वृत्ते – कवितेला जखडणारी की बांधणारी..?

शाळेत असतानाची सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे मराठीच्या पुस्तकातल्या कविता….आणि सगळ्यात नावडती गोष्ट म्हणजे त्या कवितांचे व्याकरण…वृत्ते. कवितांना चाली लावून म्हणायला मजा यायची पण त्याच चालींमागचा आधारस्तंभ असलेली वृत्ते नकोशी वाटायची…सगळे गण पाठ करून वर कोणते वृत्त आहे ते शोधा म्हणजे कटकटच होती….त्याच वृत्तांविषयी नंतर नंतर आत्मीयता वाटायला लागली. कवितेची चाल ही कवितेचा अर्थ पाहून ठरवावी लागते. तेच रसपरीपोषाला साजेसे असते. नाहीतरी गम्मत होते. ‘झाले युवतिमना दारूणरण’ सारखे प्रेमगीत संग्रामगीत वाटायला वेळ लागत नाही….आणि चाल कुठून येते? चालीचा आणि वृत्तांचा फार जवळचा अनुबंध आहे. त्यामुळे कवितेचा रस पाहून त्यानुसार वृत्त निवडले जाते. भुजंगप्रयात म्हटले की काय रचना असावी, ओवीतून कोणते विषय हाताळले जावेत, नि जीवनलहरी वृत्त असल्यास काय भावना कवितेतून असाव्यात याची वाचक त्यामुळे एक अपेक्षा घेऊन असतो. (आदरणीय नानिवडेकरांस – यास अपवाद आहे हे मान्य आहे. लगेच ‘हल्ला-बोल’ करू नका) तर यावर ही लेखमाला. पहिल्या भागात मराठी/संस्कृत/हिंदी वृत्तांचा धावता आढावा घेतला जाईल. दुसऱ्या व तिसऱ्या भागात अनुक्रमे पाश्चात्य आणि पर्शिअन वृत्तांविषयी लिखाण असेल.

वृत्ते हा काव्यातला (मुक्तछंदाचे आगमन होण्याआधी पर्यंत तरी आणि काही अंशी अजूनही) एक महत्वाचा भाग आहे. संस्कृत टीकाकार विश्वनाथ म्हणतो- “वाक्यं रसात्मकं काव्यं | ” या व्याख्येत सर्वोपरी महत्वाचा भाग म्हणजे रस आहे, आणि त्या रसाची अभिव्यक्ती सुकर व्हावी, म्हणून इसवी सनपूर्व २०० पासून पिंगलछंद:शास्त्र संहितेपासून ते  कुसुमाग्रजापर्यंत अनेकांनी नवीन वृत्ते रचली, असलेली संकलित केली आणि गेयतेने परिप्लुत अशी रसाभिव्यक्ती सदर केली. आणि विशिष्ट रस व्यक्त करण्यात यांनी इतकी महत्वाची भूमिका बजावली आहे, की त्यांना नजरेआड करता येत नाही. मग ज्ञानेश्वर, एकनाथ, मुक्तेश्वर यांची सहज सुंदर ओवी असो, नामदेव-तुकाराम-रामदास यांचे अभंग असोत, वामनपंडितांचा सुश्लोक असो अथवा आर्या मोरोपंतांची असो. पसायदानामधील “जे खळांची व्यंकटी सांडो | त्या सत्कर्मी रती वाढो|” हे उदात्त मागणे लीनपणे मागणारी शालीन ओवीच त्या ठिकाणी सुंदर वाटते, तर हिंदवी स्वराज्याचा जोरकस साक्षात्कार “स्वप्नी जे देखिले रात्री|ते ते तैसेची होतसे |” असा कथन करताना रामदासांच्या अनगड शैलीला अनुष्टुप वृत्तच मानवते. गजेंद्र मोक्षात गजेन्द्राने केलेला धावा “नसे ठाव ब्रह्मा, न शिव अथवा श्रीपती हरी | हरी जो तापाते उचलुनी कृपासिंधु लहरी|” शिखरिणी वृत्तात वाचताना मूर्तिमंत कारुण्य डोळ्यांसमोर उभे ठाकते. (इथे मी फक्त मराठी कवितेतील उदाहरणे घेतली आहेत. प्रसंगवशात पुढे संस्कृत, हिंदी, याही भाषांमधील कवितांचे दाखले येतीलच.)

