आर्य आणि अनार्य : एक धावता (अगदी f -1) आढावा .

इतिहास म्हणजे या ना त्या कारणाने वेळोवेळी फुटणाऱ्या बॉम्बगोळ्यांनी व्यापलेले कुरुक्षेत्रच  जणू. अलीकडे तर कधी कोणत्या मुद्द्यावरून वाद , वितंडवाद आणि दहशतवाद फोफावतील, हे सांगणे कठीणच आहे. मग काल कोणताही असो , प्रदेश कोणताही असो. युरोपात पाहिले तर लोक  चेंगीज खान , अरब यांच्या नावाने बोटे मोडतात , ज्यू हिटलरला शिव्या घालतात. आफ्रिका आणि वसाहतवादाच्या जोखडातून नुकतेच मुक्त झालेले कोणतेही देश युरोपच्या नावाने खडे फोडतात .  भारतात तर असे बॉम्बगोळे  किती आहेत कुणास ठाऊक. पण या सर्व स्फोटकांचा बाप म्हणजे सो-कॉल्ड आर्यन इन्व्हेजन थेअरी . या सिद्धांतावरून जितका कंठशोष झाला, तितका अजून कोणत्याही मुद्द्यावरून झाला नाही . तस्मात या आणि अजून काही लेखांमधून याचा एक अति-अति धावता आढावा घेण्याचा प्रयत्न आहे .

हा सिद्धांत पुढे करून १९व्य शतकात ब्रिटीश लोकांनी आपल्या साम्राज्यवादाला नैतिक बैठक देण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुल्यांनी हा सिद्धांत वापरून आर्य हे बाहेरचे उपरे असून त्यांनी आधीच्या अधिक प्रगत अशा मूलनिवासी  द्रविड लोकांना पराभूत केले , असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला . बहुजनसमाजाला पारंपारिक हिंदू धर्मापेक्षा एक वेगळी ओळख देण्याचा हा प्रयत्न होता. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी   या सिद्धांताचा उहापोह “who were the shudras?”  या पुस्तकात केला आणि फुल्यान्प्रमानेच  मत दिले. तामिळनाडूमध्ये हा सिद्धांत वापरून सो-कॉल्ड द्रविडपणाला चेतविण्याचा प्रयत्न केला गेला. आजदेखील काही तथाकथित आणि पोकळ बहुजनसमाजवादी लिखाणात या सिद्धांताची मढी उकरून हवी तशी सजविली जातात.अर्थात आर्यन इन्व्हेजन थेअरी हा आर्य संकल्पनेचा एक भाग आहे. ती संकल्पना वापरून हिटलरने जो दंगा केला, तो महशूर आहे . “white man’s burden” हादेखील असाच एक रद्दी सिद्धांत आहे. पण त्याबद्दल नंतर कधीतरी .

मुळात हा सिद्धांत काय आहे? हा सिद्धांत असे सांगतो , की सुमारे १५०० इ.स .पू. या वेळी भारतात आर्य नामक लोक बाहेरून आले, त्यावेळी भारतात असलेल्या द्रविडीय लोकांना त्यांनी हळूहळू आपले गुलाम बनवले, आणि आपला वरचष्मा भारतावर प्रस्थापित केला . आर्य लोकांचा वंश द्रविड लोकांपेक्षा वेगळा होता , त्यांची भाषा देखील वेगळी होती .

