कश्मीरनामा – १

हमी अस्तो, हमी अस्तो, हमी अस्त… इथेच आहे इथेच आहे इथेच आहे. पण काय? स्वर्ग? कोणता स्वर्ग? कोणाचा स्वर्ग? मुळात स्वर्ग म्हणजे काय? स्वर्ग ही तर एक धार्मिक कल्पना आहे. इस्लाम मध्ये ‘फिरदौस’ला जन्नत असेही म्हटले आहे. जन्नत म्हणजे अरेबिकमध्ये ‘उद्यान’ सुद्धा होते. कश्मीर एक बाग नक्कीच आहे. पण स्वर्गात अजून काय काय असते? तिथे अप्सरा असतात. कश्मीरमध्ये त्या आहेत. तिथे दुध आणि मधाच्या नद्या बारमाही वाहत असतील. कश्मीर मध्ये शुभ्र पांढरे पाणी असलेल्या नद्या वर्षभर खळखळत असतात. तिथे उत्कृष्ट आणि चविष्ट फळफळावळ असेल. कश्मीरमध्ये तीही आहे. हवामान चांगले आहे. सुन्नी कायदेपंडित इब्न-अल-कय्यिम म्हणतो कि जर जमीन आणि माती मागाल तर स्वर्गात तुम्हाला कस्तुरी आणि केशर मिळेल. कश्मीर मध्ये तेही आहे. झाडे म्हणाल तर ती सोन्याची – कश्मीर मध्ये शिशिराच्या सुरुवातीला चिनार ची पानगळती सोनेरीच असते. तलम कपडे म्हणाल तर पश्मीना आणि शाह-तूस आहे. तिथले पेय (कावा) सुद्धा स्वर्गीय असेच आहे.

मात्र ही तुलना इथेच थांबते. अजून? जन्नत’लाच अजून एक नाव आहे – दर-अल-सलाम – शांततेचे निवास. इथे मात्र ग्रेनेडस, AK-47, दहशतवादी, लष्कर, बंकर्स, तारेची जागोजागी कुंपणे… इस्लामी स्वर्गात माणसाचे आयु चिरंतन ३३ वर्षे राहील. पण इथे माणसे सतत मरणाच्या सावटाखाली फिरत आहेत कि काय असे वाटते. चेहेऱ्यावर विचित्र भाव घेऊन वावरतात कि काय असे वाटते. त्या अर्थाने हा फिरदौस नक्कीच नाही. बरोब्बर विरुद्ध.

Shah-i-Hamdan

मागच्या आठवड्यात ३-४ दिवस खोऱ्यात फिरून आलो. कोणत्याही टुरिस्ट कंपनी, मित्रांचा मोठा घोळका अथवा कुटुंबाबरोबर न गेल्यामुळे स्वच्छंद फिरायची संधी हमखास. लोकल ट्रान्स्पोर्टने प्रवास केला, कुठे धर्मशाळेत उतरलो, बाजारात हुंदडलो, अशा अनेक जागा पहिल्या जिथे प्रवासी सहसा जात नाहीत, अनेक स्थानिकांशी चिक्कार बोललो. तेव्हा आलेले काही अनुभव कथन करायचा हा प्रयत्न. या मागे कोणताही हेतू नाही, विचारसरणी नाही. अस्वस्थता म्हणाल तर नक्कीच आहे. मात्र जे आहे ते जसे ऐकले-पहिले तसे, मनाचे काकणभरसुद्धा नाही. तसे पाहता ३-४ दिवस म्हणजे काही मत बनवण्यायोग्य कालावधी नाही. भेटून भेटून किती लोकांना भेटणार? तर १०-१५. बघून बघून किती जागा बघणार? तर ७-८. त्यामुळे हे चित्र काही सर्व-सामावेशक आणि रिप्रेझेन्टेटीव आहे असा दावा नक्कीच नाही. पण आखो-देखा हाल हा असा. (मागे-पुढे जरा इतिहास जोडून)

श्रीनगरला गेल्यावर तीन गोष्टी पहायच्या नक्की ठरवले होते. शाह-इ-हमदान चा खानका, औरंग्झेबानी बांधलेली जामिया मस्जिद आणि हजरतबल मस्जिद. या तीनही गोष्टी साधारणतः टिपिकल टुरिस्ट पाहत नसावेत असे वाटले. सुरुवात शाह-इ-हमदान ने करतो.

इस्लाममधला भक्तिमार्ग म्हणजे ‘सुफी’. सुफी विचारसरणीत अनेक सिलसिले (orders) आहेत. भारतातला ‘चिश्ती सिलसिला’ तर अजमेर शरीफ आणि दिल्लीच्या निझामुद्दीनमुळे आजही फ़ेमस आहे. असे जे एकूण बारा सिलसिले आहेत त्यातला एक म्हणजे कुब्रविया. याची स्थापना उझबेकिस्तानमध्ये आठेकशे वर्षांपूर्वी झाली. त्याचा संस्थापक जो निझामुद्दीन कुब्रा होता त्याची मंगोलांनी बुखारा शहर घेतल्यावर हत्या केली. याच्या पंथाचा एक मार्गस्थ म्हणजे हमदानी. तैमुर लंगचे राज्य आल्यावर जीव वाचवून हा काही अनुयायांसमवेत तिथून पळून कश्मीरला आला. तव्हा भारतात राज्य होते फिरोझशाह तुघलकचे. जेव्हा हा कश्मीरला आला तेव्हा त्याने काय पाहिलं?

