दिसामाजी काहीतरी

Month: जानेवारी, 2010

आग जलनी चाहिये – क्रांतीकाव्य दुष्यंताचे

दुष्यंत कुमार.

नाव उच्चारताच समोर काय येते? अवघे ४२ वर्षांचे आयुष्य? आणि त्यातच केलेली हिंदी-उर्दु साहित्यातली अलौकिक कारागिरी? भारताला हा शापच आहे असे दिसते…निखिल बानर्जी, पन्नालाल घोष, केशवराव भोसले, सैगल, वसंत प्रभू, केशवसुत, बालकवी, गोविंदाग्रज… एक ना अनेक किती नवे घेऊ? यातला एक एक माणूस म्हणजे भारताला मिळालेले वरदान आहे खरं तर. पण त्यांचे आयुष्य? कसेबसे ५०-५५ वर्षे…यक्ष गंधर्वांची कामगिरीच अशी असते की त्यांची मनुष्यजन्माच्या शापातून लवकर मुक्तता होते. दुष्यंत कुमारही त्यातलेच एक. अवघे ४२ वर्ष जगले. पण तेवढ्याच अवधीत केलेली कारागिरी अशी बावनकशी आहे की काही बोलवतच नाही.

साने गुरुजींच्या मार्फत आपल्याला शाळेमध्ये क्रांती गीते म्हणजे काय ते कळले. साने गुरुजींच्या नंतरच्या काळात मराठी क्रांतीकाव्यामध्ये खूप फरक पडले. रादर ‘क्रांती’ ही संकल्पनाच बदलली,पण त्या गाण्यांमागाची बेहोशी तीच आहे. क्रांतीला सामाजिक संदर्भ असतात. वर्ग लढ्याचे ढोबळ स्वरूप तर कायम असते. शोषित-शोषक ही पार्श्वभूमी असते. हे झाले ऐतिहासिक सत्य. मग ती फ्रेंच राज्यक्रांती असो की रशिअन. चीन मधली असो की मेक्सिकोतली. पण ‘क्रांती’ चे स्वरूप त्याहूनही व्यापक आहे. अर्थ फार वेगळा आहे. तो नेमका दुष्यंत कुमार त्यांच्या एका प्रसिद्ध काव्यात पकडतात. त्यांचा एक संग्रह आहे. ‘सायेमे धूप’ म्हणून. अफाट फेमस आहे.

तेव्हा भारत किमान समाजवादाची स्वप्ने तर पाहत होता. त्याच्या पण वर्मावर बोट ठेवले आहे नेमके – ‘गिडगिडानेका यह कोई असर नही होता, पेट भरकर गालिया दो, आह भरकर बद्दुआ’ किंवा ‘भूख है तो सब्र कर, रोटी नही तो क्या हुआ, आजकाल दिल्लीमे है जेरेबहस ये मुद्दआ’

पण ही पोस्ट लिहिण्यामागची प्रेरणा म्हणजे त्यांचे विश्व-विख्यात काव्य. क्रांतीचे स्वरूप का वा कसे असावे, त्यामागची खरी प्रेरणा काय? आणि तिला सामाजिक संदर्भ जरी अटळ असले तरी त्यांच्याशिवाय सुद्धा क्रांती जगू शकते. क्रांती ही एक प्रकारची प्रोसेस आहे. जिला अंत नाही. जिच्या मागची प्रेरणा म्हणजे मनुष्याच्या जिवंततेची प्रेरणा. आणि दुदैवाने तिला संपूर्ण यश नाही. आणि म्हणूनच पुन्हा एकदा तिला अंत नाही. असो. दुष्यान्तांच्या ताजमहालाला आपल्या विटा नकोत. त्यांचे काव्यच लिहितो. खास करून शेवटच्या २ ओळी लक्षपूर्वक वाचा…अप्रतिम.

हो गयी है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए

आज ये दिवार पर्दों की तरह हिलने लगी, शर्त लेकिन थी की ये बुनियाद हिलनी चाहिए

हर सड़क पर हर गली में हर नगर हर गाव में, हाथ लहराते हुए हर लाश चलनी चाहिए

सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सारी कोशिश है की ये सूरत बदलनी चाहिए

मेरे सिनेमे नहीं तो तेरे सिनेमे सही, हो कही भी आग लेकिन आग जलनी चाहिए…

मायभूमी

मला आस आहे , तुझा ध्यास आहे
कधीचा तुला अर्पिला श्वास आहे..
तिथे चांदण्याने सडा पाडलेला,
इथे रोजचा चंद्र खग्रास आहे..

