दाभोलकरांची हत्या झाली. कुसुमाग्रज म्हणाले होते –
व्यर्थ गेला तुका, व्यर्थ ज्ञानेश्वर, संतांचे पुकार, वांझ झाले
रस्तोरस्ती साठे, बैराग्यांचा ढीग, दंभ शिगोशीग, तुडुंबला
बँड वाजविती, सैंयामिया धून, गजांचे आसन, महंतासी
भाला खड्ग हाती, नाचती गोसावी, वाट या पुसावी, अध्यात्माची?
कोणी एक उभा, एका पायावरी, कोणास पथारी, कंटकांची
असे जपीतपी, प्रेक्षकांची आस, रुपयांची रास, पडे पुढे
जटा कौपिनांची, क्रीडा साहे जळ, त्यात हो तुंबळ, भाविकांची
क्रमांकात होता, गफलत काही, जुंपते लढाई, गोसव्यांची
साधू नाहतात, साधू जेवतात, साधू विष्ठतात, रस्त्यावरी
येथे येती ट्रक, तूप साखरेचे, टँकर दुधाचे, रिक्त तेथे
यांच्या लंगोटीला, झालर मोत्याची, चिलीम सोन्याची, त्याच्यापाशी
येथे शंभराला, लाभतो प्रवेश, तेथे लक्षाधिश, फक्त जातो
अशी झाली सारी, कौतुकाची मात, गांजाची आयात, टनावारी
तुका म्हणे ऐसे, मायेचे माइंद, त्यापाशी गोविंद, नाही नाही.