मी चालतो अखंड – विंदा

विंदा गेले….विंदा गेले….विंदा गेले…..बाबासाहेब म्हणतात तसे, काय लिहू शब्दच संपले….आपली आणि विंदांची ओळख पुस्तकांमधुनच…पण एकदम जिगरी ओळख ती..काय त्यांच्या एक एक कविता….उत्कृष्ट नमुनाच तो….स्वेदगंगा मध्ये त्यांनी म्हटले (बहुधा १९६६)

ऊठ ऊठ सह्याद्रे घुमवीत बोल मराठी खडे, समतेचे हे तुफान उठले उठले सागराकडे…
हीच मराठी जिच्या मुखाने वदली ज्ञानेश्वरी, शिवबाने तलावर घासली याच मराठीवरी,
हिच्या स्वागतासाठी झडती तोफांचे चौघडे….
टिळक रानडे फुले गोखले आगरकर वैखरी, स्वातंत्र्याच्या पाच मशाली जळती वेदिवरी,
या ज्योतीवर दीप पेटवा चला भविष्याकडे….
दर्याच्या भरतीच्या लाटा महाराष्ट्रअंगना, कंकणनादा भिऊनि ज्यांच्या शत्रू सोडिती रणा,
वीज माळूनी वेणीवरती त्याही घुसल्या पुढे….
ऊठ मजूरा पुन्हा एकदा झाडूनिया घोंगडी, ऊठ सैनिका पुन्हा झेपण्या आघाडीवर उडी,
एकजूट ही पाहून पडतील अन्यायाला तडे….

अन्यायाला तडे…काय हे शब्द…त्यांच्या फिलोसोफी वर तर पिढ्या जगल्या….आदिमाया मध्ये त्यांनी म्हटले आहे –

नुकते होते नजरेत तुझ्या दिसू लागले अवखळ पाणी; नुकती होती तुझ्या जिभेवर नाचू लागली अल्लड गाणी !
नुकते होते सुरु जाहले लाजेचे पदराशी चाळे; नुकते नकळत वितळत होते भाव निरंकुश साधे भोळे !
नुकते नुकते होतीस शिकलीस ओठ दाबण्या दातांखाली; नुकत्या नुकत्या मीही होतो जुळवीत पहिल्या-वहिल्या ओळी !
पहिल्या-वहिल्या त्या ओळीतील कुणासही नच काही रुचते; आठवता पण त्या माझे मन मधेच झुरते मधेच फुलते !

यांनी ज्ञानेश्वरी वर लिहिले तसेच लहान मुलांचे साहित्य पण हाताळले, समाजवादावर लिहिले तसेच ही कविता पण –

तीर्थाटण मी करीत पोचलो नकळत शेवट तव दारी ….. अन तुझिया देहात गवसली सखये मजला तीर्थे सारी ! !
अधरावरती तव वृंदावन प्रयाग सापडले नेत्री ……..भालावरती मानससर अन मानेवरती गंगोत्री !!
गया तुझ्या गालात मिळाली रामेश्वर खांद्यावरती …… मिळे द्वारका कमरेपाशी अन काशी अवती-भवती !!
मोक्षाचीही नुरली इच्छा नको कृपा याहुन दुसरी …….. तीर्थाटण मी करीत पोचलो नकळत शेवट तव दारी !

असे नव्या जुन्याची तमा नसलेले. स्वतःचे एक काव्यविश्व त्यांनी बनवले होते…एक तुतारी द्या मज आणुनी चा खरं अविष्कार होता तो…पण माझी सगळ्यात जास्त आवडती कविता म्हणजे –

चुकली दिशा तरीही हुकले ना श्रेय सारे; वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे
मी चालतो अखंड चालायचे म्हणून; धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे
डरतात वादळांना जे दास त्या धृवाचे; हे शीड तोडले कि अनुकूल सर्व वारे
मग्रूर प्राक्तनाचा मी फाडला नकाशा; विझले तिथेच सारे ते मागचे इशारे
चुकली दिशा तरीही आकाश एक आहे; हे जाणतो त्याला वाटेल तेथ न्या रे
आशा तशी निराशा, हे श्रेय सावधांचे; बेसावधास कैसे डसणार हे निखारे…

हे खरे विंदा….ही त्यांची असामान्य शैली आणि प्रवृत्ती होती…एका ठिकाणी ते म्हणतात –

बन दगड आजपासून; काय अडेल तुझ्यावाचून; गालावरचे खारे पाणी पिऊन काय जगेल कोणी ?
काय तुझे हे निःश्‍वास मरणाऱ्यांना देतील श्‍वास ? आणिक दुःख छातीफोडे देईल त्यांना सूख थोडे ?
आहे दुःख तेच फार; माझ्या मना कर विचार; कर विचार; हस रगड; माझ्या मना बन दगड !