वृत्तातील रचनेवर एक आक्षेप नेहमी घेतला जातो , की वृत्तांच्या गणमात्रादि बंधनांमुळे कवी कारण नसताना जखडला जातो. यात तथ्य नक्कीच आहे, परंतु वृत्तांची बंधने मान्य करूनहि जुन्या कवींनी जी रचना केली आहे, ती पाहिली म्हणजे मन स्तिमित होते. या आक्षेपाचा शांता शेळके यांनी “नवनीत” च्या प्रस्तावनेत चांगलाच समाचार घेतला आहे. बदलत्या काळानुरुप बदलायला हवे हे मान्य, परंतु जुन्या संकेतांमध्ये चांगले असे खूप आहे. आता अक्षरगणवृत्तापेक्षा मात्रावृत्ते कधीही जास्त फ्लेक्सिबल असतात, आणि त्यामुळे आनंदराव टेकाडे यांनी आनंदकंद नामक वृत्त स्वत: तयार केले, कुसुमाग्रजांनी जीवनलहरी वृत्त तयार केले. आशयाची सोय पाहून वृत्ते रचली तर कवीला “रेंज” खूप मोठी मिळते. वृत्त हा मूळ म्हणजे सांगाडा आहे, त्यात कोणता रस ओतला तर काव्य जिवंत होईल , हि मेख कळली , की “समसमा संयोग की जाहला !”

वृत्तांचे अतिशय ढोबळ मानाने २ प्रकार आहेत- १) अक्षरगणवृत्त आणि २) मात्रावृत्त. अक्षरगणवृत्तामध्ये उपप्रकार म्हणजे १) समवृत्त २) अर्धसमवृत्त आणि ३) विषमवृत्त. यामध्ये ४ ओळींची गण रचना सारखी असते, २ ओळींची सारखी असते अथवा सर्वच ओळींची वेगळी असते. आता खाडीलकरांच्या भाषेत सांगायचे झाले तर “झाले इतके वृत्त स्तवन  पुरे आहे”.

आता संस्कृत साहित्यातील काही प्रसिद्ध उदाहरणे पाहू. अर्थातच पहिले उदाहरण हे कवीकुलगुरू कालिदासांच्या मेघदुतातील आहे. मेघदूताचे कथानक हे “विप्रलंभ शृंगार” या  प्रकारात मोडणारे आहे. त्यात आपली पत्नी बरोबर नसल्याने यक्ष शोक करतो आहे. यासाठी कालिदासाने वापरलेले वृत्त आहे “मंदाक्रांता “. नाव सुद्धा कसे चपखल आहे- मंद + अक्रांता. ती व्यथा ” मेघालोके भवती सुखिनोsप्यन्यथावृत्तीचेत: |  कंठाश्लेषप्रणयिनीजने किम पुनर्दूरसंस्थे | ” अशा श्लोकामधून प्रभावीपणे व्यक्त होते. शांत शेळकेंनीच केलेल्या मेघदूताच्या मराठी अनुवादामध्ये ‘पादाकुलका’ वृत्त वापरले आहे. (इच्छुकांकरता – मेघदूताचा अजून एक रसाळ अनुवाद चिंतामणराव देशमुखांनीही केला आहे, जरूर वाचवा)

गीतेसारख्या काव्यात तर ” वाचमर्थोsनुधावती” चा प्रत्यय येतो. गंगालहरीमध्ये गंगेची महती वर्णन करताना शिखरिणी मधून जगन्नाथ पंडित “समृद्धं सौभाग्यं सकलवसुधाया: किमपि तत” असे म्हणून जातात, तर गीतगोविन्दामध्ये कृष्णाचा खट्याळपणा वर्णिताना जयदेव आर्येत म्हणून जातो – ” धीर समीरे यमुना तीरे वसती वने वनमाली  | गोपी पीनपयोधरमर्दन चंचलकरयुगशाली |”. (इथे “अवजड आणि सुटसुटीत आर्या ” हा पु लंचा जोक आठवल्याशिवाय राहत नाही. जिज्ञासूनी गाळीव इतिहास प्लीज मुळातून वाचावा! तो खरा मुक्त-छंद)

