महु-पुराण..!

काही माणसे, काही प्रसंग, काही ठिकाणे… उगीच कारण नसताना मनात घर करून असतात. त्यांच्या बाबतीत काही स्पेशल असते असे नाही, पण असतात. काही वेळा काही घटना घडल्या म्हणून तर काही वेळा का नाही घडल्या म्हणून…

एकदा मागे मध्ये-प्रदेश दौरा करून आलो होतो. आपण ज्याला ट्रीप म्हणतो ती ९९% वेळा अगदी तिऱ्हाईत, परदेशी, अनोळखी, अलिप्त व्यक्तीसारखी त्या प्रदेशाला दिलेली भेट असते. ना तिथले लोक कळतात ना तिथली संस्कृती. काचेच्या अलीकडून पाहिल्यासारखे अंगावर काही शिंतोडे ना उडवून देता जर त्या भागाला भेट दिली तर पोकळ समाधानच मिळते. ती सहल मग फोटो काढण्यासाठी आणि इतरांना ‘मी तिथे जाऊन आलो’ सांगून फुशारक्या मारण्यासाठी होऊन जाते. किंवा स्वतःलाच ‘मी जाऊन आलो बर का, आता छान वाटून घे’ असे समजावण्यासाठीची ती सहल. रोजच्या आयुष्यातून बदल आणि विरंगुळा म्हणून ठीक आहे पण त्याने तुम्ही त्या भागल खरी भेट देत नाही. स्वतःपासून पळण्यासाठी आपण कामात मग्न असतो आणि कामापासून पळण्यासाठी इतर लोकांमध्ये आणि अशा ट्रिप्स मध्ये. असो. उगीच फिलॉसॉफी देणे आपला धंदाच आहे.

तर ट्रीपला गेलो होतो. इंदौर, उज्जैन, मांडवगड, ओंकारेश्वर वगैरे बघून आलो. नवा प्रदेश होतं, नवे लोक होते आणि एकंदरीतच भारताच्या सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक भूगोलाचे ज्ञान कमी असल्याने खूप नव्या गोष्टी कळल्या. सांदिपनी आश्रम असो नाहीतर मांडू… खूप भारी होते सगळे. नंतर वर्षभराने पुन्हा एकदा ‘बहा’ स्पर्धेच्या निमित्ताने पिथमपूर ला जाणे झाले. दोन्ही वेळेस महू नावाचे गाव लागले. ११-१२वी मध्ये एक मित्र होता त्याचे बाबा आर्मी मध्ये होते आणि तेव्हा महूला स्टेशंड होते. त्यामुळे महू म्हणजे भारतीय लष्कराचे एक ठाणे एवढीच ओळख… पण परवा गुगल करता करता महूची जी जी माहिती वाचली तसा अवाकच झालो… दोनदा महू ला टच करून आलो तरी हे माहित नव्हते म्हणून वाईट पण वाटले. महू हे एक अजब रसायन च आहे… म्हणजे पुण्यासारख्या शहराला जाज्वल्य अभिमान बाळगण्यासारखा ३००-४०० वर्षांचा इतिहास असणे यात नवे काही नाही.. पण ज्या गावाचे अस्तित्व इतके पिटुकले आहे त्याचा इतिहास पण असा भरलेला आहे की काय… वाचाच वाचा..