किती दिस झाले, किती तास झाले,
असे व्यर्थ मी दिन सांडीत आहे?
तिथे वेचलेल्या सुगंधी क्षणांच्या
हिशोबास मी रोज मांडीत आहे..

पुरे हे -’उठावे! मना सावरावे!’,
असे वाटते की आता खेप घ्यावी
निशिदिन नयनी जिचे रूप आहे,
अशा मायभूमीकडे झेप घ्यावी…..

.                                       – यशा

रामदास विरुद्ध तुकाराम

काय लिहू, काय लिहू? तुकारामांना हा प्रश्न कधी पडला असेल का? की आज कशावर अभंग लिहू? मोरोपंतांना? आज कोणते रामायण लिहू? निरोष्ठ झाले, हुः झाले, एका ओळीचे देखील रामायण झाले…पण त्यांना हा प्रश्न पडला असेल कधी? आता कोणते रामायण? आणि ज्ञानेश्वर? त्याचे काय? ओवीसाठी विषय शोधायचे कष्ट त्यांनी कधी घेतले असतील? आळंदीहून २७ दिवस प्रवास करून पैठण ला आले तेव्हा भावंडांनी रोज एक एक करत हरिपाठ रचला…हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा…..किती सहज…त्यासाठी डोकेफोड करायची गरज भासली का त्यांना? की विंदांना? आता स्त्रीचे कोणते रूप वर्णू? प्रत्येक नाते आणि प्रत्येक वय त्यांनी शब्दात चितारले पण तरीही नव्या कविता सुचतच गेल्या….? अगदी ‘नुकते होते नजरेत तुझ्या दिसू लागले’ पासून ते ‘दर्याच्या भरतीच्या लाटा महाराष्ट्र अंगना, कंकणनादा भिऊन ज्यांच्या शत्रू सोडिती रणा’ पर्यंत कितीक ती रूपे…’आदिमाया’ म्हणजे कल्पनाविलासाचा कहरच.

कल्पना करा, टिळक बसले आहे केसरी च्या कचेरीमध्ये, दुसऱ्या दिवशीचा पेपर छापायचा आहे आणि अग्रलेखच तयार नाही…लेखणी घेऊन विचार करताहेत. किंवा खाडिलकर, नाट्यसंगीताचे पदच सुचत नाहीये. माधव जुलीयनांना ना कधी फारसी शब्दांची उणीव भासली असेल ना पुलंना विनोदाची….अतार्किक वाटते की पुलं विनोद काय करू म्हणून सिरीयस झालेत. कालिदास निसर्गाच्या वर्णनात उपमा काय वापरू याचा विचार करतोय….२ दिवस झाले आणि दिग्दर्शक मागे लागलाय की श्लोक द्या श्लोक द्या तेव्हा कुठे ‘आषाढस्य प्रथम दिवसे मेघामाश्लिष्ट सानुम, वप्रक्रीडापरिणत गज प्रेक्षणीय ददर्श’ हे सुचले…ते पण वाक्याला वाक्य जोडून….आहे शक्य?

‘मी पाहतो ही माणसांनी सळसळणारी निर्दय शहरे, ही अप्राण कोरड, पाण्यालाच पडलेली’ हे वाक्य सुचायला काय लागते? एका जागी बसून विचार करून सुचते? की गालिब डोके खाजवून खाजवून ‘जिक्र उस परीवशका और फिरा बयान अपना’ लिहितोय…बाप जन्मात शक्य आहे का? दारा शुकोह श्रीनगर वर बेनिहाय खुश आहे. आणि विचार करतोय कसे पकडू याला शब्दात, काय लिहू, काय लिहू? त्याला ‘गार फिरदौस बर रु ए जमि अस्त’ लिहायला एका सेकंदापेक्षा जास्त वेळ लागला असेल?

