बोल के लब… (१)

“सध्या मराठी भाषेला मरगळ आलेली आहे. चांगले कुणी काही लिहित नाही.” “अरे नाही, नाटके आपली चालू आहेत की; अन मराठी सिनेमा?” “पण राजकारणात दमदार वक्ते नाहीत. साहित्यात जोरकस कवी नाहीत…. आजच्या जमान्यातले टिळक-कुसुमाग्रज कुठाहेत?”

या गप्पा पुण्यात शिशुमंदिरात देखील चालतात. विनोद राहू द्या. पण साहित्यात अभिजन घडतात तरी केव्हा? पर्फेक्ट रँडमनेस? यावर अनेक भल्या भल्यांनी भलेभले लिखाण केले आहे. सामाजिक अधोगती होत असतानाच, समाज रसातळाला जात असताना जसे शिवाजी किंवा शंकराचार्य होतात तसे साहित्यकार साधारणतः होत नाहीत. कालिदास गुप्त काळातच होतो. एकंदरीत सामाजिक मरगळ साहित्यात उतरते हे खरे.

जर आपण भारतीय साहित्याचा गेल्या दीड-दोन शतकांचा ग्राफ पहिला तर त्यात तीन शिखरे अगदी उठून दिसतात जेव्हा साहित्यरचना उदंड होत होती; आकाराने, विचाराने आणि प्रभावाने. एक म्हणजे सुधारकांच्या चळवळीचा काळ. यात अनेक प्रयोग झाले. नवे साहित्य आले, नवे साहित्य प्रकार आले, नवे विषय आले, नवी साधने आली. हे मराठी, बंगाली, हिंदी, तेलुगु सर्वच भाषांमध्ये चालू होते. समाजमनाचे अभिसरण का काय ते सुरु झाले. त्यात गेल्या शतकाच्या सुरुवातीस खंड पडला. दुसरा काळ गांधींचा. त्यांच्या काळात देखील अनेक प्रकारचे मंथन-बिंथन झाले. नवनवे प्रयोग झाले. आणि त्यालाच समांतर अस डाव्यांचा प्रवाह हा तिसरा. थोडासा नंतर सुरु झाला. या प्रवाहाचा प्रभाव मात्र पुढे जास्तच टिकला. १९२५-३० च्या आसपास सुरु झालेली यांची चळवळ पुढे फाळणी झाली तरी अनेक वर्षे तग धरून होती. यालाच पुढे अनेक फाटे फुटले. (डाव्यांच्या प्रत्येक गोष्टीची फाटाफूट हमखास होते, त्यामुळे त्यांच्या विरोधकांनी त्यांना भ्यायचे काहीच कारण नाही. फक्त कालाय तस्मै नमः म्हणावं झालं)

‘सामर्थ्य आहे चळवळीचे’ या समर्थांच्या उक्तीवर डाव्यांचा जबर विश्वास. प्रत्येक गोष्ट करायची ती संघटना बांधून. मग साहित्य निर्मितीमध्ये ती वृत्ती उतरली नाही तर ते डावे कसले? १९३६ साली अनेक साहित्यिकांनी एकत्र येउन एक प्रोग्रेसिव रायटर्स असोसिएशन स्थापन केले लखनौला. मुन्शी प्रेमचंद यांनी त्यात पुढाकार घेतला होता. त्यानंतर ते काहीच महिन्यात वारले पण ती चळवळ मात्र जोरदार रुजली. यात कोण नव्हते? साहीर लुधियानवी, सरदार जाफरी, अमृता प्रीतम, कैफी आझमी, सआदत हसन मंटो, भीष्म सहानी, हबीब तन्वीर, इस्मत चुगताई, जोश मलिहाबादी, जान निसार अख्तर, फ़िराक़ गोरखपुरी… गेला बाजार आपले जावेद अख्तर साहेब पण यातूनच पुढे आले. एक एक नाव म्हणजे दिग्गज आहे.

