कश्मीरनामा – ४

कश्मीर म्हणजे जणू एक मोठ्ठीच्या मोठ्ठी लष्करी छावणी. लाखो सैनिक, अनेक भारतीय सेना, त्यांचे क्वार्टर्स आणि हेड-क्वार्टर्स, कोंव्होय सारखे ये जा करत आहेत, त्यामुळे वाहतूकीचा खोळंबा.

Indian Army Convoy

जम्मू ते श्रीनगर हा सध्याचा रस्ता बांधला गेला स्वातंत्र्यानंतर. पूर्वीचा रस्ता होता गुरुदासपूरमार्गे जो कि आता पाकिस्तानात आहे. त्यामुळे जेव्हा ४७ चे युद्ध सुरु झाले तेव्हा तिथे सैनिक पाठवायला रस्ताच नाही. कबालीवले मुजफ्फराबाद, डोमेल करत करत पूंछपर्यंत आले तेव्हा कुठे आपण हालचाल सुरु केली. विलीनीकरण झाले आणि आपण मग सगळे सैनिक हवाईमार्गे श्रीनगर विमानतळावर उतरवले. नंतर लवकरच हा रस्ता बांधायला घेतला. हा रस्ता बांधणे तसे जिकीरीचे काम. बीआरओने बरेच कष्ट घेतले. पण बांधताना अनेक इंजिनिअर, लेबर मेले. कधी रस्त्याची आखणी करताना, तर कधी भूसुरुंगात सापडून तर कधी दरड कोसळून किंवा कधी स्वतः दरीत कोसळून. यातल्या अनेकांची थडगी आजही जागोजागी दिसतात. यादगारी. वळणा-वळणावर असे फोटो, थडगी, चबुतरे आहेत.

हा रस्ता म्हणजे ‘एनएच-१ए’ दिल्ली-जम्मू-श्रीनगर-द्रास-कारगिल-लेह. हिवाळ्यात बंद पडतो. एक इच्छा होती, कोंव्होय पहावा. पहाडीतून रस्ता यावा, मागे हिमशिखरे असावीत, आपण बाजूला उभे असावे, आणि असाच एक लांबलचक आर्मी ट्रक्सचा तांडा जावा… न संपणारा… आणि मग आपण कोणाला तरी हात दाखवावा, ड्रायव्हरने पण हात दाखवावा. एकदम फिल्मी. पण जेव्हा एक बघायला मिळाला तेव्हा नेमका मी अर्धवट झोपेत. चायला. एकच कोंव्होय बघायला मिळाला. पूर्वी असे कोंव्होय खूप जात असत. सारखी वर्दळ. वाहतुक बंद. सध्या लोकांचा सैन्यावरचा रोष कमी व्हावा म्हणून जमेल तेवढा प्रवास हे कोंव्होय फक्त रात्रीच करतात. जनतेच्या जेवढे कमी दृष्टीपथात पडून तेवढे बरे म्हणून. दृष्टीआड सृष्टी.

श्रीनगर-कारगिल रस्ता. उन्हाळ्यात कारगिलला जाणारे भरलेले ट्रक्स आणि येणार रिकामे ट्रक्स. आर्मीचे पण आणि प्रायव्हेट पण. हिवाळ्यात लदाखचा रस्ता बंद. रेशन प्रोव्हिजनिंग आधीच करून ठेवायला हवे. एक तास ‘जोझी-ला’ पाशी उभे राहिलात तर किमान ५०-६० तरी ट्रक्स दिसतील. त्यातले बरेच कश्मीर राज्य सरकारने हायर केलेले असतात. अधेमध्ये वीस-तीस ट्रक्सचा आर्मी कोंव्होय. पूर्वी निस्सान आणि शक्तिमान असत १ टनर, पाच टनर वगैरे. चार टनर शक्तिमान – जबलपूरला बनवतात – तो आपण किती वर्षे वापरतो आहोत कुणास ठाऊक. ‘टाट्रा’चे ट्रक्स बनवायचे लायसन्स बीइएमएल कडे आहे. ते पण आपण वापरतो. स्वीडनवरून ‘साब’ कंपनीचे पण ट्रक्स आपण आयात करतो आहोत सध्या. एका ड्रायव्हरला विचारले कि किती पॉवरचे इंजिन आहे तर जाम सांगेन. म्हणे ओफ़िशियल सिक्रेट.

