते म्हणून. त्यांनी पेटीसाठी केले कार्य अजोड आहे. त्यांनी ज्या ज्या लोकांना साथ दिली त्या सगळ्यांनी त्याविषयी काढलेले उद्गार सगळे सांगतात..पेटीसाठी संगीत नाटकं अकादमी चा पुरस्कार मिळालेले पहिले वादक….पेटी पूर्वी फार दुर्लक्षित किंवा उपेक्षणीय वाद्य होती…आता हे खरे पण वाटणार नाही की पेटी भारतात आलीच मुळी दीड-दोनशे वर्षांपूर्वी…त्यापूर्वी ती नव्हतीच. आणि आली ती लगेच आपलीशी नाही केली गेली. मागे एकदा गोविंदराव टेम्ब्यांचे पुस्तक वाचले होते त्यात १९२०-१९३० साली पेटीची अवस्था कशी होती त्याबद्दल लिहिल्याचे स्मरते आहे. इराणमधून आलेले वाद्य आणि त्यातून सगळ्या श्रुती का जे काही असते ते नीट निघत नाही म्हणून लोक त्याचा वापर टाळायचे…तेव्हा सारंगी फेमस असावी परंपरेनुसार. आता सारंगीचे महत्व कमी झाले आहे. आणि सगळीकडे पेटी असते.

जळगावमध्ये एका शेतकऱ्याच्या कुटुंबात १९२२ मध्ये यांचा जन्म झाला. उर्दू पाठशालेमध्ये शिक्षण झाले सुरुवातीला आणि धृपद धमार गायकी शिकत होते लहानपणी पण नंतरचा प्रवास पेटीवादनाकडे झाला….प्रवास कसला, झंझावाती वादळच ते. त्यांनी कोण कोणाला साथ केली याची लिस्ट अहमदजान थिरकवांपासून सुरु होते म्हणजे बघा…मग नंतरचे सगळे अल्लारखा, किसन महाराज, सामतां प्रसाद… ते झाकीर हुसेन पर्यंत सगळे तबला वादक. बिरजू महाराज, अण्णा जोशी, जसराज वगैरे तर यांचे नेहमीचेच होते…त्यांनी १९७० पासून बहुधा सोलो वादनही केले…
सगळे असे वाचून नंतर थक्क झालो आणि वाटले की किती बावळट होतो, जेव्हा भेटलो तेव्हा काहीच का नाही वाटले…आणि मध्यंतरी अचानक मागच्या वर्षी त्यांच्या जाण्याची बातमी वाचली. फार वाईट झाले.

