दिसामाजी काहीतरी

प्रवर्ग: अमेरिका

भारतवारी?

काळ लोटला. मध्यंतरी पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. जसे मी हे लिहितो आहे तसे ते अजून वाहतेच आहे… सतत अथक… त्याच्याकडे बघता बघता विचार करून करून आपण थकून जाऊ. पण ते थांबणार नाही.. कालप्रवाह आहे… अचंबा वाटावा असा… शाळेत कधीतरी वाचले होते.. ‘काळाच्या या कराल दाढा.’..

कितीतरी दिवस ब्लॉग पासून दूर आहे. या वर्षाच्या सुरुवातीला लिखाण सुरु केले. १०० दिवस १०० पोस्ट्स लिहिल्या. नंतर मात्र संकल्प संपला आणि लिखाण अतिशय बेजबाबदार आणि बिनाशिस्तीचे झाले. कर्मयोगाची आठवण झाली का? पर्पज संपतो अन मग काम करण्यामागची प्रेरणा संपून गेली तर? काम करण्यात खरं राम आहे. साध्य करण्यात नव्हे. १०० आर्टिकल्स लिहिण्यात राम नसून व्यवस्थित नेहमी लिहिण्यात राम आहे… पुन्हा यत्न करून पाहू…

आजकाल तसेही मराठी वाचायची फारशी वेळ येत नाही. रादर journals, reports, theses यापुढे आमची गाडी फार तर फार ‘द हिंदू’ ची वेबसाईट नाहीतर गेला बाजार पीएचडी कॉमिक्स वाचणे… मर्ढेकर, गालिब, टोलस्तोय, खय्याम, तेंडूलकर, कुसुमाग्रज, बोरकर, दुष्यंत कुमार म्हणजे ‘किस देस के लोग’ झाले आहेत. दहावीनंतरच्या सुट्टीमध्ये तीन महिने किती पुस्तके वाचली होती… पुमग्र म्हणजे दुसरे घर झाले होते…हरकत नाही…नाही म्हणायला कुमारजी आणि वसंतराव मदतीला येतात.. पण तेसुद्धा स्ट्रेस बस्टर म्हणून… निर्मल आनंदासाठी नाही. दुर्दैव.

भारताची पाहिली वारी जवळ येत आहे. त्याबद्दल उत्सुकता आहेच. दीड वर्ष म्हणजे काही ‘हाये कितने बरस बीते’ सारखे नसले तरी बराच काळ आहे. पुण्यात बरेच काही करायचे आहे. राजगड बोलावतो आहे असे वाटते. बरेच प्लान्स केले होते, त्यातला एक होता म्हणजे प्रभाकर पेंढारकर यांना भेटायचे. जी काही मराठी मध्ये उत्कृष्ट पुस्तके आहेत त्यातले एक म्हणजे रारंगढांग त्याचे ते लेखक. भालजींचा मुलगा. भालजी म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीमधला मोठा माणूस. त्यांचे चरित्र वाचले आहे का? ‘साधा माणूस’ नावाचे? नसेल तर जरूर वाचा. भारी आहे एकदम. तर पेंढारकरांना भेटायला मागे एकदा गेलो होतो तेव्हा ते घरी नव्हते. भेट झाली नाही. आता दीड वर्षांनी परत जाण्याचा विचार होता तर आता ते या जगातच नाहीत… खंत आयुष्यभर राहील.