कश्मीरमध्ये पूर्वीच इस्लामी राज्य स्थापन झाले होते. शेवटचा लोहार राजा पळून गेला तेव्हा त्याचा कोणी एक रीन्चन म्हणून बौद्ध आश्रित होता. त्याने कपटाने राज्य ताब्यात घेतले. बाहेरून इस्लामी सेनेचे हल्ले तर शतकापेक्षा जास्त काळापासून होतच होते. त्यात लोहार राजे शेवटी नालायक निघाले. रीन्चनने ताब्यात घेतल्यावर काही कारणाने इस्लाममध्ये धर्मांतर केले. त्याने इस्लामच का स्वीकारला यावर अनेक मत-प्रवाह आहेत. मात्र हि गोष्ट कश्मीरच्या लोककथांमध्ये फार फ़ेमस आहेत असे म्हणतात. कोणी म्हणे कि त्याला हिंदू धर्मात प्रवेश नाकारला गेला. कोणी म्हणे सुहरावर्दी सिलसिल्यातला एका पीरच्या प्रभावाखाली येउन धर्मांतर केले. कोणी म्हणे कि त्याचा जो वजीर होता ‘शाह मीर’ त्याचा प्रभाव यास कारणीभूत ठरला. जोनराज म्हणून कल्हणानंतरचा कश्मिरी इतिहासकार आहे त्याने याबद्दल त्याच्या ‘द्वितीय राजतरंगिणी’ मध्ये लिहून ठेवलय. असाही एक मत-प्रवाह आहे कि हा जो बौद्ध रीन्चन होता त्यास खोऱ्यात कोणत्या तरी एका गटाचा सपोर्ट हवा होता आणि हिंदू तो द्यायला तयार नव्हते तेव्हा त्याने थोड्याफार बऱ्या संख्येत असलेल्या असलेल्या मुसलमानांचे साहाय्य मिळवण्यासाठी धर्मांतर केले. कश्मीरच्या आसपासचे अनेक प्रदेश तेव्हा मुस्लिम बनू लागले होते. त्यांच्यापासून आक्रमणाचा धोका कमी व्हावा म्हणून खेळलेली चाल असेही कोणी म्हणते. कारण काही का असेना. इथून कश्मीरच्या इतिहासाचा नवा अध्याय सुरु होतो. लवकरच २-३ वेळा तख्त-पालट होऊन शेवटी तो ‘शाह मीर’ सत्तेवर आला आणि त्याच्या वंशजांनी पुढची सव्वादोनशे वर्षे राज्य केले. हा शाह मीर होता सय्यद. सय्यद म्हणजे पैगंबराचा वंशज.

DSC03653

त्या काळाचा मध्य आशिया कसा होते हे पाहणे रोचक ठरेल. मंगोलांचा पहिला जोर जरा ओसरला होता. अनेक मंगोल मुस्लिम धर्म स्वीकारायला लागले होते. अनेक सुफी सिलसिले ठिकठिकाणी जन्माला येत होते आणि त्यांचे गुरु जगभर प्रवास करत होते, धर्मप्रसार करत होते आणि मंगोल आक्रमणाने तहस-महस झालेल्या जगात शांतता आणायला मदत करत होते. कश्मीरमध्ये पण असेच अनेक पीर-फकीर आले. कोणी स्वतःहून तर कोणी घाबरून, कोणी हद्दपार केले म्हणून तर कोणी जीव वाचवायला पळून. कोणी तुर्कस्थानातून, कोणी इराणहून, तर कोणी उझबेकिस्तान-ताजिकिस्तानातून. सांस्कृतिक देवाणघेवाण जोरदार चालू झाली. त्यांनी तिकडच्या कला आणल्या, भाषा आणली, धर्म आणला. यातूनच हळू हळू कश्मिरियतचा उदय झाला. शाह-इ-हमदानच्या माग-पुढचे एकेक शतक याचा हीच गोष्ट सांगते.

या मीरांच्या घराण्यातला पुढचा कर्तृत्ववान राजा म्हणजे शिहाब-अल-दीन. याचे आणि दिल्लीच्या फिरोज तुघलकाचे म्हणे तुंबळ रणकंदन माजले. याने अनेक लोकोपयोगी कामे पण केली. कालवे बांधले. पुराने नुकसान होऊन नये म्हणून बंधारे बांधले. याची कोणी लक्ष्मी म्हणून एक बायको होती. तिच्या नावाने ‘लक्ष्मीनगर’ नावाचे गाव पण वसवले. मात्र हा तेवढाच क्रूर पण होता. लोकांकडून स्वतःसाठी फुकट कामे करवून घ्यायचा. हा वारला १३७३ मध्ये. त्यानंतर या शाह-इ-हमदानच्या कश्मीरवाऱ्या सुरु झाल्या.

तसे पाहायला गेले तर कश्मीरमध्ये दोन प्रतिद्वंदी इस्लामी प्रवृत्ती होत्या. एका सहिष्णू तर दुसरी आक्रमक-असहिष्णू. मीर सय्यीदांच्या काळात दोन्हीमध्ये स्पर्धा आणि झगडा चालू होता. मात्र पात्रांची आणि योजनांची अदलाबदल चालू आहे. कधी राजे सहिष्णू तर कधी पीर. कधी एकमेकात झगडा तर कधी दोस्ताना. पण सर्वसाधारणपणे तिकडची ऋषी परंपरा (हे सुफी ऋषी होत) अन मध्य-आशियातून येणारे पीर-फकीर काही मोजके अपवाद वगळता तसे सहिष्णू होते तर मीर/शाह/राजे बऱ्याचदा आक्रमक पवित्रा घ्यायचे. या मीरांच्या काळात दोन माणसे प्रचंड महत्वाची – शाह-इ-हमदान आणि शेख नुरुद्दीन (नंद ऋषी)

प्रथम या शाह-इ-हमदानचा समाचार घेऊ.

क्रमशः

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s