दिसामाजी काहीतरी

Month: जुलै, 2010

इस्लाम पाठ सोडत नाही…

इस्लाम बद्दल जाणून घ्यायची इच्छा अपार. लहानपणापासून वाचले त्याचे इम्प्रेशन मनावर असते आपल्या सगळ्यांच्या… मग ती पाठ्याशाळेतील पुस्तके असो की ऐतिहासिक कादंबऱ्या बखरा असोत. कुठून तरी वायव्येकडच्या वाळवंटातून उंटांचे काफिले प्रवास करत आहे.. बदायुनी लोक रात्री एकत्र बसून शेकोटीभवती गाणी गात आहेत. किंवा मग असंच हिरवा झेंडा घेऊन कोणता तरी घोड्यांचा काफिला आरडा-ओरडा करत आला… शेकडो लोक ,हातात नंग्या तलवारी आणि मुखात ‘दीन दीन’, ‘अल्ला हो अकबर’ चा नारा. अत्यंत क्रूरकर्मा असे हे लोक, जाळपोळ करत, लुटालूट, मारहाण करत आले, शहरे लुबाडली, मुडदे पडले, गायी मारल्या, मंदिरे पाडली, आया-बहिणींची अब्रू लुटली वगैरे वगैरे टिपिकल वर्णन वाचतो. मराठी मध्ये तर इस्लाम बद्दल नीट माहिती असणारे काहीच सापडत नाही.. (शेषराव मोऱ्यांचा अपवाद) आणि मग फाळणीची पार्श्वभूमी असतेच. तेव्हा झालेल्या कत्तली, मास मायग्रेशन, कश्मीरचा न सुटलेला प्रश्न…त्यातूनही कोणी जरा वाचणारा मराठी वाचक असेल तर लगेच तो पहिल्यांदा सावरकरांच्या ताब्यात सापडतो आणि बौद्ध धम्म वा अकबर हे कसे भारतविघातक होते असे पक्के मन बनते.. मग मोपल्यांचे बंड असो की मग होणारे शिवाजी महाराजांच्या इतिहासाचेआधुनिक व्हर्जन असो. त्यातून इस्लामचा पर्सनल लॉ बोर्ड वेगळा का? त्यांना युनिफोर्म सिव्हील कोड का नाही? आर्टिकल ३७० का आहे? वक्फ बोर्ड हा काय प्रकार आहे? पाकिस्तानचे अस्तित्व आणि दहशतवादाचे नवे रूप आणि वर ९/११ आणि २६/११… आणि आता तर घरामागेच जर्मन बेकरी.

हे सगळे एकाकी वर्णन वाटले. खरंच काय प्रकार आहे? मग इतके लोक मुस्लीम का? इस्लामला त्याच्या जन्माच्या पहिल्या एका शतकातच इतकी समृद्धी का प्राप्त झाली? ते जर इतके अन्यायी आहेत तर मग तरी पण त्यांना इतिहासात इतके जय का मिळाले? इतका प्रसार का झाला? इतकी शतके त्यांनी राज्य कसे केले? गम्मतच आहे….

इतिहासाची आवड म्हणून जसा जसा वाचत गेलो तसे तसे लक्षात आले की मूळ कागद बघणे, मूळ तर्जुमा वाचणे आणि मूळ पुस्तक वाचणे याला फार महत्व आहे. त्याबद्दल इतरांची वक्तव्ये वाचून सत्य समजत नाही. पर्ड्यू मध्ये मध्यंतरी हिस्टरी डीपार्टमेंटच्या दक्षिण आशियाचा इतिहास या कोर्सला जाऊन बसायचो. शिकवायला शिक्षिका होत्या त्या होत्या बंगाली. टिपिकल आधुनिक शिक्षित बुद्धिवादी बंगाली डोळ्यासमोर आणा. पहिल्याच लेक्चरला त्या भारताची ओळख अमेरिकन मुलांना करून देताना म्हणाल्या की भारत म्हणजे राज्यांचे फेडरल नेशन आहे. काय घ्या… त्यांना वर्गात खूप बोलायची इच्छा झाली होती की भारत फेडरल नसून रिपब्लिक आहे. पण शांत राहिलो. ‘गर फिरदौस बर रु ए जमीं हस्त’ हा शेर माहित नसलेली व्यक्ती मुघलांचा इतिहास शिकवत होती. सोर्सेस होते बार्बरा मेटकाफ वगैरे.. त्यांना विचारले की तुम्ही इतिहासकार आहात, उर्दू फार्सी येते का? नाही म्हणाल्या.. मी कधी प्रयत्न पण नाही केला… मग कसला डोंबलाचा इतिहास शिकवणार मध्ययुगीन भारतीय उपखंडाचा? मूळ साधने वाचता येत नसतील तर कसले इतिहासकार? मोडी लावता न येणाऱ्या माणसाने शिवाजी महाराजांवर जर पुस्तक लिहिले तर ते किती युजलेस असेल याचा विचार करा..

