अडीच हजार वर्षांपूर्वी सिंधू च्या तीरावर झालेली ती चकमक. अलेक्झांडर आणि एक साधू. दोघांचे आयुष्याकडे बघायचे दृष्टीकोन वेगळे, दोघांच्या आकांक्षा वेगळ्या. दोघांचे विचार-आचार वेगळे आणि दोघांच्या ‘कर्तृत्व’ या शब्दाच्या व्याख्याच वेगळा. अलेक्झांडर आला होता ग्रीसहून…अकिलीस चे ग्रीस. विजयाचा उन्माद, पराक्रमाची ओढ, राज्याची लालसा, कर्तृत्वाची आस. विजयाच्या उन्मादाच्या क्षणी ज्या भावना असतात that is the closest you can go to the God. Its an ambrosia from the heaven.
आणि हा नंगा फकीर… त्याची पार्श्वभूमी होती भारतीय तत्वज्ञाची. सगळे मिथ्या आहे. ‘खुदा के पास जाना है, ना हाथी है ना घोडा है, बस पैदल ही जाना है…!’ शून्याची संकल्पना शोधणाऱ्या देशातला तो. गीतेमधल्या विश्वरूप दर्शनाची जाणीव असणारा. ‘हे सगळे आधीच मेलेले आहेत. मी त्यांना मारलेले आहे. तू फक्त एक माध्यम आहेस’ हे माहित असलेला.
दोन वेगळ्या विचारांमधला झगडा. कोणा एकाचे बरोबर वा चूक नाही. कारण दोन्हीही मानवनिर्मित आहेत. तो २ विचारांमधला फरक आहे. प्रत्येक वेळी निर्णय घेताना आपल्यासमोर तो प्रश्न असतो. की हे का करायचे? कोणासाठी? तेव्हा ही गोष्ट आठवा. म्हणजे सगळी उत्तरे सापडणे सुकर होते. आपल्याकडच्या पारंपारिक गोष्टी.. मग त्या पुराणातल्या असोत की इसापनीती-पंचतंत्र-जातक कथा असोत वा चार्वाक-बिरबल-तेनालीरामन सारख्या ऐतिहासिक असोत. खूप मोठा खजिना आहे. लहानपणी वाचून सोडून देतो खरं तर पण प्रत्येक टप्प्यावर त्यातली गोष्ट मार्गदर्शक ठरू शकते. परवा युट्युब वर कोणता तरी व्हिडियो पाहत होतो तेव्हा पुन्हा एकदा फिरून ही गोष्ट सापडली आणि ती इतकी प्रचंड अपील झाली की काय सांगू. फकिराच्या आणि अलेक्झांडरच्या स्टान्सवर खरंच खूप काही विचार करण्याजोगे आहे.
माणसाला कर्तृत्वाची आस का असते? रिकग्निशन? पैसा? सत्ता? अमरता? जग मिथ्या आहे ही संकल्पना माणसाला उत्तरायुष्यात फार भेडसावते. आणि मग घेतलेले निर्णय जर परत घेता आले तर काहीतरी वेगळे आयुष्य जगलो असतो असे वाटू शकते. वैफल्याची ती भावना मला वाटते प्रत्येकाला कधीनाकधी भेडसावतेच. ती असमाधानातून असो किंवा अजून कशामुळे. वपू एका ठिकाणी म्हणाले होते, ‘म्हातारा झाला, निवृत्त झाला की माणूस गीतापठण सुरु करतो. उरलेला काल भगवंताच्या स्मृतीत कंठायला. पण तीच तर खरी गीतेची शोकांतिका आहे. गीता आहे कर्मपर. कर्मयोग वाचून आयुष्य घडवायचे की सगळे सांधे हलायला लागल्यवर कर्मयोग वाचायचा? गीता तरुणपणी वाचली तर काही अर्थ आहे. नाहीतर नंतर फक्त कर्म-अकर्म-विकर्म वितंडवाद नुसता.’ (नक्की शब्द आठवत नाही पण आशय असा होता)