असाच एक जुना मित्र. ज्याच्याशी इमेलवर संपर्क साधतो. मेलामेली चालू असते. हे महाराज सध्या इंग्रजी साहित्यामध्ये पदवी मिळवत आहेत. आणि त्यांचा आक्षेप असा की माझे इंग्रजी आता पूर्ण अमेरिकनाळलेल आहे. मग जरा मागचे जुने काही मेल्स काढून वाचले… खरंच चायला… अमेरिकन इंग्रजीचा मी काही फारसा चाहता नाहीये.. (I am not a big fan of… या अमेरिकन म्हणीचे भाषांतर आले इथे परत…!!) अर्थात Hemingway, Pearl Buck आणि Ayn Rand च्या वाचनातून नकळत थोडेसे संस्कार झिरपले असावेत… पण त्याहीपेक्षा बहुधा हा प्रभाव सिनेमांचा असावा… ब्रिटीशांचे इंग्रजी सिनेमे पाहणे अगदी तुरळक झालंय आता…हा.. एक मात्र आहे.. वाचन जरी कमी झाले असले तर सिनेमे पाहणे मात्र जोरदार सुरु आहे… श्याम बेनेगल जवळ जवळ संपवला… मध्यंतरी एक डेज इन हेवन नावाचा सिनेमाटोग्राफीसाठीचा अतिशय जबरदस्त सिनेमा पहिला.. वर्णन करायला शब्दच नाही… यात कथा आहे पण फारशी जोरकस नाही. कलाकार तेव्हा तसे नवेच होते. पण एक एक फ्रेम म्हणजे एक एक उत्कृष्ट चित्र आहे.. पाहता पाहता आपण त्यात इतके गुंगून जातो की कोण सेट वर येतात, कोण बोलताय काय चाललंय काहीही फरक पडत नाही.. फक्त ‘बघत’ राहावा असा सिनेमा… खऱ्या अर्थाने ‘चित्र’पट आहे हा… एक अनुभवच होता.. त्या काळा-दिग्दर्शकाने म्हणे हा चित्रपट बनवल्यार पुढची २० वर्ष दुसरा कोणातच चित्रपट बनवला नाही….

पुण्यामध्ये करण्याच्या यादीमध्ये सवाई गंधर्व बसायला पाहिजे होता खरं.. पण नाही होणार. मागच्या वर्षीपण बुडाला होता… सिओइपि-मध्ये चांगले होते. परीक्षा बरोब्बर सवाई सुरु व्हायच्या १-२ आठवडे आधी संपायची.. तिकडे ग्रीनरूम म्हणजे जणू काही आपल्या बापाची खोली आशा थाटात मागे जाऊन प्रत्येक कलाकाराला भेटून, २-४ वाक्य बोलून सह्या घेऊन येऊन मिरवायचा एक काळ होता. हरिप्रसाद चौरसिया, भीमसेन जोशी, आरती अंकलीकर, परवीन सुलताना सगळ्यांशी बोलून आलो होतो.. उगीच भारी वाटायचे… गाणे ऐकणे कमी (जे तसेही काळात नाहीच) आणि इतरच गमजा… तरी मजा होती.

५ दिवस कोलकात्याला जाणारे. असंच फिरायला. भारताचा पूर्व भाग कधीच पहिला नाही. शांतीनिकेतन, बेलूरचा माठ बघून येऊ. इंग्रजांची पहिली राजधानी. बॉम्बे प्रेसिडन्सी, सुरत आणि मद्रास चे ब्रिटीश सारे लोक कलकत्त्याला रिपोर्ट करत असत. गव्हर्नरचे घर पण तिथेच होते. राष्ट्रवादी चळवळ, क्रांतीकार्यांचे माहेरघर, कम्युनिस्टांचे माजघर, बुद्धिवादी नव-मध्यमवर्गाची पडवी, भारतीय सिनेमाचे अग्रदूत असलेल्या अनेकांचा व्हरांडा आहे. पण त्याहूनही भारी म्हणजे भक्ती मुव्हमेंटचा वेगळाच अविष्कार बांग्ला मध्ये आहे ज्यात हिंदू-मुस्लीम समीकरण अजबच आहे. गालिब म्हणतो न – कलकत्तेका जिक्र जो किया तुने हमनशीन, एक तीर मेरे सिनेपे मारा की हाय हाय…!

