जाज्वल्य

हा लेख आमचे मित्रवर्य पंडित श्रीनिवास याडकीकर-नगरकर यांनी लिहिला आहे. त्यांचे ‘राधा – एक आभास’ हे पुस्तक तसे पूर्वीपासूनच गाजते आहे.. पण त्याव्यतिरिक्त केलेल्या फुटकळ लेखात त्यांनी आमचा समाचार घेतला. काही सत्य काही विपर्यास… विनोदी समजून घ्यावा…(त्यांचे लिखाण येथून प्रसिद्ध होते – http://shabdanvachun.wordpress.com/)
—————————————————————————

आपल्या “मुंबईकर-पुणेकर-नागपूरकर” ह्या लेखात पु. ल. म्हणतात, “जर तुम्हाला पुणेकर व्हायचे असेल तर खुशाल व्हा, फक्त तुम्हाला कुठल्या न कुठल्या तरी गोष्टीचा साधासुधा नाही तर जाज्वल्य अभिमान असावा..” पहिल्याने पुण्यात आल्यावर असा कोणी ‘जाज्वल्य’ अभिमान असणारा कोणी भेटेल कि नाही ह्याविषयी शंका (किंबहुना धास्ती जास्त!) होती. पण निखील शेठ्ला भेटल्यावर हि शंका फिटली. खरेतर निखीलला पहिल्यांदा कधी भेटलो हे नीटसे आठवत नाही.. शेठ ह्या मनुष्यप्राण्याचा (मनुष्य-प्राणीच म्हटलेले बरे!) पहिला ज्ञात उल्लेख (हि हिस्ट्री क्लबमध्ये बेल्लारीकर, शेठ आणि स्मित ह्या त्रयीने लावलेली सवय…) मी एस. वाय. ला पहिल्या सेमिस्टरमध्ये असतानाचा! बेल्लारीकर ह्या कधीही न ऐकलेल्या आडनावाच्या आणि कधीही न पाहिलेल्या माणसाशी माझी गाठ घालून देण्यात आली होती. इतिहास, गणित, सिनेमा अश्या पाच-पन्नास गल्ल्यामधून बेल्लारीकर मला फिरवत होता. आणि मी वाघाच्या गुहेत सापडलेल्या पाडसासारखा झालो होतो (आज तीच गुहा अल्लीबाबाच्या गुहेसारखी वाटते.. असो!) अचानक बेल्लारीकारचा फोन वाजला. “शेठचा फोन आहे एक मिनिट हं!” असे बोलून बेल्लारीकर ने फोन घेतला. आणि मग बेल्लारीकर आणि शेठचे पेशवाई वरचे संभाषण सुरु झाले.

हळूहळू माझा क्लबमधला वावर आणि इतिहासाचा माझ्यातला संचार दोन्ही वाढू लागले. लवकरच मी आणि विक्रांत हांडे-देशमुख यांनी सिकंदरावर व्याख्यान द्यावे असे ठरले. रात्रभर जागून मी प्रेझेन्टेशन बनवले होते.. उरलेले काम करायला मी स्मितच्या रूमवर गेलो. तिथे सावळ्या वर्णाचा आणि हिस्ट्री क्लब मधल्या इतर सदस्यांच्या तुलनेने एक अंमळ भरघोस अंगाचा तरुण (किमान दिसण्यावरून तरी) माझ्या प्रेझेन्टेशनशी झगडा करीत होता. “हा शेठ!” बेल्लारीकरने ओळख करून दिली. “तुश्रीनिवासका?” शेठ बोलला. एव्हड्या वेगाने शब्द उच्चारता येतात ह्या गोष्टीवर माझा विश्वास बसत नव्हता. शेठने उच्चारलेले ते पहिलेच वाक्य मला मुंबईमधल्या लोकलच्या गर्दीची किंवा कुंभमेळ्यातील गदारोळाची आठवण करून देऊन गेलं. “काय?” एकही पॉज न घेता उच्चारलेले ते वाक्य ऐकून माझी तारांबळ उडाली होती. “तू श्रीनिवास का?” शेठने ह्या खेपेला शब्दांपेक्षा त्यांच्या मधल्या अंतरावर जोर देत तेच वाक्य उच्चारले. “हो” किंचित सावरून मी म्हणालो. यापुढे मी शेठचे प्रत्येक वाक्य मी कान टवकारून ऐकू लागलो. मी जरा बोथट अगर गोड कानाचा आहे असा वाटून शेठने आवाजाचा वोल्युम तेव्हढा वाढवला पण वेग मात्र तोच. टेप रेकॉर्डर मध्ये जेंव्हा केसेट अडकते तेंव्हा आवाज जसा गोन्गाणा ऐकू येतो (ह्यापुढे माझी शब्दसंपदा जात नाही) तसा काहीसा शेठच्या बोलण्याचा धाट वाटला, अन मी खुदकन हसलो. शेठ क्षणभर चिडला पण त्याचे बोलणे ऐकून समोरच्या माणसाच्या चेहेर्यावर येणारे अगम्य भाव त्याला परिचयाचे असावेत म्हणून अखेर शांत झाला.

