आणि गालिब असे मुरारी

शब्दात जादू कशी भरतात? गालिबला विचारा… तो त्यामध्ये माहीर आहे. काय शब्द ते… आहाहाहा… सिक्रेट रेसिपी काय ते कळतच नाही शेवटपर्यंत पण शब्दांचा करिष्मा मनावर लगेच होतो आणि एकदा का झाला की झाला…. त्यातून सुटणे म्हणजे केवळ अशक्य… गालिब म्हणतो तसे ‘हूँ गिरफ्तार-ए-उल्फत-ए-सय्याद’ जाळे टाकणाऱ्या पारध्याच्याच अफेक्शन मध्ये अडकून पडलो आहे… गालिब च्या शब्दांच्या जाळ्यात तर आहोतच पण गालीबाच्याच अनुरागात अडकून जातो… विषय, मांडणी, अर्थाचे अर्थ, अर्थाच्या अर्थाचे अर्थ… अनेक पदर.. अनेक भाषांतरे.. गुस्ताख आणि मिस्चीवस म्हणजे काय ते…(सय्याद च्या शेराचा पुढचा अर्थ अजून पराकोटीचा वेगळा आणि उत्कृष्ट आहे, पण इथे प्रसंगानुरूप अर्धाच भाग घेतला आहे..)

आता हा एक शेर बघा – क्या फ़र्ज़ है की सबको मिले एक सा जवाब, आओ ना हम भी सैर करे किसी तूर की….

काय अर्थ कळला? काय कर्तव्य आहे की सगळ्यांना एकसारखेच उत्तर मिळेल? या, आपण एकदा तूर वर फिरून बघू… याचा अर्थ तूर म्हणजे काय ते माहित असल्याशिवाय कळणार नाही.. गालिब ची खासियत म्हणजे बऱ्याचदा महत्वाचा शब्द शेवटी येतो.. सिनेमा बघतो आहोत आणि शेवटी हिचकॉक ने डायरेक्ट केलेला ट्रेल/मारामारी चा सीन यावा आणि उत्कंठा वाढावी तसं या शेराचे आहे… शेवटचा शब्द येई पर्यंत पुढे काय पुढे काय असा गेस करतो आणि ‘तूर की’ म्हटले की नकळत ‘वाह वाह’ ची दाद देतो..

ज्यांना इस्लाम चा इतिहास माहित असेल किंवा ज्यांनी ओल्ड टेस्टामेंट वाचले असेल त्यांना तूर म्हणजे काय ते पटकन लक्षात येईल… कोह-ई-तूर म्हणजे तूर नावाचा पर्वत. याचा उल्लेख कुरआन मध्ये आहे. आणि Mount Sinai/Horeb याचा उल्लेख जुन्या करारात आहे. सिनई म्हटले की इस्रायेल आठवते.. ज्यू लोकांचा या भागाशी इतका घनिष्ट संबंध आहे की बस… गेल्या अर्धशतकातच तीनदा युद्ध झाले या भागात.. पहिल्यांदा गमाल अब्दुल नासरने जेव्हा सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले तेव्हा.. ( बहुधा ६० च्या आधी).. नंतर सगळ्यात फेमस सहा दिवसांचे युद्ध (६७)..डेव्हिड बेन गुरियन तेव्हा राजकारणातून कमी झाले होते आणि गोल्डा मायर यायची होती…प्रचंड राडा झाला होता..आणि तिसरे युद्ध म्हणजे ७३ चे अरब इस्रायली युद्ध… इस्रायल ला जन्माला आल्या आल्या पहिल्याच २५ वर्षात खूप युद्ध करावी लागली… असो..तर हे सगळे जिथ घडले त्याला सिनाई चा पेनन्सुला म्हणतात.. तिथेच हा सिनाई चा पर्वत आहे..

मोझेस ला जिथे १० कमांडमेंटस मिळाल्या तीच ही जागा.. जिथे परमेश्वराने दर्शन दिले.. मोझेस तिथे दोनदा गेला.. पहिल्यांदा काही चूक केली आणि दुसऱ्यांदा परत जावे लागले… त्याचे प्रेषितत्व पणावर होते.. ते सिद्ध करायचे होतेच त्याव्यतिरिक्त त्याने देवाला दर्शन द्यायचे आव्हान केले होते.. अग्नी-धूर-उष्णता वगैरे रूपानेच परेमेश्वर आला नि हे १० कमांडमेंटस मिळाल्या.. हिब्रू लोकांचे तेव्हा इजिप्त मधून अरबांच्या मुख्य भूमीकडे स्थानांतर(एक्झोडस) चालले होते… मोझेस च्या क्वेस्ट ला अनेक कारणांमुळे हे उत्तर मिळाले खरे.. पण प्रत्येकाला हेच उत्तर मिळेल असे नाही… क्या फ़र्ज़ है की सबको मिले एक सा जवाब? इथे ‘फ़र्ज़’ म्हणजे प्रत्येकाला तेच उत्तर मिळणे कंपल्सरी नाहीये या अर्थाने तर आहेच आहे पण हिडन अर्थ अजून एक म्हणजे पर्वतावर जाण्याचे ‘फ़र्ज़’ मात्र प्रत्येकाचे आहे… काय रूपक आहे ते… प्रत्येकासाठी आयुष्य म्हणजे एक कोह-ई-तूर आहे… तो चढणे, त्या आगीला तोंड देणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे… पण उत्तर एकसमान येणे कर्तव्य नाहीये… अर्थात हे रूपक असे मला असे दिसले.. याचे अनेक कंगोरे निघू शकतील…

