ध चा मा!!!

नारायणराव पेशव्यांच्या खुनाच्या वेळी गारद्यांना दिलेल्या आज्ञापत्रात मुदलात “रावांस धरावे” असा उल्लेख होता. तो बदलून आनंदीबाईंनी “रावांस मारावे” असा केला आणि मराठी दौलतीचे धनी (आणि पुढे दौलत सुद्धा) आपल्या निम्म्या गोवऱ्या स्मशानी जाते पाहती जाहले. हा इतिहासाचा भाग एक सत्य-कथा आहे की प्रक्षिप्त(?) हा एक संशोधनाचा विषय आहे. पण या घपल्याहूनही आणखी एक विषय आहे जो की बऱ्याचदा हाताळला जात नाही आणि तो म्हणजे सांप्रत मराठी ऐतिहासिक साहित्यातून होणारे ध चे मा! अर्थात ऐतिहासिक कादंबरी लेखकांच्या ऐतिहासिक चुका!

मराठीत मुदलात ऐतिहासिक असे लिखाण होत नाही (इथे मराठी वाचक चवताळून उठण्याची शक्यता जास्त आहे. पण मी इथे न वाचल्या जाणाऱ्या थेसिस विषयी बोलत नसून समाजापर्यंत पोहोचणाऱ्या ऐतिहासिक लिखाणाचा अर्थात कादंबऱ्यांचा उहापोह करीत आहे.). कोणे एके काळी भारतीय अस्मिता जागविण्याच्या (मराठी) प्रयत्नांचा भाग म्हणून हरी नारायण आपटे, नाथ माधव प्रभृतींनी लिहिलेल्या कादंबऱ्या ह्या त्या बाबतीत आद्य होत. त्यानंतर ही धुरा रणजीत देसाई, शिवाजी सावंत ह्यांनी सांभाळली. सध्या विश्वास पाटील आदि मंडळी हा भर उचलीत आहेत. पण हा भार उचलताना त्या भाराचा ‘भारा’ कधी झाला ह्याचा पत्ता ह्यातील बऱ्याच लेखक मंडळीना लागला नाही असे खेदाने म्हणावे लागते.

सर्वात प्रथम हा विषय उपस्थित करण्याचे प्रयोजन. मुळात इतिहास हा क्लिष्ट पण पुराव्यांवर आधारित थेसिस मधून उकलला जात असला तरी तो समाज-मनापर्यंत पोहोचतो तो कादंबऱ्यांच्या माध्यमातून. साधी-सोपी आणि साहित्यिक चमत्कृतिनी भरलेली कादंबरी ही एखाद्या थेसिस पेक्षा केंव्हाही आकर्षक आणि मनोवेधक असतेच आणि म्हणूनच इतिहासाकडे पाहण्याचा, आपल्या मनातली इतिहासाबद्दलची उत्सुकता शमवण्याचा सामान्य माणसासाठीचा एक सोपा मार्ग देखील असते. पण इथेच सावधगिरीची गरज असते. कारण कादंबऱ्यांच्या माध्यमातून नकळतपणे लोकांच्या मतावर आणि त्यांच्या एकंदरीत विचारसरणीवर लेखकाच्या विचारसरणीचे संस्कार होण्याचा संभव असतो. ह्यातून जे काही साध्य होते ते म्हणजे इतिहासाचे मूळ स्वरूप बदलणे. ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे पानिपतचे तिसरे युद्ध. १७६१ साली पानिपत येथे मराठे आणि अब्दाली- जो की अफगाणीस्तानचा बादशहा होता- ह्यांच्यात तुमुल रणसंग्राम झाला. ह्यात अस्मानी आणि अब्दाली-पुरस्कृत संकटांनी हैराण मराठी फौजांची अफगाण फौजांनी धूळधाण उडवली. ह्यात मराठी फौजांनी जरी अतुलनीय पराक्रम गाजवला, तरी त्यांचा पराभव झाला. त्यांचा नेता सदाशिवरावभाऊ (उर्फं भाऊ) हा मरण पावला. तसेच मल्हारराव होळकर, शिंदे आदी वीर मराठे सरदार कसेबसे पळून आले. त्यानंतर ‘भाऊची बखर’ ह्या नावाने एक बखर प्रकाशित झाली. ह्यात होळकरादी लोकांचे ‘कर्तृत्व’ लपवण्यासाठी सदाशिवरावभाऊ हाच कसा पराभवास जबाबदार होता हे ठसविण्यात आले. ह्यामागे प्रस्तुत बखरीचा लेखक हा होळकर समर्थक अगर त्यांच्या दरबारीचा असावा असा प्रवाद आहे. कारण जरी ‘भाऊ हा एक कणखर सेनापती म्हणून पुढे न येता एक विचारी प्रशासक म्हणून दिसतो’ (पानिपत १७६१, लेखक त्र.शं. शेजवलकर. उद्गार जसेच्या तसे उद्घृत करता आले नाही ह्यासाठी दिलगीर.) असे जरी शेजवलकर आणि इतर बरेच इतिहासकार जरी म्हणत असले तरी ते भाऊवर कोसळलेल्या अडचणी ह्या ही तितक्याच मती कुंठीत करणाऱ्या होत्या हे अमान्य करीत नाहीत. भाऊचे कर्तृत्व ह्या अडचणीपुढे फिके ठरले, ही बाब बखरकार मांडीतच नाही. पुढे मात्र दुर्दैवाने बखरकाराचेच मत ग्राह्य धरले गेले आणि भाऊ -जो की पानिपतचा नायक होता (अगदी शत्रूच्या दृष्टीनेही)- तोच स्वकियांकडून आततायीपणाचे बिरूद मिळविता झाला. समाजमनावर होणारे साहित्याचे परिणाम सांगण्यासाठी पानिपतइतके बोलके उदाहरण दुसरे नाही. असे म्हणायचे कारण साधने असूनही, प्रत्यक्षदर्शी लोक उपलब्ध असून देखील त्यांचा अभ्यास न करता इतिहास (मग तो कोणेही कारणाने का असेना) चुकीच्या स्वरुपात, मोडतोड करून सांगितला गेला. आणि सांगायचे माध्यम लोकप्रिय असल्याने ह्या विचारांचे गारूड लवकरच समाजमनावर पसरले. समाज -मग तो कितीही सुशिक्षित का असेना- अश्या गोष्टींवर सहजी विश्वास ठेवतो. निव्वळ पानिपत हा एकच दाखला नव्हे.