म्हणून उर्दू शिकायला घेतली आणि ‘अलिफ बे पे’ करत वाचायला लागलो. पण भारतातल्या इस्लामला पारंपारिक सांस्कृतिक आकर्षण कशाचे असेल तर ते आहे पर्शियाचे. जसा जसा गालिब आणि इक्बालची शायरी वाचायला लागलो तसा तसा फार्सीकडे ओढा वाढू लागला… फार्सी व्याकरण शिकायचे २-३ प्रयत्न निष्फळ ठरले. दरम्यान इस्लामबद्दल वाचन सुरु केले. इंग्रजी मध्ये मराठीच्या तुलनेत प्रचंड साहित्य उपलब्ध आहे. मग कश्मीर आणि इस्राएल मधल्या साम्यांचा अभ्यास करायला लागलो तेव्हा जेरुसलेम बद्दल मनात एक अनाम प्रेम वाटायला लागले.. इतकी शतके, इतके धर्म, इतक्या लढाया, इतक्या अस्मिता… एकदम खास इतिहास आहे. तिथून थोडा दक्षिणेकडे उतरून मग मक्का-ए-शरीफ बद्दल माहिती वाचणे सुरु केले.. मुहम्मदाचे आयुष्य, वयाच्या ४०व्या वर्षी पैगंबर होणे.. मग पुढचे १ तप केलेला झगडा, हिज्र, बदायुन टोळ्यांवर मिळवलेली फतेह, पैगंबराच्या मृत्युनंतर अबू बक्र, उमर, उस्मान आणि अली हे राशुदिन, खलिफा, उमय्याद, खिलाफत ऑफ ग्रनाडा…वाचत जावे आणि तोंडात बोटे घालावीत.. मग मंगोल लोकांचे पर्शिया पर्यंत येणे आणि त्यातून संपर्ण इस्लामचा चेहेरा बदलून जाणे… पहिला मुघल बाबर हा चंगीज खान आणि तैमुर लंग यांचा वंशज होता.. म्हणजे एकदम रॉयल मंगोल आणि रॉयल मुस्लीम… वस्तुतः मुघल हा शब्दच मुळी मंगोल वरून आला आहे.. त्यांच्या काळातले त्यांचे युनानी मेडिसिन, आकाशविज्ञान, नेव्हीगेशन, व्यापार, गणित, आर्किटेक्चर, कलाकुसर, संगीत, पाककला यामध्ये अतिशय उच्च पातळीवर गेलेले इस्लाम कल्चर, त्यांच्या परंपरा आणि सण… आफ्रिकेमध्ये आणि भारतीय उपखंडात इस्लाम चा वाढता प्रभाव, त्यांचेही अनेक सबग्रुप्स जसे की शिया, सुन्नी, अहमदिया, सुफी, इबादी… मग तिथून हळू हळू युरोपातला रेनेसा आणि मग इस्लामचे आजच्या इस्लाम मध्ये झालेले रुपांतर वगैरे वगैरे बराच मोठा व्याप आहे. काय काय काय काय… फज्र, अस्र, इशा, मघ्रीब वगैरे नमाज, त्यांची भक्ती परंपरा, जकात, रमदान… कयामत वगैरे गोष्टी..इराण मधला फरहाद, पंजाबातील मिर्झा साहिबा यांच्या चटका लावून जाणाऱ्या गोष्टी. एकदा का माणूस अडकला की त्यातून बाहेर येणार नाही. आणि आपण काही रामकृष्ण परमहंस नाही एका आयुष्यात सगळे धर्म साध्य करायला. पण इस्लाम बद्दल जाणून घ्यायची इच्छा फार.

