कश्मीरनामा – ५

जवान मद्दड असतात? बहुतेक. जर सगळेच विचार करायला लागले तर सावळा गोंधळ नाही का उडणार? आर्मी म्हणजे काय लोकशाही वाटली का? हवालदार जास्त डोके वापरायला लागला तर इंस्पॅक्टरचे काय काम? यात अपमानास्पद काहीच नाही. जवानाला विचार करायला शिकवले जातच नाही. आज्ञा पाळायला शिकवले जाते. You are not to ask why, you are but to do or die. ते असतातच गरम डोक्याचे आणि तसेच असायला हवेत. फक्त त्यांची ती एनर्जी कुठे-कधी वापरायची याची कला त्यांच्या कमिशन्ड ऑफिसरकडे असते.

India Pakistan Border

गरम डोक्याचे म्हणजे किती गरम डोक्याचे? सीमेवर म्हणे टेहेळणी-बंकर्स असतात. त्यात सैनिक कायमचा बंदूक रोखून बसला असतो. जसा आपल्याकडून तसेच सीमेपलीकडून. आणि तसेच तासन-तास थांबायचं म्हणजे कंटाळवाणे काम. मग मागे रेडियो चालू असतो. त्यावर कधी ‘आप की पसंद’ तर कधी क्रिकेट कॉमेंटरी चालू असते. एकदा असेच भारत पाकिस्तान मॅच चालू होती. सचिनने ५० रन्स केले. ‘घे साल्या हरामखोर पाक्या दोन’ म्हणून आपल्या सैनिकाने इकडून गोळीबारी सुरु केली. दोन-चार गोळ्या अशाच सोडून दिल्या त्या दिशेने. मग सचिन बाद झाला तेव्हा तिकडून १०-२० गोळ्या आल्या. पाकी पण रेडियो लावून बसले असणार. मग तर सिलसिलाच सुरु झाला. मैदानात एक चौका पडला कि इथे चार गोळ्या सुटायच्या. यात अतिशयोक्ती नाही. असे अनेक वेळा घडले आहे. सीमेवर लोक फ्रस्ट्रेशन दूर करायला काहीही करू शकतात. एका मित्राचे वडील ‘मराठा लाईट इंफ्रंट्री’मध्ये होते. ते म्हणायचे की सैनिकाला खरेच डोके नसते त्यामुळे काम नसेल तर भांडणे करत बसतात. मारामारी, उचापत्या काही कमी नाहीत. एखाद्याचे डोके पण फोडतील उगीच. म्हणूनच काम नसेल तर त्याला खड्डे खणायला आणि ते परत बुजवायला सांगायला लागते. He must always be occupied, anyhow.

भारताचे आधुनिक मिलिटरी स्ट्रक्चर ही इंग्रजांची विरासत. त्यातच मग मराठा-बिहार-मद्रास-राजपूत-गोरखा-महार रेजिमेंट आल्या. एकेका भागाला आणि एकेका कम्युनिटीला इंग्रज जसे आपल्या अधिपत्याखाली आणत गेले तसतशा या रेजीमेंट्स बनत गेल्या. त्यांच्या उपयोग करून उरलेले भारतीय आणि उरलेला भारत त्यांनी जिंकला. आजच्या मद्रास रेजिमेंटचे चिन्ह पहिले आहे कधी? दोन तलवारी, मध्यात एक ढाल आणि त्यावर एक हत्ती. हत्ती? हा हत्ती त्यांनी असाईच्या युद्धात मराठ्यांना धूळ चारून जिंकून नेला होता. हा त्यांचा दैदिप्यमान युद्ध इतिहास आहे. युद्ध अवघड होते, मराठे बळजोर होते, पण यांचा सेनानी आर्थर वेलस्ली होता. १८०३ ची गोष्ट. मद्रास रेजिमेंटने युद्ध जिंकले. त्याचा त्यांना आजही प्रचंड अभिमान आहे. पण आता स्वातंत्र्यानंतर?