विसाव्या शतकात साधारण ७० च्या दशकात एका माणसाला ‘कर्ण’ ह्या एका पात्राने झपाटले होते. हा माणूस कर्णावर लिहिण्याच्या ध्यासाने इतका झपाटला की त्याने कर्णाचे पाय जिथे जिथे लागले तिथे तिथे याने आपली पायधूळ झाडली.  अजरा गावी जन्मलेल्या ह्याच माणसाने साकारला एक अजरामर मराठी साहित्याविष्कार- “मृत्युंजय” आणि तो माणूस होता शिवाजी सावंत. एक कादंबरी म्हणून मृत्युंजय हा एक कोहिनूर आहे ह्यात शंका नाही. तत्वज्ञान, वातावरण-निर्मिती; मनाचे,त्यातील भावनांचे चित्रण, शब्दांची सूक्ष्म निवड ह्या साऱ्या गोष्टी “मृत्युंजय”ची वैशिष्ट्ये आहेत. पण असे असले तरी मृत्युंजय ही एका बाबतीत कमी पडते, आणि ते म्हणजे इतिहासाचे चित्रीकरण. माझ्या ह्या वक्तव्याला अनेकांचा आक्षेप असू शकतो आणि तो असा की मुळात ह्या कादंबरीमध्ये ही कर्णाची कादंबरी आहे ही गोष्ट स्पष्ट आहे. त्यामुळे जी काही वर्णने आहेत ती कर्णाच्या दृष्टीकोनातून आहेत. परंतु, माझा आक्षेप ह्या पुढचा आहे. कादंबरी कर्णाची आहे ही गोष्ट मान्य. अतएव, कर्णाने अलम दुनियेला शिव्या देणे ही गोष्ट सुद्धा मान्य. पण सावंतानी ज्या पद्धतीने ह्या एकंदरीत कादंबरीची मांडणी केली आहे – म्हणजे कुंती, कृष्ण, वृषाली, दुर्योधन ह्यांच्या मनोगतांच्या स्वरुपात- ती मांडणी कर्णाची लेखकाने कल्पिलेली बाजू आणि व्यासांनी मांडलेली बाजू ह्या दोन्ही बाजूंचा उहापोह करण्याचे सामर्थ्य लेखकाला देण्यास सक्षम आहे. पण असे असूनही कित्येक गोष्टी नजरेआड झालेल्या दिसतात. महाभारताच्या वेळी कर्णाने केलेला भीमाचा पराभव जितक्या ओळीत रंगविला आहे तितक्या शब्दात देखील पांडवांच्या दिग्विजयाच्या वेळी  भीमाने केलेला कर्णाचा पराभव लेखक मांडत नाहीत. व्यासांनी जे विजय धनुष्य (हे कर्णाच्या धनुष्याचे नाव होते.)भीमाच्या हाती महाभारत युद्धात ४५ वेळा तोडवून घेतले आहे ते लेखकाने अभंग ठेवले आहे. अतएव, भीमाला शिव्या देणे आणि कर्णाची (वस्तुस्थिती जाणून न घेता) स्तुती करणे अशी एक नवी फेशन त्या काळात रुजू झाली. वृकोदर – अर्थात ज्याचे पोट लांडग्यासारखे खपाटी गेले आहे असा (अर्थात सांप्रत भाषेत सिक्स पेक एब्सवाला) – भीम वक्रोदर- अर्थात ढेरपोट्या- म्हणून ओळखला जाऊ लागला. अर्थात हा काही फक्त सावंतांचा दोष नाही. महाभारताच्या ज्या काही शे-पाचशे (मला नक्की आकडा ठावकी नाही) स्थानिक आवृत्या देश-विदेशात निघाल्या त्यात भीम हा “खायला काळ, भुईला भार” अश्या सोडल्यास इतर स्वरुपात दिसत नाही. व्यासांनी रंगवलेल्या वृकोदर, सर्व-शस्त्र-पारंगत, आणि पांडवात सर्वात तर्कशुद्ध विचार करू शकणाऱ्या भीमावर तुंदिलतनु, गदाधारी, रासवट भीमाची छबी अशी काही चिटकली की ती सुधारणे अवघड आहे.