त्यासाठी बरेच उपद्व्याप केले. पुण्यामध्ये एका इराणी माणसाला पकडून त्याच्या मागे लागलो होतो की रे बाबा, फार्सी शिकव फार्सी शिकव. ते काही झाले नाही. आता इथे आलो आहे. इथे ३-४ पठाण लोकांशी गप्पा मारल्या. पण त्यातून पुढे काहीच नाही. इराणी लोकांना भेटलो. त्यांच्यात प्रयत्न करतो आहे कुठे कोणी चांगला माणूस भेटतो आहे का शोधतो आहे. आज एक लिबियाचा मुलगा भेटला. अहमद म्हणून. त्याला मग १-२ प्रश्न विचारले. तर मग तो एवढा खुश झाला की मग त्याने नंतर २ तास बडबड केली. मजा आली. फारशी उपयोगी माहिती मिळाली अशातला भाग नाही. पण इराण पलीकडचा इस्लाम जो भारतामध्ये फार कमी पाहायला मिळतो त्या लोकांचे विचार ऐकायला मिळाले. त्या २ तासात जबरदस्त काय काय मते सांगितली जी काही वेळा विरोधाभासाची होती तर काही वेळा मूर्खपणाची. पण त्याची त्यावर श्रद्धा होती. इस्लामबद्दल नवी माहिती मिळाली असे नाही म्हणणार पण एक नवीच इच्छा जागृत झाली. फार्सीचा टप्पा गाळावा आणि जमल्यास डायरेक्ट अरेबियाच शिकावी. आणि मुळातूनच कुराण वाचावे. बघू कधी हे स्वप्न प्रत्यक्षात येते ते…

वो जो हममे तुममे करार था..

मोमीन खान मोमीन साहेबांची उत्कृष्ट गजल…
वो जो हममे तुममे करार था.. तुम्हे याद हो के न याद हो….
वो नये गिले वो शिकायते, वो मजेमजेकी हिकायते…वो हर एक बातपे रूठना… तुम्हे याद हो के न याद हो…

बघा एकेकाने कशी गायली आहे..

नय्यर नूर -

गुलाम अली -

फरीदा खानुम -

बेगम अख्तरीबाई फैजाबादी-

अबिदा परवीन -

पंकज उदास -

कुणीच सांगत नाही युक्ती

पद्मा गोळे म्हणतात -
कोठेतरी गेलेच पाहिजे गतीचीही आहेच सक्ती
जायचे कसे त्याची मात्र कुणीच सांगत नाही युक्ती

आहे की नाही अगदी खरे?

धबाबा लोटती धारा…

आत्ता बाहेर सोसाट्याचे वादळ आणि पाऊस येत आहे. एक वर्ष तरी झाले मी वादळाची वाट पाहत आहे. मिडवेस्ट मधली राज्ये ही वादळांच्या छायेखाली असतात. सारखे अलर्टस, टोर्नाडो आला की काय करावे, कसे करावे, कुठे लपावे कुठून पळावे, काय करू नये वगैरे वगैरे काय काय चालू असते. आधीच अमेरिकेसारखा देश जिथे उगीच जास्त काळजी करतात. त्यात हा वादळांचा धोका. इथे येण्यापूर्वीपासून इच्छा होती की एकदा तरी मोठा टोर्नाडो बघावा बघावा म्हणून. २-३ वेळा उगीह्क अलार्म वाजले अलर्टस आले पण फुसके निघाले… आणि आज काहीच अलर्ट नव्हता तरी बेक्कार वादळ आले आहे. सगळी झाडे मुळासकट उन्मळून पडतील जणू… आणि हे घर तर लाकडाचे आहे.. लाकडाच्या घरांबद्दल उगीच तकलादू असल्याची भावना आहे त्यामुळे सारखे असे वाटते की हे घरच उडून गेले तर? तर काय? पुण्यात म्हणे पानशेतच्या पुरामध्ये जुने वादेच्या वाडे २-३ मजले असलेले पाण्यात वाहून गेले होते… बोट क्लब वरचे मामा सांगायचे की त्यांनी कशी पंट काढली आणि संगमावरून कसे कुठे गेले नी कुणाला वाचवले वगैरे वगैरे… भयंकर साहसाची गोष्ट वाटायची.. त्यांनीच सांगितले होते की त्यांनी अक्षरशः जुने २-३ मजली वाडे पुरत वाहून जाताना पहिले आहेत..!!! इथे फक्त ते उडतील.. २ मजल्यांची लाकडी घरे हवेत उडतील असेच वाटत आहे…मजा येईल… जोरदार, घमासान काय काय विशेषणं लावू ते पण सुचत नाहीये. अंधार दाटलाय. पाण्याचे फवारे नुसते अंग बोचकारून काढतील एखाद्याच्या इतके जोरदार आहे. झाडे हालत आहेत..हालत काय झाली त्यांची बघा – झाडाचा शेंडा बुडाला टेकेल इतके वाकली आहेत…तर. सह्याद्री मध्ये असा पाऊस अनुभवला की रामदास आठवायचे ‘धबाबा लोटती धारा, धबाबा तोय आदळे’ इथे तर ‘धबाबा’ शब्द पण फिका वाटावा… बघू किती वेळ हे प्रकरण चालते आहे ते…

