सुचले न काही…

शिस्तीने राष्ट्र मोठे होते. शिस्तीने माणूस पण मोठा होतो. पण शिस्तीने काम करायला खरच शिस्त लागते. परवाच ब्लॉग सुरु केला आणि आज यक्षप्रश्न आ वासून उभा. काय लिहू? मनातले विचार? आज काही खास सुचले तर नाही. मग? एखाद्या सिनेमा चे परीक्षण? नको. मराठी कविता? त्यावर पूर्वीच दोनदा लिहून झाले आहे. इतिहास? इतिहास तर सकाळ दुपार संध्याकाळ डोक्यात असतो. त्यावर तर पुढे पुढे खूप पोस्ट येतीलच. उर्दू शायरी? कालच झाली त्यावर एक पोस्ट. आणि हा काही फ़क़्त कवितांचा, शायरी चा ब्लॉग म्हणून काढला नाहीये. यावर मला अजून इतरही बरेच काही अपेक्षित आहे. काय म्हणतोस निखिल? खरच? नक्की काय काय अपेक्षा आहेत ब्लॉग कडून आणि तस्मात तुझ्याकडून? ब्लॉग काय विचार करून काढलास नेमका? रादर, ब्लॉग काढताना खरच विचार केला होतास का? एखाद्या विषयाला वाहून लिहिण्याइतपत काही अभ्यास नाही कि त्यावर सारा ब्लॉग तरून जाईल. फार तर फार १०-१२ पोस्ट नंतर लोकांना नाही तरी मला नक्कीच कंटाळा येईल. मग? आता काय?

अमेरिकेत आल्यापासून पुस्तक वाचन पण बंद झाले आहे. त्यामुळे त्यावर लिहायची सोय नाही. जुने जे वाचले आहे ते संदर्भाला उपलब्ध नाही. वास्तविक पाहता, इथली पब्लिक लायब्ररी खूप चांगली आहे. विद्यार्थ्यांना मोफत आहे. किती पुस्तके आणली तिथून? अगदी विलीयम शिरर च्या गांधी-अ मेमॉयर पासून ते आय्झाक असिमोव च्या आत्म्चारीत्रा पर्यंत….किती वाचलीस? उलट दोनदा तर ना वाचताच ५० सेंट अन ७५ सेंट दंड पण भरला उशीर केल्याबद्दल. एकदा तर एका जुन्या पुस्तक विक्रीला पण गेलास. एक डॉलर ला पिशवी भरून पुस्तके. १०-१२ पुस्तके आली. आल्यापासून तशीच पडून आहेत. घरी पण पीपल्स हिस्टरी ऑफ अमेरिका पडले आहे. किती वाचले, इंडियन्स पण अजून त्यांनी हरवले नाहीयेत, केव्हा सात वर्षांचे युद्ध होणार, केव्हा यादवी युद्ध होणार, केव्हा पूर्वेकडून पश्चिम जिंकणार, केव्हा मेक्सिको शी झगडा नि केव्हा गोल्ड रश…मार्टिन ल्युथर किंग, पहिले-दुसरे महायुद्ध तर फार पुढच्या गोष्टी झाल्या…कधी होणार हे सगळे?

राजकारण? कसा आहे विषय? तेलंगाणा आहे, पर्यावरण वरून चाललेली धुसफूस आहे. चीन-पाकिस्तान तर जन्मापासून ऐकत आलोय. शेतकरी आत्म-हत्या आहे, नितीन गडकरी, राज ठाकरे आहे, साहित्य संमेलन आहे. क्रिकेट आहे अन हॉकी आहे. हवामान-पाण्याचा प्रश्न तर पाचवीलाच पुजलेला आहे. तशीच महागाई… हे विषय नसते तर वृत्तपत्र चालली नसती. किंबहुना ती चाललीच असती पण त्यांना आपण ‘वृत्त’पत्र म्हणालो नसतो. आजचे पेपर वाचायला खरच चिपळूणकर आणि आगरकर हवे होते. शेकऱ्यांच्या आधी त्यांनीच वर जाणे पसंत केले असते.  ते नको. ते बोअर आहे. एकोणीसाव्या शतकात आफ्रिकेत झालेल्या ‘बोअर’ युद्धात चर्चिल आणि गांधी दोघेही काही ना काही कारणाने सामील होते. उगीच ‘बोअर’ या शब्दावरून आठवले.

तर मग काय लिहू? आज काय घडले? हा. हा सगळ्यात सोपा, साधा विषय आहे. कुणाला आहे का इंटरेस्ट वाचायला? आज साल्सा चा क्लास सुरु झाला. प्रायमरी स्टेप्स शिकवल्या. खूप मजा आली. कि सकाळी लेमन राईस बनवला आणि रात्री मुगाची उसळ? वेट. १ सेकंद. मी हा ब्लॉग का लिहितोय नक्की? लोकांना आवडेल ते लिहायला कि मला पाहिजे ते लिहायला? मग असा विचार का करायला लागलो आहे? नकोच ते. मग मला आज काय लिहायला आवडेल? काय? काय?