एक महत्वाची गोष्ट – इतिहास संशोधन मंडळ. बेल्ल्याला पकडून कीं आठवडाभर तरी रोज तिथे जाण्याचा मनसुबा आम्ही मनी धरला आहे. आई जगदंबेच्या कृपेने त्यात नक्की येश मिळेल. एकदा असेच बाबासाहेबांना भेटायला गेलो होतो. त्यांना कोणाचा तरी फोन आला… आम्ही बाजूला उभे होतो.. ‘आम्ही पर्वतीजवळच्या पुरंदरे वाड्यावर आहोत… हो हो xxxराजांचे आगमन अजून येथे झाले नाही… मुकुंदराव जरा आम्हास पाणी देता आणता का…आपण आसनावर बसा न…’ आणि त्यांच्या दिवाणखान्यात आजूबाजूला तरवारी आणि हंडे वगैरे फुल ऐतिहासिक वातावरण… हा माणूस इतिहास लिहितो, बोलतो, अभ्यासतोच नाही तर अक्षरशः इतिहास जगतो. बेडेकरांबरोबर जेव्हा जेव्हा बोलायचो तेव्हाही असेच जाणवायचे.. उठता बसता हे लोक काहीतरी फाटकन बोलून जातात की ऐकणाऱ्याने फक्त ऐकावे. शेवटी इतिहासाचे मार्केटिंग करणे तेही पुण्यामध्ये फारसे सोप्पे नाहीये..:)

यंदा हिस्टरी क्लबचा चौथा हिस्टरी वीक. भारी होईल यात शंकाच नाही. फिरून पुन्हा एकदा पहिला हिस्टरी वीक आठवतो आहे. फुल धमाल होती. उगीच ‘इवलेसे रोप लावियले द्वारी’ ची भावना मनात यायला लागली तर? वटवृक्ष होणे अजून फार लांबची गोष्ट आहे खरे पण निदान मूळ बाळसे धरू लागले आहे.

बरेच लोक मार्क करून ठेवले आहेत त्यांना भेत्याचे आहे. बरेच मित्र आहेत. बरीच हॉटेले आहेत. काही काही पुस्तके आणायची आहेत. काय काय काय काय…. असो. या गोष्टी इथेच थांबवतो. कारण संकल्पना करून ठेवणे चांगले जमते. प्रत्यक्षात किती येतात ते बघू.

मोहन-वीणा

आत्ता पंडित विश्वमोहन भट यांचा इथे कार्यक्रम झाला. तबल्यावर साथीला पंडित शुभेन चटर्जी होते. यमन आणि हंसध्वनी वाजवला. त्यांच्या ‘Meeting at the river’ आणि ‘Sleepless nights’ या अल्बम्स मधील २-३ गाणी वाजवली. ज्याच्याकरता Grammy Award मिळाले ते गाणेही वाजवले…. कार्यक्रम अतिशय रंगला…. पण शेवट त्याहूनही उच्च होता. त्यांनी जन गण मन आणि वंदे मातरम वाजवले. आणि संपूर्ण १३ महिन्यांनी पहिल्यांदा आजूबाजूला शंभरावर भारतीय लोक एकत्र उभे राहून जन गण मन ऐकले. अंगावर सरसरून काटा आला. अविस्मरणीय…

