ब्लॉगचे विषय???

किती कविता कविता कविता….चायला कधी वाटलेच नव्हते की मी कविता वाचेन आणि त्यावर लिहेन वगैरे. माझे खास आवडते विषय म्हणजे आत्मवृत्त, इतिहास आणि प्रवास वर्णन. कविता वगैरे वाचणाऱ्यांना शिव्याच घालायचो. म्हणजे कविता आवडायच्या नाहीत असे नाही पण मुद्दामहून काव्यसंग्रह हा घेऊन वाचायचा प्रकार आहे असे नाही वाटायचे. पण एक मात्र होते. मर्ढेकर आणि तुकाराम…ते खूप आवडायचे. संपूर्ण मर्ढेकर रट्टा मारून झाला होता आणि तुकाराम तर जागोजागी दर्शन देत होते. पण मर्ढेकर आवडण्यामागे कारण काहीच नव्हते. मर्ढेकर मोठे का? हेच कळत नव्हते. मग केव्हातरी रविकिरण मंडळ, नव-काव्य, दलित काव्य, सामाजिक आशयाच्या कविता…हळू हळू कळत गेले आणि मर्ढेकरांच्या मोठेपणाची खरी प्रचीती आली. तोवर ‘सकाळी उठोनी चहा कॉफी घ्यावी’ किंवा ‘इरेस पडलो जर बच्चमजी’, ‘फलाटदादा फलाटदादा’ कविता नुसत्या गम्मत म्हणून आवडायच्या….आणि ‘पिपात मेले ओल्या उंदीर’ कळायचंच नाही आणि  ‘काहो माजवता दुही, माखता स्वातंत्र्याची वही, स्वजन रक्ताने प्रत्यही, लळथळा’ ही आहे त्याच वृत्तात का केली हे विचार करायचे प्रश्न तेच नाही कळायचे. ‘न्हालेल्या जणू गर्भवतीच्या’ म्हणजे मुंबईचे किती अप्रतिम वर्णन आहे आणि हाच कवी हेही लिहितो आहे त्यात महानता आहे हे लक्षातच नाही आले. ‘कितीतरी दिवसात नाही चांदण्यात गेलो किती तरी दिवसात नाही नदीत डुंबलो’ अशी सुरुवात करून जेव्हा ती कविता ‘बरा म्हणून हा इथे दिवा पारवा पाऱ्याचा, बरी तोतऱ्या नळाची, शीरी धार मुखी ऋचा’ अशा वाक्याने संपते तेव्हा किती अंतर्मुख करते याचा अंदाज नंतर नंतर येऊ लागला होता…..पण तरीही त्याहीपेक्षा जास्त लोभसवाणे रूप होते ते म्हणजे ‘आला आषाढ श्रावण’ मधली ‘ओल्या पानातल्या रेषा वाचतात ओले पक्षी, आणि पोपटी रंगाची रान दाखविते नक्षी’…हे खूप आवडायचे…पण जेव्हा हाच कवी लिहितो की ‘या स्नायूंच्या तारांचा रे तुझ्याच हात खाली स्वीच’ तेव्हा मराठी कवितेत किती क्रांती घडवून आणत होता याचा अंदाज नाही आला..ती क्रांती अर्थाची होती, उपमांची होती, छंदांची तर होतीच होती पण त्याहीपेक्षा कविता का, कोणासाठी आणि कशी या प्रश्नाच्या उत्तरांची होती…संपूर्ण नवा दृष्टीकोन होता तो….’पोरसवदा होतीस काल परवा पावेतो, थांब उद्याचे माई तीर्थ पायाचे घेईतो’ असे लिहिताना त्यांनीच असेही म्हटले आहे – ‘आभाळाच्या पल्याड स्पंदन टिपरी त्याची या मडक्यावरी’…

