एक (उनाड) अमेरिकन दिवस

पर्सनल आयुष्यावर पोस्ट्स टाकणे नाही असे ठरवले होते. पण आज प्रयत्न करू. काल रात्री उशिरा पर्यंत जागा होतो. साडे तीन पर्यंत. माहित होते की सकाळी ११ ला केप्नर ला पोहोचायचे आहे म्हणून. केप्नर इथून ६ मैल लांब. जायला बस असते पण तिचे स्वतःचे वेळापत्रक असते. सायकलने चढ असल्याने जवळ जवळ ४० मिनिटे लागतात. तिथे ‘एक्स्पेरिमेंटल व्हायब्रेशंस’ चा कोर्स प्रोजेक्ट करतो आहे. प्रोफ अडम्सची मोठी प्रयोगशाळा आहे असे ऐकून होतो पण मुख्य कॅम्पस पासून लांब असल्याने पूर्वी कधी गेलो नव्हतो. आत्ता आत्ता गेले ३ आठवडे जातोय. कळवले होते की ११ ला पोहोचतो आणि उठलोच नेमका १० वाजता. आता आवरून जेवण बनवून बस पकडून जायचं म्हटलं तरी १२ च्या आत कसा पोहोचतो? रात्रीची ‘तमस’ बघायची हौस नडली. उठलो, आवरले अन कसाबसा काहीतरी कोंबून निघालो पळत. कॅम्पस कडे बस चुकेल म्हणून नदीच्या पल्याड बस पकडायची म्हणून सायकल पिटाळली. पोचता पोचता बस जाताना दिसली. मग काय..अर्धा तास थांबलो पुढची बस येईपर्यंत… एकटा बसलो होतो. सकाळ सकाळी अर्धा तास शांतपणे रिकामा मिळणे म्हणजे दुर्मिळ योग…! आणि कानात गाणे पण नाही. स्र्पिंग चालू असल्याने सगळ्या झाडांवर जांभळी, पांढरी फुले आणि त्यांच्या पाकळ्यांचा रस्त्यावर खच. आणि जोरदार वारं. त्यामुळे केसात सगळ्या पाकळ्या. समोर एक जुन्या गाड्यांचे गरेज. तिथे हातावर चित्र काढलेला आणि भारी बिल्ड असलेला टिपिकल कंट्री साईड गोरा माणूस बनियन वर गाडी दुरुस्त करतो आहे. बाजूला रेडियो बोम्बलतो आहे. त्याची कोणी गर्लफ्रेंड गाडी घेऊन येते आणि त्याला २-३ शिव्या घालून, काहीतरी भांडण करून परत तशीच गाडीने निघून जाते. असंच अर्धा तास गेला कसातरी इकडे तिकडे बघत आणि बस आली. बस च्या पुचे सायकल  माउंट केली आणि चढलो. १५ मिनिटांनी केप्नर जवळ उतरलो ३-४ मिनिटात केप्नर मध्ये. 

उशीर झालाच होतं पण एमिली आली नव्हती. त्यामुळे बरे वाटले. सारा आणि मी थर्मोग्राफीपाशी गेलो तर एकाचा बल्ब उडालेला. आणि कोणीतरी दुसऱ्या ग्रुप ने डिजिटल इमेज कोरिलेशन कॅमेरा सगळा हलवलेला. त्याचे कलीब्रेशन परत करणे आले…. अर्ध्या तासाची बोंब. आधी प्रयोग काय करतो आहे ते थोडक्यात सांगतो. (वाचकाला इथे पोस्ट सोडून इतरत्र पळून जायचं संपूर्ण अधिकार आहे पण थोडे डिटेल देणे अपरिहार्य आहे. तेव्हा वाचायचे नसतील तर  ३-४ ओळी गाळून पुढे वाचा; असे २ च पर्याय आहेत…:)) कार्बन फायबर च्या दोन पाट्या हनिकोंब स्ट्रक्चर ने जोडलेला एक आयताकृती तुकडा आहे. त्याचे मोडल टेस्टिंग करतो आहे. ते खूप कडक असते आणि हेलीकोप्टरमध्ये वापरतात. ही प्रयोगशाळा तर प्रचंड महान आहे. पहिल्यांदा जेव्हा आलो तेव्हा तर चक्रावूनच गेलो होतो. २-२ आर्मर्ड व्हेहिकल्स, १ रणगाडा, ३-४ वेगवेगळे टर्बाईंस, आणि चक्क १ हेलीकोप्टर…!! आणि या सगळ्यावर वेगवेगळे काम करण्यासाठी लागणारी उपकरणे, सुविधा आणि सगळे पीएचडी विद्यार्थी… इकडे तिकडे बघितले तर सगळ्या गोष्टींवर यू एस नेव्ही, किंवा यू एस डिफेन्स अशा काय काय पाट्या होत्या. बटन दाबतातच वर जाणे शटर्स, मोठमोठे रेल्स.. वाटले होते कोणत्या तरी सिक्रेट प्रयोगशाळेत आलो आहोत. पण आता सवय झाली होती गेले २-३ वेळा जाऊन.

