दिसामाजी काहीतरी

प्रवर्ग: सिनेमा सिनेमा

ब्लॉगचे विषय???

किती कविता कविता कविता….चायला कधी वाटलेच नव्हते की मी कविता वाचेन आणि त्यावर लिहेन वगैरे. माझे खास आवडते विषय म्हणजे आत्मवृत्त, इतिहास आणि प्रवास वर्णन. कविता वगैरे वाचणाऱ्यांना शिव्याच घालायचो. म्हणजे कविता आवडायच्या नाहीत असे नाही पण मुद्दामहून काव्यसंग्रह हा घेऊन वाचायचा प्रकार आहे असे नाही वाटायचे. पण एक मात्र होते. मर्ढेकर आणि तुकाराम…ते खूप आवडायचे. संपूर्ण मर्ढेकर रट्टा मारून झाला होता आणि तुकाराम तर जागोजागी दर्शन देत होते. पण मर्ढेकर आवडण्यामागे कारण काहीच नव्हते. मर्ढेकर मोठे का? हेच कळत नव्हते. मग केव्हातरी रविकिरण मंडळ, नव-काव्य, दलित काव्य, सामाजिक आशयाच्या कविता…हळू हळू कळत गेले आणि मर्ढेकरांच्या मोठेपणाची खरी प्रचीती आली. तोवर ‘सकाळी उठोनी चहा कॉफी घ्यावी’ किंवा ‘इरेस पडलो जर बच्चमजी’, ‘फलाटदादा फलाटदादा’ कविता नुसत्या गम्मत म्हणून आवडायच्या….आणि ‘पिपात मेले ओल्या उंदीर’ कळायचंच नाही आणि  ’काहो माजवता दुही, माखता स्वातंत्र्याची वही, स्वजन रक्ताने प्रत्यही, लळथळा’ ही आहे त्याच वृत्तात का केली हे विचार करायचे प्रश्न तेच नाही कळायचे. ‘न्हालेल्या जणू गर्भवतीच्या’ म्हणजे मुंबईचे किती अप्रतिम वर्णन आहे आणि हाच कवी हेही लिहितो आहे त्यात महानता आहे हे लक्षातच नाही आले. ‘कितीतरी दिवसात नाही चांदण्यात गेलो किती तरी दिवसात नाही नदीत डुंबलो’ अशी सुरुवात करून जेव्हा ती कविता ‘बरा म्हणून हा इथे दिवा पारवा पाऱ्याचा, बरी तोतऱ्या नळाची, शीरी धार मुखी ऋचा’ अशा वाक्याने संपते तेव्हा किती अंतर्मुख करते याचा अंदाज नंतर नंतर येऊ लागला होता…..पण तरीही त्याहीपेक्षा जास्त लोभसवाणे रूप होते ते म्हणजे ‘आला आषाढ श्रावण’ मधली ‘ओल्या पानातल्या रेषा वाचतात ओले पक्षी, आणि पोपटी रंगाची रान दाखविते नक्षी’…हे खूप आवडायचे…पण जेव्हा हाच कवी लिहितो की ‘या स्नायूंच्या तारांचा रे तुझ्याच हात खाली स्वीच’ तेव्हा मराठी कवितेत किती क्रांती घडवून आणत होता याचा अंदाज नाही आला..ती क्रांती अर्थाची होती, उपमांची होती, छंदांची तर होतीच होती पण त्याहीपेक्षा कविता का, कोणासाठी आणि कशी या प्रश्नाच्या उत्तरांची होती…संपूर्ण नवा दृष्टीकोन होता तो….’पोरसवदा होतीस काल परवा पावेतो, थांब उद्याचे माई तीर्थ पायाचे घेईतो’ असे लिहिताना त्यांनीच असेही म्हटले आहे – ‘आभाळाच्या पल्याड स्पंदन टिपरी त्याची या मडक्यावरी’…

