रामदास विरुद्ध तुकाराम

काय लिहू, काय लिहू? तुकारामांना हा प्रश्न कधी पडला असेल का? की आज कशावर अभंग लिहू? मोरोपंतांना? आज कोणते रामायण लिहू? निरोष्ठ झाले, हुः झाले, एका ओळीचे देखील रामायण झाले…पण त्यांना हा प्रश्न पडला असेल कधी? आता कोणते रामायण? आणि ज्ञानेश्वर? त्याचे काय? ओवीसाठी विषय शोधायचे कष्ट त्यांनी कधी घेतले असतील? आळंदीहून २७ दिवस प्रवास करून पैठण ला आले तेव्हा भावंडांनी रोज एक एक करत हरिपाठ रचला…हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा…..किती सहज…त्यासाठी डोकेफोड करायची गरज भासली का त्यांना? की विंदांना? आता स्त्रीचे कोणते रूप वर्णू? प्रत्येक नाते आणि प्रत्येक वय त्यांनी शब्दात चितारले पण तरीही नव्या कविता सुचतच गेल्या….? अगदी ‘नुकते होते नजरेत तुझ्या दिसू लागले’ पासून ते ‘दर्याच्या भरतीच्या लाटा महाराष्ट्र अंगना, कंकणनादा भिऊन ज्यांच्या शत्रू सोडिती रणा’ पर्यंत कितीक ती रूपे…’आदिमाया’ म्हणजे कल्पनाविलासाचा कहरच.

कल्पना करा, टिळक बसले आहे केसरी च्या कचेरीमध्ये, दुसऱ्या दिवशीचा पेपर छापायचा आहे आणि अग्रलेखच तयार नाही…लेखणी घेऊन विचार करताहेत. किंवा खाडिलकर, नाट्यसंगीताचे पदच सुचत नाहीये. माधव जुलीयनांना ना कधी फारसी शब्दांची उणीव भासली असेल ना पुलंना विनोदाची….अतार्किक वाटते की पुलं विनोद काय करू म्हणून सिरीयस झालेत. कालिदास निसर्गाच्या वर्णनात उपमा काय वापरू याचा विचार करतोय….२ दिवस झाले आणि दिग्दर्शक मागे लागलाय की श्लोक द्या श्लोक द्या तेव्हा कुठे ‘आषाढस्य प्रथम दिवसे मेघामाश्लिष्ट सानुम, वप्रक्रीडापरिणत गज प्रेक्षणीय ददर्श’ हे सुचले…ते पण वाक्याला वाक्य जोडून….आहे शक्य?

‘मी पाहतो ही माणसांनी सळसळणारी निर्दय शहरे, ही अप्राण कोरड, पाण्यालाच पडलेली’ हे वाक्य सुचायला काय लागते? एका जागी बसून विचार करून सुचते? की गालिब डोके खाजवून खाजवून ‘जिक्र उस परीवशका और फिरा बयान अपना’ लिहितोय…बाप जन्मात शक्य आहे का? दारा शुकोह श्रीनगर वर बेनिहाय खुश आहे. आणि विचार करतोय कसे पकडू याला शब्दात, काय लिहू, काय लिहू? त्याला ‘गार फिरदौस बर रु ए जमि अस्त’ लिहायला एका सेकंदापेक्षा जास्त वेळ लागला असेल?

मनाच्या विफालावस्थेत साहित्यिकाला ‘हे गच्च बहरलेले झाड, मी धरेन तेवढीच फांदी, कुजकी अन ठिसूळ’ लिहायला कष्ट पडत नाही. दांडेकरांना भावनेचे वर्णन करायला शब्द शोधायला लागले असतील? असंभव…गोनीदांचे मराठी म्हणजे ‘मराठी’. त्यात यमुना असो, मृण्मयी असो, गाडगेमहाराज असोत, दुर्गभ्रमण असो की भागीरथ असो…असंख्य असंख्य, अकल्प अकल्प…भाषा आणि जीवन आकळलेला माणूस, त्यांना कुठे हा शाप? बाबासाहेबांना इतिहासाचे पोर्ट्रेयल कसे करावे यासाठी नव्या कल्पना शोधाव्या लागतात? सुहास शिरवळकर, गुरुनाथ नाईक, अर्नाळकर यांना साहसकथांच्या विषयांची कमी भासते?

शेजवलकरांना कोणताही विषय द्या, पेशवाईची टवाळी करायची संधी त्यांनी सोडली नाही. त्यासाठी त्यांना कधी विचार करावा लागला नाही….की सलमान खान ला सिनेमा मध्ये कपडे कुठे काढू म्हणून विचार करावा लागत नाही….नैसर्गिकरित्या या गोष्टी जमतात…का बुवा? कारण, स्थायीभाव. तो त्या त्या व्यक्तीचा स्थायीभाव आहे.

जरी समर्थ म्हणतात की ‘दिसामाजी काहीतरी ते लिहावे’, तुकारामबावांनी सांगून ठेवले आहे – ‘तुका म्हणे व्हावी, प्राणासवे आटी, नाहीतरी गोष्टी लिहू नये’

खरं तर काय लिहावे सुचत नव्हते, तेव्हा यातून योग्य तो बोध घेतो आणि आज पोस्ट लिहित नाही. प्राणासावे आटी नसताना या ‘दिसामाजी’ ला काही अर्थ नाही, नाही का?

11 thoughts on “रामदास विरुद्ध तुकाराम

  • Nikhil Sheth

   मनापासून आभार. पण ‘लेखक’ वगैरे नाही. सध्या अजून कॉलेजमधल्या कामांचा बोजा वाढायचा आहे, रिकामा वेळ आहे म्हणून चालू आहे हे प्रकरण.

 1. savadhan

  छान! वाचल की मत व्यक्त करायच अस मी ठरवल. जो लिहू लागतो त्याला असं सुचत जात,विषय आपल्मया अवतीभवतीच असतात ,नाहीक? फक्त लिहिण्यचा कंटाळा.मनः पुर्वक अभिनंदन.

  • Nikhil Sheth

   खरं आहे…. आणि आता नवाच प्रकार सुरु झाला आहे. दिवसभर डोक्यात आज काय विषय हे चालू असते…कोणीही भेटले, काही बोलले, काही वाचले, काही सुचले की पहिला विचार, हे ब्लॉग वर जाऊ शकते का? प्रत्येक घटनेची जणू प्रतिक्षिप्त क्रियाच झाली आहे…

 2. savadhan

  महेंद्र महोदय , मत व्यक्त करणं येवढ सोप नाहीय हो ! त्याला सुद्धा मोठ मन असावं लागतं ! “जे वाचलं ते चांगलं आहे” असं लिहिलं तर, आणि हे मत प्रामाणिकपणे दिलय हे लेखकाला समजलं की त्याला लिहायला हुरुप येतो.लेखक नेहमीच आप्ण लिहिलेलं लोकांनी वाचाव या उद्देशानेच लिहित असतात ना? लिहायला बसले कि सुचत जातं हे सत्य आहे.विषय कसा खुलवायचा हा ज्याच्या त्याच्या मनाच्या घडणीवर अवलंबून आहे.तुमचं पाठांतर, वाचन,प्रवास जितका जास्त तितके तुमचं अनुभव विश्व समृद्ध ! तितके तुमचं लिखाण पण उच्च दर्जाचे होईल नाही कां? कदाचित यापेक्षा आपले मत वेगळे असू शकेल. काही हरकत नाही.पण मत व्यक्त करणे निश्चितच चांगले असे मला वाटते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s