धबाबा लोटती धारा…

आत्ता बाहेर सोसाट्याचे वादळ आणि पाऊस येत आहे. एक वर्ष तरी झाले मी वादळाची वाट पाहत आहे. मिडवेस्ट मधली राज्ये ही वादळांच्या छायेखाली असतात. सारखे अलर्टस, टोर्नाडो आला की काय करावे, कसे करावे, कुठे लपावे कुठून पळावे, काय करू नये वगैरे वगैरे काय काय चालू असते. आधीच अमेरिकेसारखा देश जिथे उगीच जास्त काळजी करतात. त्यात हा वादळांचा धोका. इथे येण्यापूर्वीपासून इच्छा होती की एकदा तरी मोठा टोर्नाडो बघावा बघावा म्हणून. २-३ वेळा उगीह्क अलार्म वाजले अलर्टस आले पण फुसके निघाले… आणि आज काहीच अलर्ट नव्हता तरी बेक्कार वादळ आले आहे. सगळी झाडे मुळासकट उन्मळून पडतील जणू… आणि हे घर तर लाकडाचे आहे.. लाकडाच्या घरांबद्दल उगीच तकलादू असल्याची भावना आहे त्यामुळे सारखे असे वाटते की हे घरच उडून गेले तर? तर काय? पुण्यात म्हणे पानशेतच्या पुरामध्ये जुने वादेच्या वाडे २-३ मजले असलेले पाण्यात वाहून गेले होते… बोट क्लब वरचे मामा सांगायचे की त्यांनी कशी पंट काढली आणि संगमावरून कसे कुठे गेले नी कुणाला वाचवले वगैरे वगैरे… भयंकर साहसाची गोष्ट वाटायची.. त्यांनीच सांगितले होते की त्यांनी अक्षरशः जुने २-३ मजली वाडे पुरत वाहून जाताना पहिले आहेत..!!! इथे फक्त ते उडतील.. २ मजल्यांची लाकडी घरे हवेत उडतील असेच वाटत आहे…मजा येईल… जोरदार, घमासान काय काय विशेषणं लावू ते पण सुचत नाहीये. अंधार दाटलाय. पाण्याचे फवारे नुसते अंग बोचकारून काढतील एखाद्याच्या इतके जोरदार आहे. झाडे हालत आहेत..हालत काय झाली त्यांची बघा – झाडाचा शेंडा बुडाला टेकेल इतके वाकली आहेत…तर. सह्याद्री मध्ये असा पाऊस अनुभवला की रामदास आठवायचे ‘धबाबा लोटती धारा, धबाबा तोय आदळे’ इथे तर ‘धबाबा’ शब्द पण फिका वाटावा… बघू किती वेळ हे प्रकरण चालते आहे ते…

पुनरागमन

पुनरागमन??? मधुशालेमध्ये बच्चनजी म्हणतात – आनेकेही साथ जगतमें कहलाया जानेवाला..

बरेच दिवस गैरहजर राहिल्याबद्दल मुआफी बक्षावी. मध्यंतरीच्या कळत अनेक घटना घडल्या ज्यांना फक्त असंभावित अन अनपेक्षित म्हणू शकतो. खरे तर त्यातल्या प्रत्येक घटनेवर एक एक मस्त आर्टिकल होऊ शकते. एका माणसाला भेटलो. त्याचे जन्मगाव आहे बेथलेहेम. तेच ते गाव जिथे ख्रिस्त जन्माला. आणि ते आहे जेरुसलेम पासून हाकेच्या अंतरावर. त्याच्याशी मनसोक्त गप्पा मारल्या ३०-४० मिनिटे…. तो ७३ च्या युद्धात अरब सैन्याकडून इस्राईलविरुद्ध लढला पण होता बच्चमजी..!! यॉम किप्पुर च्या युद्धात… मग जॉर्डन मध्ये काही वर्षे राहून अमेरिकेत आला. इथे शेफ बनला… मायकल जॉर्डन च्या टीमचा शेफ होता म्हणे काही वर्षे… आणि आता इथे येऊन हॉटेल टाकले. त्याने कुरआनातल्या काही गोष्टी पण सांगितल्या. आब-ए-जमजम आणि आर्क ऑफ नोआह सांगताना तर त्याचा उत्साह उतू जात होता… मजा आली