मनाच्या विफालावस्थेत साहित्यिकाला ‘हे गच्च बहरलेले झाड, मी धरेन तेवढीच फांदी, कुजकी अन ठिसूळ’ लिहायला कष्ट पडत नाही. दांडेकरांना भावनेचे वर्णन करायला शब्द शोधायला लागले असतील? असंभव…गोनीदांचे मराठी म्हणजे ‘मराठी’. त्यात यमुना असो, मृण्मयी असो, गाडगेमहाराज असोत, दुर्गभ्रमण असो की भागीरथ असो…असंख्य असंख्य, अकल्प अकल्प…भाषा आणि जीवन आकळलेला माणूस, त्यांना कुठे हा शाप? बाबासाहेबांना इतिहासाचे पोर्ट्रेयल कसे करावे यासाठी नव्या कल्पना शोधाव्या लागतात? सुहास शिरवळकर, गुरुनाथ नाईक, अर्नाळकर यांना साहसकथांच्या विषयांची कमी भासते?

शेजवलकरांना कोणताही विषय द्या, पेशवाईची टवाळी करायची संधी त्यांनी सोडली नाही. त्यासाठी त्यांना कधी विचार करावा लागला नाही….की सलमान खान ला सिनेमा मध्ये कपडे कुठे काढू म्हणून विचार करावा लागत नाही….नैसर्गिकरित्या या गोष्टी जमतात…का बुवा? कारण, स्थायीभाव. तो त्या त्या व्यक्तीचा स्थायीभाव आहे.

जरी समर्थ म्हणतात की ‘दिसामाजी काहीतरी ते लिहावे’, तुकारामबावांनी सांगून ठेवले आहे – ‘तुका म्हणे व्हावी, प्राणासवे आटी, नाहीतरी गोष्टी लिहू नये’

खरं तर काय लिहावे सुचत नव्हते, तेव्हा यातून योग्य तो बोध घेतो आणि आज पोस्ट लिहित नाही. प्राणासावे आटी नसताना या ‘दिसामाजी’ ला काही अर्थ नाही, नाही का?

यशा वदे..

नमस्कार मंडळी,

आता या नवीन ब्लोगवर लेख लिहायचा सन्मान आम्हाला प्राप्त होत आहे त्याबद्दल आमचे अभिनंदन आणि आम्हाला शुभेच्छा !!! आम्हाला म्हणजे आम्ही  सोडून जे  कोणी सगळे इथे लिहिणार आहेत आणि लिहित आहेत त्यांना….

आता काय लिहू हा प्रश्नच आहे …आत्ता तसा काही सुचत सुद्धा नाहीये…पण निखीलच्या (फार गुणी मुलगा हो…(खुश का रे?)..)  खास आग्रहास्तव आम्ही हा लेखन प्रपंच मांडला आहे…त्यात आम्ही आमचे सामान्य (!) ज्ञान वापरून काही लिहिले तर ….(जाऊ दे तो एक विषय होईल …कल्पनाविस्तार प्रकारच्या निबंधामध्ये.. )

हां..तर निबंधावरून आठवलं (आता कशावरून तरी काही तरी आठवणं,आणि ते लिहिणे क्रमप्राप्त आहे आम्हाला…)…. वस्तुतः सर्व विषयांमध्ये मराठी आणि मराठी विषयामध्ये निबंध हा आमचा अतिशय आवडता प्रकार…त्यात मनासारखे लिहायची मुक्त परवानगी असल्याने आम्ही तिथे “काहीही” लिहायचो…एकदा तर “माझा आवडता छंद” मध्ये  “झोप” या विषयावर काहीतरी लिहिल्याच्या आणि नंतर म्याडमकडून बोलावणे आल्याच्या काही अंधुक आठवणी आजही आमच्या मनात आहेत…

तसा मराठीचा एक “विषय” म्हणून संबंध (बाप रे! दोन्ही शब्दांचा मराठीतच दुसरा अर्थ वेगळाच आहे!!…) तर दहावीमध्येच सुटला..(सुटला की तुटला ??? बघा आता हे पण माहिती नाहीये…भाषा बिघडत चालली आहे इथे आल्यापासून.. )  पण हा निबंध मनावर ठाण मांडून बसला…आजसुद्धा कुठल्याही विषयावर सुचत असते (आम्ही त्याला मुक्त छंदातला निबंध असे म्हणतो.) ..पण ते लिहिण्यासारखे..किंबहुना वाचण्यासारखे नसल्याने (नाही हो ..तुम्ही जसा विचार करत आहात तसले काही म्हणत नाहीये मी..) आम्ही लिहिणे बंद केले होते….आता या ब्लोगच्या निमित्ताने पुन्हा की-बोर्ड हाती धरला आहे….तुम्ही वाचा किंवा नका वाचू ..आम्ही आमचा तोफखाना चालवणारच…तर तूर्तास हे नमनाचे घडाभर तेल (तुमच्या टाळक्यावर ??) ओतले….