जम्मू-श्रीनगर प्रवास एका सुमो मधून केला. बरोबर होते चार कश्मिरी. अजून जम्मूमधून बाहेर पण नाही पडलो ते एका पोलिसाने अडवले. ‘जे एंड के’ पोलिस. रुबाबात सुमो ड्रायव्हरकडून २०० रुपये घेऊन सोडले. लगेच बाजूचा मुलगा म्हणतो कसा – ‘इसी लिये हम आझादी चाहते है.’ आता हे लुटणारे लोक त्यांचेच आहेत हे त्याला दिसत नव्हते. फक्त सरकार आणि काहीही सरकारी असले की त्याचा प्रचंड राग. त्यातही आर्मी म्हणजे ‘हेट-ऑब्जेक्ट.’ ‘हमेशा मुस्तईद’वाले १-२ फलक दिसले. मराठीतल्या ‘सदैव तत्पर’ सारखे. लोकल पोलिसांमध्ये तिकडचा तरुण भरती होताना दिसला. असेही नोकरीचे पर्याय फारच कमी, शिक्षणाची तशीही बोम्बच, आणि सरकारचा राग. लोकल तरुणांना पोलिसात भरती करून घ्यायचा उपाय गेले दशकभर चालू आहे. एकाच दगडात अनेक पक्षी. दगड मारणारे हात आणि त्यावर लाठी चालवणारे दोघेही काश्मीरी. नोकरीचा प्रश्न कमी झाला तर रिकामे लोक कमी. आणि सरकारच्या इंटरेस्ट मध्ये स्थानिकांचे हितसंबंध गुंतले की भारतीय राज्याची तेवढीच अधिक ‘लेजिटीमसि.’ भारतीय सेनेमध्ये मात्र कश्मिरी तरुण फार नाही.

जम्मू-श्रीनगर प्रवास किमान ९ तासांचा. यात ४ वेळा पोलिसांनी अडवले. वाटले आता हा मुलगा बाहेर येउन दगड फेकायला लागतो की काय. यात पण गम्मत आहे. जम्मू पासिंग ची गाडी दिसली की अडवलीच. आणि श्रीनगर पासिंग असेल तर बऱ्याचदा सोडून देतात असे दिसले.

मग आले उधमपूर. उधमपूर म्हणजे आर्मीच्या नॉर्दर्न कमांडचे हेडक्वार्टर. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना फक्त त्यांच्याच वसाहती, इमारती वगैरे. जागोजागी भारताचे आणि पाकिस्तानचे रणगाडे ठेवलेले. भारताच्या रणगाड्याचे नळकांडे वरती तर पाकिस्तानचे शरण आल्यागत खालमुंडी. त्याचबरोबर उधमपूर हे एयरफोर्सचे ‘फोरवर्ड बेस सपोर्ट युनिट’ पण आहे. असे एकूण १९-२० युनिट्स भारतभर पसरलेले आहेत. कश्मीर खोऱ्यात अवंतीपूरला पण असेच एक युनिट आहे. उधमपूरचे मुख्य लष्करी महत्व इंग्रजांना जे होते ‘ग्रेट गेम’च्या काळात रशिया विरुद्ध. पण पाकिस्तान-निर्मिती नंतर भारताचा मध्य आशियाशी तसाही संबंध राहिला नाही. आणि आक्रमकपणा आमच्या अंगात कधी फारसा नव्हता. त्यामुळे ते बंद करण्यात आले होते. इंदिरा गांधींच्या काळात जेव्हा ‘८ गोरखा’चे सॅम माणेकशा आर्मी चीफ होते त्यांनी पुन्हा सुरु करवले.

पुढचा प्रवास. जागोजागी सीआरपीएफ-चे जवान रस्त्यावर गस्ती घालत होते. उधमपूर नंतर पीरपान्जाल पर्वतरांग सुरु होते. अनेक जागी थडगी तर होतीच ,जवानांच्या गस्ती चालूच होत्या. कुठे सीआरपीएफ-च्या एखाद्या बटालियन चे हेडक्वार्टर लागत असे. ‘बनिहाल पास’च्या पुढे ११८ बटालियन. काझीगुंड नंतर १२७ बटालियन. त्यांची पाटी पण ‘सीआरपीएफ सदा अजय, भारत माता कि जय’ जागोजागी होती. किंवा ‘सेवा और भक्ती’ वाले बोर्ड. बॉर्डर रोड्सचे ‘ऑपरेशन बिकन’ तर गेली चार दशके चालू आहे. हिमालयातल्या या भागात रस्ते बांधायचे. हजारो कोटी खर्च केलेत आता पर्यंत. कारण शेवटी जोपर्यंत रस्ता ताब्यात आहे तोपर्यंत खोऱ्यावर कंट्रोल. त्यासाठीच दहशतवादी पण नेहमीच रस्ता बंद करायला बघतात. आणि मुख्य सगळी लष्करी ठाणी आणि गस्ती रस्ते मोकळे ठेवायला. बाकी आतल्या खेड्यात कोण मरायचे ते मरो. साहजिकच आहे म्हणा. पाकिस्तानने युद्धाची सुरुवात पण ‘अखनूर’ पासून केली होती. हा इथला ‘चिकन्स नेक’ एकदा दाबला की कश्मीरला जवळजवळ गळफासच. जसे पूर्वेकडे सिलीगुडी तसे इथे तेव्हा अखनूर होते. आणि हा ‘बनिहाल पास’चा बोगदा – त्याच्या सुरक्षेला तर अख्खे एक युनिटच आहे. जबरदस्त माहोल.