मग एका विद्यार्थ्याला भेटलो. तो आहे तेहरान चा. म्हणजे इराण. मातृभाषा फार्सी. हा तर एक मस्तच किस्सा आहे. इतिहास हा विषय निघाल्याबरोबर त्याने पहिलाच प्रश्न गुगली टाकला… म्हणे तुझे नादिरशाह बद्दल मत काय आहे…? आयला… मला मग पटापट आठवले. त्याने अफगाण प्रांत जिंकून घेतला होता. मग सिंधू ओलांडली होती. भारतावर हल्ला केला होता. दिल्ली जिंकून घेतली. मुघलांचा पाडाव केला.. बेसुमार कत्तल केली.. अगदी ६ डिसेंबरच्या ‘प्रत्यक्ष कृती दिन’ स्टाईल मध्ये २-३ दिवसात त्याने २०-३०००० माणसे कापून काढली.. घाबरून मग बादशाहने त्याच्या हातात राज-खजिन्याच्या चाव्या दिल्या. यानेच मयुरासन आणि कोहिनूर भारताहेर नेले… इतकी लुट मिळाली इतकी लुट मिळाली त्याने इराण ला जाऊन पहिले काम काय केले असेल? तर संपूर्ण देशाला ३ वर्षे करमाफी केली. सरसकट सगळ्यांना…!!! आणि त्याच पैश्यात वर अजून ओट्टोमान साम्राज्याशी आणि इतरही काही लढाया केल्या… तर असा हा नादिरशाह.. मुघालांवर कितीही राग असला तरी नादिरशाह बद्दल चांगले मत भारतात तरी कोणाचे असायचेच काही कारण नाही. पण त्याला सरळ कसे सांगू की आम्ही काय विचार करतो ते… आणि जर अब्दाली जरा अफगाणिस्तानात तसा हा इराण मध्ये पुजला जात असेल तर मग प्रोब्लेमच. मग जरा पोलिटिकल उत्तर दिले. पण मग तोच म्हणाला की आम्ही त्याला शिव्याच देतो. त्याने देशाची वाट लावली. खूप मुडदे पडले, अर्थव्यवस्था बुडवली आणि काय काय… हुश्श्श… मग पुढचा मुद्दा त्यानेच मांडला… की तुला संस्कृत येते का? काय बोलणार..! थोडी थोडी कळते म्हणालो…मग म्हणे बऱ्याच फार्सी शब्दांचे रुट्स संस्कृतमध्ये आहेत… वा वा… खुलेपणाने मान्य पण केलेन बेट्याने.. थोडक्यात बराच लिबरल, बरीच माहिती आणि कुतूहल असणारा दिसला… मग मी पण त्याला त्याच्या नावाचा अर्थ काय होतो आणि तेहरान बद्दल १-२ प्रश्न विचारले आणि पुन्हा भेटायचे नक्की करून खुदा हाफिज केले.

टेस्ट ऑफ टीपकनू नावाच्या इथल्या जत्रेत भाग घेतला. जरा फूड कुपन्स वगैरे विकली.. इथल्या लोकांबरोबर सहभागी व्हायची संध्या येणे आणि आपण त्या घेणे नेहमीच होते असे नाही.. त्यात बरेच शिकायला मिळाले… overly simplified and straightly put….