जी गोष्ट ‘मृत्युंजय’ ने भीमाच्या बाबतीत साध्य केली तीच गोष्ट ‘घाशीराम कोतवाल’ने नाना फडणवीस यांच्या बाबतीत करून दाखवली. नाना हे बाहेरख्याली (किंवा विश्वास नांगरे-पाटील यांनी आपल्या आई. ए. एस. इंटरव्हेऊ मध्ये सांगितले तसे- बिहाईन्ड वूमन) प्रतिमेचे होते. पण असे असूनही त्यांनी कधी बेअमली केली ह्याचा पुरावा नाही. प्रस्तुत नाटकावरून, नाना हा केवळ पुण्यातील स्त्रियांचा माग काढीत हिंडणे ह्या एकच कामाचा पगार पेशवे दप्तरातून घेत होता असा अनेकांनी समाज करून घेतला. वास्तविक ज्याच्या न झडणाऱ्या डंक्यांचे आवाज फिरंगी इंग्लंडात बसून ऐकत होते त्याच्या कर्तृत्वाचे इतर पैलू जगासमोर येण्याऐवजी हा एकच पैलू समोर आणला गेला. पुन्हा माध्यम देखील लोकप्रिय. अतएव साहित्याने इतिहासावर मात करणे जरूर होते

माझे हे एकंदरीत विवेचन वाचून लोकांची अशी खात्री झाली असेल की मी हे केवळ माझ्या वैयक्तिक आवडीनिवडीना धक्का लागला म्हणून आहे. परंतु माझा हेतू वेगळाच आहे. भारताच्या ज्या ज्या वेळी चुकीचे आदर्श समोर आणले गेले, आणि एकंदरीत इतिहासाची प्रतारणा झाली, त्या त्या वेळी देश संकटात सापडला. घोरीला सोडते वेळी पृथ्विराजाने युधिष्ठिराचा आदर्श बाळगला आणि नागवला गेला. ब्रिटिशांनी भारतात सत्ता स्थापन करतेवेळी आधी इथल्या लोकांचा बुद्धिभेद केला. त्यासाठी इथल्या इतिहासाचे विचीत्रीकरण करण्यात आले. ऐतिहासिक व्यक्ती, घटना ह्यांचा चुकीचा अन्वयार्थ लावण्यासाठी लोकांना प्रेरित केले गेले. आता देश जागतिकीकरणाच्या उंबरठ्यावर आहे, किंबहुना आपण माप ओलांडले आहे. जगाला एक खेडे म्हणताना आपण खेड्यात घरकुल उभारले आहे, धर्मशाळा नाही,अतएव ओळख जपणे ह्या खेरीज इतर पर्याय नाही ही गोष्ट ध्यानी, मनी, स्वप्नी असू द्यावी. आणि ह्यासाठी विचारांनी -मग ते आपल्या राष्ट्रीय वीरांचे समर्थक का असेना – इतिहासावर प्रभाव पडू ना देणे हे’च’ इष्ट आहे. कारण मूळ आणि शुद्ध स्वरूपातील इतिहास हाच भावी पिढ्यांना प्रेरक, मार्गदर्शक आणि उद्बोधक ठरतो.

