ओनामासिधम

आज पुन्हा एकदा ब्लॉगिंग सुरु करत आहे. ३ वर्षांपूर्वी काहीतरी खरडायचो..पण त्यात नियमितता नव्हती. या वेळेस पाहू काय कसे होते ते.

आजच दुपारी एक कविता वाचली. दहावी मध्ये असताना एक शिक्षक होते. ते पुस्तकाबाहेराच्या काय काय कविता सांगायचे. त्यातलीच ही एक. तेव्हा फार आवडली होती पण विस्मरणात गेली होती. कवी पण आठवत नव्हता. आज कळले कि पद्मा गोळ्यांची कविता आहे. मंदारमाला वृत्त आहेच अगदी गेय आणि मोठे नादमय. आणि कविता तर नितांतसुंदर आहेच.

शाळेमध्ये असताना एक मास्तर प्रत्येक १-२ वाक्यांमागे किमान एकदा ‘या ठिकाणी’ चा रव करायचा. आणि आम्ही मागच्या बाकावर बसून वहीमध्ये नोंदी करायचो कि आजचा स्कोर काय..उद्याचा स्कोर काय…त्याचा लॉग पण ठेवला होता. उच्चतम विक्रम होता एका तासात १२३…!!!

प्रसंग असा घडला होता- शिक्षकांनी कविता शिकवायला सुरुवात केली.

‘मुलांनो, आज मी या ठिकाणी पद्मा गोळ्यांची पक्षिणीची कविता तुम्हाला शिकवणार आहे. खास करून शब्दकळा अतिशय अवखळ आणि मनोहर आहे. (याचा अर्थ फ़क़्त संपादकांना नाहीतरी टीकाकार, समीक्षकांना कळतो) यातली ती पक्षीण आकाशात उडते आहे. या ठिकाणी उंच उंच भराऱ्या घेत आहे. ती आत्म-मग्न आहे. तिच्या मनात या ठिकाणी एक स्वप्न आहे, आशा आहेत, काही निश्चय आहेत काही अंदाज आहेत. तिला या ठिकाणी स्वनिल आशावादी तर दाखवले आहेच, मात्र ध्येयवादी पण आहे. ती उन्मुक्त आहे. तिच्या मनातील विचारांचे तरंग कवयित्रीने या ठिकाणी अचूक टिपले आहेत…….’ कोणत्या मुलाची उत्सुकता टिकून राहील या पुढे? हा काही बीए एमए चा वर्ग नव्हता, दहावीतली मुले होती. मर्ढेकर वगैरे फार दुरापास्त कवी असतातच तेव्हा पुस्तकात आणि त्यात अशा कवितेची पण वाट लावून मोकळे.

कोणीतरी लीन्ग्वीस्टिक म्हणाला होता (बहुधा नोअम चोम्स्की असावा) – मनुष्याच्या मनाच्या जडण-घडणीमध्ये इतर अनेक गोष्टींबरोबर त्याचे विचार फार महत्वाचे असतात. आणि तो विचार काय व किती करतो हे त्याला ठावूक असलेल्या शब्दांवर अवलंबून आहे. म्हणजे जर का मला पुस्तक हा शब्द माहित नसेल तर मला पुस्तक ही कन्सेप्टच माहित नाहीये आणि म्हणून त्या अनुषंगिक विचार मी करणार नाही….

पण याची एक करोलरी अशी होते कि ज्या लोकांचा शब्द संग्रह मर्यादित आहे त्यांचे विचार पण त्याच कक्षेत बंदिस्त आहेत. गम्मत च आहे…आता त्या ‘या ठिकाणी’ चा जप करणाऱ्या शिक्षकाला जाऊन हे सांगायची इच्छा होते आहे इतक्या वर्षानंतर.

असो. लिहिता लिहिता विषयांतर होत गेले. जिथून सुरुवात झाली ती म्हणजे ही कविता. मात्र शब्दकळा खरच अवखळ आहे.


मी एक पक्षीण आकाशवेडी, दुज्याचे मला भान नाही मुळी,
डोळ्यात माझ्या असे एक आकाश, श्वासात आकाश प्राणातळी.
स्वप्नात माझ्या उषा तेवते अन निशा गात हाकारीते तेथुनी 
क्षणार्धी सुटे पाय नीडांतुनी अन विजा खेळती मत्त पंखातुनी.
अशी झेप घ्यावी, असे सूर गावे, घुसावे ढगामाजी बानापरी,
ढगांचे अबोली भुरे केशरी रंग, माखुनी घ्यावेत पंखांवरी.
गुजे आरुणी जाणुनी त्या उषेशी, जुळे का पहावा स्वरांशी स्वर
बघावी झणत्कारिते काय वीणा शिवस्पर्श होताच तो सुंदर.
किती उंच जाईन, पोचेन किंवा संपेल हे आयु अर्ध्यावरी,
आभाळ यात्रीस ना खेद त्याचा निळी जाहली ती सबाह्यांतरी.