तो काळंच मोठा धामधुमीचा होता. आणि या लोकांनी त्यात आणिक भर म्हणून वैचारिक घुसळण करकरून साहित्य-विश्व मुळासकट हलवून का काय ते सोडले. त्यांना सर्व प्रांतीय भाषांनी देखील प्रतिसाद दिला. मग ते उर्दू मधले अंजुमन तरक्कीपसंद मुस्सनफिन असो कि तेलुगु मधले अभ्युदय रचयीतला संगम असो. (या लेखाचा संबंध उर्दूपुरता मर्यादित आहे)

उर्दू काव्याबाबत एक तक्रार नेहमी केली जाते. यांचे शायर कायम बेवडे असतात, प्रेमात आणि म्हणून आयुष्यात हरलेले असतात, साकीसमोर बसून दारूच्या याचनेपलीकडे यांची मजल जात नाही, धर्मगुरूंना शिव्या देण्याशिवाय यांना काही येत नाही, यांच्या शायरीचे विषय देखील किती मर्यादित असतात वगैरे वगैरे. एका अंशी ते खरेही होते. अर्थाच्या कितीही छटा काढू म्हटले तरी त्याला मर्यादा आहेच्चे. बच्चन साहेबांची मधुशाला म्हणजे खरोखरीचा दारूचा गुत्ता नाही हे सरळ आहे. पण बिचाऱ्या उर्दू कवीच्या व्याकुळ भावात फारात फार सक्तीची भक्ती दाखवता येईल, पण तेवढेच. पण म्हणून ‘शाळा’, ‘गवतफुल’, ‘आजी’, ‘पडू आजारी’, ‘दख्खनची राणी’ थोडीच त्यात दिसणार आहे?

पण या परंपरेने लादलेल्या मणामणाच्या ओझ्याला वगैरे बाजूला सारून, हे ‘प्रोग्रेसिव’ वाले बरेच काही करून गेले. त्यांनी उर्दू साहित्याचा चेहरामोहरांच बदलून टाकला. त्यांच्यात पण मर्ढेकर, विंदा, विश्राम बेडेकर, श्री. ना., श्री. दा. पानवलकर आणि नेमाडे झाले. अल्लामा इक्बालने तरक्कीपसंदच्या माध्यमातून उर्दू कवितेला नवे आयाम दिले तर सआदत हसन ने लघुकथांचे स्वरूप बदलून टाकले.

“If you are not familiar with the age in which we live, read my stories. If you cannot endure my stories, it means that this age is unbearable.” असे मंटो म्हणाला होता.

या प्रोग्रेसिववाल्यांनी शब्द-चमत्कृती बाजूला सारली. शमा-परवाना विलग झाले, कश्ती समुद्रात हेलकावे घेणे थांबली, मद्याचा  प्याला फोडला, अंजुमनमध्ये हजेरी लावणे सोडून दिले, साकी एकटी पडली, मयखाना लॉसमध्ये गेला. यांनी आभाळाच्या पल्याडचे जग नाकारले. अल-इलाहला अल-विदा केलं, बिचाऱ्या शेख-साहबशी कोणी भांडण करेना. आणि या जमिनीवरच्या या माणसाच्या या जगण्यात ज्या अडचणी येतात त्या मांडायचा प्रयत्न केला. प्रतिमांचे भव्य-दिव्यत्व अबाधित ठेवले, मात्र ते मनुष्यात्वाला उन्नतीची वाट दाखवायला, आदर्श निर्माण करायला आणि आपल्या आम आदमीच्या रोजच्या संघर्षाचे दर्शन घडवायला. अखिल-जग, मानवता-विश्वबंधुत्व, मनातील हेलकावे, घुसमट, सामाजिक आंदोलने, गरिबी-भूक, क्रूरता-युद्ध-अमानावता काय काय नि काय काय.. यांच्या पिढीने सारे याची देही याची डोळा पहिले, अनुभवले. शतकांचे अनुभव यांनी दशकात घेतले. आणि ते साहित्यात उतरले.

तरीही आशावाद होता, आदर्शवाद होता. सामाजिक एकता हे मूल्य मान्य होते. त्यासाठी क्रांतीवर अजून विश्वास होता. जगात बदल घडवता येतो हे यांनी पहिले होते. व्यक्तीच्या शक्तीवर श्रद्धा होती. शक्यता अनेक होत्या. त्यांना बळ द्यायचे काम हे आपल्या परीने करत होते. हे सर्व अनुभवतानाच्या भावनांचे अचूक चित्रण हे लोक करत होते. समाजाचा आणि व्यक्तीच्या मनाचा आरसा बनू पाहत होते.

यांच्याच पुढच्या पिढीत जन्माला तो आपला या लेखमालेचा नायक – फ़ैज अहमद फ़ैज.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s