कश्मीरनामा – २

शाह-इ-हमदानचे स्थान कश्मीरच्या इतिहासात फारच महत्वाचे. हा अनेक वेळा कश्मीर येउन गेला. कधी सहा महिने तर कधी एक वर्ष मुक्काम केला. पहिल्यांदा आला याला कारण तैमुर लंग तेव्हा सत्तेवर आला होता त्याच्याकडून यांच्या जीवाला धोका. ७०० अनुयायांना बरोबर घेऊन कश्मीर गाठले. या अनुयायांमध्ये अनेक तऱ्हेचे लोक होते, अनेक कलाकार होते. त्यांनी इथे ज्या कला आणल्या त्यात मग शाल बनवणे, कार्पेट बनवणे, पेपर माष, तांब्याच्या भांड्यांवरचे नक्षीकाम, इराणी बेकरीपदार्थ, इराणी कपडे घालायची पद्धत, इराणी calligraphy आणि काय काय. याने इथल्या लोकांना बरेच शिकायला मिळाले, नवे धंदे प्रस्थापित झाले. आजमितीला म्हणे खोऱ्यात पन्नास हजारावर तांब्याच्या भांड्यावर नक्षीकाम करणारे कारागीर आहेत. पेपर माष म्हणजे कागदाचा लगदा कापडाच्या आधाराने आकारात मोल्ड करून स्वतंत्र पुतळे वगैरे किंवा भिंतीवर नक्षी बनवायला वापरणे. शाह-इ-हमदान च्या खानक्याचा अनेक भिंतींवर याचा सुंदर वापर केला आहे. या सगळ्या बरोबरच आले ते मध्य आशियाई वास्तुशास्त्र आणि लाकूड काम ज्यासाठी कश्मीर सुप्रसिद्ध आहे त्याची सुरुवात इथेच झाली म्हणतात. हे लाकूड काम जे आहे ते घराच्या छपरावर, हाउसबोट, मशिदीपासून ते छोटे डबे, लाकडाच्या काठ्या, शोभेच्या वस्तू अनंत ठिकाणी वापरतात. यात वूड-कार्विंग पण आहे आणि वूड-वर्क पण.

Kashmiri Wood Carving

यामुळे झाले एक – कश्मीर सांस्कृतिकरीत्या मध्य आशियाच्या फार जवळ गेला, खास करून इराणच्या. तसे पाहता इराणचा कश्मीरवर प्रभाव त्याहीपेक्षा आधीपासून आहे. हेलेनिस्टीक काल असो कुशाण, कश्मीर कधीच पूर्ण वेगळा नव्हता. आणि आताही मुस्लिम झालेल्या इराणशी पुनः जवळीक साधली गेली. फरक मात्र इतकाच की आजही हा प्रभाव जाणवतो. गेलो त्याच दिवशी तिथल्या एका पेपरात आलेली बातमी मासला म्हणून बघा. अशा प्रकारची एक तरी बातमी रोज वाचत होतो.

WP_20130603_084

तसेच पहिल्याच दिवशी संध्याकाळी श्रीनगरच्या रस्त्यांवर फिरताना काही लोक हे पोस्टर लावत होते. पुढच्या तीन दिवसात असे पोस्टर्स जागोजागी उभारलेले दिसले –

DSC03808

जम्मू ते श्रीनगर प्रवास सुमोमध्ये बसून केला. सोबतीला सगळे कश्मिरी. गप्पा मारता मारता ड्रायवर म्हणाला कि, “इथले चिनार बघा – काय सुंदर आहेत. आहे का तुमच्या भारतात असे सौंदर्य अजून कुठे? ते जगात फक्त कश्मीर आणि इराण मध्ये सापडतात. अस्सल इराणी सौंदर्य आहे ते. आणि इथली कपडे घालायची पद्धत. आमच्या मुली हिजाब (बुरखा) नाही घालत तर चादोर घालतात. एकदम इराणी बायकाच जणू.” आणि अजून काय काय म्हणत होत. यातले तथ्य सोडून द्या. पण त्या लोकांना इराणचे आकर्षण अजूनही भलतेच आहे. हे जे कनेक्शन आहे त्याची सुरुवात शाह-इ-हमदानच्या काळात झाली. आजही इराण मध्ये हमदान नावाचा प्रांत आहे ज्याचे राजधानीचे शहर हमदान म्हणूनच आहे. इराण मधून अनेक लोक पिढ्यान पिढ्या शतकानुशतके इथे येत होते, व्यापारी, शिक्षक, फकीर, मजूर, व्यासंगी… आज त्यांचे वंशज तिथे मोठ्या प्रमाणात आहेत. एथ्निकलि आणि कल्चरलि मध्य आशियाचे छोटे प्रतिबिंबच म्हणा ना. कश्मिरी भाषाच बघा. जसजशी मुस्लिम लोकसंख्या वाढत गेली तसे हळूहळू संस्कृत मागे पडली. मग फारसी तिथली राजभाषा झाला. कधीकाळच्या काश्मिरी शैव तांत्रिक लोकांनी संस्कृतमध्ये प्रचंड कार्य करून ठेवले आहे. कल्हण, बिल्हण, अभिनवगुप्त, जयरथ… खूप मोठी यादी आहे. पण कालचक्र सदैव चालू असते. आधी तिथल्या अ-मुस्लिमांनी विरोध करून पहिला पण हळूहळू फरसी शिकायचे फायदे लक्षात आल्यावर त्यांनी पण जोमाने शिकून अनेक सरकारी जागा पटकावल्या. आज जी कश्मिरी भाषा आहे (कोशूर) ती नस्तलिक़मध्ये लिहितात. ती जरी इंडो-आर्यन असली तरी दार्डीक सब्ग्रूपमध्ये येते जिच्यावर फारसीचे खूप संस्कार आहेत. या सब्ग्रूप मधल्या इतर भाषा पाकिस्तान-अफगाणिस्तानात बोलल्या जातात. आजही तिथे भारत-पाकिस्तान मध्ये कश्मीर मुद्द्यावर चर्चा करायला तटस्थ मध्यस्थ म्हणून इराणला घ्यावे हि मागणी सारखी होता असते. त्यावरही २-३ बातम्या वाचनात आल्या. (शिमला करारात भारत-पाकिस्तानने कोणतीही तृतीय व्यक्ती/देश यांना मध्यस्थ कधीही मान्य न करायचा निर्णय घेतला आहे)