भारतीय संविधानात आपण म्हटले आहे कि आपण जात-पात-धर्म-लिंग-प्रदेश यावरून भेदाभेद करणार नाही. पण मग अजूनही कुमाऊ-गढवाल-डोग्रा-जाट-मराठा-बिहार-मद्रास-राजपूत-गोरखा-महार रेजिमेंट्स का? पूर्वी म्हणे पुण्याच्या शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजात तीन वेगवेगळ्या चुली पेटत असत. एक हिंदू एक ख्रिश्चन अन एक असेच काहीतरी. तसेच पूर्वी आणि अजूनही भारतात एकात्मतेची भावना अजून एवढी नाही. काही मराठी लोकांना भैय्या आवडत नाहीत. राजपुतांना मुसलमान चालत नाही. हिंदी भाषकांना मद्रासी उपरे वाटतात तर असामी म्हणे चीनी वाटतो आणि शिखांनाही मुसलमानांचा राग. यात योग्यायोग्य बाजूला राहू दे. तो विषय इथे नाही. पण अशा लोकांना एकत्र घेऊन सैन्य चालेल काय? ते खांद्याला खांदा भिडवून लढतीलही एकवेळ पण शांततेच्या काळात? परस्पर विद्वेष आहे की नाही हा भाग सोडा. पण रोज खाणे-पिणे एकत्र करायचे असते. आधीच सांगितल्या प्रमाणे सैनिकांना गरम डोक्याचे बनवले जाते, त्याना शांत डोक्याने विचार करायला शिकवला जात नाही आणि बुद्धि चालवायचे काम तर त्यांच्या ऑफिसरचे असते. रोज काही ना काही खुराफ़ात निघणारच, फालतू कारणावरून भांडण होणारच. तेव्हा ते वेगळे राहिलेलेच बरे. जेव्हा सबंध भारत युनिफॉर्म व्हायचा तो होवो पण तोपर्यंत तरी हे असेच राहणार. १९७० साली जेव्हा आपण ‘नागा रेजिमेंट’ बनवली ती पण प्रांतीय आधारावरच. काही रेजीमेंट्स आहेत त्यामध्ये सर्व-प्रांतीय लोक घेतात. पॅराशूट, किंवा काही आर्मर्ड रेजीमेंट्स. पण त्यामध्ये काम पण असे असते कि नुसते गरम-मिजाजवाले सैनिक तिथे नसतात. त्यांच्या शिकवणुकी वेगळ्या असतात.

तरीही आपण एक प्रयत्न करून पहिला. ‘राष्ट्रीय रायफल्स’चा. ८० दशकाच्या शेवटी घुसखोरी आणि दहशतवादी करावया वाढल्या. आर्मीचे ट्रेनिंग पुरे पडेना. नागा, मिझोरम, मणिपूर, श्रीलंका इथला अनुभव वेगळा होता, लोक वेगळे होते, भूगोल वेगळा होता. अशा इंसर्जन्सी एरियात मुख्य काम असते एरिया डॉमिनेशन. त्यासाठी ‘ग्रीड सिस्टीम’ वापरतात. पण कश्मीर खोऱ्यात मुख्य अडचण म्हणजे इथली घन-लोकसंख्या. अशा ठिकाणी ‘फायर पॉवर’चे कव्हर देणे मुश्किल. लवकर हालचाली करणे, गावाला घेराव घालून पटकन अतिरेकी मारणे – सोप्पे काम नाही. आपली एक प्रचंड शौर्यवान आणि हायली डेकोरेटेड ‘वीर भोग्य वसुंधरा’वाली ‘राजपुताना रायफल्स’ पण पुरेशी उपयोगी पडत नव्हती. कारवाया यशस्वी होईनात. कॅजुअल्टीज वाढायला लागल्या. स्थानिक लोकांचा पाठींबा बिलकुल नाही. अशा ठिकाणी काम करायला वेगळ्या तरकिबी लागतात.