महू ची सुरुवात होते तीच ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात… त्यापूर्वी तिथे काय होते ते माहित नाही… कंपनी सरकारचा एक तगडा अधिकारी – सर जॉन माल्कम. याचे लहानपण गेले मद्रास ला. फार्सीचा सखोल अभ्यास आणि त्यामुळेच कॉर्नवालीसने त्याची नियुक्ती त्याच्याशी रिलेटेड पदावर केली होती. (हा माणूस इतिहासकर ही आहे बर का) सगळ्यात आधी हा प्रकाशझोतात आला ते म्हणजे इंग्रज विरुद्ध टिपू सुलतान + निझाम यांच्यात झालेल्या शेवटच्या लढाईत. तिथे जोरदार पराक्रम गाजवला भाऊंनी. मग इंग्लंड ला गेला. तिथे काहीतरी नेव्ही मध्ये पराक्रम गाजवला. एक मात्र आहे, की त्या १००-२०० वर्षांमध्ये जो जो भारी इंग्रज अधिकारी होऊन गेला त्याचं काही ना काही काही कर्तृत्व नेव्ही मध्ये असतेच.. तसेच याचे पण होते. परत मद्रास ला आला.. बऱ्याच मोठ्या मोठ्या पोस्ट्स वर चढत गेला.. मुलकी आणि लष्करी दोन्ही…. रादर तेव्हा असा फरक कंपनी सरकारात तरी जास्त होते नसे… एकाच अधिकाऱ्याकडे बऱ्याचदा दोन्ही पॉवर्स असायच्या.. नशीब म्हणजे काय असते एकेकाचे.. कोणाला कुठे कुठे फिरवून आणेल सांगता येत नाही. इराणच्या इंग्रजी राजदूताची हत्या झाली आणि याला तिथे पाठवले.. तिथे राजदरबारात हे फारच रमले… वारेमाप खर्च केला. बेधुंद झाले आणि मग सगळ्यांशी भांडण करून बसले. कंपनी सरकारने परत मुंबईला बोलावले. आता काळ येतो १८००-१८१५ चा… तेव्हाचा हिंदुस्थान लक्षात घ्या… कंपनी एकेक राज्य गिळत होती. ३ इंग्रज-मराठा युद्धे, इंग्रज-शीख युद्धे, दक्षिणेतली अनेक युद्धे… संपूर्ण भारत म्हणजे रणभूमी झाला होता.. मला वाटते भारतवर्षभर स्प्रेड असलेले युद्ध १-२ दशकाच्या कालावधीत.. नि ते पण एकाच शत्रूशी.. हे पहिलेच असावे इतिहासात… अफगानिस्तान-इराण पासून म्यानमार पर्यंत आणि काश्मीर पासून श्रीलंकेपर्यंत… सगळीकडेच युद्ध-सदृश परिस्थिती… अशा वेळी माल्कम महाराजांना भराभरा पदोन्नती मिळत गेल्या.. आधी इराणचा राजदूत मग मद्रास ला मोठे कोणते तरी पद नि मग डायरेक्ट गव्हर्नर ऑफ बॉम्बे… !! आता आले साल १८१७-१८१८… म्हणजे शेवटचे इंग्रज मराठा युद्ध. आणि माल्कम साहेब बॉम्बेचे गव्हर्नर आणि मोठ्या लष्करी हुद्द्यावर…

ब्रिटीश लोकांचा खरा राग येतो जेव्हा तुम्ही त्यांनी सगळा भारत कसा मिळवला ते नीट वाचले तर.. आणि मग त्यांची न्याय-प्रियता, तंत्रात प्रगती, त्यांची पार्लमेंट.. सगळे जाते गाढवाच्या ***. तळपायाची आग मस्तकात जाणे म्हणजे काय त्या म्हणीचा अर्थ अनुभवायचा असेल तर हा १०० वर्षांचा इतिहास वाचा, गाझेटीयर्स वाचा….. १९ डिसेंबर १८१७. मध्य भारत. होळकर विरुद्ध इंग्रज. आपल्यातला अजून एक सूर्याजी पिसाळ म्हणजे गफूर खान पिंडारी. याने या दिवशी ब्रिटीशांशी गुप्त तह केला, परत छावणीत आला आणि तुळशीबाईला खलास केले. दुसऱ्या दिवशी ब्रिटीश आले लढायला आणि आपले उरलेले सेनानी म्हणजे ११ वर्षांचा मल्हारराव आणि २० वर्षांचा हरीराव होळकर.. असेही नाही की तेव्हा आपण लै भारी होतो.. खूप डीग्रेड झालोच होतो अनेकदृष्ट्या.. त्यामुळे पराभवाचे खापर शत्रूवर फोडणे म्हणजे पलायनवाद होईल. औरंगझेबने गोवळकोन्ड्याला केलेली न-गीना बाग असो किंवा ब्रिटिशांनी केलेली ही महिद्पुरची कत्तल… कोणीना कोणी ‘क़्विसलिन्ग’ असल्याशिवाय हे होत नाही हे खरे… असो. तर दुसऱ्या दिवशी युद्ध सपाटून मार खाला आणि हरलो. आणि कंपनी सरकारच्या अखात्यारीखाली हा ‘मध्य भारत’ नावाचा प्रांत आला. या युद्धानंतर होळकर महेश्वर सोडून इंदौर ला आले… नर्मदेकडून क्षिप्रेकडे…तिथून महू आहे २०-३० किलोमीटर..परत कोणी इंदूर, उज्जैन ला उचल काहु नये या कारणासाठी किंवा भारताच्या मधोमध एक असावे म्हणून… अनेक कारणांनी इंग्रजांनी इथे एक मोठा लष्करी तळ उभारला – ज्याचे नाव आहे – महू.. मिलिटरी हेडक्वार्टर्स ऑफ वेस्टर्न इंडिया चे अक्रोनिम आहे हे. And this is how Mhow came into being… हुश.. ..

