वादग्रस्त शिवाजी….!

सध्या अमेरिकेत आहे. मागे एकदा भांडारकर प्रच्याविद्येचे दुर्दैवी प्रकरण झाले होते. जेम्स लेनच्या ‘शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ या पुस्तकातल्या काही उल्लेखांवरून. मग त्यावर राज्य शासनाने बंदी आणली. (की केंद्र?) पेपरात त्यावर बरेच लेख यायचे, नेटवरही आर्टिकल्स उपलब्ध आहेत. पण मुळातून कोणतीही गोष्ट वाचल्याशिवाय मत बनवायचे नाही आणि विश्वास ठेवायचा नाही असा शिरस्ता समर्थांनी पाडून दिला आहे, मूर्खांच्या लक्षणाच्या समासात ते म्हणतात – समूळ ग्रंथ पाहिल्याविण, उगाच ठेवी जो दूषण, गुण सांगता पाहे अवगुण, तोची एक पढतमुर्ख. मग लक्षात आले की बंदी भारतामध्ये आहे आणि मी अमेरिकेत. म्हणजे पुस्तक वाचायला मिळू शकते की इथे.

इथली लायब्ररी अतिशय मोठी आहे. १२ इमारती आहेत…!! १२…!!! आणि त्यातही जर पाहिजे ते पुस्तक नाही मिळाले तर ते इतर युनिव्हार्सीटीजच्या लायब्ररीतून मागवून आणून देतात…. अनेक लायब्रऱ्यांची लीग आहे.. ते पुस्तक आहे का ते धुंडाळले, तर नव्हते… म्हणून मागवून घेतले आहे. ते आज पोचले. पण आज आहे रविवार. उद्या जाऊन ते आणतो आणि खरंच काय कसे आहे ते वाचतो. नेत्यांच्या भाषणावर, वृत्तपत्रातील आणि टीव्ही-रेडियो वरच्या बातम्यांवर कमीत कमी विश्वास असल्याने आता खरंच कळेल की काय प्रकार होता ते. फक्त मला एक माहित नाही मी ते वाचल्यावर त्याबद्दल ब्लॉगवर लिहू शकतो का ते. त्यामुळे वाचल्यानंतर त्यावर लिहायचे की नाही ते अजून ठरवले नाहीये. पण ते नंतर पाहता येईल…. आधी वाचून तर बघू…..

ब्लॉगचे विषय???

किती कविता कविता कविता….चायला कधी वाटलेच नव्हते की मी कविता वाचेन आणि त्यावर लिहेन वगैरे. माझे खास आवडते विषय म्हणजे आत्मवृत्त, इतिहास आणि प्रवास वर्णन. कविता वगैरे वाचणाऱ्यांना शिव्याच घालायचो. म्हणजे कविता आवडायच्या नाहीत असे नाही पण मुद्दामहून काव्यसंग्रह हा घेऊन वाचायचा प्रकार आहे असे नाही वाटायचे. पण एक मात्र होते. मर्ढेकर आणि तुकाराम…ते खूप आवडायचे. संपूर्ण मर्ढेकर रट्टा मारून झाला होता आणि तुकाराम तर जागोजागी दर्शन देत होते. पण मर्ढेकर आवडण्यामागे कारण काहीच नव्हते. मर्ढेकर मोठे का? हेच कळत नव्हते. मग केव्हातरी रविकिरण मंडळ, नव-काव्य, दलित काव्य, सामाजिक आशयाच्या कविता…हळू हळू कळत गेले आणि मर्ढेकरांच्या मोठेपणाची खरी प्रचीती आली. तोवर ‘सकाळी उठोनी चहा कॉफी घ्यावी’ किंवा ‘इरेस पडलो जर बच्चमजी’, ‘फलाटदादा फलाटदादा’ कविता नुसत्या गम्मत म्हणून आवडायच्या….आणि ‘पिपात मेले ओल्या उंदीर’ कळायचंच नाही आणि  ‘काहो माजवता दुही, माखता स्वातंत्र्याची वही, स्वजन रक्ताने प्रत्यही, लळथळा’ ही आहे त्याच वृत्तात का केली हे विचार करायचे प्रश्न तेच नाही कळायचे. ‘न्हालेल्या जणू गर्भवतीच्या’ म्हणजे मुंबईचे किती अप्रतिम वर्णन आहे आणि हाच कवी हेही लिहितो आहे त्यात महानता आहे हे लक्षातच नाही आले. ‘कितीतरी दिवसात नाही चांदण्यात गेलो किती तरी दिवसात नाही नदीत डुंबलो’ अशी सुरुवात करून जेव्हा ती कविता ‘बरा म्हणून हा इथे दिवा पारवा पाऱ्याचा, बरी तोतऱ्या नळाची, शीरी धार मुखी ऋचा’ अशा वाक्याने संपते तेव्हा किती अंतर्मुख करते याचा अंदाज नंतर नंतर येऊ लागला होता…..पण तरीही त्याहीपेक्षा जास्त लोभसवाणे रूप होते ते म्हणजे ‘आला आषाढ श्रावण’ मधली ‘ओल्या पानातल्या रेषा वाचतात ओले पक्षी, आणि पोपटी रंगाची रान दाखविते नक्षी’…हे खूप आवडायचे…पण जेव्हा हाच कवी लिहितो की ‘या स्नायूंच्या तारांचा रे तुझ्याच हात खाली स्वीच’ तेव्हा मराठी कवितेत किती क्रांती घडवून आणत होता याचा अंदाज नाही आला..ती क्रांती अर्थाची होती, उपमांची होती, छंदांची तर होतीच होती पण त्याहीपेक्षा कविता का, कोणासाठी आणि कशी या प्रश्नाच्या उत्तरांची होती…संपूर्ण नवा दृष्टीकोन होता तो….’पोरसवदा होतीस काल परवा पावेतो, थांब उद्याचे माई तीर्थ पायाचे घेईतो’ असे लिहिताना त्यांनीच असेही म्हटले आहे – ‘आभाळाच्या पल्याड स्पंदन टिपरी त्याची या मडक्यावरी’…