तर हा सिद्धांत कोणी सर्वात आधी मांडला? याचे उत्तर देण्या आधी मुळात या सिद्धांतामागील पार्श्वभूमी थोडीशी समजावून घेऊ. १८व्य शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटीशांची भारतावरील पकड बर्यापैकी मजबूत होऊ लागली आणि बरेच युरोपियन्स भारतात येऊन भारतीय संस्कृतीचा अभ्यास करू लागले . त्याची परिणती म्हणजे “indology” ही शाखा होय. सर विलियम जोन्स हे त्यातील एक अग्रगण्य नाव आहे . संस्कृत चा अभ्यास करून त्यांनी आधीच्या लोकांनी केलेल्या तर्काला पुष्टी दिली, की संस्कृत, ग्रीक आणि लातिन या ३ भाषांची पूर्वज भाषा ही एकच होती. त्यामुळे भारत आणि युरोप यांचे सांस्कृतिक आजेपणजे एकच असावेत असा निष्कर्ष त्यांनी काढला. त्याचीच परिणती म्हणजे वरती सांगितलेला हा सिद्धांत होय . max  मुल्लर , जॉन मुइर आणि इतर अभ्यासकांनी हा सिद्धांत पहिल्यांदा मांडला.

आता या सिद्धांतातील तथ्य आणि मिथ्य दोन्ही तपासून पाहू . विलियम जोन्स हा संस्कृत भाषेचा पहिला प्रसिद्ध अभ्यासक संस्कृत बद्दल असे म्हणतो , की संस्कृत ही ग्रीक आणि लातिन यापेक्षा बाहेरून वेगळी असली तरी त्यांचे व्याकरण आणि साधारण ढाचा बर्यापैकी सारखा आहे आणि हा सारखेपणा इतका आहे , की या तीनही भाषांची मूळ भाषा १ च असावी . त्या भाषेला तो “proto-indo-european” असे म्हणतो. इतकेच नाही , तर पारशी लोकांच्या अवेस्ता नामक धर्मग्रंथातील पर्शियन भाषा आर्ष संस्कृतशी खूपच मिळतीजुळती आहे. हे झाले भाषिक पुरावे . कधीकाळी आर्य लोक हे भारताबाहेर होते याला काय पुरावा? इराणमधील प्राचीन  संस्कृती ही आर्य संस्कृतीशी मिळतीजुळती होती, पण त्यापुढे काय? पण तुर्की मध्ये बोगोझ-कोई नामक ठिकाणी मितान्नी   साम्राज्यामधील तुशारात्त राजाने इजिप्त च्या अमेनहोतेप तिसरा या राजाबरोबर केलेला  शांतता करार मिळाला क्युनिफोर्म लिपीत लिहिलेला मिळाला आहे . त्यात अग्नी, वरुण यांसारख्या स्पष्टपणे आर्यन / वैदिक देवतांना साक्षी मानले आहे . या कराराचा काळ आहे इ.स.पू . १४००   . ह्यावरून असे सिद्ध होते की भारताबाहेर देखील आर्य संस्कृती प्राचीन काळी पसरलेली होती.

पण मग द्रविड लोकांवरील त्या तथाकथित हल्ल्याचे काय? आर्य हे हल्लेखोर होते , असे म्हणणार्यांच्या मताला पुष्टी देणारा एकच अप्रत्यक्ष पुरावा आहे, तो म्हणजे पाकिस्तान मधील बलुचिस्तान भागात आजही सुमारे २२ लाख लोक बोलत असलेली ब्राहुई ही भाषा होय. जरी शब्दसंपदा अलीकडच्या काळात उर्दू फारसीने प्रभावित असली तरी व्याकरण इत्यादी प्रकारे तपासू गेलो तर ती एक द्रविड भाषा आहे , असे सर्व भाषातज्ञ म्हणतात. बाकी सर्व द्रविड भाषा दक्षिण भारतात आणि हीच एकटी उत्तरेत कशी काय? नक्की उत्तर कुणालाच माहित नाही. पण यावरून स्थलांतर हे एकच तर्कशुद्ध उत्तर निघते.