झाले? कवितांवर किती जास्त लिहितो आहे सांगताना परत त्यावरच एक चुकून आर्टिकल झाले. चायला….. हा ब्लॉग काही कवितांचा ब्लॉग म्हणून सुरु केलेला नाही पण ६० पैकी २० पोस्ट्स कवितांवर झाल्या आहेत. नकळतपणे…. गालिब, तुकाराम, बच्चन तर नेहमीचेच पेटंट आहेत. काही सुचत नसले की आपोपाप गालिब आणि इक्बाल सुरु करतो…कारण त्यांवर बोलणे सोप्पे असते. जसे की आत्ता मर्ढेकर…इतके वाचले आहेत की झोपेत ही त्यांच्या कवितांवर बोलू शकतो…पण त्यात आता मजा येत नाही. नवे वचन करायची आणि व्हायची संधी इथे फार कमी आहे. तेव्हा आपोआप रारंगढांग किंवा मधुशाला सुरु करतो…नाहीतर इतिहास…इतिहास तर कायमचा डोक्यात ठाण मांडून बसला आहे. त्यातही मध्ययुगीन भारत. या क्षेत्रातल्या भरपूर मोठ्या लोकांच्या सहवासात आल्याने आणि समानशील मित्र लाभल्याने त्याच विषयावर दिवसाच्या दिवस घालवले आहेत. जसे की पानिपतचे युद्ध…साधारणपणे आपली सुरुवात विश्वास पाटलांच्या कादंबरीने होते आणि तोतयाचे बंद किंवा भाऊबंदकी नाटकाच्या आधाराने संपते. पण मग आम्ही जातो ते पानिपत १७६१ कडे. तिथून…शेजवलकर कोण? मग त्यांचे शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या अभ्यासाची साधने व आराखडे…तिथून मग दांडेकर, वि श्री, सरदेसाई, राजवाडे, पोतदार, पगडी…..पगडी मग निझामाकालीन हैद्राबाद आणि पोट्टी श्रीरामल्लू, मग हैदराबादची जामा मस्जिद, हैद्राबादी दखनी भाषा, हिंदीचे प्रकार, खडी बोली, अवधी, ब्रज भाषा वगैरे…मग तिथून वीर रसाची हिंदी साहित्यातली उत्थापना, छायावाद वगैरे…हिंदीवर उर्दू चा प्रभाव..मग रामचरीतमानस वगैरे,, भक्ती मुव्हमेंट…वंगदेशाचे इस्लामीकरण, कबीराच्या खऱ्या रचना कोणत्या…पाठभेद…ऐतिहासिक पात्रे…मग महाभारत आणि रामायण…तिथून दुर्गा भागवत आणि इरावती कर्वे…इरावती कर्वे आल्या की एका दिशेने डी डी कर्वे, अण्णा कर्वे, महात्मा फुले तर दुसऱ्या दिशेने आनंदीबाई जोशी, रमाबाई रानडे…(युगांत वाचले आहे? अप्रतिम पुस्तक आहे…वाचाच वाचा….जगात तोड नाही त्याला…) मग असे करत करत सध्याच्या बाबासाहेब, मेहेंदळे, बेडेकर, बेलसरे पर्यंत येऊन थांबतो…पण गप्पांची भूक काही संपत नाही. त्यातून कधी काय साध्य झाला का हा संशोधनाचा विषय ठरवा…..पण वेळ मात्र मजेत जातो…काहीच नसेल तर उर्दू, हिंदी शायरी आणि गाणी, चित्रपटांचा इतिहास, जुने गायक संगीतकार…..नाट्यसंगीत….अशा विषयी लिहायला काहीच लागत नाही….उचलली जीभ आणि लावली टाळ्याला सारखे उघडला ब्लॉग आणि लावला बडवायला असे होते….

पण आजकाल त्यात मजा येत नाही…सध्या अमेरिकेत आहे त्याविषयी कितीतरी गोष्टी लिहिण्यासारख्या आहेत…इथले लोक, समाज, शिक्षण पद्धती, इथले राहायचे अनुभव….मागे एकदा शिकागो ला गेलो होतो तिथे स्वामी विवेकानंदांनी जेथे जागतिक सर्वधर्म परिषदेमध्ये जेथे भाषण दिले १८९३ मध्ये ती जागा पाहून आलो…. का नाही लिहित? आणि ललित? ललित हाताळणे सोप्पे नाहीये…पण जमला तर त्यासारखा तोच. अर्थकारण आणि राजकारण हे तर विषय दिवस रात्र असतात गप्पांमध्ये पण लिहिताना का नाही सुचत? सध्या रिसर्च आणि academic मध्ये इतक्या इतक्या नव्या गोष्टी पाहत आहे की त्या लिहायला पण हरकत नाही… एवढे मित्र बंगाल, हरियाना, ओरिसा, अरुणाचल, आंध्र, गुजरात, इंग्लंड, जर्मनी, सिंगापूर, अमेरिकेत पसरले आहेत त्यांचे कितीतरी ऐकतो नवे नवे अचंबित व्हावे असे….का नाही लिहित?