आता येतो पुढच्या ओळीकडे… ‘सैर करे’… म्हणजे सहज फिरायला गेल्यासारखे… भटकून येऊ… बघून तर येऊ काय आहे ते.. काय बरे असेल? अनुभव घेऊन बघितला पाहिज एकदा… उत्सुकता आहे, उत्कंठा आहे.. पण मोझेस सारखे सर्व पणाला लावले नाहीये… उत्तराची अपेक्षा नाहीये… सहज भटकून येऊ काय दिसते ते.. इथे मला थोडासा ‘कर्मण्येवाधीकारस्ते’ चा वास येतो.. उत्तराच्या शोधात नका जाऊ… पण थोडासाच… जाणे तर फर्ज आहे पण ते कसे, तर सहज गेल्यासारखे…

असा विचार करा, मोझेस ला पहिल्यांदा अपयश आले, तुम्हाला येईलच कशावरून? आणि मोझेस ने आगीतून पण १० कमांडमेंटस आणल्या.. तुम्ही जळून नाही जाणार कशावरून? आणि सगळ्यात विचित्र अनालोजी निघते ती म्हणजे – मोझेसला ज्या १० कमांडमेंटस मिळाल्या त्या तर तुम्हाला माहित आहेतच… पण तुम्हाला त्याच कमांडमेंटस मिळतील कशावरून? तो मोझेस चा दृष्टीकोन होता, त्याच्या शोधला देवाने त्याला दिलेले उत्तर होते..  आणि म्हणून त्यःचा धर्म होता…तुमचे फल वेगळे असू शकते…मोझेसच्या कृतीचे अनुसरण करा, त्याच्या १० कमांडमेंटसपेक्षापण…

पण या सगळ्यातले गालिब काहीच सांगत नाही.. तो फक्त म्हणतो की ‘आओ ना, हम भी सैर करे’ याला म्हणतात काहीच ना सांगून खूप काही सुचवून जाणे…. गालिब चा एकेक शेर म्हणजे आरसा असतो. तुमचा आकलनानुसार आणि प्रवृत्तीनुसार त्याचे अनेक अर्थ बदलतात… आयुष्य अनुभवायची चीज आहे, प्रत्येकाने उपभोगून बघावे असे कोणी म्हणेल तर कोणाला यात गडकर्यांच्या आयुष्याच्या पेला दिसेल जो ‘पिता बुडाशी गाळ दिसे, अनुभव त्याचे नाव असे’ तर कोणाला ‘जने जाऊ द्या मरणालागुनी’ त्यामुळे प्रत्येकाचे नियम, त्याचे विचार, आचार, श्रद्धा या स्वतः ठरवाव्यात असे सुचवले आहे असे वाटेल तर कोणाला अजून काही…. मी तर मर्ढेकरांचे पसायदान थोडेसे बदलून म्हणेन – ‘विविध अर्थांना या अंत नाही, आणि गालिब असे मुरारी’


2 thoughts on “आणि गालिब असे मुरारी

 1. सौरभ

  मस्त लेख… तुझे उर्दूचे काम जोरात चालले आहे वाटते.

  बाकीचा सगळा इतिहासही वाचनीय…..

  इतरही लेख वाचले. एक(उनाड)अमेरिकन दिवस, क्रिकेट आणि अमेरिका…. भन्नाट!

  आवडले.

  • Nikhil Sheth

   अरे उर्दूचे काम कसले रे? फुटकळ वाचन चालू आहे झाले… पण गालिब म्हटले की कसे कोण उस्तादाचे नाव घेताना शागीर्द डाव्या हाताने कानाला पकडतो आणि जीभ चावतो तसे होते….. शब्द बापुडे केवळ वारा असले तरी त्या वाऱ्याचे सामर्थ्य जाणवते…

Nikhil Sheth साठी प्रतिक्रिया लिहा उत्तर रद्द करा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s