आजच्या बातम्या..!

भाग १ –

सोव्हिएत युनिअनने अफगानिस्तानमधून माघार घेतल्यावर तिथल्या मुजाहिदीनांना वाटले की त्यांचा विजय झाला. एकच उन्माद आणि जल्लोष. रशियन तर गेले पण जिहाद असा थोडक्यात कधी संपतो का? त्यांच्याकडे शक्ती होती, हत्यारे होती, स्किल्स होती, मनुष्यबळ होते आणि आता जबरदस्त आत्मविश्वास देखील. एका जागतिक महासत्तेला हरवणे म्हणजे खायची गोष्ट नाही. पण हे लोक मग तिथेच थांबले नाहीत. ते घुसले जम्मू-कश्मीर मध्ये… जिहादचा नारा देत. त्याला पार्श्वभूमी होती ८७च्या निवडणुकीमध्ये केंद्राने केलेल्या चुकांची. आणि तिथून सुरु होतो कश्मीर मधील घुसखोरीचा आधुनिक कालखंड. त्याची परिणती कशात झाली? एक – राष्ट्रीय रायफल्स ची स्थापना. म्हणजेच सीमेव्यातिरिक्त नागरी भागात लष्कराची प्रचंड नेमणूक. आणि त्यासाठीचा अत्यावश्यक भाग म्हणजे दोन – आफ्स्पा जो की फक्त पूर्वांचलातील राज्यांसाठी होता त्याला कश्मीर मध्ये लागू करणे. तेव्हाच पंडितांनापण हुसकावून लावण्यात आले. बऱ्याच लोकांना यासीन मलिक वगैरे माणसे पण आठवत असतील.

भाग २ –

आता आपण गेल्या काही दिवसात आलेल्या दोन बातम्या पाहू –

१ ऑगस्ट – सिंकीआंग मधील मुस्लीम अलहदगीला पाकिस्तानातून होणारी मदत ताबडतोब थांबवावी – चीन

१० ऑक्टोबर – चीन पाकिस्तान रेल्वे मध्ये चीन मोठी गुंतवणूक करणार.

१२ ऑक्टोबर – पाकव्याप्त कश्मीर मधील चीनी सैनिकांची उपस्थिती चिंताजनक – भारत

भाग ३ –

मागच्या वर्षी हुंझा प्रांतात अताबादजवळ झालेल्या भूस्खलनात काराकोरम हायवे (जो इस्लामाबादला चीनशी जोडतो आणि पाकव्याप्त कश्मिरातून जातो) बंद पडला होता. साधारणतः हिमालयातले रस्ते नदीच्या किनाऱ्याने जातात. भूस्खलनामुळे नदीप्रवाह थांबला आणि प्रचंड मोठे नैसर्गिक धरण तयार झाले. आता ते फोडले तर त्याखालची गावे वाहून जातील आणि नाही फोडले तर रस्ता बंद. या विवंचनेत बरेच दिवस काढल्यावर शेवटी चीनी तंत्रज्ञांना आणि सैनिकांना पाचारण करण्यात आले. त्यांनीच तो रस्ता बांधला होता. त्यांनी त्याच्या थोडा वरून दुसरा रस्ता बांधून दिला आणि पाकिस्तान-चीन खुष्कीचा मार्ग पुन्हा सुरु झाला. या कारणामुळे चीनी सैन्य पाकव्याप्त कश्मीर मध्ये तेव्हापासून किंवा त्याच्याही पूर्वीपासून आहे. त्यात त्यांनी आता रेल्वे बांधायला घेतली आहे. त्यात नवे काय आहे? (चिंता तर पूर्वीपासूनच करतोच आहे, कारण आपल्याला तेवढेच करता येते) मग ही १२ ऑक्टोबर ची बातमी का?

भाग ४ –

आता हे तीनही भाग जोडले की लक्षात येईल.

अमेरिका हळूहळू अफगाणिस्तानातील आपले सैन्य कमी करत आहे. तिकडे पश्तून तालिबान, पाकिस्तानी तालिबान, आणि ताजिक व हाजरा लोकांची नॉर्दर्न अलायन्स जोरदार कार्यरत आहेत. यांना हळू हळू मोकळे रान मिळेल. मग ते परत कश्मीर मध्ये आणि सिंकीआंग मध्ये घुसून जिहाद पसरवण्याचा प्रयत्न करणार हे साहजिकच आहे. पाकिस्तानची आधीच स्वतःची वाट लागली आहे. कराची मध्ये रोज होणाऱ्या १५-२० कत्तली, उर्दू मुहाजिर-पश्तून-सिंधी लढा, बलुच लोकांचा जोरदार लढा, सरऐकी आणि बहवालपूर सुभे तयार करायचे की नाही, गेल्या वर्षी आलेला प्रचंड पूर, अमेरिकेने थांबवलेली मदत, विजेची अती-प्रचंड कमतरता आणि त्यामुळे होणाऱ्या दंगली, आणि परवाच नवाज शरीफांनी पुकारलेला झरदारी विरोधी लढा, आजच्याच बातमीनुसार बंद पडण्यास आलेली रेल्वेसेवा. त्यांना स्वतःचाच डोलारा सांभाळता येत नाहीये. पाकिस्तानी तालिबान, तेहेरिक, लष्कर सगळे डोईजड झालेत. त्यामुळे चीनने त्यांच्यावर विसंबून न राहता स्वतःच नाकाबंदी करायची ठरवली असल्यास आश्चर्य वाटायचे कारण नाही. आणि ते लोक निर्णय घेऊन कार्यरत पण करतात. त्यांच्या हातून इतक्या सहजासहजी सिंकीआंग सुटणार नाही. ती नाकाबंदी साहजिकच पाकव्याप्त कश्मीर मध्येच करायला लागणार. ‘विकास’ हे उत्तर प्रत्येक प्रश्नाला लागू पडते हे सगळ्या राजकारण्यांना कळते. चीननेही सिंकीआंग मध्ये दोन नवे मोठे सेझ जाहीर करून काम सुरु केले आहे. तिथे जायला तिबेट, गोबी, टकलामकान पार करून जावे लागते जे दुर्गम आहे. तेव्हा पाकिस्तानातूनच रेल्वे केली तर सोयीचे, म्हणून मग पाकव्याप्त काश्मिरातून रेल्वे बांधत आहेत. त्याचवेळी जर हे सगळे मोकळे झालेले मुजाहिदीन आलेच तर त्यांना सिंकीआंग मध्ये घुसून द्यायचे नाही – तर कश्मीर मध्ये डायव्हर्ट  करणे सोप्पे नाही का? तेवढेच भारत पण गडबडेल… उगाच नाही भारताने जाहीर स्टेटमेंट दिले की चीनच्या या हालचाली चिंताजनक आहेत.

भाग ५ –

सगळ्या बातम्या रोज पेपरात येत असतात. पण त्यांच्यात एक माल गुंफून अर्थ काढता आला तर त्या पेपर वाचण्याला अर्थ

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s