साधे उत्तर आहे – शाहरुख खानचा चित्रपट होता एक – राम जाने….का नाही लिहित……….राम जाने…

होळी आणि विष-कन्या

लोकांचे बरेच लेख वाचले, सगळे ब्लॉग्स होळीबद्दल भरभरून लिहित होते. होळीची मजा, रंग कसे काय, होळीचे पौराणिक आणि सांस्कृतिक महत्व, होळीचे खाद्यपदार्थ, शिमगा..वगैरे वगैरे काही काही…मला तर काय इथे शक्य नाहीये ते…पण मला पण होळी बद्दल लिहायचे आहे ना…काय केले बर परवा मी? सांगू? एक सिनेमा पहिला; ‘गिल्डा’ नामक. रिटा हेवर्थ नामक अप्सरेचा. मी काही तिचे वर्णन करणे म्हणजे .. त्यापेक्षा तिचा सिनेमा मधला एन्ट्री चा सीन पाहा…


आता बोला…:)

पण पोस्ट काय गिल्डा बद्दल नाहीये..तर त्यामध्ये एक गाणे आहे. ‘पुट द ब्लेम ऑन मेम’ ते इतके अशक्य गाणे आहे. नाचासाठी तर आहेच आहे पण त्यापेक्षाही त्याच्या शब्दांसाठी. अमेरिकेतल्या ३ मुख्य दुर्दैवी घटनांचा उल्लेख करते. जेव्हा शिकागो जळाले तेव्हा, न्यू योर्क ला प्रचंड हिम-वादळ आले तो प्रसंग आणि गेल्या शतकाच्या सुरुवातीचा सान फ्रान्सिस्को चा भूकंप…वास्तविक पाहता या घटना एक तर निसर्गतः घडल्या आहेत किंवा दुर्दैवी आहेत. पण गिल्डा गाण्यात सांगते की हे सगळे बकवास आहे. खरी बाजू तर वेगळीच आहे. मेम नावाची बाई आहे एक तिच्या वागण्यामुळे सगळे घडले. म्हणून तिलाच दोष दिला पाहिजे.

सगळ्या महाभारतांमागे स्त्री असते म्हणे…मग ते रामायण असो, महाभारत असो, एडविना असो, की ही मेम…मग मला चाणक्याची विषकन्या आठवली. तिच्या म्हणे ओठांवर विष लावायचे आणि तिला शत्रूला भुरळ पडायला सोडून द्यायचे..मेनकेचा रोल बजावायला..फेमे फेटल की खरंच. पाकिस्तानसोबतच्या एका युद्धात म्हणे आपण एक जुनी पाणबुडी मुंबईहून कराची जवळ नेऊन सोडली…पाक्यांनी ती पकडली, आणि विजयोन्मादात ती कराची च्या बंदरात डॉक केली. आणि ती खरी फेमे फेटल होती. तिच्यात काय तर दारुगोळा ठासून भरला होता. तिथे जाताच त्याचा विस्फोट झाला…खरं खोटं माहित नाही. लहानपणी कुठेतरी वाचली होती.

दुसऱ्या महायुद्धामध्ये गुप्तहेर म्हणून असलेली एक डच स्त्री. माता हरी असे तिचे नाव…!! ती पण एका अर्थाने विष कन्याच.. मोहिनी अस्त्रच की…किंवा निकोल किडमन चा ‘मुला रूज’ पाहिलंय? किंवा Ann Parillaud ची साकारलेली ‘निकिता’ पाहिलेय का? बेसिक इंस्टीनक्ट मधली शेरॉन स्टोन? हिचकॉक च्या ‘परदाइज केस’ मधली नायिका पाहिली का? सेम तो सेम ‘फेम फेटल’…खरतर हिचकॉक च्या प्रत्येक सिनेमात नवी कोणीतरी नायिका असते आणि ती ब्लोंडच असते..ती एक म्हणच आहे ‘हिचकॉक ब्लोंड’…

असो होळीला काय केले त्यावरून ते विषकन्या असा प्रवास झाला…ते सोडा आणि तुम्ही रिटा हेवर्थ ला बघा…

बॉलीवूड च्या आईच्चा घो…

हा व्हिडियो बघा… फक्त इंग्रजी मध्येच सिनेमांचे स्पुफ येतात असे नव्हे… इतका भंकस, छपरी, युजलेस, ढासू, पांचट….सलाम, हे बनवणाऱ्याला डोके बंद करून सलाम…

तलत महमूद

शाम-ए-गम की कसम, आज तनहा है हम, आभी जा आभी जा आज मेरे सनम….रुत हसीं है तो क्या, चांदनी है तो क्या? चांदनी जुल्म है और जुदाई सितम….अब तो आजा की अब रात भी सो गयी, ज़िन्दगी गम के सहेरओंमे खो गयी, ढूंढती है नजर, तू कहा है मगर, देखते देखते आया आखो में गम…..शाम-ए-गम की कसम….