संस्कृत आणि मराठी नंतर नंबर लागतो हिंदीचा. भक्तीकाल आणि रीतीकालामध्ये अतिशय सुंदर प्रासादिक रचना झाल्या. त्यात कबीर, मीराबाई पासून ते केशवदासापर्यंत सगळे येतात. मात्र अमीर खुसरोला विसरून चालत नाही. भारतीय आणि इस्लामी संस्कृतीचा सांस्कृतिक मेळ घडवून आणण्यात या माणसाचे फार मोठे कर्तृत्व आहे. पण या सगळ्या गोड गोड स्वप्नांतून झडझडून जागे झाल्यासारखे केले ते भूषणाने. सवाई, मनहरण या वृत्तान्मधून त्याने शिवाजी महाराजांवर अशी काही कविता केली आहे की भाई वाह ! . मनहरणलाच मराठीत घनाक्षरी असेही म्हणतात. त्याची बरीच रचना या वृत्तात आहे. एक प्रसिद्ध उदाहरण देतो-

इंद्र जिमी जंभ पर| बाडव सुअम्भ पर |
रावण सदंभ पर| रघुकुलराज है||
पौन बारीबाह्पर| संभू रतिनाह पर|
ज्यो  सहस्बाह्पार| राम द्विजराज है ||
दावा द्रुमदंडपर | चीता मृगझुंडपर|
भूषण वितुंडपर| जैसे मृगराज है||
तेज तम अंस पर | कान्ह जिमी कंस पर|
त्यो मलीच्छ वन्स पर| सर शिवराज है ||
वृत्ते हा फक्त भारतीय काव्याचा विशेष आहे का? अजिबात नाही. अरेबिक काव्यात मिस्रअ प्रचलित आहे. मिस्रअ म्हणजे अर्धी ओळ. उर्दूमध्ये गझलेचे पण रचना करताना काफिया-रदीफ सारखे काही नियम असतात, किंवा अनेक इतर काव्यप्रकार आहेत जसे की मसनवी, कसिदा वगैरे. फार्सीमध्ये ही अनेक वृत्ते आहेत. तसेच ग्रीक आणि लातिन काव्यात दाक्टीलिक हेक्सामीतर, Sonet  इत्यादी वृत्ते प्रचलित आहेत. त्यांचा आढावा पुढे केव्हातरी घेऊ.
.                                                                                                                      – निखिल बेल्लारीकर

18 thoughts on “वृत्ते – कवितेला जखडणारी की बांधणारी..?

 1. Naniwadekar

  > भुजंगप्रयात म्हटले की काय रचना असावी, ओवीतून कोणते विषय हाताळले जावेत, नि जीवनलहरी वृत्त असल्यास काय भावना कवितेतून असाव्यात
  > याची वाचक त्यामुळे एक अपेक्षा घेऊन असतो. (आदरणीय वाचकहो – यास अपवाद आहे हे मान्य आहे. लगेच ‘हल्ला-बोल’ करू नका) तर यावर ही लेखमाला.
  >
  जिथे नियमच नाही आणि अपेक्षाही नाहीत, तिथे अपवादाचा प्रश्नच कुठे आला. अमुक रागाशी किंवा अमुक छंदाशी तमुक रसाचा संबंध आहे असल्या समज़ुती कोणी बाळगल्या तर त्या मिटवण्याचा प्रयत्नही करू नये. अपवादानी एखादा तोडी करूण रसाला योग्य असतो, मुलतानी-श्री-भटियार-दरबारी मंडळी भारदस्त असतात. पण यमन, भीमपलास, बागेश्री, सारंग, मल्हार हे सर्वसमावेशक आहेत, आणि मुलतानीही क्वचित खेळकर असू शकतो. रामदासांनी ‘स्वप्नी ज़े देखिले रात्री’ मधे अनुष्टुपात ज़ोरकस रचना केली असेल, पण व्यासानी अनुष्टुपातच अर्जुन घाबरलेला दाखवला, कृष्णाचे कठोर उद्‌गार, तत्त्वप्रचुर उतारे हे सगळं त्याच छंदात आलं. ‘समर्थाचिया सेवका वक्र पाहे’ हे सांगायला रामदासांना तथाकथित ‘ज़ोरकस’ अनुष्टुपाकडे धाव घ्यावी लागली नाही.