मंगेश तेंडुलकर

बालगंधर्व मध्ये तेंडूलकरांच्या चित्रांचे प्रदर्शन लागले होते… आणि स्वतः तेंडूलकर तिथे असणार १ दिवस. दहावीची परीक्षा संपली होती आणि कॉलेज सुरु व्हायचे होते. रिकामा होतो. गेलो…खूप खूप चित्रे होती…काही काही कॉमेडी होती. राजकारणावर, समाजावर भाष्य-बिष्य करणारी होती. काही काही बोर झाली. काही काही कळलीच नाहीत. पण ज्यासाठी गेलो होतो – तेंडुलकरांशी २ मिनिटे का होईना बोलायचे…आता १०वी मधला मुलगा त्यांना असे कसे सांगणार, ‘तुमच्या चित्रांचा मी चाहता आहे, मला अमुक अमुक फार आवडले, यात तुमचा विनोद खूपच सटल आहे…ब्लाब्ला…’ ते नाहीतरी मी स्वतःच हसलो असतो. मग बोलायला काहीतरी विषय तर पाहिजे…चित्रांच्या शेवटी ते एका बाकावर बसले होते आणि कोणाशी तरी गप्पा मारत होते…तिथेच ५ मिनिटे घुटमळत होतो….काय बोलू आणि कसे बोलू….एकतर सायकल चालवत एवढ्या लांब आलो होतो तेव्हा बोलल्याशिवाय परत जायचे नाही…आणि आता समोर ते बसलेत तर बोलायला काही सुचत नाही….परत एक राउंड मारली आणि सगळी चित्रे बघितली…त्यात एक काहीतरी गांधींवरती चित्र होते…शेवटी शेवटी होते ते…..ते नेमके काय होते ते आठवत नाही पण विचित्र होते हे नक्की…चला, विषय मिळाला…या चित्राविषयी बोलूयात. जो ‘तुमची चित्र आवडतात’ म्हणायला घाबरत होता तो त्याच्या एका अतिशय कॉम्प्लेक्स चित्राविषयी बोलायला निघाला…बाजूला जाऊन थांबलो. त्यांचे लक्षच नव्हते. ४-५ मिनिटे गेली तरी त्यांनी बघितलेच नाही…मी त्याचेह निरीक्षण करत होतो…अंगात हिरवा कुर्ता, त्यावर एक जाकेट, पांढरी दाढी आणि चष्मा + स्मितहास्य… शेवटी हिम्मत केलीच, ‘सर तुम्हाला एक विचारायचे होते’ त्यांनी बघितले की हा कोण उपटला मधेच…उत्तर पण नाही दिले. बहुधा त्यांच्याच विचारात असावेत. (पुलं स्टाईल प्रतीभासाधनेत व्यत्यय वगैरे) परत विचारले, ‘सर, एक प्रश्न होता’ ‘हा, काय रे?’ ‘सर आत्ता तुमची चित्र सगळी बघून झाली. पण एक कळलेच नाही, ते शेवटचे चित्र आहे ना, डावीकडचे,, दुसरे, गांधींवरचे, ते काही कळले नाही बघा, जरा एक्स्प्लेन करता का?’ धन्य मी…चायला…आधीच तो मोठा चित्रकार, त्यात त्यांचे प्रदर्शन, त्यात मी १०वी तला मुलगा, आणि वर चित्र समजले नाही तोंडावर सांगतो आणि परत ते एक्स्प्लेन करायाचे फर्मान देतो…!!! त्यांनी बघितले की हा असा काय आहे? काय विचारतो आहे ते त्यांना कळायला आधी १ मिनिट गेला…मग ते हसले आणि म्हणाले, ‘बाळा, तुला नाही कळायचे..जरा मोठा होशील तेव्हा मी काही ना सांगताच तुला कळेल’ मी जरा नाराजीच्या सुरातच म्हणालो, ‘पण मग सही तरी देता का मला?’ ते परत हसले, डायरी घेतली आणि सही करून दिली…

किस्से सह्यांचे….

एक जुनी सवय आहे. मोठ्या लोकांना जाऊन भेटायची…काहीही कारण काढून, कुठे असतील तिथे जाऊन, कसेही म्यानेज करून…पण भेटायचे… कधी कधी चर्चा करायला (पुणेरी असल्याचा जाज्वल्य अभिमान असल्याने ही सवय असणे म्हणजे आश्चर्य नाही) तर कधी नुसते बघायला…पण खूप लोकांना भेटलो, कधी बाहेर कार्यक्रमात तर कधी डायरेक्ट घरी जाऊन…मजा आली. प्रत्येक भेट म्हणजे एक नवा अनुभव असतो. खूप गोष्टी कळल्या….आता त्यातले काही लोक हयात नाहीयेत. काही लोक अनरिचेबल आहेत. भेटलेल्या बहुतेक लोकांच्या सह्या पण घेतल्या आहेत. पण सगळ्यांच्याच नाही जमल्या…काही काही इतक्या ब्रीफ भेटी होत्या की सही मिळाली, २ मिनिटे बोललो आणि टाटा…काही काही इतक्या जपल्या गेल्या की त्यानंतर त्यांच्या घरी जाणे येणे सुरु झाले…आणि त्यांचाही मोठेपणा की त्यांनी कायम मोठ्या मनाने प्रत्येक वेळी वेळ दिला…यामध्ये लक्ष्मी सहगल पासून ते दिलीप प्रभावळकर आणि अप्पा जळगावकर ते ग्रेगरी डेव्हिड रोबर्ट्स (शांताराम) सगळे लोक आहेत….एकूण किमान ५० तरी लोक होतील…(चला ५० दिवसांच्या पोस्ट्स चा प्रश्न निकालात निघाला एका झटक्यात…:))

थोडक्यात असे की – नवी कॅटगरी सुरु करत आहे. ‘किस्से सह्यांचे’ म्हणून… त्यामध्ये त्या व्यक्तींविषयी थोडे, भेटीविषयी थोडे आणि सही असेल तर सहीचा फोटो टाकत जाईन…..