मग एका बल्ब वर थर्मोग्राफ्स घेऊन, डिजिटल इमेज चे सगळे सोपस्कार पार पडता नाकी नऊ आले. ते काही जमत नव्हते. नोआह ला बोलावले. हा इथे खूप मदत करतो. त्याने काय काय केले आणि फोतोस निघाले. आता ते कार्बन फायबर चे तुकडे जे होते त्याच्यावर हातोडे मारत बसलो. किती मारले असतील? मागच्या आठवड्यात ७५० वेळा आणि आज १५०० वेळा. टक, टक, ठक, ठक….हातोडे मारा, एफआरआर  आणि कोरिलेशन बघा, परत हातोडे मारा…. ५०० सारा, ५०० एमिली आणि ५०० मी…. ३ तास लागले. पण त्याच्या मध्ये एक गम्मत झाली. डेव्ह आला. डेव्ह हा इथला कारभारी. सगळे इकडे तिकडे बघत असतो. जवळा आला आणि म्हणाला, Sorry to disturb you guys, but are you US citizen? I said, No. Then are you a green card holder… I again replied, no… then I have to say, you must go out. It is highly clandestine US defense …blablabla…. चायला मागचे २ आठवडे येत होतो तेव्हा काही बोलला नाही पण म्हणाला बाहेरच्या जागेत जाऊन तुमचा काय तो एक्स्पेरीमेंट करा. मग अचानक जाणवले की तिथे सगळ्यांमध्ये मी एकटाच तसा आहे. आणि मला उगीच भारी वाटले, जर चुकून कधी भविष्यात इस्रो किंवा तत्सम ठिकाणी काम करायला गेलो तर हे आठवेल वगैरे वगैरे….लोल..

मग बाहेर सगळे समान आणले आणि उरलेले हातोडे मारले. तेव्हा गप्पा सुरु झाल्या आणि अमेरिकन लोकांच्यामध्ये कॉमन असलेली गोष्ट प्रकर्षाने जाणवली. सगळ्यांचा भूतकाळ. नोआह म्हणाला की त्याचे पणजोबा हंगेरी मधून १९१४ मध्ये आले एका बोटीने. आणि इथे येऊन त्यांचा भाऊ हरवला, यांनी त्यांचे आडनाव पण अमेरीकनाईज्ड केले आणि आता कुणाला जुने काहीच माहित नाही, ना आडनाव, ना गाव, ना नातेवाईक. शोधायचा प्रयत्न चालू आहे पण यश नाही. सारा म्हणाली की तिची आज जर्मन आहे. आणि ती पण कट्टर जर्मन. आणि आजोबा ब्रिटीश. त्यामुळे घरात दोन भाग आहेत. अर्धे लोक घरात फक्त जर्मन च बोलतात. आणि हाईट म्हणजे हिला जर्मनचा इतका राग की मग ती शाळेमध्ये स्पानिश किंवा फ्रेंच पण नाही तर डायरेक्ट लातिन शिकली… ५ वर्ष शिकून मग घरी कोणी जर्मन बोलले की ही लातिन मध्ये उत्तर देते…!! आणि तिथे सगळ्यात जवळचा म्हणजे नासीर. जवळचा कारण जर्मनी आणि हंगेरी पेक्षा पाकिस्तान भौगोलिक दृष्ट्या जवळ आहे आणि हा इस्लामाबाद जवळच्या खेडेगावातला आहे. उर्दू त्याची मातृभाषा आणि मला उर्दू चे आकर्षण. (मागे एकदा पुरिया म्हणून इथे एक पीएचडीला मुलगा आहे तो इराण चा आहे त्याच्याशी ओळख केली होती. प्रचंड म्हणजे महा प्रचंड हुशार आहे तो. तो अधे मध्ये भेटला की पर्शियन चे धडे गेहतो पण तो भेटतोच महिन्यातून एकदा त्यामुळे तिथे काही गती नाही) तर त्यामुळे नासीर जरा जास्त जवळचा वाटतो…! इथे सगळे असेच. प्रत्येक कुटुंबाचा काही ना काही किस्सा असतोच वाटते. बाजुच्य असगली अप्रयोशालेच्या मुख्य प्रोफेसर आहेत त्या पण इव्हान्तिसिनोव्हा नावाच्या. आहेत ऑस्ट्रिया च्या आणि बाकी सगळे जर्मनी मध्ये . आत्ता आत्ता आल्या आहेत इथे. मज्जाच मज्जा.

