ती गेली तेव्हा…

हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे…..कवी ग्रेस हा एक अतिशय डेंजर प्रकार आहे. कविता कशी लिहावी आणि त्याचवेळी कशी लिहू नये या दोहोंचाही अतिशय उत्कृष्ट नमुना. त्यांना कोणी संध्यासुक्तांचा यात्रिक म्हटले आहे….मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवली गीते. गीत पण कसे? ‘तो उठला म्हणजे देईल डोळ्यात नदीचे पाणी, तू आवर सावर करता, फिरशील पुन्हा अनवाणी?’ भावगंधर्व हृदयनाथ मंगेशकरांनी अतिशय गाजवलेली त्यांची एक कविता म्हणजे ‘ती गेली तेव्हा रिमझिम…’ आधी वाटते की काही प्रेमगीत किंवा विरहगीत असावे म्हणून…कारण पहिला काही ओळीच अशा आहेत. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादात होता, मेघात अडकली किरणे सूर्य सोडवीत होता….तो दुखी आहे हे सरळ आहे. भावनांचा काला झाला आहे…कारण ती गेली….आणि तेव्हा वातावरण पण असे होते की पाउस पडत होता. उकललेली मानसिक अवस्था झाली होती. पण ती गेली…कुठे गेली? ती का याला सोडून तिच्या घरी गेली? ब्रेक अप झाला की काय? असे वाटते तोच पुढचे वाक्य येते…ती आई होती म्हणुनी…म्हणजे आई गेली. आता कविता वेगळ्याच पातळीवर आहे. आई निवर्तली आणि कवी दुखी अशी सिच्युएशन आहे का गाण्याची? बघा नक्की….कवी ग्रेस म्हणजे जर शब्दातून जो अर्थ कळतो तो अर्थ बिलकुल नसणारा कवी आहे. त्यामुळे आईच्या निवर्तनावर झालेले दुःख हा कवितेचा दृश्य विषय आहे हे खरे का? आधीच एकदा पहिल्या २ ओळींनी चकवा दिला. आता पुढच्या पण ओळी तशाच नसतील कशावरून?

आणि ग्रेस काही उगाच पहिल्या २ ओळी लिहित नाहीत. त्यांनाही अर्थ आहे. त्यांचा अर्थ पुढच्या ओळींशी संबंधित असला पाहिजे. फक्त, हा कसं गंडवलं…खरं अर्थ तर नंतर सुरु होतो, मग पहिले तर काय नुसते नो बॉल्स होते? नाही, नाही. ती गेली मधल्या तिच्या ‘ती’पणाचा आणि नंतरच्या ओळीत तिच्या ‘आई’पणाचा काही संबंध आहे. आणि तो संबंध निवर्तनाच्या प्रसंगाशी जोडून त्यातून काव्य तयार झाले आहे….’Here I have come not to display but to relieve myself for my own sake’ असे म्हणणारा हा कवी आहे. ‘मेघांचे अभिराम रूप गळले उत्कंठ देहावरी’ म्हणजे काय ते त्यांनाच कळते…ज्ञानेश्वरीवर आणि ज्ञानेश्वरांवर बोलणे जोक नाही. तोंडाचा पट्टा लावून अखंड बडबड करणारे निरुपणकार पैश्याला पासरी मिळतात. टाळ कुटायला अक्कल लागत नाही. पण तिथून जो प्रवास सुरु होतो तो सगुण-निर्गुण-साकार असा प्रवास करत परा-पश्यंती-वैखरी वगैरे पातळ्या गाठत जेव्हा अनन्याशी जाऊन पोहोचतो तेव्हाच हे असे काहीतरी सुचते कारण अनन्यच हे मूळ पण आहेआणि पूर्ण-रूपही. ही सगळी बडबड काही मला फारशी जमत नाही पण अनुभूतीची अनुभूती जेव्हा येते तेव्हा कबीर म्हणतो तसे ‘मै हो गयी लाल’ अशी अवस्था प्राप्त होत असावी. आणि मग सहजपणे ही कविता स्फुरते, ‘या हाडांच्या कुशीत व्हावे आज त्वचेचे पाणी, संध्याकाळी माझ्याजवळी सर्व देऊळे जमली, रंग दिशेने तरंग पसरून सूर्य उतरतो खाली…’

तर आपण आपल्या ‘ती’च्याकडे येऊ. कवितेचे नाव हा कवितेच्या आशयाचा दर्शक असतो. काय आहे नाव या कवितेचे? ‘आई’ नाहीच्चे तर वर ‘ती गेली तेव्हा’ असे आहे…म्हणजे या कवितेमध्ये कवीला तिचे आईपण कमी आणि तीपण जास्त अभिप्रेत असावे का? खरंच? आता तर पुढची शंका येते – ‘माझी आई मरण पावलेली आहे आणि तिच्या नावानी मी आक्रोश करतो आहे’ अशी आहे का कविता? खरंच मरण तरी पावलेली आहे का ती? अख्ख्या कवितेत एकदा पण कुठे मरणाचा उल्लेख येत नाही. मग ते चुकून की मुद्दामून? युलोजी म्हणून की खरंच वेगळेच काही प्रकरण आहे हे? एका ठिकाणी ते म्हणालेत ‘मुळात जर ती देहस्विनी असेल तर त्या मुळाच्या प्रारंभाशीच ती मनस्विनी आहे’ काय गौडबंगाल आहे हे? जेवढा विचार कराल तेवढा अडकत जाल…खोल खोल पाणी आहे…