मंथन पहिला…. श्याम बेनेगलवर पुन्हा एकदा दिल खुश झाला…. काय तो संपूर्ण संच होता लोकांचा.. श्याम बेनेगल, गोविंद निलाहणी, स्मिता पाटील, ओम पुरी, अमरीश पुरी, कुलभूषण खरबंदा, नसिरुद्दीन शाह, शबाना आझमी, वनराज भाटीया वगैरे लोकांनी जे जे काम करून ठेवले आहे ना.. अप्रतिम. लहानपणी मी जर स्वतः सिनेमा काढला तर कसं काढेन, कोणत्या कथा हातालेन, कसे चित्रीकरण, संवाद असा मुक्त-विचार करत असे. पण श्याम बेनेगलचे सीनेमे पहिल्यापासून तर आता काही करायचे उरले आहे असे वाटतच नाही. नंतर मिर्च मसाला पहिला… पुन्हा एकदा दिल खुश झाला… जबरदस्त आहे… मग Bandit Queen आणि हजार चौरासी की मा पहिला… अनुपमेय. आणि सगलावर कडी कशाने झाली माहित आहे? Sophie’s Choice ने…. याचे नाव पण पूर्वी ऐकले नव्हते… पण बेत शिंडलर’स लिस्ट च्या तोडीस तोड निघाला… मेरील स्ट्रीपचा अभिनय बघणे हाच एक मोठा अनुभव होता… जेव्हा तो खरंच निवडीचा क्षण येतो तेव्हा हृदयाची कालवाकालव होणे म्हणजे काय त्याचा अर्थ पुन्हा एकदा कळला… आणि काल रात्री पहिला तो वास्तु-पुरुष. अतिशय उच्च…शब्दातीत… यावर लिहिण्याची पण क्षमता नाही म्हणून इथेच हा विषय थांबवतो.

घरी I too had a dream मागवले. वर्गीस कुरियनचे आत्म-चरित्र. बघू आता जेव्हा हातात पडेल तेव्हा वाचू… आणि शैक्षणिक जीवनात तर असंख्य घटना घडत आहेत. हळू हळूच घडत आहे पण काहीना काही चालूच आहे… ते परत केव्हातरी..

डेड विक दिनक्रम

रात्री ऑफिस मध्ये राहून काम केले आणि झोपायला पहाट झाली…  रोज रात्री साडे तीन ला येणारा जेनीटर ओळखीचे स्मित देवून गेला… मग लॉबी मध्येच सोफ्यावर कसाबसा मावून झोपलो… अंगावर चादर म्हणून जर्किन… झोपताना समोर काचेतून दिसतो आहे तो अंधारात पण चमकणारा बेल टोवर… हळूच डोळे मिटले की डोके अपोआप शांत झाले…. डोळे उघडतो तो आजूबाजूला खूप लोक इतरत्र चालत फिरत गप्पा मारत आहेत, क्लासेस ला जात आहेत.. बाजूला कोणी एक कपल शांतपणे ना बोलता असंच बसले आहे…. पहिल्यांदा आठवते ती कॉफी.. काल रात्री ब्रश इथे आणलाच नाही… असंच इलेक्ट्रिकल च्या एचकेएन लोंज मध्य एजून ३० सेंट ची रेग्युलर कॉफी घेतली… जाताना पॉटर लायब्ररी आणि मेक डीपार्टमेंट च्या मधून येणारा सूर्यप्रकाश… आज अंघोळ नाहीच… दुपारी अडीच पर्यंत खायला पण नाही वेळ… मग काय काय कामे उरकता उरकता, असाईनमेंट संपवताना आणि क्लासेस करेपर्यंत अडीच… मग जेवण आणि जरा सुस्ती.. परत ऑफिसच्या लॉबीमधला सोफा…. मग संध्याकाळ…. पाच वाजता लोंज बंद होतो.. त्याच्या आधी एक कॉफी घेतलेली बरी… दिवस संपत आला… चायला अर्धा दिवस फुकटच गेला की.. अजून बरेच काम करणे बाकीच आहे.. आता कसे संपणार.. आज पण परत जागायला लागणार… आज पण घरी जायला मिळणार नाही.. पण उद्या सकाळी नक्की घरी जायचे… असे म्हणून आपले ऑफिस अन लॉबी आणि त्या काचेतून दिसणारा बेल टोवर… समोर पुस्तक, इंटरनेट… रात्री कोणीना कोणी सापडतेच जेवायला बरोबर जायला… परत काम, ऑफिस आणि लॉबी… रात्रीचे साडे तीन… जेनीटर चे ओळखीचे आणि सवयीचे स्मित… आणि पहाटे पहाटे सोफ्यावर केलेले अंगाचे मुटकुळे…

Follow

Get every new post delivered to your Inbox.