पाच वाजले. साडे पाच वाजले, सहा वाजले. आता कुठे काम झाले. मग निघालो. आता हवा मस्त होती, सायकलनेच यायचे ठरवले. बाहेर निघालो तोच अन्थनी भेटला. म्हणे, तुझी सायाकले दे आणि माझी गाडी घे. मी विकतो आहे. इन्शुरन्स परवडत नाहीये. पाच पाच गाड्या आहेत. ही माझ्या मुलासाठी घेतली होती पण आता नको आहे. घेतोस का? मी हसलो…पुढे निघालो.. १२ किलोमीटर म्हणजे काही जास्त नाही कारण आता सगळा उतारच होता नदीपर्यंत. प्रॉपर अमेरिकन खेडेगाव. अधे मध्ये छोटेसे चारच, हिरवळ, लहान दुकाने, गल्ल्या, फटफट्या मोटारबाईक्स चालवणारे काही लोक, टंगळमंगळ करत नदीपर्यंत आलो आणि पुलावर बघतो तर मोठी सभा. ३००-४०० लोक जमले होते. अशा ठिकाणी ३००-४०० लोक जमवले म्हणजे मोठीच गोष्ट. बघायला गेलो तर एक थोमास जेफरसन चे पुस्तक आणि डिक्लेरेशन ऑफ इंडीपेंडन्स हातात थोपवले. कोणीतरी सिनेटचा निवडणुकीचा उमेदवार भाषण देत होता. आणि भाषण काय चालले होते, ‘माझ्या हातात साडे तीन आठवड्याचे मूल होते जेव्हा मी ९/११ बघत होतो. आणि तेव्हाची मी ठरवले की याच्या भविष्याकरता साठी तरी आपण राजकारणात आलेच पाहिजे..! मजा आली. लोकांनी हवेत झेंडे फडकावले होते.. घोषणानाजी चालू होती पण फारच संयत वाटली. शनिवारात असताना एकदा रामदेवबाबांचे काही प्रकरण गाजले होते तेव्हा भाजप आणि कम्युनिस्टांची घोषणाबाजी ऐकायला गेलो होतो… तेवढ्या गल्लीतल्या छोट्या गोष्टीसमोर पण हे काहीच वाटत नव्हते. पण यांची डेमोक्रसी वेगळी. लोक वेगळे, त्यांचे आचारविचार वेगळे आणि प्रचाराची पद्धत पण वेगळी.

मग काही नाही, घरी आलो, खाल्ले, झोपलो. उठलो, ग्रेडिंग केले थोडे आणि आता हे लिहायला बसलो. काही नाही. असंच एक दिवस होता. उगीच लिहायचा प्रयत्न केला. बहुधा बोअरच झाला आहे. पण आता दुसरे काही लिहायला नाही म्हणून हेच पोस्ट करतो. परत पर्सनल गोष्टींकडे वळत नाही….

 DSC05855DSC05865  DSC05904 DSC05895 DSC05897 DSC05898 DSC05899 DSC05900 DSC05903  DSC05906  DSC05908

7 thoughts on “एक (उनाड) अमेरिकन दिवस

  1. ngadre

    lekh faar interesting..

    Itake high grade research karta..

    Koutuk aahe..

    Tumhala aikavalele shabd vachoon vaeet vatale..tarihi Amerikela equal opprtunity, kashtala equal pratishtha asane asa ugeech amerikecha defense karnare bhartiy athavale..

    Aso..
    Lekh Bhari ch..

  2. pritizafar

    हे वाचून मज्जा आली इंटरेस्टिग आहे ….
    पण तुम्ही नेमक काय करता हे कळलं नाही …. जसं तुम्ही लिहीलयं की तुम्ही पर्सनल लिहीत नाही पण तुमचे तिथले एक्सपिर्यन्स वाचायला नक्कीच आवडतील
    प्रीती खान
    आयबीएन लोकमत
    coresspondent

  3. Nikhil Sheth

    प्रीती, कॉमेंट बद्दल आभार, नेमके काय करतो ते सांगू का नको त्याच्या विचारात होतो पण जास्त टेक्निकल गोष्टी कंटाळवाण्या होतील म्हणून टाळल्या.
    पर्सनल लिहायचे नाही असे ठरवूनच खरं तर ब्लॉग सुरु केला होता. पण कधी हिस्टरी क्लब च्या निमित्ताने तर कधी उर्दूच्या वा आता अमेरिकेच्या निमित्ताने एखादी पोस्ट पर्सनल पडली तर हरकत नाही असे वाटते आहे. सुरुवातीला वाटले होते की इथल्या अनुभवांवर लिहावे म्हणून. पण नंतर ध्यानात आले की फार जगावेगळे किंवा नवे अनुभव नाहीयेत. म्हणजे माझ्यासाठी नवे असतील पण खूप लोकांचे सिमिलर अनुभव आहेत. अमेरिकेत यायला लोकांनी १९५० च्या आसपास सुरुवात केली आणि तेव्हापासून लोकांचे बदलत्या काळानुसार अनेक बदलते अनुभव असलेले भरपूर साहित्या उपलब्ध आहे. प्रवास वर्णन असो, की उद्योग-कथा, की शिक्षणाचा अनुभव.. मराठी मध्येही पुष्कळच आहे. मध्यंतरी तर अपर्णा वेलणकरांनी यावर रिसर्च करून एक सुंदर पुस्तक पण लिहिले होते ‘For here or to go?’ नावाचे. तेव्हा जर कधी फारच वाटले तर लिहितो.

Leave a reply to Nikhil Sheth उत्तर रद्द करा.