  चिखलात येता – मूल माखुनिया
  प्रेमे न्हाऊ तया – घालतोसी , अशी ईश्वराची लडिवाळ स्तुती केल्यावर त्याच कवितेत पुढे कुसुमाग्रज ईश्वराला
  जळातले जीव – वाळवंटावरी
  भरल्या दुपारी – ओढसी तू – म्हणून शिव्याही देतात. तेव्हा देवद्‌वार छंदाची नक्की प्रवृत्ती भावोत्कट की फटकळ?

  > शिखरिणी वृत्तात वाचताना मूर्तिमंत कारुण्य डोळ्यांसमोर उभे ठाकते.
  ‘समोसा भारी हा गरम कसला, जीभ ज़ळली’ हे वाचतानाही कारुण्य डोळ्यापुढे आलं का? (माझ्या ओळीत काव्य-गुण आढळणार नाहीत, हे मान्य आहे. त्याबद्‌दल हल्ला-बोल करू नका. गंमत म्हणून सुचली तशी ओळ लिहिली.)

  – डी एन

 2. Naniwadekar

  बेल्लारीकर साहेब (आणि श्री शेठ) : ‘धीर समीरे यमुना तीरे वसती वने वनमाली’ ही आर्या नाही, हे ८-८-८-४ मात्रांचं साकी-वृत्त आहे. आणि तो शब्द ‘वसति’ आहे.

  गंगे, गोदे, यमुने, – माझा नोहे तुझाचि हा बाळ – ही कुंती कर्णाला नदीत सोडतानाची करूण आर्या आहे. (१२-१८ मात्रा)
  किंवा, तेव्हा कोठे गेला होता राधासुता तुझा धर्म, ही आर्या आहे. पण तिच्यात कारुण्य शोधू नका.

  > वृत्तातील रचनेवर एक आक्षेप नेहमी घेतला जातो , की वृत्तांच्या गणमात्रादि बंधनांमुळे कवी कारण नसताना जखडला जातो. यात तथ्य नक्कीच आहे.
  >
  ‘कारण नसताना’ यात काही तथ्य नाही. छंदबद्‌धता आवडते, म्हणून कवी बुद्‌ध्याच तशी रचना करतो. साध्या बोलण्यातही ‘ते दोघे गेला’ (‘गेले’-ऐवजी) अशी वाक्यरचना चालत नाही. व्याकरणाचे हे ‘ज़खडणारे’ नियम विना-कारण, फावल्या वेळेतला चाळा म्हणून आलेले नाहीत.

  – नानिवडेकर

 3. अनिकेत वैद्य

  (इच्छुकांकरता – मेघदूताचा अजून एक रसाळ अनुवाद चिंतामणराव देशमुखांनीही केला आहे, जरूर वाचवा)

  ह्यात “जरूर वाचावा” असे हवे.
  लेख मस्तच आहे. जाता जाता क्रुपया शुद्धलेखनाकडे पहावे. म्हणजे अजून बहार येईल.

 4. nikhil bellarykar

  @ अनिकेत वैद्य : . शुद्धलेखनातील चुकीबद्दल दिलगिरी आणि चूक शोधल्याबद्दल आभार…..