जशी पाडगावकरांची सलाम होती, तशाच भाष्य कविता विंदांनी खूप जबरदस्त लिहिल्या….ओरखडे ओढायची त्यांची शैली जरा विचकट होती पण टोकदार सुद्धा…ही कविता बघा –

जितकी डोकी तितकी मते जितकी शिते तितकी भूते;
कोणी मवाळ कोणी जहाल कोणी लठ्ठ कोणी मठ्ठ
कोणी ढीले कोणी घट्ट; कोणी कच्चे कोणी पक्के
सब घोडे बारा टक्के!

गोड गोड जुन्या थापा (तुम्ही पेरा तुम्ही कापा)
जुन्या आशा नवा चंग जुनी स्वप्ने नवा भंग;
तुम्ही तरी काय करणार? आम्ही तरी काय करणार?
त्याच त्याच खड्ड्या मधे पुन्हा पुन्हा तोच पाय;
जुना माल नवे शिक्के सब घोडे बारा टक्के!

जिकडे सत्ता तिकडे पोळी जिकडे सत्य तिकडे गोळी, (जिकडे टक्के तिकडे टोळी);
ज्याचा पैसा त्याची सत्ता, पुन्हा पुन्हा हाच कित्ता;
पुन्हा पुन्हा जुनाच स्वार, मंद घोडा जुना स्वार;
याच्या लत्ता त्याचे बुक्के, सब घोडे बारा टक्के!

सब घोडे! चंदी कमी; कोण देईल त्यांची हमी?
डोक्यावरती छप्पर तरी; कोण देईल माझा हरी?
कोणी तरी देईन म्हणा मीच फसविन माझ्या मना!
भुकेपेक्षा भ्रम बरा; कोण खोटा कोण खरा?
कोणी तिर्र्या कोणी छक्के; सब घोडे बारा टक्के!

ही कविता तर त्यांच्या काव्यात्म विश्वाचा पराकोटीचा कळसाच आहे…मनस्वी सृजनशिलातेचा उत्कृष्ट अविष्कार –

कधी येतसे क्षुद्रता कस्पटाची; कधी वाढता वाढता व्योम व्यापी
कधी धावतो विश्व चुंबावयाला कधी आपणाला स्वहस्तेच शापी

कधी याचितो सत कधी स्वप्न याची कधी धावतो काळ टाकुन मागे
कधी वर्षतो अमृताच्या सरी अन कधी मृत्यूची भाबडी भीक मागे

कधी दैन्यवाणा, निराधर होई कधी गुढ, गंभीर, आत्मप्रकाशी
कधी गर्जतो सागराच्या बळाने; कधी कापतो बोलता आपणाशी!

कधी आपणा सर्व पिंडात शोधी; कधी पाहतो आत्मरुपात सारे;
कधी मोजीतो आपणाला अनंते अणुरुप होती जिथे सुर्य, तारे

टळेना अहंकार साध्या कृतीचा; गळेना महापुच्छ स्वार्थी स्मृतीचे;
कधी घेतसे सोंग ते सत्य वाटे! कधी सत्य ते वाटते सोंग साचे!

कधी संयमी, संशयात्मा, विरागी कधी आततायी, कधी मत्तकामी
असा मी… तसा मी… कसा मी कळेना; स्वतःच्या घरी दुरचा पाहुणा मी!

त्यांची देणाऱ्याने देत जावे; घेणाऱ्याने घेत जावे; घेता घेता एक दिवस; देणाऱ्याचे हात घ्यावे….शक्य नाहीये ते….

(सगळ्या कविता स्मरणातून लिहिल्या आहेत तेव्हा चुका असतील तर क्षमा असावी)

1 thoughts on “मी चालतो अखंड – विंदा

Leave a reply to Manmaujee उत्तर रद्द करा.