दिसामाजी काहीतरी

प्रवर्ग: यशा

मायभूमी

मला आस आहे , तुझा ध्यास आहे
कधीचा तुला अर्पिला श्वास आहे..
तिथे चांदण्याने सडा पाडलेला,
इथे रोजचा चंद्र खग्रास आहे..

किती दिस झाले, किती तास झाले,
असे व्यर्थ मी दिन सांडीत आहे?
तिथे वेचलेल्या सुगंधी क्षणांच्या
हिशोबास मी रोज मांडीत आहे..

पुरे हे -’उठावे! मना सावरावे!’,
असे वाटते की आता खेप घ्यावी
निशिदिन नयनी जिचे रूप आहे,
अशा मायभूमीकडे झेप घ्यावी…..

.                                       – यशा

यशा वदे..

नमस्कार मंडळी,

आता या नवीन ब्लोगवर लेख लिहायचा सन्मान आम्हाला प्राप्त होत आहे त्याबद्दल आमचे अभिनंदन आणि आम्हाला शुभेच्छा !!! आम्हाला म्हणजे आम्ही  सोडून जे  कोणी सगळे इथे लिहिणार आहेत आणि लिहित आहेत त्यांना….

आता काय लिहू हा प्रश्नच आहे …आत्ता तसा काही सुचत सुद्धा नाहीये…पण निखीलच्या (फार गुणी मुलगा हो…(खुश का रे?)..)  खास आग्रहास्तव आम्ही हा लेखन प्रपंच मांडला आहे…त्यात आम्ही आमचे सामान्य (!) ज्ञान वापरून काही लिहिले तर ….(जाऊ दे तो एक विषय होईल …कल्पनाविस्तार प्रकारच्या निबंधामध्ये.. )

हां..तर निबंधावरून आठवलं (आता कशावरून तरी काही तरी आठवणं,आणि ते लिहिणे क्रमप्राप्त आहे आम्हाला…)…. वस्तुतः सर्व विषयांमध्ये मराठी आणि मराठी विषयामध्ये निबंध हा आमचा अतिशय आवडता प्रकार…त्यात मनासारखे लिहायची मुक्त परवानगी असल्याने आम्ही तिथे “काहीही” लिहायचो…एकदा तर “माझा आवडता छंद” मध्ये  “झोप” या विषयावर काहीतरी लिहिल्याच्या आणि नंतर म्याडमकडून बोलावणे आल्याच्या काही अंधुक आठवणी आजही आमच्या मनात आहेत…

तसा मराठीचा एक “विषय” म्हणून संबंध (बाप रे! दोन्ही शब्दांचा मराठीतच दुसरा अर्थ वेगळाच आहे!!…) तर दहावीमध्येच सुटला..(सुटला की तुटला ??? बघा आता हे पण माहिती नाहीये…भाषा बिघडत चालली आहे इथे आल्यापासून.. )  पण हा निबंध मनावर ठाण मांडून बसला…आजसुद्धा कुठल्याही विषयावर सुचत असते (आम्ही त्याला मुक्त छंदातला निबंध असे म्हणतो.) ..पण ते लिहिण्यासारखे..किंबहुना वाचण्यासारखे नसल्याने (नाही हो ..तुम्ही जसा विचार करत आहात तसले काही म्हणत नाहीये मी..) आम्ही लिहिणे बंद केले होते….आता या ब्लोगच्या निमित्ताने पुन्हा की-बोर्ड हाती धरला आहे….तुम्ही वाचा किंवा नका वाचू ..आम्ही आमचा तोफखाना चालवणारच…तर तूर्तास हे नमनाचे घडाभर तेल (तुमच्या टाळक्यावर ??) ओतले….

मग दोस्तहो ..आता होऊन जाऊ द्या …….!!!

- यशोदत्त देशपांडे

Follow

Get every new post delivered to your Inbox.