अप्पा – पेटीचे शेहेनशाह

सह्या घेत फिरायची फार हौस…जो कोणी भेटेल मोठा माणूस की पकड त्याला, माग सही आणि मार गप्पा….खूप नाटक केली यापायी…एकदा तर पंडित जसराजांच्या मागे इतका लागलो होतो की ते चिडलेच….ते नेहमीच चिडतात हे नंतर कळले तो भाग अलाहिदा….सवाई म्हणजे सह्या मिळण्याचा खूप मोठा अड्डा…आणि तिथले काही स्वयंसेवक परिचयातले असल्याने ग्रीन रूम मध्ये घुसून सह्या घेणे किंवा कार्यक्रमाला पत्रकार/अतिथी कक्षात जाऊन बसणे हेही नेहमीचेच….

एकदा असंच पुढे बसलो होतो. आणि एक वयस्कर व्यक्ती आल्या..चालता नीट येत नव्हते. त्यांना सोफ्यावर बसवले…मित्राला विचारले की हे कोण? कोणीतरी जड व्यक्तिमत्व दिसत होते. तर तोही म्हणाला माहित नाही बुवा. आणि अचानक त्यांच्या शेजारी शाळेतले एक सर दिसले. जे काही फार थोडे शिक्षक शिक्षक म्हणण्याच्या लायकीचे लाभले आणि ज्यांच्याप्रती आदर वाटतो त्यातले ते एक होते. पण त्यांची शाळेतून तर त्यापूर्वीच काही वर्षे बदली झाली होती तेव्हा त्यांना इतक्या वर्षांनी पाहून आनंद झाला पण अचंबा याचा झाला की त्यांना त्या ‘जड’ व्यक्तीमत्वाशेजारी बसलेले पाहून. जाऊन सरांना हाय म्हणालो, पुण्यात कधी आलात? कसे काय चालले आहे? वगैरे विचारले. त्यांनीही विचारपूस केली…मग हळूच खिशातून डायरी बाहेर काढली आणि ‘जड’ व्यक्तीमत्वासमोर धरली…आणि मग कळले की त्यांना अर्धांगवायू झाला होता…फार वाईट वाटले पण तरीही त्यांनी ती डायरी घेतली आणि २-३ मिनिटं कष्ट करून सही दिली…सही म्हणजे काय तर नाव लिहून दिले. मग विचारले की काही गातोस/वाजवतोस का? मी म्हणालो पेटी…ते हसले…तरीही काहीच भारी नाही वाटले. कारण तेव्हा त्यांचे नावच माहित नव्हते मुळी…मग थोडा वेळ तिथेच तसा बसलो अन जसराजांचे गाणे सुरु झाले. जसराजांनी आल्या आल्या त्या ‘जड’ व्यक्तिमत्वाला नमस्कार केला. आयला…फारच ‘जड’ व्यक्तिमत्व होते म्हणजे….जसराज काहीवेळ गायले आणि मग त्यांना जड व्यक्तिमत्वाने फर्माईश केली. तेव्हा जसराज म्हणाले की तुमच्या बरोबरच किती तरी वेळा हे गाणे गायलो आहे तेव्हा तुम्ही फार्मैश मान्य करतो पण तुम्ही साथीला आले पाहिजे…हे सगळे होताना त्यांच्या बाजूला उभा होतो म्हणून उगीच भारी वाटले…मग त्यांना स्टेजवर नेले, समोर पेटी दिली. आणि यांनी एका हाताने मग पुढचा काहीवेळ पेटीने साथ केली. तेव्हा कळले की हे पेटीवाले कोणीतरी आहेत….आणि अस्मादिकांनी पण लहानपणी पेटी बडवायचा प्रयत्न केला असल्याने जर अजून बरे वाटले आणि जड व्यक्तिमत्वाविषयी एकदम ममत्व वाटले. रात्री घरी निघून आलो…

त्यानंतर काही महिन्यांनी कळले की ते व्यक्तिमत्व किती मोठे होते म्हणून. त्यांनी पेटीसाठी केले कार्य अजोड आहे. त्यांनी ज्या ज्या लोकांना साथ दिली त्या सगळ्यांनी त्याविषयी काढलेले उद्गार सगळे सांगतात..पेटीसाठी संगीत नाटकं अकादमी चा पुरस्कार मिळालेले पहिले वादक….पेटी पूर्वी फार दुर्लक्षित किंवा उपेक्षणीय वाद्य होती…आता हे खरे पण वाटणार नाही की पेटी भारतात आलीच मुळी दीड-दोनशे वर्षांपूर्वी…त्यापूर्वी ती नव्हतीच. आणि आली ती लगेच आपलीशी नाही केली गेली. मागे एकदा गोविंदराव टेम्ब्यांचे पुस्तक वाचले होते त्यात १९२०-१९३० साली पेटीची अवस्था कशी होती त्याबद्दल लिहिल्याचे स्मरते आहे. इराणमधून आलेले वाद्य आणि त्यातून सगळ्या श्रुती का जे काही असते ते नीट निघत नाही म्हणून लोक त्याचा वापर टाळायचे…तेव्हा सारंगी फेमस असावी परंपरेनुसार. आता सारंगीचे महत्व कमी झाले आहे. आणि सगळीकडे पेटी असते.

जळगावमध्ये एका शेतकऱ्याच्या कुटुंबात १९२२ मध्ये यांचा जन्म झाला. उर्दू पाठशालेमध्ये शिक्षण झाले सुरुवातीला आणि धृपद धमार गायकी शिकत होते लहानपणी पण नंतरचा प्रवास पेटीवादनाकडे झाला….प्रवास कसला, झंझावाती वादळच ते. त्यांनी कोण कोणाला साथ केली याची लिस्ट अहमदजान थिरकवांपासून सुरु होते म्हणजे बघा…मग नंतरचे सगळे अल्लारखा, किसन महाराज, सामतां प्रसाद… ते झाकीर हुसेन पर्यंत सगळे तबला वादक. बिरजू महाराज, अण्णा जोशी, जसराज वगैरे तर यांचे नेहमीचेच होते…त्यांनी १९७० पासून बहुधा सोलो वादनही केले…
सगळे असे वाचून नंतर थक्क झालो आणि वाटले की किती बावळट होतो, जेव्हा भेटलो तेव्हा काहीच का नाही वाटले…आणि मध्यंतरी अचानक मागच्या वर्षी त्यांच्या जाण्याची बातमी वाचली. फार वाईट झाले.

One thought on “अप्पा – पेटीचे शेहेनशाह

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s