कश्मीरनामा – ३

मुघलांमध्ये अकबर आधी झाला आणि औरंगझेब नंतर. कश्मीरवाल्यांचे उलटे. त्यांचा औरंगझेब आधी झाला तर अकबर नंतर. त्यांचा औरंगझेब हा ‘सिकंदर बुतशिकन’ तर अकबर होता ‘झैन-उल-अबिदीन.’

हा सिकंदर बुतशिकन महाक्रूर आणि महाभयंकर. त्याच्याच काळात आपल्या शाह-इ-हमदानचा मुलगा बापाच्या पावलावर पाउल टाकून कश्मीरला आला. याचे नाव मीर मुहम्मद हमदानी. याने बापाचे सगळे वाईट गुणच तेवढे उचलले. सुरुवातीला सिकंदर राजा म्हणे जर बरा होता पण मीर मुहम्मदाच्या प्रभावामुळे पालटला. पूर्णपणे सनातनी झाला. दारू-बंदी, नाचगाणे-बंदी, जुगार-बंदी वगैरे जारी केले. मुस्लीमेतरांवर जिझिया खोऱ्यात सर्वप्रथम यानेच लावला. हिंदूंना म्हणे भाळावर गंध लावायला बंदी. मूर्ती फोडणे याचा छंद म्हणूनच नाव पण बुतशिकन (मूर्तिभंजक). पण हा राजा जेवढा धर्मांध तितकाच कर्तृत्ववान. याच्या काळात तैमुरने भारतावर स्वारी केली. त्याच्या कत्तली तर सर्वश्रुत आहेतच. त्यापासून कश्मीर वाचवण्यासाठी सिकांदराने हरतर्हेचे प्रयत्न केले, शिकस्त केली, प्रसंगी नाक रगडले पण तैमुरची मेहेरनजर प्राप्त केली. लढाई न करता काश्मीर वाचवले. भयंकर कत्तल वाचली.

हे सगळे राजकारणात चालू असताना कश्मीरी ‘ऋषी परंपरे’चा उदय होत होता. हे ऋषी म्हणजे काय आपले भगवी वस्त्र परिधान केलेले ऋषी नव्हेत. हे होते सुफी गुरु. उलट ब्राह्मणांवर रागच. पण संस्कृत भाषा अजूनही थोड्याफार प्रमाणात कश्मीरमध्ये तग धरून होती. त्याचा परिणाम म्हणून काय की त्या काळात अनेक गीर्वाणशब्द मुसलमान रोजमऱ्याच्या जिंदगीत वापरत असत. एका ठिकाणी असेही वाचले आहे की मुसलमानांच्या कबरींवर संस्कृतात कोरलेले लेखही सापडले आहेत म्हणून…

याच काळात (चौदाव्या शतकात) एक लल्लेश्वरी नावाची बाई तिथे होऊन गेली. कश्मिरी शैव आणि गूढवादी (Mystic). तशाच कविता पण करायची. त्या कविता सांगायची पण एक पद्धत होती – वाचन-सदृश. त्यावरून त्यांना आज ‘वाख’ म्हणतात. तिच्या कविता म्हणजे कोशूरमधले सर्वात जुने महत्वाचे साहित्य होत. तिचा परिणाम तिच्यानंतर आलेल्या नुरुद्दीन शेख वर झाला. हा शेख म्हणजेच फ़ेमस ‘नंद ऋषी’. पहिला महत्वाचा ओरिजिनल कश्मिरी सुफी. त्यानंतर अशांची मोठी मांदियाळीच सुरु झाली. आपल्याकडे जसे गुरु-शिष्य असते तसे यांच्यात पीर-मुरीद असते. हा नुरुद्दीन शेख हि लहानपणी शाह-इ-हमदानला एकदा भेटला होता म्हणतात. हे सुफी लोक जबरदस्त भटके. भजन-धूप करत फिरायाचे (समा). ‘वाख’ म्हणत म्हणत. योगासने करण्यात तर म्हणे नागा साधुंसारखेच पटाईत. शारीरक श्रमाची प्रतिष्ठा यांना प्रिय आणि म्हणून नुसते बसून पूजा-अर्चा करणाऱ्या ब्राह्मणांचा म्हणे यांना राग यायचा. सिकंदर बुतशिकन जो होता त्याच्या काळातच हे सुफी लोक पण सर्वत्र पसरले.