Advertisements

12 thoughts on “ओनामासिधम

  • Nikhil Sheth

   आपले बोलणे नेहमी चालू असतेच….किंबहुना त्यातून च शब्दप्रभू वाचीवीर ची प्रेरणा मिळाली हेही तुला माहित आहेच…..म्हणून धन्यवाद.

 1. Naniwadekar

  श्री निखिल शेठ : पद्‌मा गोळे यांची ही कविता वाचली नव्हती. इथे ती नोंदवल्याबद्‌दल आभार.
  कवितेत मंदारमालेचे फक्त सहा चरण आहेत. पण त्या भेसळीचा लयीला धक्का लागत नाही.
  मूळ कविता मिळाल्यास बघा, कारण एक ओळी चूक उतरवल्या गेली आहे.
  लघु अक्षराने सुरु होणार्‍या सर्व ओळी (एकूण ८) सुमंदारमालेत आहेत, पण ते चालेल. मात्र त्यामुळे या कवितेशी एकच वृत्त बांधता येत नाही.
  क्षणार्धी सुटे पाय नीडांतुनी अन विजा खेळती मत्त पंखातुनी ( ‘अन्‌’ शब्द वृत्तात बसतो. ही ओळ तशीही सुमंदारमालेत आहे. )
  ढगांचे अबोली भुरे केशरी रंग, माखुनी घ्यावेत पंखांवरी (माखूनि)
  किती उंच जाईन, पोचेन किंवा संपेल हे आयु अर्ध्यावरी (पोचेन, वा आयु संपेल हे मात्र अर्ध्यावरी — असं काही असू शकेल.)

  – नानिवडेकर

   • Nikhil Sheth

    मी मूळ संहिता शोधायचा प्रयत्न केला पण जमले नाही. त्याबद्दल सॉरी.

    तुमचे म्हणणे बरोबर आहे. मंदारमाला आणि सुमन्दारमाला यांमध्ये फरक आहे फक्त एका लघु अक्षराचा. मंदारमाला म्हणजे ७ त आणि १ गुरु अक्षर तर सुमंदारमाला म्हणजे ७ य + १ लघु + १ गुरु अक्षर. म्हणजे मंदारमलेच्या आधी एक लघु अक्षर आले तर झाली सुमंदारमाला. आणि गम्मत म्हणजे दोघांची चाल ही समान आहे. त्यामुळे हे दोन्ही वृत्त, interchange or replace झाले तरी चालीत व रसात फरक पडत नाही. ती ओळ माझ्याकडून चुकीची उतरवली गेली असेल. किंवा काही वेळा कवीही यतिभंग करतात. उदा. वामन पंडितांचे श्लोक. भलेही क्वचित अशुद्ध असतील तरी ते सुश्लोक म्हणवतात.

 2. Naniwadekar

  > चालीत व रसात फरक पडत नाही.
  >
  चाल आणि रस यांचा तसा काहीही परस्परसंबंध नाही.

  > काही वेळा कवीही यतिभंग करतात. उदा. वामन पंडितांचे श्लोक. भलेही क्वचित अशुद्ध असतील तरी ते सुश्लोक म्हणवतात.
  > —-
  व्यास, शंकराचार्य, कालिदास सगळ्यांनी वृत्तदोषयुक्त किंवा सैल रचना केलेली आहे. यातला कुठलाच कवी किंवा वामन पंडित माझ्या गाढ अभ्यासाचा वगैरे विषय नाही. पण वामनाच्या भाषाप्रभुत्वाबद्‌दल शंका असण्याचं कारण नाही. ब्रॅडमन भले शेवटच्या डावात आणि इतर सहा वेळां शून्यावर उडाला असेल तरी थोर म्हणवत नाही का? लोक वामनाला ‘सुश्लोककर्ता’ म्हणतात. त्याचे अशुद्‌ध श्लोक सुश्लोकांच्या श्रेणीत टाकण्याची गरज़ नाही.

  – डी एन

 3. Aarti

  ही कविता मला बहुतेक दहावीच्या पुस्तकात होती. तिची सुरूवात लक्षात राहिली होती आणिअर्थातच कविता आवडलीही होती. पण त्यावेळेस ती जपून ठेवावी हे कळलं नाही आणि नंतर इतकी वर्ष मी तिला शोधत होते.
  तुमच्यामुळे मला ही कविता पुन्हा भेटली. मनापासून धन्यवाद.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s