अश्या अनेक चुका आहेत, त्यांचा समाचार पुन्हा केंव्हातरी !

इति लेखनसीमा

मर्यादेयं विराजते

श्रीनिवास

12 thoughts on “ध चा मा!!!

 1. Naniwadekar

  श्रीनिवास याडकीकर साहेब : लेख अ‍ुत्तम आहे.

  मुळात कर्ण नावाची व्यक्ती प्रत्यक्षात होती का याविषयी खात्री नसताना शिवाजी सावन्तांनी नक्की कुठे, कशी आणि का पायधूळ झाडली याची माहिती कुठे मिळेल? सावन्त हा थापेबाज़ माणूस होता, असे त्यांच्याशी थोडा संबंध आलेला माझा अ‍ेक मित्र म्हणतो. ‘मृत्युंजय’ ही मी वाचलेली एकमेव अ‍ैतिहासिक कादम्बरी असावी. मी तेव्हा ८-८.५ वर्षांचा होतो; आता काहीही आठवत नाही. दहाच्या वर वय असलेल्यांना ती कादम्बरी वाचण्यासारखी आहे का, हे पाहण्याचा विचार होता. तेव्हा मित्रानी माझे मन लेखकाविषयी कलुषित केले. एकदा ती कादम्बरी चाळावी लागणार.

  कर्ण हा त्या काळचा रामविलास पासवान होता. (सन्दर्भ : ‘कालिदास हा त्या काळचा ना सी फडके होता.’ – दुर्गा भागवत.) राज्य मिळाले, राजाशी खास मैत्री होती, दोन बायका होत्या आणि पाण्डव बिचारे विषप्रयोग, लाक्षागृह, केलेल्या बायकांपैकी अ‍ेक द्रौपदी सोडून इतर बायांपासून दूर वनवास, ती द्रौपदीही एक पंचमांशही मिळेना असा वर्षभराचा अज्ञातवास वगैरे भोगत होते. पण ‘जग आपल्याला सहानुभूती, सत्ता, आरक्षण वगैरे देऊ लागते’ याबद्‌दल कर्ण पासवानांसारखाच नि:शंक होता.

  – नानिवडेकर

  • Nikhil Sheth

   या ब्लॉगवर नानिवडेकर यांच्याकडून काहीही चूक ना काढता कौतुकाचे बोल मिळवण्याचा पराक्रम केलास, याड्या… ग्रेट.

   • Naniwadekar

    शेठ साहेब : न पटणारी अशी काही वाक्ये वाचली, पण त्याबाबत लिहण्याची इच्छा झाली नाही.
    ‘पांडवात सर्वात तर्कशुद्ध विचार करू शकणाऱ्या भीम’ — याला आधार काय हे माहीत नाही. भीम आततायी होता आणि युधिष्ठिरानी पायाचा अंगठा दाबून ठेवला तर दांडगाई करायची नाही ही त्याला कुन्तीची ताकीद होती. द्रौपदी नीतीविषयक वाद घालत असे तो युधिष्ठिराशी, असा ‘व्यासपर्व’ मधे उल्लेख आहे. ‘जितेन्द्रियं, बुद्‌धिमताम्‌ वरिष्ठम्‌’ असा हनुमानाचा उल्लेख आहे खरा, पण अशा गोष्टी श्लोकांत टाकल्या ज़ातातच. हनुमान आणि भीम हे दोघेही पवनपुत्र धसमुसळे.

    ‘भारताच्या ज्या ज्या वेळी चुकीचे आदर्श समोर आणले गेले, आणि एकंदरीत इतिहासाची प्रतारणा झाली, त्या त्या वेळी देश संकटात सापडला.’ — तत्कालीन स्थितीत चुकीचे निर्णय घेतले तर त्याचा परिणाम वाअ‍िट होण्याचीच शक्यता असते. त्याचा अ‍ितिहासाच्या प्रतारणेशी सम्बन्ध असतोच असे काही नाही. पण ‘आपण अ‍ितिहासाशी प्रतारणा करतो, म्हणून असे आहोत’ हे वाक्य कानाला गोड वाटते.

 2. प्र. के. फडणीस

  कर्णाला हीरो बनवण्याची एक लाट येऊन गेली. खुद्द महाभारतात कर्णाचे चित्रण कसे केले आहे याबद्दल्चे माझे विस्तृत विवेचन माझ्या http://www.mymahabharat.blogspot.com या ब्लॉगवर आपण वाचावे असे सुचवतो.