  @ नानिवडेकर: वृत्तातील झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी आणि चूक शोधल्याबद्दल आभार.
  आपल्या प्रतिक्रिया वाचून मस्त वाटले…..आता मी वृत्तांवर रसांचा आरोप केला असा त्यांचा सूर आहे, तर यावर माझे इतकेच मत आहे की ह्या अनुभव सिद्ध गोष्टी आहेत, साचेबंद नियम नाहीत. आता एक च वृत्त हे विविध रसांच्या अभिव्यक्तीसाठी वापरता येते आणि तसे ते वापरले गेलेपण आहे , जसे की उपजाती. परंतु मंदाक्रांता, स्रग्धरा, मालिनी या वृत्तांच्या चालीमुळे काही विशिष्ट वर्णने त्या वृत्तामध्ये करणे सोपे जाते, ते जास्त नैसर्गिक वाटते . माझा रोख हा तसे patterns अस्तित्वात आहेत, हे सांगण्यावर आहे. बाकी माझे काही म्हणणे नाही.

  अजून १ मुद्दा….रामदास आणि रामदासी संप्रदायाच्या रचनेत अनुष्टुप , प्रामाणिक इत्यादी वृत्ते जास्त फेमस आहेत, असे महाराष्ट्र सारस्वतकारांचे म्हणणे आहे. आणि एकूणच रामदासी रचना हि अनगड आहे , आणि मनाचे श्लोक वगळता रामदासांनी अभंग आणि अनुष्टुपेच जास्त रचली आहेत ( अपवाद करुणाष्टकांचा ) त्यामुळे जेव्हा मी जोरकसपणा सांगतोय तेव्हा मुख्यत: रामदासी जोरकसपणा अभिप्रेत आहे…

  शिखरिणी वृत्तातील कारुण्यावर जो आक्षेप आपण घेतला आहे , तो गजेंद्रमोक्ष वाचून तरी नाहीसा होईल अशी अपेक्षा आहे. मी काही वृत्तातील माझ्या मते उत्कृष्ट असलेल्या रचनांचा हवाला देऊन त्या वृत्तातील गुणधर्म पाहण्याचा प्रयत्न करतोय…..आता हा निकष सर्व ठिकाणी लावणे म्हणजे एखादी स्त्री हरिणाक्षी आहे असे म्हटल्यावर शिंगे कुठे आहेत? असे विचारण्यासारखे होईल.

  • Naniwadekar

   > माझा रोख हा तसे patterns अस्तित्वात आहेत, हे सांगण्यावर आहे.
   >
   श्री निखिल बेल्लारीकर : कुठले निष्कर्ष आपण ढोबळमानानी काढू शकतो आणि कुठले नाही, याबद्‌दल माझे थोडे विचार मी तुम्हाला सांगतो.

   खयालगायनात सरगम करू नये असा अल्लदिया खानसाहेबांचा विचार होता. त्यांच्या शिष्यशाखेनी तो मानला. पण असा ढोबळ निष्कर्ष मला मान्य नाही. त्या नावांची (मंजी खान, केसरबाई, मोगूबाई, मनसूर) प्रतिष्ठा इतकी मोठी आहे की निदान जयपूर गायकी सरगमेला अनुकुल नाही हे अनेक लोकांनी चूपचाप मान्य केलं. पण त्याला पुरावा काहीच नव्हता. किशोरीही बोलताना सरगमेवर टीका करते, पण गाताना (अधूनमधून) सरगम वापरते. तिनी सरगम वापरली नसती तरी ‘या गायकीत सरगम सहज़ वापरता येईल’ असा निष्कर्ष मी काढू शकलो असतो, पण त्याचं उदाहरण मात्र किशोरीमुळेच शक्य झालेलं आहे. एखादी गोष्ट होत नाही याचा अर्थ ती होऊ शकत नाही असा होतो का, हा प्रश्न असतो. आणि शिखरिणी तर कारुण्य, वीर, हास्य, शृंगार हे सगळे रस हाताळू शकते.

   खयालगायनात हास्यरसाला स्थान नाही, हा निष्कर्ष मला मान्य आहे. ते आज़पर्यंत आढळलेलं नाही. पुढे काय? माझ्या मते ते पुढेही आढळणार नाही. भीमसेनजी किंवा अभिषेकी बुवा गाताहेत आणि त्यांनी घेतलेल्या एका ज़ागेमुळे श्रोत्यांत खसखस पिकली याची मी कल्पनाही करू शकत नाही. खयालगायनात जेव्हा गायक-श्रोते हसतात तेव्हा त्यामागे दुसरं काहीतरी कारण असतं, तो गायनाचा प्रत्यक्ष परिणाम नसतो. सिनेसंगीतात त्या मानानी हास्यरसाला वाव आहे.