झाले? कवितांवर किती जास्त लिहितो आहे सांगताना परत त्यावरच एक चुकून आर्टिकल झाले. चायला….. हा ब्लॉग काही कवितांचा ब्लॉग म्हणून सुरु केलेला नाही पण ६० पैकी २० पोस्ट्स कवितांवर झाल्या आहेत. नकळतपणे…. गालिब, तुकाराम, बच्चन तर नेहमीचेच पेटंट आहेत. काही सुचत नसले की आपोपाप गालिब आणि इक्बाल सुरु करतो…कारण त्यांवर बोलणे सोप्पे असते. जसे की आत्ता मर्ढेकर…इतके वाचले आहेत की झोपेत ही त्यांच्या कवितांवर बोलू शकतो…पण त्यात आता मजा येत नाही. नवे वचन करायची आणि व्हायची संधी इथे फार कमी आहे. तेव्हा आपोआप रारंगढांग किंवा मधुशाला सुरु करतो…नाहीतर इतिहास…इतिहास तर कायमचा डोक्यात ठाण मांडून बसला आहे. त्यातही मध्ययुगीन भारत. या क्षेत्रातल्या भरपूर मोठ्या लोकांच्या सहवासात आल्याने आणि समानशील मित्र लाभल्याने त्याच विषयावर दिवसाच्या दिवस घालवले आहेत. जसे की पानिपतचे युद्ध…साधारणपणे आपली सुरुवात विश्वास पाटलांच्या कादंबरीने होते आणि तोतयाचे बंद किंवा भाऊबंदकी नाटकाच्या आधाराने संपते. पण मग आम्ही जातो ते पानिपत १७६१ कडे. तिथून…शेजवलकर कोण? मग त्यांचे शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या अभ्यासाची साधने व आराखडे…तिथून मग दांडेकर, वि श्री, सरदेसाई, राजवाडे, पोतदार, पगडी…..पगडी मग निझामाकालीन हैद्राबाद आणि पोट्टी श्रीरामल्लू, मग हैदराबादची जामा मस्जिद, हैद्राबादी दखनी भाषा, हिंदीचे प्रकार, खडी बोली, अवधी, ब्रज भाषा वगैरे…मग तिथून वीर रसाची हिंदी साहित्यातली उत्थापना, छायावाद वगैरे…हिंदीवर उर्दू चा प्रभाव..मग रामचरीतमानस वगैरे,, भक्ती मुव्हमेंट…वंगदेशाचे इस्लामीकरण, कबीराच्या खऱ्या रचना कोणत्या…पाठभेद…ऐतिहासिक पात्रे…मग महाभारत आणि रामायण…तिथून दुर्गा भागवत आणि इरावती कर्वे…इरावती कर्वे आल्या की एका दिशेने डी डी कर्वे, अण्णा कर्वे, महात्मा फुले तर दुसऱ्या दिशेने आनंदीबाई जोशी, रमाबाई रानडे…(युगांत वाचले आहे? अप्रतिम पुस्तक आहे…वाचाच वाचा….जगात तोड नाही त्याला…) मग असे करत करत सध्याच्या बाबासाहेब, मेहेंदळे, बेडेकर, बेलसरे पर्यंत येऊन थांबतो…पण गप्पांची भूक काही संपत नाही. त्यातून कधी काय साध्य झाला का हा संशोधनाचा विषय ठरवा…..पण वेळ मात्र मजेत जातो…काहीच नसेल तर उर्दू, हिंदी शायरी आणि गाणी, चित्रपटांचा इतिहास, जुने गायक संगीतकार…..नाट्यसंगीत….अशा विषयी लिहायला काहीच लागत नाही….उचलली जीभ आणि लावली टाळ्याला सारखे उघडला ब्लॉग आणि लावला बडवायला असे होते….

पण आजकाल त्यात मजा येत नाही…सध्या अमेरिकेत आहे त्याविषयी कितीतरी गोष्टी लिहिण्यासारख्या आहेत…इथले लोक, समाज, शिक्षण पद्धती, इथले राहायचे अनुभव….मागे एकदा शिकागो ला गेलो होतो तिथे स्वामी विवेकानंदांनी जेथे जागतिक सर्वधर्म परिषदेमध्ये जेथे भाषण दिले १८९३ मध्ये ती जागा पाहून आलो…. का नाही लिहित? आणि ललित? ललित हाताळणे सोप्पे नाहीये…पण जमला तर त्यासारखा तोच. अर्थकारण आणि राजकारण हे तर विषय दिवस रात्र असतात गप्पांमध्ये पण लिहिताना का नाही सुचत? सध्या रिसर्च आणि academic मध्ये इतक्या इतक्या नव्या गोष्टी पाहत आहे की त्या लिहायला पण हरकत नाही… एवढे मित्र बंगाल, हरियाना, ओरिसा, अरुणाचल, आंध्र, गुजरात, इंग्लंड, जर्मनी, सिंगापूर, अमेरिकेत पसरले आहेत त्यांचे कितीतरी ऐकतो नवे नवे अचंबित व्हावे असे….का नाही लिहित?

साधे उत्तर आहे – शाहरुख खानचा चित्रपट होता एक – राम जाने….का नाही लिहित……….राम जाने…

8 thoughts on “ब्लॉगचे विषय???