तर सांगायचे असे कि शाह-इ-हमदान च्या नंतर लवकरच कश्मीर हा मिनी-इराण म्हणून ओळखला जाऊ लागला. (आपल्याकडे उत्तर प्रदेश मधल्या जौनपुरला देखील कधीकाळी पूर्वेकडचे शिराज़ म्हणायचे). कश्मीरच्या कारागिरांची भरभराट झाली. त्याने जे इराणी वास्तुशास्त्र आणले ते अजूनही तिथे पाहायला मिळते. त्याचा खानक़ा म्हणजे त्याचे मूर्तिमंत स्वरूप. अतिशय सुंदर आणि सुबक. तिथे गेल्यावर दारावरच एक म्हातारा बसला होता. त्याने आस्थेने विचारपूस केली. शाह-इ-हमदान कोण होता वगैरे माहिती देणारे पत्रक दिले. मी मुस्लिम नसूनही उंबरठ्याच्या आत नजर टाकायला आणि फोटो काढायला परवनागी दिली. झेलमच्या किनाऱ्यावर वसलेल्या या खानक्याला खानक़ा-इ-मौला पण म्हणतात.

DSC03662

असे अनेक खानक़े त्याने जागोजागी स्थापन केले. इथे नमाज तर पडतात पण हे खानक़े म्हणजे मस्जिद नव्हे. खास सुफी लोकांच्या ‘तरिक़ा’ करता बांधलेल्या इमारती होत. तसेच सुफी फिरस्ते आणि यात्रेकरूंच्या धर्मशाळा म्हणूनपण यांचा वापर होत असे. भारतीय उपखंडाबाहेर दर्गा हि संकल्पना फारशी आढळत नाही पण खानक़े मात्र सर्वत्र पसरलेले आहेत. अगदी मोरोक्कोपासून इंडोनेशियापर्यंत. पण शेवटी खानक़ा म्हटला कि ती मध्य आशियायी खासियत, अरबी नव्हे.

या शाह-इ-हमदानचे हिंदूंविषयी असणारे विचार यावर जरा वादविवाद आहे. त्याने स्वतः एक पुस्तक लिहिले आहे ‘झकिरत-उल-मुल्क’ म्हणून. यात तो स्वतः म्हणतो कि त्याने खोरे सोडून जायच्या आधी हिंदूंविषयी काय धोरण आखावे याबद्दल मीरला काही सल्ले दिले होते. त्यात अनेक कडक बंधने घालण्याविषयी तो आग्रह धरतो. नवी मंदिरे न बांधून देणे, जुन्यांची डागडुजी न करून देणे, मुसलमानासारखे कपडे न घालणे, घोड्यावर न बसणे, मुस्लिम गुलाम विकत न घेणे, कोणी मेल्यावर मोठ्याने शोक न करणे, मुसालमानाजवळ घर न बांधणे, हत्यारे न बाळगणे आणि अशीच काही. आणि जर यांचे पालन नाही केले तर त्या हिंदूचे घर लुटावे आणि त्याला गुलाम करण्यात यावे असा फतवा काढावा असेही तो म्हणतो. मात्र कश्मिरी लोकांनी याने जे काही सांगितले ते सर्व बाबा वाक्यं प्रमाणम सारखे ऐकले असे नव्हे. त्यानंतर लवकरच तिथे ऋषी परंपरेचा उदय झाला, झैन-उल-अबिदीन सारखा जाणता राजा होऊन गेला.

अल्लामा इक़्बालचे गाजेलेले फारसी पुस्तक आहे ‘जावेदनामा’ म्हणून. यात त्याने शाह-इ-हमदान वर एक कविता लिहिली आहे. दर हुजूर-ए-शाह-इ-हमदान (शाह-इ-हमदानच्या सान्निध्यात). इच्छुकांनी जरूर वाचावी.

क्रमशः

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s