मग दोस्तहो ..आता होऊन जाऊ द्या …….!!!

- यशोदत्त देशपांडे

मंगेश तेंडुलकर

बालगंधर्व मध्ये तेंडूलकरांच्या चित्रांचे प्रदर्शन लागले होते… आणि स्वतः तेंडूलकर तिथे असणार १ दिवस. दहावीची परीक्षा संपली होती आणि कॉलेज सुरु व्हायचे होते. रिकामा होतो. गेलो…खूप खूप चित्रे होती…काही काही कॉमेडी होती. राजकारणावर, समाजावर भाष्य-बिष्य करणारी होती. काही काही बोर झाली. काही काही कळलीच नाहीत. पण ज्यासाठी गेलो होतो – तेंडुलकरांशी २ मिनिटे का होईना बोलायचे…आता १०वी मधला मुलगा त्यांना असे कसे सांगणार, ‘तुमच्या चित्रांचा मी चाहता आहे, मला अमुक अमुक फार आवडले, यात तुमचा विनोद खूपच सटल आहे…ब्लाब्ला…’ ते नाहीतरी मी स्वतःच हसलो असतो. मग बोलायला काहीतरी विषय तर पाहिजे…चित्रांच्या शेवटी ते एका बाकावर बसले होते आणि कोणाशी तरी गप्पा मारत होते…तिथेच ५ मिनिटे घुटमळत होतो….काय बोलू आणि कसे बोलू….एकतर सायकल चालवत एवढ्या लांब आलो होतो तेव्हा बोलल्याशिवाय परत जायचे नाही…आणि आता समोर ते बसलेत तर बोलायला काही सुचत नाही….परत एक राउंड मारली आणि सगळी चित्रे बघितली…त्यात एक काहीतरी गांधींवरती चित्र होते…शेवटी शेवटी होते ते…..ते नेमके काय होते ते आठवत नाही पण विचित्र होते हे नक्की…चला, विषय मिळाला…या चित्राविषयी बोलूयात. जो ‘तुमची चित्र आवडतात’ म्हणायला घाबरत होता तो त्याच्या एका अतिशय कॉम्प्लेक्स चित्राविषयी बोलायला निघाला…बाजूला जाऊन थांबलो. त्यांचे लक्षच नव्हते. ४-५ मिनिटे गेली तरी त्यांनी बघितलेच नाही…मी त्याचेह निरीक्षण करत होतो…अंगात हिरवा कुर्ता, त्यावर एक जाकेट, पांढरी दाढी आणि चष्मा + स्मितहास्य… शेवटी हिम्मत केलीच, ‘सर तुम्हाला एक विचारायचे होते’ त्यांनी बघितले की हा कोण उपटला मधेच…उत्तर पण नाही दिले. बहुधा त्यांच्याच विचारात असावेत. (पुलं स्टाईल प्रतीभासाधनेत व्यत्यय वगैरे) परत विचारले, ‘सर, एक प्रश्न होता’ ‘हा, काय रे?’ ‘सर आत्ता तुमची चित्र सगळी बघून झाली. पण एक कळलेच नाही, ते शेवटचे चित्र आहे ना, डावीकडचे,, दुसरे, गांधींवरचे, ते काही कळले नाही बघा, जरा एक्स्प्लेन करता का?’ धन्य मी…चायला…आधीच तो मोठा चित्रकार, त्यात त्यांचे प्रदर्शन, त्यात मी १०वी तला मुलगा, आणि वर चित्र समजले नाही तोंडावर सांगतो आणि परत ते एक्स्प्लेन करायाचे फर्मान देतो…!!! त्यांनी बघितले की हा असा काय आहे? काय विचारतो आहे ते त्यांना कळायला आधी १ मिनिट गेला…मग ते हसले आणि म्हणाले, ‘बाळा, तुला नाही कळायचे..जरा मोठा होशील तेव्हा मी काही ना सांगताच तुला कळेल’ मी जरा नाराजीच्या सुरातच म्हणालो, ‘पण मग सही तरी देता का मला?’ ते परत हसले, डायरी घेतली आणि सही करून दिली…

Follow

Get every new post delivered to your Inbox.