‘का?’ हा प्रश्न खरंच अनादिकालापासून सतावणारा आहे. आणि याचे उत्तर आपल्याला खरंच कधीच सापडत नाही. काहीतरी समाधानकारक पळवाट नक्कीच काढतो त्यातून आपण.. पण ती शेवटी पळवाटच असते. त्या ‘का’ या प्रश्नाचे उत्तर शोधायला या सगळ्या पौराणिक-ऐतिहासिक कथा खूप उपयोगी ठरू शकतात, नाही का? त्यात प्रचंड आशय आहे. विफलता म्हणजे काय ते नीट कळायचे असेल तर भीष्माचे आयुष्य बघा. त्याने तरुणपणी केलेले कर्तृत्व आणि उत्तरआयुष्यात आलेली असहाय्य हतबलता. कर्ण तर वर्ल्डफेमस आहेच. अनेक अनेक आहे. सगळे जुने आहे, सगळे परंपरागत आहे, माहित आहे… आताचा काळ वेगळा आणि नवा आहे. नवी संकटे नव्या घटना नव्या अडचणी नव्या संस्कृती नवे लोकं ….. म्हणून ते ज्ञान टाकाऊ नाही. उलट आता त्याकडे नव्याने बघू शकतो. त्याचे अनेकपदरी अर्थ निघतात. दुर्लक्ष अक्षम्य.
‘का’ चे उत्तर बऱ्याचदा, १) पर्याय नाही २) दुसरे काय करता येईल माहित नाही ३) गरज नाही ५) सगळे हेच करतात आणि हेच रूढी-प्राप्त आहे ४) कशाला त्रास; अशा प्रकारचे असते. तुकाराम जेव्हा म्हणतात ‘ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान’ तेव्हा शिवाजी महाराजांनी जर ती उक्ती आचरली असती तर? मनाचा इनार्शिया शरीरापेक्षा शतपट जास्त आहे…. शून्य…. वर्तुळ… अलेक्झांडर आणि तो साधू. मला इथे बसल्या बसल्या मनःशांती मिळाली आहे. मग का जगाच्या मागे फिरत बसायचे? प्रत्येक निर्णय घेताना, जीवन के हर मोड पर, आपल्या मनात एक साधू असतो आणि एक अलेक्झांडर. दोघेही त्यांची त्यांची पार्श्वभूमी बघितली तर योग्य असतात. त्यांची चकमक होणे अपरिहार्य आहे. आवश्यक आहे. आणि वर्तुळ… शून्याची संकल्पना बनवणाऱ्याने त्याला आकार पण कसला जबरदस्त विचार करून दिला आहे. मी आहे तिथेच थांबलो आणि तू सगळी पेरीफेरी भटकून तिथेच आलास…. दोघांचा शेवट तिथेच. त्यामुळे फरक तो काय?
सध्या अमेरिकेत आहे. मागे एकदा भांडारकर प्रच्याविद्येचे दुर्दैवी प्रकरण झाले होते. जेम्स लेनच्या ‘शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ या पुस्तकातल्या काही उल्लेखांवरून. मग त्यावर राज्य शासनाने बंदी आणली. (की केंद्र?) पेपरात त्यावर बरेच लेख यायचे, नेटवरही आर्टिकल्स उपलब्ध आहेत. पण मुळातून कोणतीही गोष्ट वाचल्याशिवाय मत बनवायचे नाही आणि विश्वास ठेवायचा नाही असा शिरस्ता समर्थांनी पाडून दिला आहे, मूर्खांच्या लक्षणाच्या समासात ते म्हणतात – समूळ ग्रंथ पाहिल्याविण, उगाच ठेवी जो दूषण, गुण सांगता पाहे अवगुण, तोची एक पढतमुर्ख. मग लक्षात आले की बंदी भारतामध्ये आहे आणि मी अमेरिकेत. म्हणजे पुस्तक वाचायला मिळू शकते की इथे.