त्यानंतर शेठ आणि माझा संवाद-कम-चर्चासत्र-कम-सात्विक वाद (इथे वाद सात्विक पण असतो हे लिहिण्याचे कारण काही लोकांचा गैरसमज…) सुरु झाले. “तू नोन-व्हेज का खात नाहीस?” ह्या विषयावर शेठने मला पुण्याच्या ‘बर्गर किंग’ मध्ये नेताना अर्धा तास वाद घातला होता. आणि अखेर घरी लवकर जायचे असल्याने स्वत:च तो आवरता घेतला. “तू हिटलरला का मानतोस?” ह्या प्रश्नावर “यापुढे नाही मानणार ” असे उत्तर शेठ्ला चालत नाही. “यापुढे गांधींची उपासना करेन” ह्या उत्तरावर तर शेठ भडकून उठतो. आयुष्यात आपली मते ठाम असावीत, मग त्यासाठी कोणाशीही वाद घालण्याची आपली तयारी असावी असं शेठ मानतो. मागे एकदा “तू दाढीत चांगला दिसशील” अश्या एका (अर्थात प्रेक्षणीय बाजूकडील) मताचा पडताळा घेण्यासाठी शेठने इतकी दाढी वाढवली कि अखेर मुले (आणि ती प्रेक्षणीय बाजू देखील!) त्याला निखील शेठ ऐवजी निखील शेख म्हणू लागली.
पोलादपूरच्या दिलीपराव शेठ यांचे निखील हे थोरले अपत्य. अपत्य म्हटले कि त्याचा आपत्तीशी उच्चारी जवळीक असते. पण हे पोर मात्र कुटुंबासाठी इष्टापत्ती ठरले. घराची जबाबदारी अंगावर पडली तसे दिलीपरावांनी पुस्तके,नाटके, संगीत यातून अंग काढले. पण ह्या क्षेत्रातील रसिकपणाच्या बाबतीत शेठ वडिलांहून सुद्धा सवाई निघाला. ‘नु.म.वी’ मध्ये जायला लागल्यापासून शेठने अ, आ, ई सोबत रसिकतेचे धडे गिरवले. इतर मुले व रे वडाचा अगर वरवंट्याचा म्हणत आपल्या बुद्धीची धूळ जगभर उधळीत होती, तेंव्हा हे चिरंजीव व रे वसंतरावांचा असे म्हणत त्याच धुळीला आकार देत होते. आपल्या हेडमास्तर असणाऱ्या आजोबांकडे एकही पुस्तक नाही हि गोष्ट शेठ्ला प्रचंड छळे. शाळेत जाताना बस ऐवजी पायी जाऊन आपला पोकेटमनी वाचवून शेठने पुस्तके खरेदी केली.

मागे एकदा शेठला मी खांडेकरांचे ययाती मागण्यासाठी मागितले होते. त्यावर “घरी येऊन वाच, पण मी तुला पुस्तक होस्टेलवर देणार नाही” असे शेठने ठामपणे सांगितले. स्वकष्टार्जित गोष्टींविषयी असणारी उपजत आस्था ह्या स्पष्टपणामागे होती. ‘हे सारे मी मिळवलंय’ ह्याच्याऐवजी ‘हे सारे कष्टाने साध्य केलेय’ असा सार्थ आणि जाज्वल्य अभिमान त्यामागे होता. म्हणूनच शेठ साधासुधा ठरत नाही, जाज्वल्य ठरतो.
पण शेठचा हा जाज्वल्य अभिमान फक्त पुस्तके, संगीत ह्याबाबतीतच मर्यादित नाही. हिस्ट्री क्लबचा संस्थापक सदस्य असणाऱ्या ह्या पोराच्या घरालादेखील तितकाच रंजक इतिहास आहे आणि त्याचा शेठ्ला जाज्वल्य अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज सुरतेची लूट करण्यासाठी गुजरातेत गेले असताना परत येते वेळी त्यांनी आपल्यासोबत काही गुजराती व्यापारी आणून त्यांना कोकणात वसवले. शेठचे पूर्वज हे ह्या लोकांपैकीच होत. पुढे हे लोक पोलादपूरला स्थायिक झाले. ह्या पोलाद्पुरचा शेठ्ला प्रचंड अभिमान आहे. पोलादपूरचे बालाजी आवजी चिटणीस (सारा इतिहास ह्यांना बालाजी आवजी चिटणीस म्हणत असला तरी शेठ त्यांना बालाजी आवजी चित्रे असेच म्हणतो.) हे शिवाजी महाराजांचे चिटणीस होते. महाराजांचे पहिले चरित्रकार कवींद्र परमानंद नेवासकर यांनी पोलादपूरला समाधी घेतली. या दोन्ही आणि पोलादपूरला धूळ आपल्या पायी आणि मग माथी लावणाऱ्या प्रत्येकाचा शेठ्ला जाज्वल्य अभिमान आहे. किंबहुना जगातले सारे महात्मे पोलादपूरला पायधूळ झाडण्यासाठी पुन्ह:पुन्हा जन्म घेत असावेत असा आमचा होरा आहे. नु.म.वी.य असल्याने शेठ्ला महामहोपाध्याय (हि पदवी घेतली नवी तर शेठ पेटतो) दत्तो वामन पोद्दारांपासून स्वत:पर्यंत सार्या नु.म.वी.य जणांचा त्याला जाज्वल्य अभिमान आहे. पण शेठचा अभिमान अनाठायी नसतो. ख्यातनाम (कुख्यात म्हटले तरी चालेल) इतिहास संशोधक त्र्यंबक शंकर शेजवलकर हा शेठ, बेल्लारीकार आदि प्रभृतींचा मुकुटमणी. निनाद बेडेकरांनी (ते तेंव्हा शिवभूषण नव्हते) “शेजवलकरांना मोडी वाचता येत नव्हते” ह्या एका वाक्यात शेजवलकरांचा कडेलोट केला तेंव्हा शेठने हि गोष्ट मान्य केली होती.