आता हा पुरावा असे सूचित करतो, की भाषेचे कदाचित स्थलांतर झाले असावे. पण मग तथाकथित आर्य वंशाचे काय? तर २००५ साली National DNA analysis centre, Kolkata , Oxford university zoology dept. ani Estonian biocentre या संस्थांमधील संशोधकांनी भारतामधील ३२ भटक्या जमाती आणि ४५ (नेहमीच्या) जाती यांमधून हजारो लोकांचे डी एन ए तपासले आणि निष्कर्ष काढला की सुमारे गेल्या ४०००० वर्षात तरी उत्तरपश्चिम भागातून मोठ्या प्रमाणावर लोकांचे कोणतेही उल्लेखनीय  स्थलांतर झालेले नाही . कुणाला हवे असल्यास त्याची पीडीएफ माझ्याकडे आहे. त्यामुळे वंशाचा मुद्दा तरी निकालात निघाला .

भारतीय संस्कृतीचा सध्या ज्ञात असलेला सर्वात जुना अवशेष जी हडप्पा संस्कृती, ती आर्य  की द्राविडी? हडप्पा संस्कृती ही आर्य नाही , असे म्हणणार्यांचा भर कायम घोडे आणि त्याशी निगडीत असलेल्या रथ आणि इतर गोष्टींशी असतो. त्यामुळे घोड्यांचा  उल्लेख असणे म्हणजेच आर्यपणाचे लक्षण आहे का? आता “आर्य /वैदिक” संस्कृतीशी निगडीत असलेला सर्वात जुना ग्रंथ जो ऋग्वेद , तो याबद्दल काय सांगतो? त्यात घोड्याचे उल्लेख आहेत , परंतु निव्वळ घोडाच नाही , तर बैल , गायी यांनादेखील महत्वाचे स्थान आहे. आता एक fact म्हणजे घोडा हा प्राणी मुळात भारतातील नाहीच. इ स पू २००० पूर्वी अश्वपालनाचे उदाहरण दक्षिण आशिया मध्ये सापडलेले नाही. तर एक गोष्ट नक्की , की घोडा हा प्राणी बाहेरचा आहे. पण मग हडप्पाचे  काय? निव्वळ  घोडा नसणे हे  द्रविडपणाचे लक्षण कशावरून?  ज्या अर्थी ऋग्वेद आणि जुन्यातील जुनी उपनिषदे सरमा-पणी यांसारख्या कथा रंगवून सांगतात आणि त्या कथा गाईंच्या  चोरीबद्दल आहेत , त्या अर्थी ती आर्य संस्कृतीची अतिशय जुनी अवस्था आहे , आणि हडप्पादेखील तसे असण्याची शक्यता आहे. अर्थात हे सगळे अवलंबून आहे ते हडप्पाच्या चित्रलिपीच्या सर्वमान्य अशा वाचनावर . तोपर्यंत आर्य आणि द्रविड या दोन्हीही पक्षांना मूग गिळून बसणे भाग आहे.

तर सारांश असा , की घोडा भारतात बाहेरून आला आणि काही प्रमाणात भाषिक स्थलांतर झाले .पण मग संस्कृत भाषा ही मूळ भारतातील आहे की नाही? द्राविडी भाषांचे भारतीयत्व निर्विवाद आहे, तर खरी “भारतीय भाषा ” कोणती?   S R Rao  या संशोधकांनी संस्कृतवर आधारलेले त्यांचे वाचन मांडले १९९२ साली , पण ते मान्यताप्राप्त नाहीये . जोपर्यंत हडप्पा बोलत नाही, तोपर्यंत आर्य आणि द्रविड ह्या दोन्हीही पक्षांना आपापला प्राचीनतेचा दावा पुढे रेटता येणार नाही.

इत्यलम!

– निखिल बेल्लारीकर (कोलकाता)

5 thoughts on “आर्य आणि अनार्य : एक धावता (अगदी f -1) आढावा .