 3. Nikhil Bellarykar

  लेख उत्तम आहे हे निर्विवाद . आणि ह्या लेखाच्या माध्यमातून इतिहासाचे विश्लेषण , आणि बऱ्याच वेळेस केला जाणारा अर्थाचा अनर्थ या मुद्द्यांचा
  परामर्श घेतला आहे. ही गोष्ट परम आवश्यक असूनही कोणी फारसे तिकडे लक्ष देत नाही. विशेषतः इतिहासाचे मन मानेल तसे अर्थ लावून भांडणे
  करणार्यांच्या या काळात तरी असे प्रयत्न अत्यावश्यक आणि अतएव स्तुत्य आहेत.
  माझी श्रीनिवास ला विनंती अशी आहे की त्याने हा मुद्दा अजून विस्ताराने आणि खोलवर मांडावा . ते हितकर आणि रुचकर दोन्हीही होईल.

 4. shreenivas

  प्रिय/माननीय नानिवडेकर,
  लेखाला मिळालेली आपली प्रतिक्रिया वाचली. सुज्ञ आणि जिज्ञासू वाचकांनी जे प्रश्न विचारावे तेच आपण विचारले. किंबहुना असे प्रश्न समोर यावेत हा विचार समोर ठेवूनच ह्या लेखाचे प्रयोजन केलेहोते.
  आता मुख्य मुद्दा. भीमाची एकंदरीत मनोवृत्ती. भीम हा तर्कशुद्ध विचार करणारा होता हे सांगण्याचे कारण- महाभारत युद्धाच्या पूर्वी कृष्ण आणि भीम असे दोनच योद्धे युद्ध करावे असे म्हणत होते. महावीर अर्जुन, रूपवान नकुल आणि सहदेवादी पांडव युद्ध नको म्हणत होते. युद्धात ज्याची बुद्धी स्थिर असते असे ज्याविषयी सांगितले जाते तो युद्धिष्ठिर हा तर युद्धच नको, मी सन्यास घेतो असे म्हणून गेला. परंतु राज्य हे मागून मिळत नसते तर ते मिळवावे लागते हा विचार जाणून, भीमाने युद्ध करावे असे सुचवले. ह्यात आपणास भीम हा युद्धखोर होता असे म्हणण्यास जागा आहे,परंतु, हेच वाक्य म्हणणारा भीम शिष्टाईला जातेवेळी कृष्णाला पदोपदी ‘युद्ध हा अगदीच निरुपाय झाल्यास योजायचा उपाय आहे’ असे सांगतो. भीमाच्या ह्या वागण्याला आततायीपणा म्हणावे का? दुसरी गोष्ट, हिडींब राक्षसाचा वध केल्यानंतर भीमाने त्याच्याशी विवाह करण्यास आलेल्या सुंदर-रूपधारी हिडीम्बेची केवळ शाब्दिक निर्भत्सना केली. असाच प्रसंग गुदरल्यावर रामायणातील लक्ष्मणाने काय केले ते स्मराल काय बरे? मग भीम हा तर्कशुद्ध विचार करणारा नाही काय? तिसरा दाखला आहे तो राजसभेत द्यूत खेळण्या-प्रसंगीचा. ह्या प्रसंगी द्यूत खेळायला जातेवेळी भीमाने युधिष्ठिरास पदोपदी द्यूत नको असे बजावले. हा भीम अविचारी म्हणावा का? आणि कथा -मग ती प्रक्षिप्त का असेना- बरोबर सांगितलीत नानिवडेकर. पण तपशिलाचा घोळ करते झालात. अंगठा वर उचलल्याखेरीज पढे जाऊ नये हि मर्यादा फक्त भीमास नव्हती. ती सर्व पांडवास होती. अतएव सारे पांडव झाडून आततायी आणि युद्धखोर आहेत असा अर्थ घ्यावा लागेल. नाही का? पण असे वर्णन तर आढळत नाही! होय ना? आपण बऱ्याचदा ऐकीव वर्णनावर जातो, नाही का?
  भीमासंबंधी आणखी माहिती हवी असेल तर पद्माकर विष्णू वर्तक ह्यांचे स्वयंभू हे पुस्तक वाचावे. लेखकाविषयी आपण ऐकले अगर वाचले असेल तरी ती नजर मध्ये ना आणता हे पुस्तक वाचावे.