तरी पण भारताच्या इतिहासात महू चे महत्व काय फक्त या घटनेमुळे नाहीये.. या युद्धात जरी होळकर जिंकले असते तरी एकंदरीतच मराठे काही फायनल युद्ध जिंकायच्या स्थितीत नव्हते.. केव्हा ना केव्हा हरणारच होते.. त्यामुळे महुचे सगळ्यात मोठे योगदान कोणते? – बाबासाहेब आंबेडकर… त्यांचे वालीद लष्करात होते, महार रेजिमेंट मध्ये. आणि महार रेजिमेंट तेव्हा काही काल होती महू मध्ये. तिथे त्यांच्या वडिलांवर कबीराचे संस्कार झाले. आणि वडिलांचे संस्कार झाले बाबासाहेबांवर. कबीर-बुद्ध-फुले असे तीन बाबासाहेबांचे गुरु होते त्यातले पहिले कबीर.. अन बाबासाहेबांचा जन्म पण महूचाच… कोण सांगणार आम्हाला हे? उज्जैनचा कुंभमेळा माहित पण महुचे महात्म्य नाही…

आणि आपण भारतीय लढण्यात एकदम निष्णात.. शत्रूशी नाही… आयुधजीवी राज्ये केव्हाची गेली.. आपल्या-आपल्यात भांडण्यात माहीर… आणि सगळ्यात दुर्दैवी म्हणजे अतिशय फालतू मुद्द्यांवरून… कोणाचे इगो कुठे कधी कसे ठेचले जातात तेच काळात नाही… जो तो उठतो तो ‘अस्मिता’ ‘अस्मिता’ करून भांडायला लागतो… इथे पण एक नामांतर वाद झाला. महू ला बाबासाहेब आंबेडकर नगर म्हणायचे की नाही? औरंगाबाद ला खडकी किंवा संभाजी नगर म्हणायचे की नाही? जे नाव बदला म्हणणारे होते ते बाबासाहेबांचे तथाकथित अनुयायी असावेत.. मला ते कोण होते ते माहित नाही.. आणि नाव बदलू नका म्हणणारे जे होते ते महू य अनावाची इमोशनली आणि हिस्टोरीकली बांधलेले होते… पोरबंदर ला गांधीनगर किंवा अलाहाबाद ला नेहरू-नगर नाही म्हणत तर महुलाच का आंबेडकर नगर म्हणायचे… बघा किती इगो -  पहिला इगो अस्मितेचा… आंबेडकरांचे खरे अनुयायी असल्या वादात पडण्यापेक्षा खरे काहीतरी कामाचे काम करतील तर खरे.. बर, या वादात पडले ते पडले.. दुसरी बाजू पण तशीच… इतिहासाची गोचीडे अंगावर पाळत बसलेली… ज्यातून कधी बाहेर पडतील तर बदलेले जग बघतील…. आणि तिसरी चूक म्हणजे ‘तुलना’.. जे काही करायचे आहे ते केस-स्पेसिफिक नाही बोलणार.. उगीच अजून इतर ३-४ गोष्टी मध्ये घुसडून वादाला अजून मोठा वाद करणे तेवढे जमते… चुकून उद्या कोणी खरंच म्हटले की अलाहाबाद ला करा नेहरूनगर तर काय घ्या.. परत नवीनच लचांड सुरु व्हायचे… आणि या सगळ्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर राहिले बाजूला… ना ते मोठे-लहान होणार किंवा त्यांना कमी-जास्त मान मिळणार असेही नाही किंवा यामुळे इतर काही दृश्य फायदा तरी मला दिसत नाही… पण एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या स्मृतीप्रित्यर्थ नाव बदलायला पण हरकत नाही.. कारण त्यांचे कर्तृत्व आहे तसे.. पण भांडणे कशाला? इथे इतिहासाचा दुरुपयोग दोन्ही बाजू करतात… त्यापेक्षा लोकांनी बुद्ध आणि हिज धम्म वाचले तर जास्त उपकार होतील या देशावर…