   श्री निखिल शेठ : ‘दिसामाजि काहीतरी’ हे भुजंगप्रयातात बसणारं रूप वापरता आलं तर पहा. हे शब्द नेहमीच त्यांच्या वृत्ताचा संदर्भ सोडून वापरले ज़ातात ही गोष्ट मला खटकते.

   – डी एन

 5. Naniwadekar

  Shri Bellarykar: As I had said, if you have convinced yourself about some non-existent associations, it is best to let you continue with your illusions.

  > शिखरिणी वृत्तातील कारुण्यावर जो आक्षेप आपण घेतला आहे , तो गजेंद्रमोक्ष वाचून तरी नाहीसा होईल अशी अपेक्षा आहे.
  >
  So you first announce that Indian singers wear dhotar and when some singers who do not wear dhoti are pointed out to you, you argue that you expect the claim to be established if only one looked at Mallikarjun Mansur. Very good.

  > आता हा निकष सर्व ठिकाणी लावणे म्हणजे एखादी स्त्री हरिणाक्षी आहे असे म्हटल्यावर शिंगे कुठे आहेत? असे विचारण्यासारखे होईल.
  >
  Once again, you see a few women with eyes like deer, then you announce that all/most women have eyes like deer, and when it is pointed out to you that your generalization is wrong, you protest that people are looking for horns when you are talking about eyes.

  > माझे इतकेच मत आहे की ह्या अनुभव सिद्ध गोष्टी आहेत, साचेबंद नियम नाहीत.
  >
  What is this? Proof by assertion? Keep repeating a thing and it will be proven correct or other party will just give up (which, indeed, the other party will do)? Just calling a thing अनुभवसिद्ध does not make it so.

  Lastly, please pay attention to lekhan-shuddhataa.
  त्या सत्कर्मी रती वाढो -> tayaa
  ते ते तैसेची होतसे -> taisechi, not chii … laghu-pancham
  नसे ठाव ब्रह्मा, न शिव अथवा श्रीपती हरी | हरी जो तापाते उचलुनी कृपासिंधु लहरी| shreepati , uchaluni
  रघुकुलराज है| hai.n . Use ‘hai’ for singular (ek aadamee, tuu, meraa), hai.n for plural or respect (das log, aap)
  jaise mrugaraaj hai.n. If it were ‘hai’, the line would change to ‘jaisaa mrugaraaj hai’ .
  And do request Nikhil Sheth to edit the reference to ‘dheer-sameere’ to point it to Saki (or Saar, as it is called in Hindi), instead of Arya.

  – dn

 6. nikhil bellarykar

  @नानिवडेकर : मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की i am not playing with some non-existent patterns. नवनीतच्या प्रस्तावनेत शांता शेळके यांनी वृत्ते आणि रस यांमधील association स्पष्ट
  केले आहे , ते एकदा मुळातून पहावे ही विनंती. त्यामुळे या ठिकाणी मी काढलेले निष्कर्ष ढोबळमानाने लागू होतात.

  > एखादी गोष्ट होत नाही याचा अर्थ ती होऊ शकत नाही असा होतो का, हा प्रश्न असतो………
  परंतु हा प्रश्न मी हाताळत नाहीये …… मी एखादी गोष्ट एका विशिष्ट प्रकारे केल्यावर चांगली वाटते की नाही, हे पाहत आहे … गजेंद्रमोक्ष आणि देव्यपराधस्तोत्र हे त्याचे उत्तम उदाहरण आहे…
  किंवा मेघदूत आणि केकावली ही त्याची उदाहरणे आहेत.