झाले? कवितांवर किती जास्त लिहितो आहे सांगताना परत त्यावरच एक चुकून आर्टिकल झाले. चायला….. हा ब्लॉग काही कवितांचा ब्लॉग म्हणून सुरु केलेला नाही पण ६० पैकी २० पोस्ट्स कवितांवर झाल्या आहेत. नकळतपणे…. गालिब, तुकाराम, बच्चन तर नेहमीचेच पेटंट आहेत. काही सुचत नसले की आपोपाप गालिब आणि इक्बाल सुरु करतो…कारण त्यांवर बोलणे सोप्पे असते. जसे की आत्ता मर्ढेकर…इतके वाचले आहेत की झोपेत ही त्यांच्या कवितांवर बोलू शकतो…पण त्यात आता मजा येत नाही. नवे वचन करायची आणि व्हायची संधी इथे फार कमी आहे. तेव्हा आपोआप रारंगढांग किंवा मधुशाला सुरु करतो…नाहीतर इतिहास…इतिहास तर कायमचा डोक्यात ठाण मांडून बसला आहे. त्यातही मध्ययुगीन भारत. या क्षेत्रातल्या भरपूर मोठ्या लोकांच्या सहवासात आल्याने आणि समानशील मित्र लाभल्याने त्याच विषयावर दिवसाच्या दिवस घालवले आहेत. जसे की पानिपतचे युद्ध…साधारणपणे आपली सुरुवात विश्वास पाटलांच्या कादंबरीने होते आणि तोतयाचे बंद किंवा भाऊबंदकी नाटकाच्या आधाराने संपते. पण मग आम्ही जातो ते पानिपत १७६१ कडे. तिथून…शेजवलकर कोण? मग त्यांचे शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या अभ्यासाची साधने व आराखडे…तिथून मग दांडेकर, वि श्री, सरदेसाई, राजवाडे, पोतदार, पगडी…..पगडी मग निझामाकालीन हैद्राबाद आणि पोट्टी श्रीरामल्लू, मग हैदराबादची जामा मस्जिद, हैद्राबादी दखनी भाषा, हिंदीचे प्रकार, खडी बोली, अवधी, ब्रज भाषा वगैरे…मग तिथून वीर रसाची हिंदी साहित्यातली उत्थापना, छायावाद वगैरे…हिंदीवर उर्दू चा प्रभाव..मग रामचरीतमानस वगैरे,, भक्ती मुव्हमेंट…वंगदेशाचे इस्लामीकरण, कबीराच्या खऱ्या रचना कोणत्या…पाठभेद…ऐतिहासिक पात्रे…मग महाभारत आणि रामायण…तिथून दुर्गा भागवत आणि इरावती कर्वे…इरावती कर्वे आल्या की एका दिशेने डी डी कर्वे, अण्णा कर्वे, महात्मा फुले तर दुसऱ्या दिशेने आनंदीबाई जोशी, रमाबाई रानडे…(युगांत वाचले आहे? अप्रतिम पुस्तक आहे…वाचाच वाचा….जगात तोड नाही त्याला…) मग असे करत करत सध्याच्या बाबासाहेब, मेहेंदळे, बेडेकर, बेलसरे पर्यंत येऊन थांबतो…पण गप्पांची भूक काही संपत नाही. त्यातून कधी काय साध्य झाला का हा संशोधनाचा विषय ठरवा…..पण वेळ मात्र मजेत जातो…काहीच नसेल तर उर्दू, हिंदी शायरी आणि गाणी, चित्रपटांचा इतिहास, जुने गायक संगीतकार…..नाट्यसंगीत….अशा विषयी लिहायला काहीच लागत नाही….उचलली जीभ आणि लावली टाळ्याला सारखे उघडला ब्लॉग आणि लावला बडवायला असे होते….