  आता पुढील प्रश्न: कर्ण होता की नाही? माझे ह्या बाबतीत असे मत आहे की होय, कर्ण हे पत्र महाभारतात होते’च’ (च ला ठळक केले आहे हे ध्यानी असू द्यावे.). आता कसे हे आपण विचाराल, तर महाभारतातील उल्लेख सोडले तर इतर ठिकाणी कर्णाचा उपमा सोडल्या तर उल्लेख नाही. राधेच्या प्रक्षिप्त पात्राविषयी मात्र असे उल्लेख बरेच आहेत. (मी “ऐतिहासिक प्रेमकथा” ह्या विषयावर नुकतेच एक व्याख्यान दिले होते, त्यात हा मुद्दा समाविष्ट केला होता.) अतएव, कर्ण हे पत्र प्रक्षिप्त नसून ते महाभारताच्या maternity होम मध्ये जन्माला आले होते हा प्रवाद मान्य केल्याखेरीज उपाय नाही. (प्रस्तुत वाक्य आक्षेपार्ह वाटल्यास दिलगीर.)
  नानिवडेकर साहेब, ह्याखेरीज आपण फडणीस साहेबांनी लिहिलेले विवेचन वाचावे अशी मी आपणास विनंती करेन. अर्थात ह्यात भीमाच्या संदर्भाने थोडे आलेले असले तरी कर्णाच्या संदर्भाने खूप काही आहे.
  काही चूक झाली असल्यास माफी असावी.
  मर्यादेयं विराजते
  इति लेखनसीमा
  श्रीनिवास

  • Naniwadekar

   श्री याडकीकर : राम काय, रावण काय, कृष्ण काय, भीम काय, टिळक काय, किंवा नेहरु काय, या कोणाहीविषयी त्या माणसाला दूरद्‌ऋष्टी कशी होती वा कशी नव्हती याविषयी थोडेफार सहज़ ठोकून देता येते. तो झाला निव्वळ शब्दांचा खेळ.

   युधिष्ठिराचा अंगठा इतर पाण्डवांना मार्गदर्शक ठेवला होता का, हा मला वृथा वाद वाटतो. तो अंकुश भीमावर होता, हा मुद्‌दा भीमाच्या विचारक्षमतेच्या बाबत महत्त्वाचा. यक्षाचे प्रश्नही भीमाला सुटले नाहीत म्हणून त्याला यक्षानी मारला किंवा खिशात टाकला. युधिष्ठिरानी यक्षाशी तर्कशुद्‌ध चर्चा केली आणि भावांना परत आणले. भीम अर्जुनाप्रमाणे भावजीवी नव्हता, ढोबळ होता असे दुर्गाबाई भागवत लिहितात. बाईंची प्रत्येक गोष्ट आपण मानलीच पाहिजे असे अजिबात नाही. पण मला बाअ‍ींचा हा मुद्‌दा पटतो. मी ऐकले आहे ते असे : ‘भीमाज़वळ शौर्य होते. युधिष्ठिराज़वळ कमी प्रमाणात पण शौर्य होते आणि विवेकही होता. अर्जुनाज़वळ शक्तीही होती, युक्तीही होती, आणि भक्तीही होती. म्हणून, पाण्डवानाम्‌ धनंजय:’. मला संस्कृत कळत नसल्यामुळे मी व्यासाला प्रत्यक्ष वाचू शकत नाही. त्यामुळे यापलीकडे वाद घालायची माझी अ‍िच्छाही नाही, आणि क्षमताही नाही.

   कर्ण हे पुढे कोणी घुसवलेले पात्र असू शकेल, अशी मला अजिबात शंका नाही. मुळात महाभारत झाले होते का, याची मला कल्पना नाही. एकाच कुन्तीला तीन (वा चार) कर्तबगार मुले झाली, एका गांधारीला शंभर मुले झाली, यावरून हा व्यासाचा कल्पनाविलास वाटतो. त्याला सत्याचा कमीजास्त आधार असेलही वा नसेलही. प्रत्यक्षात सर्व कर्तबगारी एकाच कुटुंबात दिसते ती फक्त चाउजेस्कू-च्या रुमेनियात, किम जॉङ्‌ग इल च्या कोरियात, सद्‌दाम हुसेनच्या इराक़मधे वा सोनिया गांधींच्या भारतात. व्यासाला हे मॉडेल मान्य होते, असे वाटते.

   ‘बघा हो मी कसा कर्णाचा ध्यास घेऊन त्याच्या पावलांचा मागोवा घेतला’ हा मला प्रचारकी प्रकार वाटतो. त्यावर माझा प्रतिसाद म्हणजे: ‘त्याचा आनन्द आहे. पुढे काय तो बोला.’ असे लोक जेव्हा बोलू लागतात तेव्हा बरेचदा आनन्दीआनन्द ऐकायला मिळतो. अशा वेळी त्या विषयात फार चर्चा करण्यात फक्त वेळ वाया ज़ातो. याचा अर्थ असा नाही की सावंतांचा छान कादम्बरी लिहिल्याबद्‌दल आदर करू नये. पण एका विषयाने झपाटलेले लोक मला बरेचदा एका विशिष्ट मर्यादेपलिकडे कंटाळवाणे वाटतात.

