मिर्ज़ा

खुशामदीद,

डबीर-उल-मुल्क निझाम-ए-जंग मुहम्मद असदुल्लाह बेग खान

या माणसाचे नाव कधी ऐकले आहे का? बेसिकली, हे काय नाव आहे का? त्या माणसाला तरी त्याचे नाव लक्षात राहते का? पण जर असे सांगितले कि तो एक उर्दू कवी होता तर? काही गेस? नाही? बर त्याचा तखल्लुस सांगतो. तखल्लुस म्हणजे टोपण नाव जे वापरून कविता करतात ते. ते सगळ्या जगाला माहित आहे. किंबहुना जगाला उर्दू शायरी म्हणजे एकच नाव माहित आहे. आता तर नक्कीच ओळखले असेल. मिर्झा गालिब. 🙂

याची एक गम्मत च आहे. आग्र्याहून लग्न झाल्यावर दिल्ली ला आला. सासऱ्याच्या घरी राहत होता. तो काळच असा होता कि उर्दू शायरी सगळीकडे दुमदुमत होती. पुरे दिल्ली, आग्रा लखनौ कहा भी जाओ, सब जगह सिर्फ शायरी, नुक्ते, कसिदे, गझला, मसनव्या…कोणत्या ना कोणत्या प्रकारचे उर्दू काव्य भरून राहिले होते साऱ्या हिंदुस्तान च्या आसमंतात. मुघल दरबारात तरी कोण कोण कवी होते? खाकानी-ए-हिंद जौक दहलवी, मोमीन खान मोमीन, स्वतः जफर मोठा कवी होता. अशा सगळ्या वातावरणात दिल्लीच्या किल्ल्यात कशा प्रकारचे शाही मुशायरे चालले असतील त्याचे वर्णन करायला शब्द केविलवाणे ठरतील. अशाच एका मुशायऱ्यात एकदा गालिब ला संधी मिळाली. त्याच्या आधी उपरिनिर्दिष्ट कवींनी त्यांच्या त्यांच्या रचना सादर करून दरबाराला भुरळ घातली होतीच. जेव्हा आपले गालिब साहेबांसमोर चिरागदान आला, त्यांनी त्यांची गझल पेश केली. आणि काय झाले असेल? काहीच झाले नाही. कोणी दाद दिली नाही, ना व्वा व्वाह म्हणाले, ना कंटिन्यू करायला प्रोत्साहन दिले. वास्तविक विचका झाला. कोणाला काही कळलेच नाही का दर्जाहीन वाटले माहित नाही. पण अपाला नायक मनस्वी होता. असा सणसणीत अपमान झाला कि गालिब उठून तडक किल्ल्यातून बाहेर पडला.

अपयश ही यशाची पाहिली पायरी असते याचे उदाहरण म्हणून ही गोष्ट लहान मुलांना सांगायला चांगली आहे नाही का? असो. नंतर काय झाले ते आता वाचा.

कोणा नाचरणीच्या मदतीने, कोणा फकिराच्या सहाय्याने म्हणा, त्याच्या गझला फेमस झाल्या. पण मुख्य गोष्ट अशी आहे कि गालिबला आधी फारसी चा फार अभिमान असल्याने भरपूर काव्यरचना फारसी मध्ये आहे. एलिट म्हणा हवे तर. हवे तर इसोटेरीक म्हणा. पण फारसी मधून रचना करायचा आग्रह होता. जेव्हा लोकांना कळत नाही असे समजले तेव्हा त्याने त्याच्या काही निवडक रचना उर्दू मध्ये भाषांतरित केल्या…एकदम थोडक्याच. आणि आज साऱ्या जगाला गालिब त्या तेवढ्या भाषांतरित रचनांमुळे माहित आहे. त्याच्या प्रसिद्ध उर्दू गझलांपेक्षा फारसी रचना दसपट आहे. पण त्याकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही….

एकदम निराळा माणूस होता. त्याचे चरित्र ही दुःखद च आहे. म्हटले आहेच ना, वेदनेशिवाय कला नाही. आज त्याच्या काही गझला वाचत होतो. आणि एक रचना आढळली.