आणि मग आला कश्मीरचा अकबर – ‘झैन-उल-अबिदीन’, कश्मीरचा आजवरचा सर्वात महान राजा. सध्या आपल्या इतिहासकारांची आवडती गोष्ट म्हणजे धर्म-राजकारण वेगवेगळा ठेवायचा हे याने केले. म्हणजे स्वतः धर्माधिष्ठित तर होताच पण तरीही अल्लामा इक़्बालला याने खोटे ठरवले. एका ठिकाणी इक़्बाल म्हणतो –

जलाल-ए-पादशाही हो या जम्बुरी-तमाशा हो
जुदा हो दीन सियासतसे तो रह जाती ही चंगेझी
(राजसत्तेचा प्रताप असो वा लोकशाहीचा खेळ, राजकारणापासून धर्म विलग केला तर उरते ते फक्त अमानुष क्रौर्य)

पण अबिदीनने धर्म आणि राजकारण यांना व्यवस्थित विलग करून आपले राज्य सर्वधर्मियांसाठी न्याय्य कसे राहील याची काळजी घेतली. सिकंदर बुतशिकनने लागू केलेला जिझिया रद्द केला. मुस्लीमेतर गुणीजनांना योग्य त्या जागेवर कामास ठेवले. याने तिथली प्रशासकीय व्यवस्था पण सुधारायचा प्रयत्न केला. गुन्हेगारी कमी करवली, PWD कडून चांगली कामे करवून घेतली. याने म्हणे सामान्य माणसाला Inflation चा चटका लागू नये म्हणून वस्तूंच्या किमती राजदरबारीच ठरवून टाकल्या. गावोगावी म्हणे तांब्याच्या पट्ट्यांवर वस्तूंच्या सरकारमान्य किमती लिहिल्या असत. त्यापेक्षा कमी-जास्त भाव केल्यास शिक्षा होई. असाच काहीसा प्रकार अल्लादीन खिलजीनेपण करून पहिला होता दिल्लीला जो कि सपशेल फसला होता. इथे काय झाले माहित नाही. पण आज जे पंडितांचे झाले ते तेव्हा पण थोड्या अंशी झाले होते. म्हणतात ना ‘History does not repeat itself, but it does rhyme’ तसाच काहीसा प्रकार. या सिकंदर बुतशिकनच्या जुलुमाला वैतागून तेव्हाही हिंदू खोरे सोडून पळून गेले होते. मात्र या अबिदीनच्या उदार धोरणाने त्यातले काही हळू हळू परत येऊ लागले.

अबिदीनला ज्ञानाची आणि व्यासंगी लोकांची भारी आवड. संस्कृत मधले अनेक ग्रंथ फारसी मध्ये अनुवादित करवून घेतली. याच पार्श्वभूमीवर याच्या पाचशे वर्ष आधी अल-बिरूनी काय म्हणाला होता ठावूक आहे? हा बिरूनी जो आहे गझनीच्या काळात अफगाणिस्तानमध्ये आला होता. तिथे काही ब्राह्मणांना भेटला, चर्चा करायचा आणि त्यांच्याकडचे काही जाणून घ्यायचा प्रयत्न केला. आणि मग याने पुस्तकात नोंद करून ठेवली आहे – “हे ब्राह्मण आपल्याच कोशात मश्गुल आहेत. यांना वाटते सगळे ज्ञान ते काय यांच्याकडेच आणि बाकी जगाकडे जाणून घ्यावं असे काहीच नाही. न स्वतः काही बाहेरून शिकतात न इतरांना काही शिकवतात. पण जग भरपूर पुढे गेले आहे. इराणी, तुरानी, यावनी, अरबी ज्ञान झपाट्याने प्रगती करत आहे आणि याचा यांना माहीच मागमूस नाही. लवकरच यांच्या देशाची दुरवस्था होणार आहे.”