 1. bhagyashree

  छान लिहीलंय. पहिला पॅरा वाचून मी अवाक झाले. इतक्या कविता ओळी पाठ असून आठवून लिहीणे माझ्यासाठी थोडी लांबची गोष्ट झालीय आता.
  पण दुसरा पॅरा वाचून फारच केविलवाणे वाटतंय मला. हे सगळं वाचन कुठे गेले माझे? ऐतिहासिक कादंबर्‍या, त्यावरची चर्चा.
  अमेरिकेत येऊनच वाचन कमी झाले. व लेखन सुद्धा. 😦
  कृपया लिहीत राहा!

  • Nikhil Sheth

   खरं आहे…भारतामध्ये असताना ज्या गोष्टी नैसर्गिक वाटतात त्यांची इथ कमतरता भासते. आणि त्याहूनही जसा जसा वेळ पुढे जातो तसे तसे आपण ज्या ज्या गोष्टी मागे सोडत जातो त्यांची अशी मध्येच कधीतरी जाणीव झाली की फारच हळवे व्हायला होते…पण पर्याय नसतो.

 2. Smit Gade

  Are tithe kai ..ethe bhartat pan ashya gappacha vanava ahe…
  kunich nahiye asahya gappa marayala..
  Maja sangto..Mehandale gharajavalach rahatat..atleast pandhavadayat ekda tari jaun gappa maranar ahe.. 😛
  Bellya ala hota teva parava gelo hoto ghari..mast gappa marayalaya

  • Nikhil Sheth

   तुला काय सांगू….आणि तुझ्याकडून काय ऐकू….नरसोपंत..कधी कधी तू म्हणतोस ते क्षणभर का असेना खरे वाटते की आपण केलेले सक्रिफ़ाईसेस वर्थ आहेत का? पण मग भविष्यावर हवाला आणि श्रद्धा ठेवून शांत राहतो…

 3. Vidyadhar

  निर्धास्त राहा भाऊ,
  ब्लॉग म्हणजे वृत्तपत्रातला कॉलम नाही. त्यामुळे बिनधास्त वाट्टेल त्या विषयावर लिहा….आम्ही वाचतोच. हृदयातून निघालेलं अवाचनीय असूच शकत नाही.
  शेवटी काय, ‘दिसामाजी काहीतरी’ लिहिल्याशी मतलब!

  • Nikhil Sheth

   खरं आहे, हृदयातून निघालेले अवचानीय असू शकत नाही….कोणी तरी म्हटले आहे ना, ये हृदयीचे ते हृदयी… पण केव्हा केव्हा अडचण अशी होते की जास्त न्याय कोणाला द्यायचा; स्वतःला, विषयाला की वाचकाला? तेव्हा असे काहीतरी लिहितो मग….

 4. anukshre

  आपण जे पहिले ते पण लिहावे त्यायोगे नवीन माहिती सर्वाना समजते. मी पण सध्या ओमान बद्धल पोस्ट लिहित आहे. खूप दिवस झाले की विसरायला होते. अनेकजण आवडीने वाचतात. नवीन संस्कृतीची ओळख होते. आणि देशाबद्धल लिहिणे ललित होत नाही, प्रवास वर्णन म्हणून ही होत नाही तर माहितीपर लिखाण होते. तेथील संस्कृतीची माहिती एखाद्या विशिष्ठ हेतूने लिहिली तर नक्कीच ललित होऊ शकते. आपण इतके छान लिहिता उगाच ललित कसे लिहावे म्हणून व्यर्थ काळजी करता….. मी नेहमी आपले लिखाण वाचते.लिहा आम्ही वाचत असतोच.

  • Nikhil Sheth

   अनुक्षरे, तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. बऱ्याचदा होते असे की वाटेल ते लिहितो खरे, पण मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी वाचक दडला असतो. तो सारखा खुणावत असतो त्याच्या आवडी-निवडी बद्दल किंवा त्याच्या काही मागण्या असतात. मग स्वतःला पाहिजे तेच आपण खरोखरीच लिहितो की नाही याचा संभ्रम पडतो. विषय मांडताना शैली वाचणाऱ्याला आवडेल अशा तर्हेने लिहिणे एक बाब आणि विषयच मॉर्फ करणे दुसरी…. हे खरे तर नेहमीचे नाही पण जेव्हा विचार करून लिहायचं असतं तेव्हा संभ्रमात पडतो…. केव्हातरी वाटते की उगीच कशाला विचार करा…पाहिजे ते लिहावे पाहिजे तसे लिहावे आणि सोडून द्यावे… काय माहित….

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s