इथली लायब्ररी अतिशय मोठी आहे. १२ इमारती आहेत…!! १२…!!! आणि त्यातही जर पाहिजे ते पुस्तक नाही मिळाले तर ते इतर युनिव्हार्सीटीजच्या लायब्ररीतून मागवून आणून देतात…. अनेक लायब्रऱ्यांची लीग आहे.. ते पुस्तक आहे का ते धुंडाळले, तर नव्हते… म्हणून मागवून घेतले आहे. ते आज पोचले. पण आज आहे रविवार. उद्या जाऊन ते आणतो आणि खरंच काय कसे आहे ते वाचतो. नेत्यांच्या भाषणावर, वृत्तपत्रातील आणि टीव्ही-रेडियो वरच्या बातम्यांवर कमीत कमी विश्वास असल्याने आता खरंच कळेल की काय प्रकार होता ते. फक्त मला एक माहित नाही मी ते वाचल्यावर त्याबद्दल ब्लॉगवर लिहू शकतो का ते. त्यामुळे वाचल्यानंतर त्यावर लिहायचे की नाही ते अजून ठरवले नाहीये. पण ते नंतर पाहता येईल…. आधी वाचून तर बघू…..
ख्रिस्त बुद्ध गांधी कोणालाही नाही सुचली अशी थिअरी मला सुचली आहे… जगात प्रेम पाहिजे? जगात शांतता पाहिजे? जगात अहिंसा पाहिजे? सोप्पे आहे. सगळ्यांना खूप खूप काम द्या. काम करत राहिला म्हणजे फालतू विचार आणि उचापत्या सुचत नाहीत. सध्या खूप बिझी झालो परत आणि विचार करायला वेळच नाही.
आज २३ मार्च. भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांच्या बलिदानाचा दिवस. त्यांच्या स्मृतीला प्रणाम. एकदम २७ सप्टेंबर २००७ मध्ये गेलो. भगतसिंग जन्मशताब्दी. आणि आम्ही जस्ट त्याच्या १-२ महिने आधी हिस्टरी क्लब सुरु केला होता. त्याला कॉलेज, अल्युम्नी कोणाचेही फंडिंग नव्हते. बाहेर जास्त ओळखी नव्हत्या. भारत इतिहास मध्ये कुठे जायला सुरुवात झाली होती. बेल्ल्या मोडी शिकून आला होता आणि आम्ही उर्दू-फारसी चे कित्ते गिरवत होतो. क्लब ला मोठे तर करायचे होते. आणि जन्मशताब्दी चांगलं ऑकेजन वाटले. काही ज्युनिअर्सनी क्रांतीकारांचे फोटो गोळा केले होते. त्यात फेमस लोक तर होतेच पण बरेच दुर्मिळ हुतात्मेही होते. १५० च्या वर क्रांतीकारांचे फोटो आणि माहिती होती. ती संधी उचलली आणि त्याचे एक्झिबिशन भरवले. प्रचंड हिट झाले. पहिल्या २ महिन्यातच मोठा शॉट दिला. भारी वाटले. तेव्हाची खरी निकड ही रिकग्निशन आणि फंडिंग ही होती. ती पूर्ण करण्याकरता असले स्टंट करणे आवश्यक होते. आणि त्याचा फायदा ही बराच झाला. सकाळने दाखल घेतली होती. एरवी ‘पुण्यातल्या सामान्य माणसाची किमान बौद्धिक पातळी अजून नीचतम कशी करता येईल हे सकाळचे काम आहे’ असे म्हणणारे आम्ही पण तेव्हा ’सकाळ किती भारी’ असे म्हणू लागलो…! असो; हिस्टरी क्लब आणि त्याचे पराक्रम हे खरं तर एका संपूर्ण ब्लॉग चा विषय होण्याइतपत व्याप्ती असलेलल्या गोष्टी. ते यथावकाश हळू हळू येथे प्रगटतीलच… पण ही पोस्ट नोस्टाल्जिक अधिक आणि क्लब बद्दल कमी आहे. तुम्ही हे फोटो बघा -