DSC03480

कारगिल नंतर आलेले शहाणपण, आपण नवा रस्ता बांधायला जोमाने सुरुवात केली. बराचसा भाग शापूरजी पालनजीची ‘आफ्कोंस’ही उपकंपनी बांधत आहे. मोठमोठाली यंत्रे, शेकडो कामगार, उंचच्या उंच ब्रीजेस… अखंड चालूच आहे गेली कित्येक वर्षे. त्याचबरोबर कटराच्या पुढे रल्वे जावी म्हणू पण इरकॉनचे (भारतीय रेल्वेची बांधकाम कंपनी) जोरदार प्रयत्न चालू आहेत. स्थानिकांना आनंदपण आहे आणि दुःखपण. रस्त्यामुळे होणारे फायदे तर दिसत आहेत पण त्याचबरोबर त्यांचे वेगळेपण आणि एकाकीपणा संपुष्टात येणार कि काय याची भीती पण बोलण्यात जाणवली.

श्रीनगरला दक्षिणेकडून एन्ट्री मारताना पहिल्यांदा येतो तो ‘बदामी बाग’ एरिया. इथे पण फक्त आर्मीच. श्रीनगरची सारी छावणी इथे आहे. बाजूला बसलेला मुलगा भारताविरुद्ध बोलून बोलून जरा थकला म्हणून कि काय आम्हाला थोडे बरे वाटावे याकरता तो ‘ऑपरेशन सद्भावना’ विषयी बरे बोलायला लागला. आर्मीने म्हणे काही शाळा बांधल्या, पूल बांधले, इस्पितळे उभारली वगैरे. श्रीनगरला एक किडनीसाठी वेगळे इस्पितळ आर्मीने उभारलेले दिसले. एक लहान मुलांची शाळा रस्त्यात होती. दहशतवादी हल्ल्यात आई-वडील गमावलेल्या मुलांसाठी. आर्मीचीच होती. पण त्याच्याही बाहेर भले मोठे तारेचे कुंपण. उंच भिंती. गेटपाशी एक बंकर. एके-४७ घेतलेला एक जवान. ही लहान मुले शिकायला रोज इथे येतात?

पहिल्या रात्री मुक्काम केला तो लाल चौकात. जर धाकधूकच. सगळ्यात कुप्रसिद्ध भाग कुठला असेल श्रीनगरमधला तर लाल चौक. इथेच हल्ले होतात, बॉम्ब फुटतात. इथे म्हणे तिरंगा फडकावून देत नाहीत. चौकात २ आर्मर्ड व्हेहिकल्स, ५-६ जवान आणि एक तारेचे वेटोळे कुंपण. पण त्याची कुणी फारशी फिकीर करत नव्हते. रोजचाच नजारा असावा. रात्र गेली आणि हॉटेल मध्ये सकाळी सकाळी दोन जवान घुसले. खतावण्या तपासल्या आणि परतले. हे पण रोजचेच असावे.

DSC03814

वेगवेगळ्या सेनांनी भाग आणि कामे वाटून घेतले आहेत. भारतीय सेना काय कायम सीमेवर नसते. गरज पडेल तेव्हा अन तसे ते छावणीबाहेर पडतात. अशा अनेक छावण्या खोऱ्यात आहेत. बदामी बाग हा तसाच एक भाग. पाकिस्तान सीमा सांभाळायला बीएसएफ तर चीन सीमेवरती आयटीबीपी. काही काही ठिकाणी मात्र लष्कर आहे. स्थानिक रखवालदारी, लहानसहान कामे, बंदोबस्त ड्यूटी वगैरे राज्य सरकारचे पोलिस. सिव्हिल भागात बहुतांश ठिकाणी सीआरपीएफ. त्यांचे मुख्य काम रस्त्यांची व इतर क्रिटीकल इन्फ्राची सुरक्षा. त्यासाठी गस्ती घालणे, सर्च ऑपरेशन्स, बंकर्समध्ये राहणे वगैरे काम करतात. आणि जनसामान्यांना सांगायला पण तेवढेच बरे – आम्ही इथे सेनेला पाचारण नाही केले हो, सीआरपीएफ ही तर रिझर्व्ह पोलिस फोर्स आहे लष्कर नाही. श्रीनगरच्या पूर्वेच्या काही भागात मात्र बीएसएफ आहे. तिथे म्हणे सगळे हाय प्रोफाईल लोक राहतात. राजभवन पण तिथेच आहे, दलच्या पूर्वेकडे. त्याचीही सुरक्षा बीएसएफ-कडेच. मुलकी भागात अजून एक म्हणजे भारतीय लष्कराची ‘राष्ट्रीय रायफल्स.’ भारतीय लष्कराचे मुख्य ट्रेनिंग हे सीमेवरचे आणि आक्रमण-सरंक्षणाचे. त्यांना मुलकी भागात जाऊन दहशतवादी पकडायचे प्रशिक्षण नव्हते, ना तशी काही योजना होती. त्यासाठी आपण बांधली ‘राष्ट्रीय रायफल्स.’ हे लोक सर्च-एंड-सीझर, टीप मिळाली कि पाळत ठेवून हल्ला करणे, माग काढणे वगैरे करतात. ही ‘राष्ट्रीय रायफल्स’ कशी सुरु झाली त्याचा किस्सा पण मोठा रंजक आहे.

क्रमशः

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s