सोडा…जबरदस्त कविता आहे. चाल पण सुंदरस्वरमय आहे. ऐका आणि शांत बस…कारण त्या कवितेचा खरं अर्थ हा आपल्याला झेपणारा नाहीये..आणि झेपला तरी फारसा मानवणारा नाहीये..सुप्त मनाच्या खोल तळाशी जाऊन डुबक्या मारून आलेला हा कवी…आणि तळाशी सापडलेला मोती म्हणजे ह्या कवितेचा अर्थ आहे. पण तो मोती मोती म्हणून मान्य करायला डुबक्या मरायची ताकद असावी लागते अंगात. जी की माझ्या नाहीये. म्हणून हा अर्थ-विषद-विरूपण वगैरे खेळ थांबवतो आणि कवितेची युट्युब लिंक देतो. ऐका आणि तिथेच थांबा…पुढे फार धोका आहे.

Advertisements

7 thoughts on “ती गेली तेव्हा…

 1. शब्दांकित

  मी एक सांगू का? माझ्यापरीने मी ह्या कवितेचा लावलेला अर्थ-
  “पत्नी ही काही काळाची पत्नी, तर अनंत काळाची माता आहे” असे कोणीतरी म्हटल्याचे ऐकिवात आहे. ते बऱ्यापैकी सत्यही आहे. ह्या कवितेचा अर्थ त्या अंगाने लावला तर जाणवते की ही ‘ती’ प्रेयसी/सहचारणी/बायको अश्या अर्थी अभिप्रेत आहे. ती प्रेयसी असली तरी, तिचे मातृत्व गुण/भावना कायम असतात. त्यामुळे ती गेल्यावर पोरकं होण्याची भावना येऊ शकते, असं असेल कदाचित. एकूणच अगम्य कवितेचा थोडासा अर्थबोध करण्याचा हा प्रयत्न!

  असो तुमचा लेख आवडला. दुसऱ्या परिच्छेदातील ज्ञानेश्वरीवरील लिखाण ही आवडले.
  ‘देहस्विनी’ हा शब्द पहिल्यांदाच वाचला. अर्थ सांगू शकाल का?

  • Nikhil Sheth

   आभार शब्दांकित, देहस्विनी म्हणजे देह-भान असणारी असा शब्दार्थ आहेत. आता भावाचे कितीक कंगोरे उलगडता येतील सूक्ष्म अर्थांचे त्याला परिसीमा नाही…

 2. शब्दांकित

  अजून एक जर तुम्ही हा सिनेमा पहिला नसेल तर. सिनेमात मात्र हे गाणं ‘आई’ ला उद्देशूनच आहे. नायकाची आई जाते तेंव्हा तो हे गाणं गातो असं पुसटसं आठवतंय.

 3. अनिकेत वैद्य

  ह्या कवितेच अजून १ वैशिष्ठ्य शेवटच्या ओळी ऐका,
  ” द्रौपदीच्या वस्त्राआड तो क्रुष्ण नागडा होता”.

  हा डोक्यला खूप मोठा शॉट आहे.

 4. Kshipra

  Tuze pushkal blog vachale vel kadhun. Pratyekavar cmnt takavishi hi vatali pan yavar ka thabakale mahiti nahi!
  ग्रेस vachatana baryachada mazya marathachi bolu kavatike chi athavan hote, ‘ki shravanichi hoti jibha kinwa vedhe parimalache bik mode’ kinwa tatsamch. Tyanchya kautukasathi nahi tar kavitesathi bolatey mhanun kavitevar yete.
  Ha kavi vachatana to samajalyacha dawa konich karu naye, agadi kavinehi karan konatya kshani konatya don olinmadhala arth kay lagun jail ani apala ki kraunch vadhanantarcha valmiki hoil te sangata nai yaych. Ithe kavila ‘ti’ apekshit ahe ki ‘aai’ nakoch to vad! Pan ‘ti’ kon kon asu shakate paha, ti ‘pratibha’ asu shakate, ti tuza maza lalatlekh lihinari ‘niyati’ asu shakate, ti fakt ‘stree’ astitva asu shakate! Mhanaje kavichya ‘purush’ manatil ‘stree’… Sarya kalpananna sarya oli lagu hotil, ani asa bhavya pasara ubha rahil samor… Anubhuti ghe!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s