पण आजकाल त्यात मजा येत नाही…सध्या अमेरिकेत आहे त्याविषयी कितीतरी गोष्टी लिहिण्यासारख्या आहेत…इथले लोक, समाज, शिक्षण पद्धती, इथले राहायचे अनुभव….मागे एकदा शिकागो ला गेलो होतो तिथे स्वामी विवेकानंदांनी जेथे जागतिक सर्वधर्म परिषदेमध्ये जेथे भाषण दिले १८९३ मध्ये ती जागा पाहून आलो…. का नाही लिहित? आणि ललित? ललित हाताळणे सोप्पे नाहीये…पण जमला तर त्यासारखा तोच. अर्थकारण आणि राजकारण हे तर विषय दिवस रात्र असतात गप्पांमध्ये पण लिहिताना का नाही सुचत? सध्या रिसर्च आणि academic मध्ये इतक्या इतक्या नव्या गोष्टी पाहत आहे की त्या लिहायला पण हरकत नाही… एवढे मित्र बंगाल, हरियाना, ओरिसा, अरुणाचल, आंध्र, गुजरात, इंग्लंड, जर्मनी, सिंगापूर, अमेरिकेत पसरले आहेत त्यांचे कितीतरी ऐकतो नवे नवे अचंबित व्हावे असे….का नाही लिहित?

साधे उत्तर आहे – शाहरुख खानचा चित्रपट होता एक – राम जाने….का नाही लिहित……….राम जाने…

सूर्याची एन्ट्री

सूर्याचे महत्व अपार आहे….सूर्य महान आहे. सूर्य खूप शक्तिशाली आहे. ऊर्जादायी स्रोत आहे. तेजाचा पुंज आहे. तेजोनिधी लोहगोल भास्कर हे गगनराज…इतके महिने आकाशात सूर्यच नाही पहिला तेव्हा जाणवलेच नाही की आपण काय ‘मिस’ करतो आहोत ते….आणि गेले २ दिवस हे आदित्यराज रोज दर्शन घडवत आहेत. सकाळी बेडरूम च्या खिडकीतून तर दुपारी किचन च्या….कसले मस्त वाटते म्हणू सांगू…दिवसाचे सकाळ, मध्यान्ह, दुपार, मग संध्याकाळ असे काही वेगवेगळे भाग असतात याची जाणीवच जणू नाहीशी झाली होती..सकाळी सातला जसे आकाश तसेच दुपारी बाराला आणि तसेच चारला….सहाला गुडुप्प अंधार…आकाशात बघून वेळ सांगणेच शक्य नसायचे…नुसते राखाडी राखाडी आणि बाजूला नुसते पांढरे पांढरे बर्फ चौफेर नजर फिरवा दूरपर्यंत फक्त बर्फच बर्फ……हवा स्वच्छ होती वगैरे सगळे ठीके पण तेज आणि प्रसन्नतेचा आशीर्वाद असलेला सुर्याराजाच आकाशात नसायचा…खरं सांगतो डिसेंबर ते मार्च इतका भंगार कालखंड असतो इथला की बस…. पण आता सूर्याने परत एन्ट्री घेतलेली आहे स्टेज वर सो खूप एफ़िशिअयन्सि जास्त काम होणार आणि परत इतर बऱ्याच ठरवलेल्या गोष्टी करायला वेळ आणि उत्साह मिळणार याचा आनंद आहे…तो तुमच्यापर्यंत पोहोचवायला ही पोस्ट…..

