माझ्या शाळेसमोरच्या फुटपाथवर एक माणूस चिक्की, गोळ्या विकायला बसायचा. त्याचं नाव बहुधा.., नाही नक्कीच, ‘मारुती’ होतं! दुसरीत असताना आकाशवाणीवर पेटी वाजवली म्हणून त्याने मला दोन गोळ्या भेट दिल्या.. वीस वर्षांनंतर तो मला दत्ताच्या देवळाबाहेर उदबत्त्या विकताना दिसला.. पांढरी दाढी, अशक्त डोळे.. मी जवळ जाऊन हसलो.. त्याने विचारले, ‘तुम्ही संगीतकार कुलकर्णी ना?’.. मी म्हणालो, ‘नाही, मी सलील.. तुम्ही मारुती ना?’
तो ओळखीचं हसला.. निदान मला वाटलं तरी तसं!
दहावीनंतर मोठ्ठी सुट्टी.. रोज सकाळी क्रिकेट आणि मग गुऱ्हाळात बसून उसाचा रस आणि खूऽऽप गप्पा.. गुऱ्हाळाच्या भिंतीवर कृष्ण, हनुमान, विवेकानंद, गांधीजी, अमिताभ, माधुरी आणि चार्ली चॅप्लिन..
..एक दिवस क्रिकेट खेळून पोहोचलो, तर ‘आमचं’ गुऱ्हाळ जमीनदोस्त.. अतिक्रमणविरोधी पथक जोरात काम करत होतं.
..नेहमी आमच्याबरोबर हास्यविनोद करणारा गुऱ्हाळवाला हतबल.. भिंतीवरून सगळे फोटो पाहत होते हे सगळं.. चार्ली चॅप्लिन नेहमीपेक्षा थोडा जास्तच करुण वाटला..
‘ती’ तिच्या निर्णयावर खंबीर होती.. आणि ‘मी’? नेहमीप्रमाणे गुळमुळीत.. पाठ फिरवून निघून गेली. शेकडो मैल दूर.. ‘मी’ आता अगदी सुखात आहे आणि कदाचित ‘ती’सुद्धा असेल.. पण मग एखाद्या अनोळखी नंबरवरून फोन आला तर धडधडतं ते कशामुळे? बहुतेक खूप दगदग चालली आहे म्हणून? आणि काही गाणी गाताना डोळ्यांत पाणी येतं ते का?..
..स्टेजवर खूप लाईट असतात. ते येतात डोळ्यांवर..!
इंग्लंड दौऱ्यादरम्यान स्ट्रॅटफर्ड या शेक्सपियरच्या गावी फिरताना एका रस्त्यावर दोन तरुण गिटार वाजवत बीटल्स गाताना दिसले. मी जाऊन दोघांच्या मध्ये उभा राहिलो आणि त्यांच्या संगीतावर आलापी गाऊ लागलो.. ते ओळखीचं हसले.. पाच मिनिटांनंतर दोघांना शेकहॅन्ड करून निघालो..
ती पाच मिनिटे आम्हा तिघांच्या अंगात एकच रक्त वाहत होते..
– डॉ. सलील कुलकर्णी, म्युजीकली युअर्स, लोकसत्ता, ६ मार्च २०१०
“ती पाच मिनिटे आम्हा तिघांच्या अंगात एकच रक्त वाहत होते.” — ‘यू आर व्हेरी फ़ॉर्च्युनेट, बरं का, धोंडोपंत’ हा ‘असामी’तला किस्सा आठवला. साईबाबाच्या अनेक भक्तांना रोज़ असे अंगात एकच रक्त वाहण्याचे अनुभव येतात. डॉ कुलकर्णींचं लेखन पहिल्यांदाच वाचतो आहे. त्यांचं संगीतही ४-५ मिनिटांवर ऐकलेलं नाही. त्यांच्यातला संगीतकार आणि त्यांच्यातला लेखक या दोघांत जास्त कंटाळवाणा कोण, हे सांगणं कठीण आहे.
कुसुमाग्रज म्हणतात की गांधींच्या पाठीमागे फक्त सरकारी कचेरींच्या भिंती. आणि पुढे त्यांना खोट्या भावनेनी ओथंबलेल्या रडक्या लेखांत ओढून नेणार्या रडक्या लेखकांच्या झुंडी. भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, विवेकानन्द, लता, पु ल, भीमसेन यांच्या नशीबीही या झुंडी भरपूर प्रमाणात आहेत.
मला तुमचा मुद्दा या लेखाच्या संदर्भात नीटसा कळला नाही. म्हणजे सलील कुलकर्ण्यांचे आर्टिकल नाही आवडले ही एक गोष्ट. पण त्याचा दुसऱ्या परिच्छेदातील मताशी असलेला संबंध नाही ध्यानात आला…
त्यात कळण्यासारखं काही नाही; ते उगीच ओढूनताणून लिहिलं होतं.
“गुऱ्हाळाच्या भिंतीवर कृष्ण, हनुमान, विवेकानंद, गांधीजी, अमिताभ, माधुरी आणि चार्ली चॅप्लिन.”
डॉ. सलील कुलकर्णी
– याच्याशी त्याचा थोडा संबंध आहे.
—
dr kulkarni, nice attempt to glorify ur coward nature. had those been knowing about ur blood, they would have preferred to crash the guiter on u than play along. lame attempt to crack such blogging.