सागरास

ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला

भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ । सृष्टिची विविधता पाहू
तइं जननी-हृद् विरहशंकितहि झालें । परि तुवां वचन तिज दिधलें
मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टि वाहीन । त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी । मी
जगदनुभव-योगे बनुनी । मी
तव अधिक शक्त उध्दरणी । मी
येइन त्वरें कथुन सोडिलें तिजला । सागरा, प्राण तळमळला

शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं । ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु यापुढती । दशदिशा तमोमय होती
गुण-सुमनें मी वेचियली ह्या भावें । कीं तिने सुगंधा घ्यावें
जरि उध्दरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे
तो बाल गुलाबही आता । रे
फुलबाग मला हाय पारखा झाला । सागरा, प्राण तळमळला

नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी । आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा । वनवास तिच्या जरि वनिंच्या
भुलविणें व्यर्थं हें आता । रे
बहु जिवलग गमतें चित्ता । रे
तुज सरित्पते । जी सरिता । रे
तद्विरहाची शपथ घालितो तुजला । सागरा, प्राण तळमळला

या फेन-मिषें हससि निर्दया कैसा । का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते । भिउनि का आंग्लभूमीतें
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी । मज विवासनातें देशी
तरि आंग्लभूमी-भयभीता । रे
अबला न माझिही माता । रे
कथिल हें अगस्तिस आता । रे
जो आचमनी एक पळीं तुज प्याला । सागरा, प्राण तळमळला

2 thoughts on “सागरास

 1. Naniwadekar

  > तरि आंग्लभूमी-भयभीता । रे

  या कवितेची रचना अक्रूर ज़ातीभवती आहे. (गुणि बाळ असा ज़ागसि का रे वाया – नीज़ रे नीज़ शिवराया : (२-६ वा) ८ – ८ – ४ + ८ + ६)

  नंतर २-८-६ अशी (अब~ला न माझि ही – माता रे) रचना तीन ओळींत आहे. हिला सरळ ८-८ अशी पादाकुलक रचना मानायला हरकत नाही. २-८-४-२ असंही मानता येईल. मी या ओळींना २-८-६ मानतो, आणि त्या मात्रावृत्ताला माधवराव पटवर्धनांच्या ‘छन्दोरचना’ ग्रंथात ‘कर्णफुल्ल’ नांव दिलं आहे.
  ती ओळ ‘ज़रि आंग्लभूमिभय-भीता रे’ अशी वाटते. तो ‘मि’ छन्दशास्त्रानुसार र्‍हस्व हवा. आंग्लभूमिभयभीता हा एकच शब्द आहे, पण त्यात ज़ोडचिह्‌न (हायफन) मी ‘भय’ नन्तर (आंग्लभूमिभय-भीता) पसंद करतो. शब्द तोडायचाच असेल तर ‘आंग्लभूमी भयभीता’ असा चूक तुटण्याऐवजी ‘आंग्लभूमिभय भीता’ असा विलग केलेला बरा. त्याद्‌ऋष्टीनी ‘भय’ नन्तर तो डॅश आलेला बरा. हे माझं वैयक्तिक मत.
  आंग्लांची भूमी – आंग्लभूमी (षष्टी तत्पुरुष समास)
  आंग्लभूमीचे भय – आंग्लभूमिभय (परत षष्ठी तत्पुरुष)
  आंग्लभूमिभयापासून (भयात्‌) भीत – आंग्लभूमिभयभीत/ता (पंचमी तत्पुरुष), असे तीन समास त्या शब्दांत आहेत.

  जो आचमनी एक पळीं तुज प्याला -> मंगेशकर मंडळी ‘एक क्षणी’ म्हणतात. आणि मनी-क्षणी हा अनुप्रास छान वाटतो.

  =====

Niranjan साठी प्रतिक्रिया लिहा उत्तर रद्द करा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s