‘बाज़ीचा-ए-अत्फाल है दुनिया मेरे आगे, होता है शब्-ओ-रोज तमाशा मेरे आगे’. (सारी दुनिया माझ्यासमोर एक लहान मुलांचे पटांगण च आहे. ज्यावरचे खेळ मी बघत आहे.) स्वतःच्या वृत्तीबद्दल आहे म्हणा किंवा दृष्टिकोनाबद्दल आहे म्हणा. संपूर्ण गझल मुळातून वाचण्यालायक आहे. पुढे त्याच धुंदीत तो म्हणतो – ‘एक खेल है औरंग-ए-सुलेमा मेरे नजदीक, एक बात है ऐजाज-ए-मसीहा मेरे आगे’.(माझ्या बाजूला चाललेले हे सत्ताकारण एक खेळच आहे, प्रेषिताचे चमत्कार पण काही फारशी भारी गोष्ट नाहीये माझ्यासाठी) किंवा ‘होता है निहाँ गर्द में सहारा मेरे होते, घिसता है जबीं खाक पर दरिया मेरे आगे’. (माझ्यासमोर वाळवंट पण त्याच्या वाळूत लपून जाते तर समुद्र मी असताना किनाऱ्यावर डोके घासतो)  याला  म्हणतात attitude. किती क्षुल्लक आहे सारे. काही कशाची परवा तर नाहीच, वर सगळ्याच्या क्षुद्रतेचा उल्लेख करून मोकळा. तसे पाहायला गेले तर समुद्राचे पाणी किनाऱ्यावर येणे आणि जाणे काही वेगळी गोष्ट नाही पण ‘गालिब का अंदाज-ए-बयान है कुछ और’

पण पुढे पुढे गझल अंतर्मुख व्हायला लावते. ‘मत पूछ की क्या हाल है मेरा तेरे पीछे, ये देख की क्या रंग है तेरा मेरे आगे.’ किंवा ‘इमां मुझे रोके है तो खींचे है मुझे कुफ्र, काबा मेरे पीछे है तो कलीसा मेरे आगे’ इथे मानसिक द्वंद्वा विषयी बोलून जातो. शेवट तर फारच फिलोसोफिकल केला आहे. ‘गो हाथ को जुम्बिश नहीं, हाथोंमे तो दम है, रहने दो अभी सागर-ओ-मीना मेरे आगे’…

शेवटचा शेर. सेतू माधवराव पगडींनी त्यांच्या गालिब वरच्या पुस्तकात याचा अर्थ फारच सरळ करून दिला आहे. ‘जरी हात आता कंप पावत आहेत, तरी मधु-चषक माझ्यासमोर ठेवा. किमान मी डोळ्याने तरी त्याच्याकडे पाहेन.’ हा त्याचा शब्दार्थ आहे. पण याचा अर्थ गालिब बेवडा होता असा होत नाही. ‘जरी आता स्वतः उपभोग घ्यायची शक्ती नाही उरली तरी इतरांना माझ्या अनुभवांचा उपयोग करून देता येईल’ या अर्थाने आहे.

असो. गालिब वर बोलायचे म्हटले तर त्याला फार ताकद लागते. ती अर्थातच माझ्याकडे शतांशाने सुद्धा नाही. त्यामुळे हा प्रयत्न केल्याबद्दल मुआफी मागून पोस्ट संपवतो.

Advertisements

5 thoughts on “मिर्ज़ा

 1. harekrishnaji

  सेतू माधव पगडींचे गालीब वरचे पुस्तक मी बऱ्याच वर्षापुर्वी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात चाळले होते, वाचीन वाचीन करता राहुन गेले, पण हे पुस्तक मला फार आठवते.

  अनेक वेळा मी दुःखी असता मला ” ‘बाज़ीचा-ए-अत्फाल है दुनिया मेरे आगे, होता है शब्-ओ-रोज तमाशा मेरे आगे’ आठवते.

  • Nikhil Sheth

   मला पगडींचे गालिब वर पुस्तक आहे हे पूर्वी माहित नव्हते. एकदा काही मित्रांसोबत सुरेशचंद्र नाडकर्णी यांच्या घरी गेलो होतो, गप्पा मारताना त्यांनी हा किस्सा सांगितला. त्यानतंर पगडींचे आत्म -चरित्र जे कि ‘जीवनसेतू’ ते वाचण्यात आले. वस्तुतः पगडी हे उर्दू/फारसी चे मोठे अभ्यासक. निझामाच्या राज्यात काम करणारे म्हणून ही आणि इतिहासाचे अभ्यासक म्हणूनही. मात्र त्यांनी त्या शेरचा अर्थ तेवढ्यावरच सोडून दिला आहे.

 2. जयंत

  नमस्कार,
  लेख छान आहे. आपल्याला अशी आवड असेल तर कृपया माझ्या खालील ब्लॉगला जरूर भेट द्या. शक्यता नाकारता येत नाही की आपल्याला तो आवडेल.
  जयंत कुलकर्णी.
  http://www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s