   – डी एन

 5. अश्विनी

  मृत्युंजय एक कादम्बरी म्हणून निःसंशय सुंदर होती. तिची पारायणं मीही ’भारल्या जाण्याच्या वयात’ केली होती. पण बायस्ड इतिहास हा मलाही नेहमी विचारात पाडणारा विषय आहे. सावरकरांनी लिहीलेले सहा सोनेरी पाने पुस्तक सुद्धा अहिंदुत्ववाद्यांना ’भगवे’ वाटते.
  इरावती कर्वे यांची महाभारतावरील पुस्तकेही उल्लेखनीय आहेत.
  खरेच यावर अधिक चर्चा झाली तर मनं उजळायला मदत होईल!

 6. shreenivas

  प्रिय/माननीय नानिवडेकर,
  उशिरा उत्तर देतो आहे त्याविषयी क्षमस्व. प्रथम आपण जो मुद्दा मांडलात ज्या अनुषंगाने अंगठा हा केवळ भीमाला मार्गदर्शक ठेवला होता असे आपण विधान करता. माझ्या मते, आपण ह्या विषयावर वाद घालताना सर्वात आधी आपण जे महाभारत वाचतो त्याची व्युत्पत्ती समजून घेतली पाहिजे.
  आपण जे महाभारत सध्या वाचतो ते न व्यासांचे आहे न शुकाचार्यांचे. साधारणता: १५ अगर १४ व्या शतकात ‘नीलकंठ’ ह्या एका पंडिताने भारतभर फिरून जी काही वेगवेगळी महाभारताची विविध स्थानिक रूपे त्या काळात प्रस्थापित होती त्यांचे संकलन करून त्यानुसार आपली हि प्रत सिद्ध केली. अतएव, आपण एक गोष्ट महाभारताच्या अनुषंगाने नेहेमी लक्ष्यात घेतली पाहिजे कि ह्यात प्रक्षिप्त गोष्टीनी मूळ कथेवर इतकी पुटे चढवली आहेत कि त्यातून मूळ कथेचा गाभा सापडणे मुश्कील.
  आता आपण भीमाच्या दूरदृष्टी विषयी. सर्वात प्रथम आपण जे “शब्दांच्या खेळाविषयी” बोललात त्याविषयी. एखाद्या व्यक्तीच्या दूरदृष्टीविषयी आपण काहीही बोलू शकतो हे आपले मत मला पटत नाही. किंबहुना ऐतिहासिक पात्रे आणि त्यांच्या विषयीच्या नोंदी ह्यांच्या माध्यमातून आपण त्यांच्या दूरदृष्टीविषयी आपण निखालस असे विधान करू शकतो. आपण ज्या उदाहरणच द्यायचे झाले तर संपूर्ण जग एका माणसाच्या अधिपत्याखाली येईल असे विधान करणाऱ्या हिटलरला आपण दूरदृष्टीने युक्त म्हणता का? अतएव, त्या व्यक्तीच्या विषयीच्या नोंदी, अगर त्या पात्राची रचना (आपण महाभारताला एक कथा मानता असे आपले मत गृहीत धरण्यासाठी.) ह्याच्या आधारे कथन केलेले विधान निव्वळ “ठोकाठोकी” ह्या संज्ञेखाली जमा करता येत नाही.
  आता पुढील मुद्दा अर्थात युधिष्ठिराकडे असणाऱ्या (सो कॉल्ड) विवेकासंबंधीचा. आपला विवेकी युधिष्ठीर द्यूताच्या प्रसंगी आपला विवेक कुठे विसरून आला होता का हो? “मला युद्ध नको, मी सन्यास घेऊन हिमालयी जातो” असे म्हणणारे आपले प्रिय युधिष्ठीर विवेकी म्हणावे कि भेकड? राजाने विवेकी असावेच पण म्हणून फक्त विवेकीच असू नये. शत्रूला दया दाखवणे, ही चूक युधिष्ठिराला महागात पडली नाही. ह्याला कारण भीमार्जुनाचे त्याला असणारे पाठबळ. पण म्हणून ह्यात युधिष्ठिराचा स्वतःचा भाग किती ह्याचा विचार नको? ह्याच युधिष्ठिराला नको इतके विवेकी समजून कित्येक भारतीय राजे शत्रूला विवेक दाखवण्यास गेले आणि आपल्या हतभाग्यतेचे लक्षण आपल्या नशिबाला देते झाले. ज्या भीमार्जुनाच्या पराक्रमावर विसंबून युद्धाचा डाव मांडला गेला त्यातीलच आपला पराक्रमी आणि भावूक अर्जुन ऐन युद्धात “मी कसा लढू?” म्हणत रथाच्या पिछाडीला गेला, त्यावेळीही भीम तिथेच रणांगणावर होता. अर्जुनाच्या पराक्रमास उणेपणा आणायचे प्रयोजन नाही. पण म्हणून भीमाला झाकून ठेवण्याची अगर त्याला ढोबळ म्हणण्याची गरज नाही. दुर्गाबाईंचा महाभारतावर ऐतिहासिक अभ्यास किती आणि तर्काधीष्टीत किती ह्याचा तपशील माझ्याकडे नाही अतएव त्याविषयी विषयी मी मौन पाळेन. आणि आपल्यासारखे जिज्ञासू वाचक ऐकीव माहितीवर विश्वास ठेवतात हे पाहून आश्चर्य वाटलेच, पण खेद आणि आनंद देखील वाटला. खेद अशाचा की आपण ऐकीव माहितीवर विसंबून राहिलात. आणि आनंद दोन गोष्टींचा. माझ्या लेखात ज्या साहित्य किंवा एकंदरीतच प्रसारमाध्यमे इतिहासाचे विडंबन करू शकतात ह्या गोष्टीचा मी उहापोह केला त्याचे कारण मला उमगले. ते असे की लोक मग ते सामान्य वाचक असोत व चिकित्सक, आपल्या ऐकीव माहितीचे विश्लेषण करीत नाहीत आणि म्हणून गैर(आणि गैरलागू) सामाजुतींचे बळी ठरतात. आनंदाचे दुसरे कारण असे ही ह्या माध्यमातून एक चांगले आणि ज्ञानपूर्ण विचारमंथन घडले.
  दुसऱ्या परिच्छेदातील आपल्या प्रश्नांचे उत्तर आपणास श्री. फडणीस ह्यांच्या लेखमालेत मिळेल. (श्री. फडणीस ह्यांचे मी ह्या लेखमालेसंबंधाने आभार मानू इच्छितो.)
  आणि आपण तिसर्या परिच्छेदातील आपण व्यक्त केलेल्या मताशी मी सहमत आहे, फक्त माझे ह्या बाबतीतील मत “एकाच विषयाच्या एकाच बाजूने झपाटलेल्या” लोकांविषयी आहे असे मला सांगावेसे वाटते. आपल्या इच्छेनुरूप मी हे उत्तर कमीत कमी वाद होतील असे लिहिले आहे. परंतु, तत्वबोध हवा असेल तर वाद हवेतच नाही का?
  इति लेखनसीमा
  मर्यादेयं विराजते
  श्रीनिवास