हम अपने पैरोंमे जाने कितने, भवर लपेटे हुए खड़े है

काम करायचा आळस असेल तर ‘विचार चालू आहे’ हे कारण मस्त आहे द्यायला… तो करताना दाखवावा लागत नाही की काही नाही… ब्लॉगचेही तसेच; नव्याने लिहायला सुरु करेन सुरु करेन म्हणतो आहे, पण नुसतेच म्हणतो आहे. कल्पना अशी होती की उधार-उसनवारी खूप झाली. इतरांच्या कविता, दाखले, शेर, इतिहासातल्या कथा, साहित्यातले मासले बरेच काही लिहून लिहून पोस्ट्सचा पाऊस पाडता येईल. आला देखील. ब्लॉग सुरु केलाच तेव्हा ठरवले होएत १०० दिवस १०० पोस्ट्स. आणि ते जमले. लोकांनी बऱ्यापैकी वाचले. पण त्यात आता मजा वाटणे थांबले. याचा अर्थ असा नव्हे की स्वतःच्या कथा/कविता/ललित लिहिणार. बिलकुल नोहे. पण स्वानुभवावरून आणि स्वतःच्या विचारांवर आर्टिकल्स लिहायचे आहे. जे वाचले ते थोडा वेळ बाजूला ठेऊ. जे दिसते ते लिहू. कसं काय?

पण जे दिसते ते कळले पाहिजे, आकळले पाहिजे आणि त्यातून काहीतरी लेखनीय स्फुरले पाहिजे. सोप्पे नाहीये हे. त्यामुळे मग शेवटी लिहिणेच बंद करून टाकले. मग गाडी परत वाचनाकडे वळली. त्यातून काही बघू सुचते का. किंवा आता लवकरच एक १० दिवसांची ट्रीप करणार आहे. त्याची डायरी होईल चांगली. सध्या भारतातून अमेरिकेत शिकायला येणारे नवे पब्लिक बरेच आहे. आगरकरांनी म्हटल्याप्रमाणे ‘एकदा सांगून भागत नाही. कालावकाशाने पुनरुक्ती करत राहावी लागते’ या न्यायाने ते अनुभव जरी पुष्कळ असतील तरी ते लिहिता येतील. इथल्या सिस्टीमबद्दल तर चिक्कार आहे लिहिण्यासारखे. पण इतरांना वाचायची इच्छा नसावी आणि असेल तरी ती इतर ठिकाणी पूर्ण होत असावी म्हणून लिहित नव्हतो. पण आता मात्र तो चाप्टर एकदा लिहून काढता झाला पाहिजे. नाहीच जमले काही तर मग पेटंट विषय आहेतच.

असे करतो त्या ट्रीपच्या डायरीनेच सुरुवात करतो. साली पण कविता सांगायची हौस काही पुरत नाही. ही सुचली -
जहासे तुम मोड़ मुड़ गए थे, ये मोड़ अबभी वही पडे है,
हम अपने पैरोंमे जाने कितने, भवर लपेटे हुए खड़े है… गुलझार.

Follow

Get every new post delivered to your Inbox.