हॉरर अंगाईगीत – रोजमेरी’ज बेबी

आत्ताच रोमान पोलान्स्की चा रोजमेरी’स बेबी नावाचा सिनेमा पहिला….. काही काही दिग्दर्शक आहे हॉलीवूड मध्ये ज्यांचे सिनेमे पहायची एकही संधी मी सोडत नाही. स्पीलबर्ग, स्कॉर्सिसी, क्युब्रिक, कॅमेरोन, ल्युकास, हिचकॉक…लिस्ट खूप मोठी आहे. हा सिनेमा पोलान्स्की च्या ‘अपार्टमेंट ट्रीलिजी’ मधला तिसरा आहे.

डेंजर होता सिनेमा. भारी होता. स्टोरी नाही सांगत. पण टायटल सॉंग मात्र जबरदस्त आहे… ऐकूनच कॅची वाटला..आणि मग सिनेमा मध्ये गुंतत गेलो..

काही काही कलाकारांची खासियत असते. जेफरी आर्चर हा बायोग्राफिकल नायक रंगवणार, आर्थर हेली एकेक फिल्ड घेऊन त्यात कादंबरी लिहिणार, गुरु दत्त बऱ्याचदा दुःखद शेवट करणार, राजकपूरच्या सिनेमातली गाणी गुणगुणण्यायोग्य असणार, हिचकॉक नवे नवे angles ट्राय करणार, मधुर भांडारकर बॉलीवूडमधल्या हेली आर्थर हेली चि भूमिका बजावणार, रहमान ओर्क्रेसट्रा चा जबरदस्त वापर करणार, ओ’हेन्री च्या कथा ओ’हेन्री स्टाइलमध्येच असणार, डॉना रीड हॉलीवूड मध्ये आईची भूमिका बजावणार, स्कोर्सिसिच्या सिनेमांमध्ये खुन्खराबे असणार, इस्टवूड ने सिनेमा काढला की त्याला ऑस्करनामांकन मिळणार, प्रत्येक सवाई मध्ये मालिनीताई टप्पा गाणार, हरिप्रसाद चौरासिया प्रत्येक वेळी येणार, श्रोते पहाडीची फर्माईश करणार, वसंतराव गाण्यात एकतरी सरगम घेणार, सत्यजित राय प्रत्येक सिनेमामध्ये वेगवेगळ्या तर्हेने भारत दाखवणार, शेजवलकर प्रत्येक लेखात इतिहासाबरोबरच सद्य सामाजिक स्थितीवर एकतरी ओरखडा ओढणार, निनाद बेडेकर भाषण कोणत्याही विषयावर असेल तरी शेवटी शिवाजी महाराज, कविराज भूषण इकडेच ओढणार, एस डी बर्मन गाण्याला खास फोक टच देणार आणि सलमान खान प्रत्येक सिनेमात कपडे काढणार…..प्रेक्षकांचे काही पूर्वग्रह असतात आणि त्यानुसार अपेक्षा पण असतात…

तसे पोलान्स्की बद्दल च्या अपेक्षा हा चित्रपट १००% पूर्ण करतो. टेनंट पाहा, रिपल्शन पाहा, चायना टाऊन पाहा की हा रोजमेरी’स बेबी पाहा…१००% पोलान्स्की. हिचकॉक आणि पोलान्स्की यांचेह जेनर फार सेम तरी समांतर आहे…दोघांचे सिनेमे मानस-शास्त्रावर खूप अवलंबून असतात…पण त्याचा उपयोग दोघे वेगवेगळ्या कारणांसाठी करतात….हिचकॉक चा सिनेमा कायम उत्कंठावर्धक असतो, शेवटी काहीतरी जबरदस्त नाटकीय घडते…आणि पोलान्स्की?? एकदम सेम. मात्र फियोदोर दोस्तायव्हस्की चे ‘crime and punishment’ वाचताना जे फिलिंग येते ना…की नायकाच्या मनातल्या ज्या भावना त्या पुस्तकात रंगवल्या आहेत…तशाच भावना आपल्या मनात येतात पोलान्स्की चे सिनेमे बघताना….असो…

सिनेमा कुठे मिळाला तर जरूर बघा. सुंदर आहे. (सुंदर कसे म्हणू? हॉरर सिनेमा आहे तो) पण हे गाणे ऐका… पाट्या पडताना लागते….एक उच्च कलाकृती आहे हे गाणे….आहे खरं तर एक अंगाई(सं)गीतच… पण त्यात पण हॉरर कसं जागोजागी पेरले आहे ते ऐका…..

Follow

Get every new post delivered to your Inbox.