आणि राज्य पोलिस, सीआपीएफ, मिलिटरी इंटेलिजन्स, आईबी, रॉ, बीएसएफ यांच्यात समन्वयाचा गोंधळ. राज्य सरकार केंद्राला मदत करेन, तर आयबीवाले मिलिटरी इंटेलिजन्सला माहिती पुरवेनात. एक रॉ’चा अधिकारी एकदा इन्स्पेक्शनकरता श्रीनगरला गेला होता. तिथे शंकराचार्य टेकडी आहे. त्यावर गेला तर तिथे एकाच फ्रिकवेन्सी रेंज’च्या ६ अँटेना, शत्रूचे बोलणे चोरून ऐकायला. त्याला कळेचना. बर या काय स्वस्तातल्या नसतात. सगळ्या खास मागणी नोंदवून आयात केलेल्या. जरा चौकशी केली तर कळले कि भारतात अनेक विभागांच्या अनेक गुप्तहेर संस्था आहेत. त्यांच्या अँटेना वेगवेगळ्या असतात कारण त्या एकमेकांबरोबर माहिती शेअर करत नाहीत… कारण काय तर दुसऱ्याबद्दल डिस्ट्रस्ट आणि श्रेयासाठी धडपड. जर कुठ्न टीप मिळालीच तर पोलिस आधी जाणार कि आर्मी? कोणाचे फोटो छापून येणार आणि कोणाला बढती मिळणार? मेडल्स पोलिसांना कि आर्मीला? कोणी सिव्हिलियन मेला तर जबाबदारी कोणाची? काही अंशी अशा प्रकारची स्पर्धा हेल्दी असते पण त्याचा अतिरेक झाला की मग उलटायला लागते. यावर अनेक उपाय करण्यात आले, करण्यात येत आहेत. स्टँडर्ड ऑपरेशन प्रोसिजर्स आहेत, आफ्स्पा’मध्ये पण काही बदल केले आहेत. तरीही थोडेफार चालूच असते. आणि हे रोजरोजचे काम. आर्मी काय कायमस्वरूपी उपलब्ध नसते. तिला पाचारण करावे लागते. त्याची प्रोसिजर असते, त्याला वेळ लागतो. कायमस्वरूपी ठाण मांडून बसायचे तर ‘असम रायफल्स’ सारखे काहीतरी हवे. त्यासाठी मग ‘राष्ट्रीय रायफल्स’ ची स्थापना केली. यांचे काम म्हणजे मुलकी भागात अतिरेक्यांना पायबंद घालणे.

Rashtriya Rifles

आणि इथेच गम्मत झाली. ‘राष्ट्रीय रायफल्स’ (आरआर) उभी करताना आपण सर्व-प्रांतीय सैनिक एकाच युनिट मध्ये गोळा केले. त्यावरचे कमिशन्ड ऑफिसर कष्टाळू, प्रामाणिक आणि सैनिकांविषयी प्रेम असणारे होते. सोयी सुविधा पण ठीकठाक होत्या. पण ते पुरेना. हे भांडत बसायचे. त्यातही अनेक इतर रेजीमेंट्स मधून तात्पुरते सैनिक येणार आणि जाणार – ही व्यवस्था कोलमडली. असंख्य अडचणी निर्माण झाल्या. शिस्तीचा पुरा बोजवारा उडाला. अनेक इतर ठिकाणाचे ऑफिसर पण त्रासदायक लोकांना बाजूला काढायला तात्पुरते आरआर मध्ये पाठवू लागले. आता महत्वाची गोष्ट अशी की ‘लो इंटेन्सीटी’ युद्धात हालचाली असतात त्या छोट्या फॉर्मेशन्स’च्या असतात. त्यासाठी ज्युनिअर अधिकारी सक्षम लागतात. मोठ्या लोकांचे फार काम नसते. पण तसे चांगले अधिकारी बाकीचे रेजिमेंटवाले सोडायला तयार होईनात. शेवटी ती पद्धत बंद केली आणि मग प्रत्येक रेजिमेंट मध्ये दोन बटालीयन्स आरआर साठी डेडीकेट करण्यात आल्या. आता ते २-३ वर्षे कश्मीर मध्ये काढतात आणि मग परत आपल्या मूळ ठिकाणी येतात. १९९५ साली ५००० स्ट्रेन्थ असलेली आरआर आता बरीच मोठी झाली आहे.

यांनी खोऱ्याचे अनेक भाग केले अन तिथे त्यांच्या कंपन्या ठेवल्या. व्हिक्टर, रोमियो, डेल्टा, किलो अशी यांची नावे. एकूण १२ सेक्टर्स आहेत. त्यातली १७वी बटालियन ही मराठा लाईट इंफंट्रीची असते. काउंटर-इंसर्जन्सी आणि इंटेलिजन्स यांचा फार जवळचा संबंध. आणि इंटेलिजन्स यशस्वी व्हायला हवा तर कोऑपरेशन हवे. त्यासाठी मग पोलीस, बीएसएफ, आर्मी सर्वांनी एकत्र काम करायला हवे. मग त्यासाठी युनिफोर्म ‘कमांड अँड कंट्रोल’ स्ट्रक्चर हवे. आरआर म्हणूनच आहे गृहखात्याच्या अखात्यारीखाली. मात्र हि पॅरा-मिलिटरी नाही. यांचे वाक्य ‘दृढता और वीरता.’ यांनी कश्मीर गाजवला. पंजाबमध्ये पण काम केले. कारगिलच्या वेळेस आपली योग्यता दाखवून दिली.

पण स्थानिकांचे काय? घुसखोरी, दहशतवादी एकीकडून आणि दुसरीकडून आर्मी, मध्ये कचाटीत सापडलेले स्थानिक.

क्रमशः

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s