स्वाक्षर्या जमावाने हा शेठचा आणखी एक छंद! व.पु. काळे ते अगदी अप्पा जळगावकर यांच्यापर्यंत शेठने अनेक मान्यवर लोकांच्या स्वाक्षर्या घेतल्या आहेत. शेठने अप्पा जळगावकरांची सही घेतली आणि अप्पांची देवाने भूतलावरून उचलबांगडी केली. असे अनेक दिग्गज शेठ्ला स्वाक्षरी देऊन पस्तावले. जणू काही सारे महात्मे शेठ्ला स्वाक्षरी देणे आणि प्रसिद्ध होणे ह्या दोनच कामांसाठी भूतली आले असावेत. आम्हाला त्रास देणाऱ्या एका मास्तरांची स्वाक्षरी घ्यायला शेठ्ला पाठवावे असा विचार होता पण तो यशस्वी झाला नाही.

वसंत सबनीस, वसंत देशपांडे आणि वसंत देसाई हे तीन वसंत म्हणजे शेठ्ची दैवते आहेत. सबनीसांची नाटके पाहताना हा पोर तालीन होऊन जातो, वसंतरावांनी ‘जमानाकीणारे मोर गाव’ म्हटल्याबरोबर त्या यामुनेकाठ्च्या वाळूत क्रीडा करून यायचे अद्भुत लेणे शेठ्ला लाभलेय. शेठ स्वत: संवादिनी उत्तम वाजवतो (ह्याला पुणे सोडून इतरत्र हार्मोनियम अगर बाजाची पेटी म्हणतात). नाट्यसंगीत संवादिनीवर वाजवून पाहणे हा शेठचा विरंगुळा आहे. माझ्या सलग तिसऱ्या प्रेमभंगाची करुण कथा (हि माझी एकमेव hat -trik) मी शेठ्ला सांगत असताना शेठ “या नवनवल नयनोत्सवा” असे म्हणत माझ्या तिसऱ्या प्रेमकथेच्या अंत्यविधीला सार्या जगाला बोलावीत होता.

शंभर नंबर हे मात्र शेठच्या आयुष्यातले एक न विसरता येण्याजोगे प्रकरण आहे. coep मुलींचे वसतिगृह (नावे दगा देऊ शकतात) मध्ये असणाऱ्या एका शेठच्या वर्गातील कन्यकेला ‘शेठ दररोज वासातीगृहाबाहेर येऊन उभा राहतो आणि तिच्या नावाने हाक मारतोय’ असा भास होई. तो आणखीही काही बोलत असावा असा तिचा दावा होता पण वेगात बोलण्याच्या शेठच्या सवयीमुळे तो काय बोलतो हे नीटसे काळात नव्हते. अखेर प्रकरण मिटले आणि भौतिक जगतातील शेठच्या एकमेव प्रेमप्रकरणावर पडदा पडला.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात उत्तम गुण मिळवून शेठ आता अमेरिकेत पुर्डू विद्यापीठात आहेत. अमेरिकेत जाण्यापूर्वी शेठ्ची हिस्ट्री क्लबने भारताची चिमुटभर माती देऊन शेठ्ची बोळवण केली. इंजिनियर झाला असला तरी शेठ अजून पक्का ‘शेठ’ आहे. आनंदाचे आणि मुख्य म्हणजे तो स्वत: लुटून इतरांना दाखवण्याच्या कलेचे कर्ज त्याने आम्हा सर्वाना दिलेय. ते सुद्धा बिनव्याजी!

2 thoughts on “जाज्वल्य

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s