 1. मनोहर

  बृहदारण्यकोपनिषदात हिंदू धर्माचे चार संप्रदाय वर्णन केले आहेत. पहिला संप्रदाय इंद्रियांच्या अस्तित्वामुळेच सुखदुःखाचा अनुभव शक्य होतो असे मानतो. वेद नाकारणारा चार्वाकसंप्रदाय व वेद प्रमाण मानणारा पितृपूजक संप्रदाय हे या संप्रदायाचे उपसंप्रदाय आहेत. पितृपूजक संप्रदायसदृश संप्रदाय हे सर्वच मानवी संस्कृतींच्या उदयकाळी अस्तित्वात होते असे इतिहासपूर्व पुराव्यांवरून वाटते. नंतरच्या काळात मानवी जाणिवा प्रगल्भ झाल्यावर पितृपूजक संप्रदायांची जागा इतर संप्रदायानी घेतली. त्याला आर्य-अनार्य संघर्षाचे लेबल लावणे चुकीचे आहे.

 2. nikhil bellarykar

  @ मनोहर: आपण वर्णन केलेली वर्गवारी मी कुठेही आर्य अथवा अनार्य संप्रदायांना उद्देशून वापरली नाही . मातृपुजक = द्रविड आणि पितृपुजक= आर्य अशी सरसकट वर्गवारी करणे चुकीचे आहे ह्याची मला कल्पना असल्यानेच मी तसे केले नाही. Will durant च्या “Story of civilisation” मधील vol १ मध्ये एक निरीक्षण असे नोंदविण्यात आले, की साधारणपणे मानव समाज हा आधी मातृसत्ताक होता आणि नंतर हळूहळू पितृसत्ताक होत गेला असे तो म्हणतो. त्यामुळे आपण म्हणता तसे लाबेल लावणे हे चूक आहेच . पण या ठिकाणी मातृपुजक v//s पितृपुजक अथवा अन्य v /s पितृपुजक असा मुद्दा नाही. मुख्य मुद्दा असा आहे की आर्य आणि अनार्य यांच्या व्याख्या ठरवणे. काही लोक त्यासाठी उपरोल्लेखित मुद्द्याचा आधार घेतात तर काहीजण घोड्याचे घोडे पुढे दामटतात, तसेच अजून काहीजण भाषांचे गुणधर्म पाहतात. आणि मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले होते किंवा नाही, हे ठरवणे देखील खूप अवघड आहे. तथाकथित आर्यन आक्रमण झाले होते की नाही? ह्ये प्रश्नाचा एक पैलू म्हणजे आपण सांगितलेली वर्गवारी होय.

 3. सौरभ

  हडप्पा आणि मोहिंजोदडोच्या भाषेचा अजून उलगडा झालेला नाही. एखादा रोझेटा स्टोन सापडला तर बर्‍याच गोष्टींचा उलगडा होऊ शकेल.

  तुम्ही बीबीसीची स्टोरी ऑफ इंडिया ही गाजलेली डॉक्युमेंटरी बघितली आहे का? नक्की बघा. तुम्हाला आवडेल. त्यात भारताच्या इतिहासाचा बराच उहापोह केलेला आहे. मी नुकतीच बघायला सुरुवात केली आहे. पूर्ण बघून झालेली नाही.

 4. nikhil bellarykar

  @ सौरभ : मी ती डॉक्युमेंटरी नाही पाहिली, परंतु ऐकले मात्र आहे त्याबद्दल . नेटवर लिंक असल्यास मला fwd करावी ही विनंती . माझा आयडी nikhil.bellarykar@gmail.com हा आहे .
  आपण हडप्पाच्या भाषेबद्दल म्हणालात ते बरोबर आहेच . ठोस पुराव्याभावी नुसता सावळागोंधळ आहे सध्या तरी . २००९ मध्ये कोणी कल्याणरामन नामक संशोधकांनी असा दावा केला की त्यांना हडप्पाचा रोझेटा स्टोन सापडला आहे म्हणून. त्याची लिंक http://www.scribd.com/doc/12752530/mlecchamlecchitavikalpa ही आहे. अर्थात हा दावा mainstream कडून स्वीकारला गेला नाही अजून . असो.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s