  > What is this? Proof by assertion? Keep repeating a thing and it will be proven correct or other party will just give up (which, indeed, the other party will do)? Just calling a thing अनुभवसिद्ध does not make it so.
  आता अनुभवसिद्ध गोष्टींचे थोडे मासले देतो.. रामदासांनी अनुष्टुप, भुजंगप्रयात, मालिनी हे सोडून इतर वृत्तात फारशी रचना केली नाही, आणि त्यात सुद्धा त्यांचा भर अनुष्टुप आणि ओव्यांवर जास्त आहे. का???? हायकू सारखे वृत्त गोळीबंद idea व्यक्त करण्यासाठी का वापरतात? इलीआड साठी होमरने dactylic hexameter च का वापरले????? जीवनलहरी बद्दलचे विवेचन तीतून व्यक्त होणार्या आशयाच्या जातीबद्दल काय सांगते? मंदाक्रांतेबद्दल शांता शेळके काय म्हणतात ?

  यांचा मागोवा जर घेतला तर अनुभवसिद्ध म्हणजे काय , ते कळेल अशी आशा..

  • Naniwadekar

   मी शान्ताबाईंचा नवनीत-च्या प्रस्तावनेचा लेख मिळवण्याचा प्रयत्न करीन. तुम्हाला वृत्त आणि रस यांच्यातला संबंध दाखवण्यात यश आलेलं नाही. तसा संबंध आहे हे शान्ताबाईंना वाटतं का, आणि वाटत असल्यास तो मुद्‌दा त्या चांगल्या प्रकारे मांडू शकल्या आहेत का, हे पहायला मला आवडेल.

   – डी एन

 7. nikhil bellarykar

  @ नानिवडेकर :
  वृत्ते आणि रस यांमधील संबंध मी स्पष्ट केला नाही , कारण माझा तो उद्देश नव्हता. मला फक्त त्या दोहोंमध्ये काही संबंध आहे , हे सांगायचे होते. हा संबंध मला काही अंशी स्वानुभवाने जाणवला आणि त्याला शांताबाईंच्या लेखाने पुष्टी मिळाली. तसा संबंध आजपर्यंत मेघदूत आणि मंदाक्रांता यांमध्ये जोडलेला मी वाचला आहे.
  अधिक माहितीसाठी आपण ही लिंक पहा अशी विनंती.

  http://cs.annauniv.edu/insight/Reading%20Materials/chhandas/pages/moods.htm

  ह्यात असे सांगितले आहे की काव्यरचनेमध्ये कवी काही संकेत बऱ्याच वेळेस पाळतात , आणि विशिष्ट वृत्ते ही विशिष्ट प्रकारचा आशय वर्णन करण्यासाठी जास्त “नैसर्गिक” असतात. हा आणि इतकाच माझा दावा आहे..

 8. Naniwadekar

  > this concerns the use of metres and their adaptability to certain moods through Tennyson.
  >

  Shi Bellarykar : I do not understand English poetry, nor Hindi poetry, and I echo G A Kulkarni’s opinion that it would be fun to kick the arses of Urdu poets (whose language is almost as alien to me as their mentality) for an assortment of reasons not directly related to the discussion at hand.

  For that matter, I don’t much care for Marathi poetry either. But I am interested in poetic metres in Marathi, not all that much in the meaning of words. I lack the temperament needed to appreciate poetry, I guess. Thanks for taking the trouble to point Tennyson’s link to me.

  – dn

 9. nikhil bellarykar

  Shri Naniwadekar: First of all, I echo your opinion on Urdu poets( kick-arse stuff!!!!!) and while I am interested in prosody, I believe(with evidence from guys like Halayudha) that metres are, though very much fun to play with, mainly the “instruments” to convey meanings.

  I believe you have read Parshuramtatya Godbole’s “Vrutta darpana”, which contains many vruttas. Further, Vaman Shivram Apte’s Sanskrit-English Dictionary part 2 gives many vruttas in the end. If you are interested in the structure of Sanskrit and Marathi vruttas and their counterparts in Graeco-Latino-Persian literature, may we continue the discussion further. my email is nikhil.bellarykar@gmail.com.

  Lastly, thanx a lot for taking the trouble to read an article on an arcane subject. Connoisseurs of this subject are very rare, indeed. I am glad to have found 1.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s