सागरास

ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला

भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ । सृष्टिची विविधता पाहू
तइं जननी-हृद् विरहशंकितहि झालें । परि तुवां वचन तिज दिधलें
मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टि वाहीन । त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी । मी
जगदनुभव-योगे बनुनी । मी
तव अधिक शक्त उध्दरणी । मी
येइन त्वरें कथुन सोडिलें तिजला । सागरा, प्राण तळमळला

शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं । ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु यापुढती । दशदिशा तमोमय होती
गुण-सुमनें मी वेचियली ह्या भावें । कीं तिने सुगंधा घ्यावें
जरि उध्दरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे
तो बाल गुलाबही आता । रे
फुलबाग मला हाय पारखा झाला । सागरा, प्राण तळमळला

नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी । आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा । वनवास तिच्या जरि वनिंच्या
भुलविणें व्यर्थं हें आता । रे
बहु जिवलग गमतें चित्ता । रे
तुज सरित्पते । जी सरिता । रे
तद्विरहाची शपथ घालितो तुजला । सागरा, प्राण तळमळला

या फेन-मिषें हससि निर्दया कैसा । का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते । भिउनि का आंग्लभूमीतें
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी । मज विवासनातें देशी
तरि आंग्लभूमी-भयभीता । रे
अबला न माझिही माता । रे
कथिल हें अगस्तिस आता । रे
जो आचमनी एक पळीं तुज प्याला । सागरा, प्राण तळमळला

अमेरिकन शिक्षक…?

अमेरिकेत शिकायला यायच्या आधी इथल्या एज्युकेशन सिस्टीम बद्दल बरेच ऐकले, वाचले, सर्फले, गुगले होते. की इथले वर्ग कसे असता, व्हिडियो लेक्चर्स, वेबसाईट वरून गृहपाठ, वर्गात खाणारी-पिणारी (कॉफी) मुले, वर्गात laptop वर नोट्स काढणारी किंवा गेम्स खेळणारी मुले वगैरे वगैरे….आश्चर्य च वाटायचे की वर्गात मास्तर जीव तोडून शिकवत असता कोणी कॉफी कसे पिऊ शकते…ते पण ठीके एकवेळ पण एक कानाने त्याचे बोलणे ऐकताना laptop वर दुसरेच काम करणे म्हणजे त्याचा अपमानच नाही का? असले ‘काय सांगू वाटे, काहीचिया बाही’ रेग्युलर आणि नैसर्गिक वाटायला लागले….तोच हा व्हिडियो पहिला. ओक्लाहोमा युनी.चा. चला, एक तरी असा प्रोफ आहे ज्याला वाटते की मुलांनी त्याच्या लेक्चर ला असली उपकरणे वापरू नयेत, वापरू नयेत काय, वर्गात आणू ही नाहीयेत….अन नुसते त्याला वाटत नाही तर तो प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड स्ट्रीक्ट दिसतो आहे त्याबाबतीत…मुलांनी घाबरावे, आपले ऐकावे म्हणून अपाल्याकडे कान पिरगळणे, कोंबडा करायला लावणे, छडी मारणे, वर्गाबाहेर किंवा बाकावर उभे करणे अशा शिक्षा आहेत. पण हा प्रोफ काय करतोय? खरंच ‘काहीच्या बाही’च आहे. त्याचा मुद्दा मुलांना नीट कळावा आणि एकदम नीट कळावा म्हणून याने काय केले? याच्या वर्गात मुलांनी laptops अनु नयेत अशी याची इच्छा आहे. म्हणून याने पहिल्या लेक्चर ला एक laptop घेतला, लिक्विड नायट्रोजन घेतले, laptop त्यामध्ये बुडवला, आणि मग म्हणाला, “This is just liquid nitrogen, so it alone won’t hurt the computer. But this will.” आता हे ‘this’ म्हणजे काय ते या व्हिडियो मध्येच पाहा. हे पाहून पोरांच्या कपाळात गेल्या नसतील तरच आश्चर्य आहे. कोण हिम्मत करेल वर्गात परत laptop आणायची किंवा मोबाईलशी खेळायची?