हे…सध्या ब्लॉग बाबत एवढा विचार का करतोय मी? रोज किती तरी गोष्ट जाणता-अजाणता करतो. किती तरी वर्ष करतोय. प्रत्येक वेळी कुठे प्रत्येक सेकंदाचा हिशेब मागत आलो आहे? स्वतःच्या वेळेबाबत आणि कृती मागच्या कार्यकारणभावाबाबत एवढा जागरूक मुलगा नाहीये काय मी. त्यामुळे काहीही केले तरी त्याबद्दल स्पष्टीकरण असते व नसते. इम्पल्स वर जगणे जास्त आवडते. खूप ठरवून अभ्यासाला बसलो. खूप कमी वेळ आहे. डेड लाईन जवळ येते आहे. आणि मित्राने पिक्चर ला जायची टूम काढली. चालली स्वारी लगेच. संध्याकाळी असाच फिरताना ठरले कि उद्या जाऊया कोकणात बाईक्स वरती कि एका पायावर तयार. सवाई गंधर्व चा कार्यक्रम चालू आहे. रविवारचा शेवटचा दिवस. ३ वाजून गेले कार्यक्रम संपायला. पण घरी जायचा कंटाळा आला आहे. तिथेच बसूयात जरा वेळ. सगळा मंडप रिकामा झाला. मागे मालिनीताई राजूरकर, श्रीकांत देशपांडे आणि इतर २-३ लोक गप्पा मारत बसले आहेत. तर त्यांच्या बाजूला जाऊन बसलो गप्पा ऐकत थोड्या वेळ. मग ते पण निघून जातात. पण तरीही घरी जायचा मूड नाही. खर तर घर आहे २ पावलांवरच. पण नाहीच जायचं. काय करू? काय लोकहो? काय विचार करत आहात? कल्पना शक्ती ला जरा जोर द्या. कितीही बेफाम दौडवलीत तरी सुचणार नाही असे काम केले…तिथल्या हमालांना सगळ्या खुर्च्या उचलून ट्रक मध्ये ठेवायला मदत…जगातल्या सगळ्या गोष्टी त्याक्षणी निरस वाटत होत्या म्हणून पहाटे पाच पर्यंत सगळ्या खुच्य्रा ट्रक मध्ये भरायला मदत करून हा मुलगा असच गावात ३-४ चकरा मारून सकाळी चहा प्यायला घरी…!!! मूर्खपणाची हद्द.

पण अजून ही विषय काही सुचला नाहीये. आता असा विचार आहे कि कुमारांचा नंद लावावा…राजन अब तो आ जा रे…धीर ना धरत कजरा आखन में, राजन अब तो आ…आणि शांतपणे झोपावे. नको किंवा, मधुशाला वाचूयात. बरेच दिवस वाचले नाही. हे एक अप्रतिम पुस्तक आहे बर का. ओमर खय्याम च्या रुबयांवर लुजली आधारित आहे. जेव्हा हे प्रकाशित झाले तेव्हा फार गदारोळ माजला होता. लोकांना बहुधा विषयाची हाताळणी करायची पद्धत आवडली नसावी. महात्मा गांधींनी मग ते पुस्तक वाचून त्यावरचे सगळे आरोप अनसॉलीसीटेड आणि अनकॉल्ड फॉर आहेत असे जेव्हा हरिजन मध्ये लिहिले तेव्हा लोक शांत झाले. पण यातल्या रुबाया मात्र खरच सुंदर आहेत. एकेक करून हळू हळू विषय पुढे सरकतो आणि मग त्यात वाचक पुरा गुंतून च जातो. असो, त्यावर एकदा एक वेगळी पोस्ट नक्कीच टाकेन. एवढ्या कमी जागेत लिहिले तर पुस्तकावरच अन्याय आहे. थोडक्यात काय, तर साऱ्या दुनियाभरचा विचार मनात येऊन गेला पण पोस्टचा विषय काय सुचला नाही…..असो. हरकत नाही. उद्या नक्की काहीतरी वाचनीय लिहेन.

Advertisements

6 thoughts on “सुचले न काही…

    • Nikhil Sheth

      गेल्या २ वर्षात इंदौर, उज्जैन कडे दोनदा जाऊन आलो पण दोन्ही वेळा इच्छा असूनही देवास पर्यंतकाही पोहोचलो नाही दुर्दैवाने. रवींद्र पिंग्यांचा एक लेख वाचला होता कुमारांवर. त्यामध्ये ते देवास ले जाऊन कुमारांच्या घरी २-३ दिवस पाहुणचार घेऊन आले होते त्याचा अनुभव लिहिला आहे. आणि कुठे तरी एका ठिकाणी श्री दा पानवलकारांनी पण देवास मधल्या कुमारांच्या वास्तव्यावर लघुकथा लिहिलेली आहे. तेवढेच काय ते. दुधाची तहान ताकावर म्हणतात तसे….:)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s