हा काळ म्हणजे इस्लाम जगभर पसरायच्या जोरात होता. इराण तोवर इस्लामसमोर पडला होता आणि मध्य आशिया आणि भारत दोन्हीच्या दारावर इस्लाम दत्त म्हणून उभा होता. अल-बिरूनी गझनीमध्ये मुक्कामाला होता तेव्हा भारतीयांना भेटला. संस्कृतपण शिकला. भारताबद्दल याने एक पुस्तक पण लिहिले आहे ‘किताब-उल-हिंद’ म्हणून. मुसलमानांना भारतीय भूमीची ओळख करून द्यावी म्हणून. ज्या प्रदेशचे तेव्हा त्यांना सुबत्तेमुळे इतके आकर्षण होते तो प्रदेश नेमका कसा आहे, तिथले लोक कसे आहेत, काय खातात, कसे कपडे घालतात, काय बोलतात, त्यांचे शिक्षण कसे असते, तिथे शेती कशी होते, तिथले इतर व्यवसाय काय आहेत वगैरे वगैरे. तेव्हाची पुस्तके काय सामान्यजन सहसा वाचत नसत. वेळ नव्हता, पैसे नव्हते, शिक्षण नव्हते आणि छपाई यंत्र पण नव्हते आणि तशी पद्धत पण नव्हती. त्यामुळे अशा प्रकारची पुस्तके हि राजवंशातील लोक आणि त्यांच्या सरदार दरकदारांसाठी लिहिली असणे साहजिक. त्या लोकांना आधीच भारताच्या भूमीचे सोन्याची भूमी म्हणून आकर्षण. त्यात त्यांची तृष्णा अशाने अजून प्रदीप्त झाली नसेल तरच नवल. असो. अशा पुस्तकांचे विषय – प्रवासवर्णन, शास्त्रीय ज्ञान, नीतिमत्ता, राजकारण, धर्मकारण, जगभराचा भूगोल, वनस्पतीशास्त्र, औषधशास्त्र… काय काय असत. मिळेल तिथून ज्ञान वेचत सुटले होते हे लोक तेव्हा. आणि याच्या पाचशे वर्षानंतरदेखील अबिदिनाच्या हे लोक शिकतच होते आणि भारताकडे यांना देण्यासारखे शिल्लक होते. अबिदीनने अनेक संस्कृत ग्रंथांचा अनुवाद फारसीमध्ये करवून घेतला. त्यासाठी भाषांतराचे एक वेगळे डिपार्टमेंटच बनवले जिथे संस्कृत आणि फारसीच्या जाणकारांना पगारावर ठेवले. अबिदिनाच्या दरबारातील कोणी भट्टावतार म्हणून एका पंडिताने ‘जैनविलास’ नामक ग्रंथ लिहिला आहे ज्यात फिरदौसीच्या शाह-नाम्याची वारेमाप स्तुती केली आहे. यातच त्याने अबिदिनाच्या मुखातील काही वाक्यांना पण लिहून ठेवले आहे. श्रीवराने जामीच्या ‘युसुफ-उ-जुलैखा’चा अनुवाद ‘कथा-कौतुक’ या नावाने केला. आज जे लोक कश्मिरियत-कश्मिरियत म्हणून बेंबीच्या देठापासून ओरडत असतात त्याचा उदय हा असा झाला.

जाता जाता एक गम्मत. मुसलमान येण्याआधी तिथे ब्राह्मण सर्व एकत्र होते. मुसलमान आल्यावर त्यांच्यात दोन तट पडले – एक फारसी जाणणारे-वापरणारे पंडित आणि दुसरा गट संस्कृतवाल्यांचा. या जणू दोन ऋग्वेदी-यजुर्वेदी शाखाच झाल्या जणू. एकमेकांत लग्न अजिबात लावेनात, बोलणे तर दूरच राहो.