  वाचकांसाठी टीप: पुढील काही महिने परीक्षेसारक्या काही कारणास्तव मला आपल्या पोस्ट्सना (अर्थात काही असल्यास) तत्काळ उत्तर देता येणे शक्य होणार नाही असे दिसते. अतएव, आपण आपली मते मांडावीत. यथाशक्ती, यथामती त्यांचा मी परामर्ष घेईनच. धन्यवाद!

 7. nikhil bellarykar

  हा नीलकंठ पंडित म्हणजे नीलकंठ चतुर्धर या नावाने विख्यात असलेला पंडित होय. महाराष्ट्र सारस्वतात याचा उल्लेख येतो तो दक्षिण भारतातील एका १८ व्या शतकातील मराठी कवीच्या संदर्भात.

 8. Prasad

  “नारायणराव पेशव्यांच्या खुनाच्या वेळी गारद्यांना दिलेल्या आज्ञापत्रात मुदलात “रावांस धरावे” असा उल्लेख होता. तो बदलून आनंदीबाईंनी “रावांस मारावे” असा केला आणि मराठी दौलतीचे धनी (आणि पुढे दौलत सुद्धा) आपल्या निम्म्या गोवऱ्या स्मशानी जाते पाहती जाहले. हा इतिहासाचा भाग एक सत्य-कथा आहे की प्रक्षिप्त(?) हा एक संशोधनाचा विषय आहे.”

  Recently i heard that there is one letter of Anandi bai 14 years before this ” dh chaa maa” tragedy , where she has said ” British are conquering Hindustan ” !! I was surprised to know this !! I dont think such a visionary woman will do such crazy thing .

  BUT
  I have to check that original letter , Its in Modi , soon I will get it read it post it !!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s