असो. आपण जरा आपल्याला मानवेल अशा विषयाकडे येऊ. सेलिना जेटली. बॉलीवूड मधली एक हिरोईन. लोकांना आता सर जॉन माल्कम माहित असायचे काहीच कारण नाही. त्याचे (अ)कर्तृत्व २०० वर्षांपूर्वीचे… पण सेलिना जेटलीला उभ्या भारतातल्या प्रत्येक घरातले लहान मूळ ओळखते… तर तिचा जन्म काही इथला नाहीये.. हिचा जन्म अफगानिस्तान मधला.. काय स्टोरी आहे बघा हीची.. वडील लष्करात, अफगाणिस्तानात होते. तेव्हा कोण एका अफगाण हिंदू बाईला यांनी पटवले… (अफगाण हिंदू हा काय प्रकार आहे मला खरंच माहित नाही, कोणाला माहित असल्यास कळवावे) ती होती तेव्हाची अफगाणी ब्युटी क्वीन… (अफगानिस्तान मध्ये ब्युटी क्वीनच्या स्पर्धा? मी वाचलेली माहिती नक्कीच चुकीची असणारे)  आणि या दाम्पत्याला झालेली मुलगी म्हणजे सेलिना जेटली… आता हे दाम्पत्य महू मध्ये राहते… एवढाच त्यांचा आणि महूचा संबंध…..:):)

असो. इति महुपुराण…

ता. क. – अफगाण हिंदू अशी कम्युनिटी खरंच अस्तित्वात आहे. इथे त्याबद्दल वाचायला मिळेल. त्यांचा एक ब्लॉग पण आहे… इंट्रेस्टिंग..

7 thoughts on “महु-पुराण..!

 1. nikhil bellarykar

  अफगाणिस्तान मध्ये काफिरीस्तान नामक एक भाग होता असे त्र्यंबक शंकर शेजवलकर यांच्या समग्र लेखसंग्रहात नमूद आहे. तेथील लोक हिंदूच होते . भौगोलिक दुर्गमतेमुळे त्यांचा धर्म अबाधित राहू शकला .इ.स.१८९० ते १९०० पर्यंत तेथील बहुतेक लोकांचे धर्मांतर घडवून आणले गेले. यामागे अफगाणिस्तानच्या तत्कालीन अमीर चा हात होता . त्या भागाचे सध्याचे नाव नुरीस्तान असून त्यांच्या जुन्या देवमूर्तींचे अवशेष ब्रिटीश म्युझियम मध्ये आहेत.

  • Nikhil Sheth

   आभार…. मी आत्ताच पहिले की तुम्ही तुमच्या ब्लॉगरोलमध्ये ‘दिसामाजी काहीतरी’ला जागा दिली आहे… त्याबद्दल मनापासून धन्यवाद….

 2. Vikram Virkar

  आपण ज्याला ट्रीप म्हणतो ती ९९% वेळा अगदी तिऱ्हाईत, परदेशी, अनोळखी, अलिप्त व्यक्तीसारखी त्या प्रदेशाला दिलेली भेट असते. ना तिथले लोक कळतात ना तिथली संस्कृती. काचेच्या अलीकडून पाहिल्यासारखे अंगावर काही शिंतोडे ना उडवून देता जर त्या भागाला भेट दिली तर पोकळ समाधानच मिळते. ती सहल मग फोटो काढण्यासाठी आणि इतरांना ‘मी तिथे जाऊन आलो’ सांगून फुशारक्या मारण्यासाठी होऊन जाते. Thanks, madhye khup trip kadhlya, pan manapasun samadhan watat navhata. khup sundar thikanana bheti deun hi kahi tari univ rahilya sarkha vataycha, aaj samjla kay chukaycha te… Pudhchya trips nakki aankhi rthapurna astil…dhanyavad!

  आपण भारतीय लढण्यात एकदम निष्णात.. शत्रूशी नाही… आयुधजीवी राज्ये केव्हाची गेली.. आपल्या-आपल्यात भांडण्यात माहीर… आणि सगळ्यात दुर्दैवी म्हणजे अतिशय फालतू मुद्द्यांवरून…जो तो उठतो तो ‘अस्मिता’ ‘अस्मिता’ करून भांडायला लागतो… +1111111111111
  Lekh sundar aahe! Tumhi Sakal wa itar wartman patrat lihaycha vichar kelay ?( Sorry ugach nak khupsnyacha prakar ahe pan, tumcha lekhan awdla an te itaranaryant pohochave asa vatla mhanun..)

  • Nikhil Sheth

   आभार… वर्तमानपत्रामध्ये लिहिण्याचा विचार केला नाही खरे… सध्या ब्लॉगपासून अंतर राखून आहे.. लवकरच पुन्हा सुरु करेन म्हणतो…

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s