शिक्षणाच्या प्रसाराकरताही अबिदिनने कष्ट घेतले. ही शिक्षणाची केंद्रे जी असत ती साधारणतः सुफी पंथांच्या धार्मिक संस्थांशी संलग्न असत. एक सर्वात गाजलेले म्हणजे इस्मैल कुब्रावईचे विद्यालय. इथे शिकायला विद्यार्थी भारत, इराणच नव्हे तर अमू-दर्या – सीर-दर्या नद्यांच्या मधला जो प्रांत आहे तिथून पण येत असत आज जिथे तुर्कमेनिस्तान-उझबेकिस्तान आहे तिथले. त्याने विविध कलांना पण उत्तेजन दिले. त्यासाठी पुन्हा मध्य-आशियातून अनेक कारागीर बोलावले लोकल लोकांना शिकवायला. पेपर-माष, सिल्क, शाल, कार्पेट, लाकूड-काम ज्या ज्या कला शाह-इ-हमदानने आणल्या होत्या त्याचाच वारसा अबिदिनने पुढे चालवला. कश्मीरमध्ये निसर्गाची मुक्तहस्ते उधळण तर परवरदिगारने केलीच आहे पण त्याचा झैन-उल-अबिदीनने ‘कोकण’ होणार नाही याची काळजी घेतली. कोकणाला निसर्गाबरोबरच फार काळ गरिबीचा शाप. अबिदीनच्या काळात मात्र कश्मीरची स्पर्धा समरकंद आणि बुखाराच्या ऐश्वर्याशी होऊ लागली.

Muslim Making Cashmere Shawl (Wikipedia)

असा हा झैन-उल-अबिदीन. याला बुद-शाह देखील म्हणतात. श्रीनगरला जे विश्वविद्यालय त्याच्या एका दरवाजाचे नाव ‘बुद-शाह प्रवेशद्वार’ असे ठेवले आहे. शाह-इ-हमदान च्या खानक़्याजवळ याचा मकबरा आहे. त्याला लोक तिथे अजूनही दानधर्मशील म्हणून गौरवतात असे ऐकले-वाचले होते. जेव्हा गेलो तेव्हा तीन-चार लोकांना विचारले. कोणाला त्याचे नाव माहित नव्हते. ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘सर्वसमावेशक’ वृत्ती असलेल्या राजांना गेल्या शंभर वर्षात आपण इतिहासात महत्वाचे स्थान दिले आहे – कारण या मुल्यांची सध्या भारतात असलेली कमतरता भरून काढावी असे इतिहासकारांना किंवा त्यांचे पुस्तक छापणाऱ्या-विकत घेणाऱ्यांना वाटत असावे. सम्राट अशोक, अकबर महान यासारखे राजे आपण गौरवतो याचे हे (अनेक कारणांपैकी) एक छोटे कारण. तिकडली शाळेतली इतिहासाची पुस्तके पाहण्यात नाही आली पण त्यात त्याचे नाव नक्की दिले असणार.

हा शेवटचा महान मीर राजा. या मीरांच्या काळात कश्मीरचा पार चेहरामोहराच बदलून गेला. संस्कृती, भाषा, कला, धर्म, राजसत्ता सगळ्यांनी नवे रूप धारण केले. कश्मीर जरी हिमालयात बंदिस्त खोरे असले तरी या कधी बाहेरच्यांना आत यायला फारसा मज्जाव केल्याचे ऐकिवात नाही. पिढ्यानपिढ्या इराणी, तुरानी कलाकार-शिक्षक-धर्मप्रसारकांच्या लाटा याच काळात येत राहिल्या. त्यांनी शेकडो मदरसे स्थापन केले. फारसी राजभाषा झाली. लोकांचे खाणे बदलले. हळूहळू सर्व लोक मुसलमानी पेहेराव करू लागले. जोनराज म्हणतो ‘जसे वाऱ्याने झाड उन्मळून पडते आणि टोळधाडीने पिकाचे नुकसान होते तत्सम यवनांनी कश्मीरचा विनाश केला.’ श्रीवरसुद्धा असेच थोडेसे दोष-विवेचन करायचा प्रयत्न करतो. पण अशा मोजक्या लोकांचा निषेध ‘काळाच्या कराल दाढे’ समोर हवेत विरून गेला.

यानंतर लवकरच मुघलांनी कश्मीर जिंकून घेतले आणि त्याचे पुन्हा भारताच्या मुख्य राजकीय प्रवाहाशी नाते जोडले गेले. त्यांनीच मग तिथे जाऊन कविता केली –
गर फिरदौस बर-रु-ए-जमीं अस्त,
हमी अस्तो हमी अस्तो हमी अस्त.

क्रमशः
(आतापर्यंत कश्मीरमध्ये इस्लाम कसा आला आणि दृढमूल झाला याचे वरवर विवेचन केले. पुढच्या भागात कश्मीरमधील भारतीय सेनेवर.)

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s